आरोग्य भवानी / डोंगर तुकाई मंदिर

चांदापूर, ता. परळी, जि. बीड

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले परळी येथील वैजनाथ मंदिर प्रसिद्ध आहे. कोकणातून वैजनाथाला भेटायला आलेल्या योगेश्वरी देवीचे प्रसिद्ध मंदिर अंबाजोगाई येथे आहे. या जिल्ह्यात देवीची अनेक प्राचीन व प्रसिद्ध मंदिरे आहेत. या शक्तिपीठांच्या ठायी अनेक सत्पुरुषांनी साधना केली आहे. परळी शहरानजीक असलेले डोंगर तुकाई मंदिर त्यापैकीच एक आहे. या मंदिरात नृसिंह सरस्वती यांचे काहीकाळ वास्तव्य होते. त्यामुळे हे स्थान ‘प्रति गाणगापूर’ म्हणून ओळखले जाते. येथील जागृत देवी नवसाला पावते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

हे देवस्थान सुमारे आठशे वर्षांपूर्वीचे असल्याचे येथील पुजारी सांगतात. मंदिर असलेल्या डोंगरात अनेक दुर्मिळ औषधी वनस्पती आढळतात, त्यामुळे देवीला ‘आरोग्य भवानी’ म्हणून ओळखले जाते. मंदिराबाबत प्रचलित आख्यायिका मंदिराचा कालखंड रामायण काळाशी जोडते. याबाबतची कथा अशी की रावणाने सीतेचे हरण केल्यानंतर श्रीराम सीतेच्या शोधात रानोमाळ भटकत होते. त्यावेळी रामाची परीक्षा पाहण्याचा विचार पार्वतीच्या मनात आला. ती सीतेचे रूप घेऊन रामासमोर प्रकट झाली. रामाने पार्वतीला लगेचच ओळखले व ‘तू का आलीस आई?’ असा प्रश्न केला. त्यावरून येथील देवीला ‘तुकाई’ नाव पडले, असे सांगितले जाते.

दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार, चांदापूर गावातील एक ब्राह्मण देवीचा निःसीम भक्त होता. तो दर पौर्णिमेला न चुकता तुळजापूरच्या भवानी मातेच्या दर्शनासाठी पायी जात असे. पुढे वृद्धापकाळाने त्याला ही वारी झेपेनाशी झाली. त्यावेळी त्याने देवीला आपल्या गावी येण्याची विनंती केली. ‘मी तुझ्या मागोमाग येईन, परंतु चालत असताना तू ज्या ठिकाणी मागे वळून पाहशील, त्याच ठिकाणी मी स्थापित होईन’, असे म्हणून देवी त्याच्या मागोमाग चालू लागली. गावाजवळ येताच ब्राह्मणाचा संयम संपला व त्याने मागे वळून पाहिले. त्याच क्षणी देवी पाषाण रूपात येथे स्थिर झाली. या मंदिराच्या तळघरातील गुहेत श्री नृसिंह सरस्वती यांनी सन १४२० मध्ये एक वर्ष वास्तव्य केल्याचा उल्लेख ‘गुरुचरित्र’ ग्रंथात असल्याचे सांगितले जाते.

परळी वैजनाथ मंदिरापासून सुमारे सात किलोमीटर अंतरावर परळी-चांदापूर रस्त्यावर उंच डोंगरावर हे मंदिर आहे. डोंगराच्या पायथ्यापासून मंदिरापर्यंत येण्यासाठी सुमारे दीडशे पायऱ्या असलेला पायरीमार्ग आहे. याशिवाय थेट मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या वाहनतळापर्यंत येण्यासाठी आता पक्का रस्ताही झालेला आहे. मंदिराभोवती असलेल्या भक्कम तटबंदीत प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारात सात पायऱ्या आहेत. प्रवेशद्वारासमोर डाव्या बाजूला एक लहान कुंड आहे. त्याच्या बाजूला वज्रपीठावर स्थानिक देवतांचे पाच पाषाण आहेत. मंदिराच्या प्रशस्त प्रांगणात विविध प्रकारचे वृक्ष आहेत. प्रांगणात मंदिरासमोर तुळशी वृंदावन आहे. त्याच्या दोन्ही बाजूला दोन चौथरे व त्यावर गोलाकार, वर निमुळत्या होत गेलेल्या दीपमाळा आहेत.

सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. प्रांगणापेक्षा उंचावर असलेल्या सभामंडपास दोन पायऱ्या आहेत. सभामंडप अर्धखुल्या स्वरूपाचा आहे. तो अलीकडील काळात सिमेंट काँक्रिटने बांधलेला आहे. सभामंडपात डाव्या व उजव्या बाजूला प्रत्येकी सहा चौकोनी स्तंभ आहेत. पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. गर्भगृहाचे दगडी बांधकाम हेमाडपंती शैलीतील आहे. गर्भगृहाचे प्रवेशद्वार साधेसे आहे. त्याला लोखंडी जाळीदार झडपा आहेत. गर्भगृहात उजेड व हवा येण्यासाठी झरोके आहेत. गर्भगृहाच्या अष्टकोनी वितानावर चक्राकार नक्षी आहे.

गर्भगृहात मागील भिंतीलगत वज्रपीठावर डोंगर तुकाई व आरोग्य भवानी देवीच्या मूर्ती आहेत. दोन्ही मूर्ती काळ्या पाषाणातील आहेत. गर्भगृहात उजव्या बाजूला जमिनीत अरुंद बोळ आहे. या बोळात पायऱ्या आहेत. या पायऱ्या गर्भगृहाच्या खालील गुहेत जातात. पायऱ्यांवरून एका वेळी एकच माणूस खाली उतरू शकतो. गुहेत श्री नृसिंह सरस्वती यांच्या चरण पादुका व मूर्ती आहेत. याच गुहेत नृसिंह सरस्वती यांनी एक वर्ष वास्तव्य होते. त्यामुळेच या स्थानाला ‘प्रति गाणगापूर’ म्हणून ओळखले जाते. गर्भगृहाच्या बाहेरून प्रदक्षिणा मार्ग आहे. गर्भगृहाच्या छतावर चौकोनी शिखर आहे. वर निमुळत्या होत गेलेल्या शिखरावर उभ्या धारेची नक्षी आहे. शीर्षभागी आमलक व त्यावर कळस आहे. मंदिराच्या प्रांगणात देवस्थानचे कार्यालय, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सभागृह तसेच इतर वास्तू आहेत.
शारदीय नवरात्रोत्सव हा येथील मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी मंदिरात दर्शनासाठी सलग दहा दिवस भाविकांचा ओघ सुरू असतो. मंदिरात मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंतीचा सोहळा साजरा केला जातो. यावेळी राज्यातील हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी, तसेच नृसिंह सरस्वती यांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी आवर्जून येतात. मंदिरात चैत्र पाडवा, दसरा, दिवाळी, महाशिवरात्री, मकरसंक्रांत, श्रावण मास, नागपंचमी, कोजागिरी पौर्णिमा आदी सण व उत्सव साजरे केले जातात. या सर्व उत्सवांच्या वेळी मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

उपयुक्त माहिती:

  • परळी येथून ६ किमी अंतरावर
  • बीड येथून ९७ किमी अंतरावर
  • परळी येथून एसटीची सुविधा आहे
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीची सुविधा आहे

स्वास्थ्य भवानी/डोंगर तुकई मंदिर

चंदापुर, ताल. परली, जिला. बीड

Back To Home