महालक्ष्मी मंदिर

शिदोड, ता. बीड, जि. बीड

महालक्ष्मी ही लक्ष्मी देवीचे रूप आहे. तिला विष्णूप्रिया, पद्मावती, हिरण्यवर्णा, आदित्यवर्णा, प्रभासा, यशसा, ज्वलंती, पद्मवर्णा, माधवी, चंद्रालक्ष्मी अशा विविध नावांनी ओळखले जाते. महालक्ष्मी देवीच्या आशीर्वादाने मानवी जीवनात यश, धन, कीर्ती, स्वास्थ्य, स्थिरता येऊन माणसाची प्रगती होते, अशी धारणा आहे. त्यामुळेच कलियुगात अधिकाधिक भाविक महालक्ष्मीची पूजा करतात. कोल्हापूर हे महालक्ष्मी देवीचे मुख्य शक्तीपीठ आहे, तर भारतात अनेक मंदिरे महालक्ष्मी देवीची उपपीठे म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यापैकीच एक मंदिर बीड शहराजवळील शिदोड या गावात आहे. येथील जागृत देवी नवसाला पावते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

या मंदिराबाबत आख्यायिका अशी की बीडचे रहिवासी असलेले शिदोजी देशमुख हे बीड परगण्याचे तत्कालीन वतनदार होते. ‘देशमुख’ हे पद महसूल गोळा करणारे आणि प्रशासकीय अधिकार असलेले पद असल्याने समाजात त्यांना मोठा मान होता. असे असूनही त्यांची ओळख ही एक निस्सीम देवीभक्त म्हणून अधिक होती. ते कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीचे परमभक्त होते. त्या काळात वाहतुकीची साधने अत्यंत मर्यादित होती, प्रवास कष्टाचा होता, तरीही शिदोजी देशमुख न चुकता दर महिन्याच्या पौर्णिमेला बीड ते कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिर अशी शेकडो मैलांची वारी करत असत. जसजसे शिदोजी देशमुख यांचे वय वाढत गेले, तसतसे त्यांचे शरीर थकू लागले. वृद्धापकाळामुळे कोल्हापूरची खडतर वारी करणे त्यांना अशक्य होऊ लागले. आपल्या लाडक्या भक्ताची ही अवस्था आणि त्याची देवी दर्शनासाठीची तगमग पाहून कोल्हापूरच्या अंबाबाईने त्यांना दृष्टांत दिला. देवीने स्वप्नात येऊन सांगितले की “तू आता माझ्या दर्शनासाठी इतक्या दूर येण्याचे कष्ट घेऊ नकोस. तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झाले आहे त्यामुळे मीच तुझ्या गावात वास्तव्यास येत आहे.” हा दृष्टांत झाल्यानंतर, शिदोजी देशमुखांना बीडजवळील शिदोड गावात देवीचे अस्तित्व जाणवले. काहींच्या मते, त्यांना जमिनीत देवीची मूर्ती सापडली, तर काहींच्या मते त्यांनी कोल्हापूरहून आणलेल्या तांदळा स्वरूपातील मूर्तीची स्थापना केली. या घटनेमुळे शिदोड गाव हे ‘देवीचे शिदोड’ म्हणून ओळखले जाऊ लागले. कोल्हापूरच्या देवीचा अंश या ठिकाणी असल्यामुळे या मंदिराला कोल्हापूर पीठाचे उपपीठ मानले जाते.

हेमाडपंती शैलीचे हे मंदिर सुमारे हजार वर्षांपूर्वीचे असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. सन १७४९ साली लक्ष्मण रघुनाथ निरंतर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला असल्याची नोंद आहे. हे मंदिर गावापासून काही अंतरावर वसलेले आहे आणि मंदिरापर्यंत पक्का रस्ता आहे. मंदिरासमोर प्रशस्त वाहनतळ आहे व येथेच एक प्राचीन वटवृक्ष आहे. वटवृक्षाच्या भोवती प्रशस्त पार बांधलेला असून त्यावर मारुती व इतर स्थानिक देवतांच्या मूर्ती आहेत. पारावर लोखंडी नळ्या आणि त्यावर पत्र्याचे छत आहे. मंदिरास सुमारे बारा फूट उंच भक्कम तटबंदी आहे व त्यात दुमजली प्रवेशद्वार आहे. मंदिर रस्त्यापेक्षा उंचावर असल्यामुळे प्रवेशद्वारास पाच पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला चौथरे आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला भिंतींवर द्वारपाल चित्रे रंगवलेली आहेत. प्रवेशद्वारास नक्षीदार लाकडी द्वारशाखा व झडपा आहेत, तर ललाटबिंबावर गणेश शिल्प आहे. वरील मजल्यावर नगारखाना आहे. प्रांगणातून नगारखान्याकडे जाण्यासाठी प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूने जिना आहे. मंदिराच्या प्रांगणात विविध प्रकारची झाडे लावून सुंदर उद्यान तयार केलेले आहे. प्रांगणातील फरसबंदी पायवाटांच्या दोन्ही बाजूला लोखंडी सुरक्षा कठडे आहेत.

सभामंडप, मुख्य सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी रचना असलेल्या या मंदिराचा सभामंडप अर्धखुल्या स्वरूपाचा आहे. हे बांधकाम अलीकडील काळात सिमेंट काँक्रीटचे केलेले आहे. सभामंडपात एकूण सात स्तंभ असून स्तंभांवर तुळई व तुळईवर छत आहे. तुळईवर पानाफुलांच्या वेली व वितानावर चक्रनक्षी रंगवलेल्या आहेत. सभामंडपात प्राचीन पाषाणी चौथरा आहे व त्यावर छतातून पार झालेली षटकोनी दीपमाळ आहे. दीपमाळेचा खालील अर्धा भाग छताच्या खाली तर वरील अर्धा भाग छताच्या वर आहे. या चौथऱ्यास लागून गरुड मूर्ती व चौथऱ्यावर स्थानिक देवतांच्या शेंदूरचर्चित पाषाण मूर्ती आहेत. पुढे मुख्य सभामंडप, अंतराळ व गर्भगृह आहे. मुख्य सभामंडपाचे प्रवेशद्वार कमी उंचीचे असून भाविकांना आत प्रवेश करताना वाकून यावे लागते. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला द्वारपाल चित्रे आहेत आणि ललाटबिंबावर गणेश शिल्प आहे. प्रवेशद्वाराच्या वर अर्धचंद्राकार कमान आहे, ज्यात उठाव शैलीतील पद्मशिल्प आहे. मुख्य सभामंडपात डाव्या व उजव्या बाजूला आणखी दोन दरवाजे आहेत. सभामंडपात एकूण बारा नक्षीदार चौकोनी स्तंभ आहेत. बारापैकी चार कोपऱ्यातील चार स्तंभांत चौकोन, षट्कोन असे भौमितिक आकार आहेत. अंतराळात जमिनीवर मध्यभागी कासव शिल्प आहे. मुख्य सभामंडपात अंतराळाच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या व उजव्या बाजूला दोन देवकोष्ठके आहेत. त्यातील एका देवकोष्ठकात महाकाली व दुसऱ्यात महासरस्वती देवीची मूर्ती आहे.

अंतराळाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला स्वागत सुंदरी चित्रे आहेत. द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी आणि ललाटबिंबावर गणपती शिल्प आहे. मंडारकावर चंद्रशिला असून कीर्तीमुख कोरलेले आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारास स्तंभशाखा आहेत आणि ललाटबिंबावर गणपती शिल्प आहे. ललाटपट्टीत पानाफुलांची नक्षी पहावयास मिळते. गर्भगृहात मागील भिंतीलगत वज्रपीठावर महालक्ष्मी देवीची काळ्या पाषाणातील चतुर्भुज मूर्ती आहे. मूर्तीच्या हातात गदा, पद्म, शंख व चक्र आहेत, तसेच अंगावर वस्त्रे व अलंकार कोरलेले आहेत. डोक्यावर मुकुट आहे, ज्यामध्ये नाग कोरलेला आहे. देवीच्या हातात कडे, कांकण व पायात तोडे आहेत. मूर्तीच्या मागील प्रभावळीत दोन्ही बाजूला दोन स्तंभ आणि त्यावर पर्ण व पुष्पनक्षी तोरण आहे. प्रभावळीत तोरणाखाली दोन्ही बाजूला गजराज व मध्यभागी पंचफणी नाग शिल्प आहे. मंदिराच्या छतावर चार थरांचे ताराकृती शिखर आहे. शिखराच्या खालील तीन थरात देवकोष्ठके आहेत. त्यामध्ये देवमूर्ती आणि स्तंभनक्षी आहेत. शिखराच्या चौथ्या थरात एकावर एक असे दोन आमलक आणि त्यावर कळस आहे.

प्रांगणात मंदिराच्या बाजूला कोरीव पाषाणात बांधलेली एक पुष्करणी आहे. पुष्करणीत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. या पायरी मार्गाच्या दोन्ही बाजूस भिंतीत पहारेकरी कक्ष आहेत.

शारदीय नवरात्रौत्सव हा महालक्ष्मी मंदिराचा मुख्य वार्षिक उत्सव आहे. यावेळी सलग दहा दिवस दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी असते. देवीला साडी-चोळीचा आहेर अर्पण करून खणा-नारळाने ओटी भरली जाते. नवसाचे पाळणे, मणी, मंगळसूत्र, बांगड्या देवीस अर्पण करण्यात येतात. श्रावण मास, मार्गशीर्ष मास तसेच मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, अमावस्या, अष्टमी आदी दिवशी मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते.

उपयुक्त माहिती:

  • बीडपासून ६ किमी अंतरावर
  • बीड येथून एसटी व खासगी वाहनांची सुविधा
  • राज्यातील अनेक शहरांतून बीडसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : प्रज्वल पुजारी, मो. ९८३४४५९५२१,
  • प्रदिप डोंगरे, मो. ८७६६४३३५८६

महालक्ष्मी मंदिर

शिदोद, ताल. बीड, जिला. बीड

Back To Home