भारतात मंदिरांची परंपरा जितकी प्राचीन आहे, त्याहून मठ, गुरुकुल आणि आश्रमांची परंपरा प्राचीन आहे. गुरु-शिष्य परंपरेतील मठांना मंदिरांपेक्षा कणभर अधिक महत्त्व आहे. त्यामुळेच देशात विविध पंथ आणि परंपरेतील हजारो मठ शेकडो वर्षांपासून कार्यरत आहेत. येथील प्राचीन गुरु-शिष्य परंपरा, त्यांचे रीतिरिवाज व शासकीय मानमरातब देखील कायम आहेत. समाजात व जनमानसात या मठांवरील श्रद्धा आजही कायम आहे. असाच एक प्राचीन मठ मुखेड तालुक्यातील बेटमोगरा गावी आहे. सुमारे हजार वर्षांची परंपरा असलेल्या येथील मठात आज १२८ वे महंत कार्यरत आहेत. या परिसरातील लोकांवर या मठाचा प्रभाव आजही कायम आहे.
चालुक्य राजांच्या काळात या मठाची स्थापना झाली असल्याचे येथील आजचे महंत सांगतात. नंतरच्या काळात बहामनी सत्तांनी या मठाचे अधिकार कायम ठेवले असल्याचा ताम्रपट येथे पहावयास मिळतो. त्यानंतर औरंगजेब व निजामशाहीनेदेखील सनदा देऊन या मठाचे अधिकार व जहागिरी कायम केल्या आहेत.
हा मठ म्हणजे किल्लेवजा लहानशी गढी आहे. मठाला भक्कम तटबंदी असून प्रवेशद्वारासमोर कोरीव दगडी पायऱ्या आहेत.
प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस चौकोनी स्तंभ आहेत. प्रवेशद्वारास तांब्याचे भालेटोक असलेल्या प्राचीन लाकडी झडपा आहेत. प्रवेशद्वाराच्या आत दोन्ही बाजूस पहारेकरी कक्ष आहेत. मठाच्या फरसबंदी प्रांगणात रंगमंच व उजव्या बाजूस एक इमारत आहे. येथे सध्याचे महंत गुरूशाळा चालवतात. येथे ओसरीवर असलेल्या चौथऱ्यावर औरंगजेब, निजाम यांनी मठास दिलेल्या सनदा तसेच बहामनी शासकांनी दिलेले ताम्रपट, सेवेकऱ्यांचे बिल्ले, शासकीय शिक्के, छत्र, चामर, चौऱ्या अशा अनेक प्राचीन वस्तू आहेत.
पुढे मठाच्या मुख्य इमारतीत जाण्यासाठी प्रवेशद्वार आहे. ही इमारत सन १७०५ साली बांधण्यात आली असल्याचे सांगितले जाते. प्रवेशद्वाराच्या पहिल्या पायरीवर मुघल व निजामकालीन नाणी ठोकलेली आहेत. प्रवेशद्वारातून आत येताच उजवीकडे शिवलिंग बादशाह यांच्या गादीचे स्थान आणि डावीकडे पहारेकरी कक्ष आहे. येथून अरूंद मार्गाने वळणे घेत पुढे गेल्यावर एका कक्षात हसन आणि हुसेन या मुस्लिम दैवतांची प्रतीके असलेल्या पितळी ढाळकाठ्या व त्यांचे मानमरातब असलेले पितळी वाघकाठ्या आहेत. येथे साजऱ्या होणाऱ्या मोहरमच्या मिरवणुकीत या काठ्या वापरल्या जातात. असे सांगितले जाते की या पितळी काठ्या सन १६६८ साली औरंगजेबाने मठास भेट दिल्या होत्या. येथून पुढे एका लहान कक्षात वज्रपीठावर या मठाचे मूळ पुरुष मानले गेलेल्या नंदी गणांचे प्रतीक म्हणून नंदी कलश व काही पितळी मूर्ती ठेवलेल्या आहेत. वज्रपीठावर मुघलकालीन पितळी दर्पणपेटी आहे. येथून पुढे सुमारे चार फूट उंच व तीन फूट रुंद भुयारी मार्ग आहे. या मार्गाने पुढे आल्यावर एका अरुंद कक्षात शिवलिंग स्वामी यांच्या अकरा गुरूंची एकत्रित समाधी आहे. समाधीच्या चौथऱ्यावर अकरा शिवलिंगसदृश पाषाण आहेत. येथून पुढे बंद केलेला भुयारी मार्ग आहे. पूर्वी हा भुयारी मार्ग येथून अकरा किलोमीटर अंतरावर असलेल्या शंकर मठाशेजारील रानात निघत असे, असे येथील महंत सांगतात. या कक्षातील भिंतीतील देवकोष्ठकांत काही पितळी मुखवटे आहेत. बाजूला दुसरे एक कक्ष असून येथे शिवलिंग स्वामींचे उत्तराधिकारी जिवक्षेत्र आणि शिवक्षेत्र यांच्या समाध्या आहेत. समाधीच्या चौथऱ्यावर ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या पितळी मूर्ती आहेत.
येथून पुढे गढीच्या वरच्या भागात असलेल्या मोकळ्या मैदानात जाण्यासाठी उभ्या चढाचा पाषाणी पायरीमार्ग आहे. पायरीमार्ग चढून वर आल्यावर डाव्या बाजूला नगारखाना आहे. नगारखान्यात लहान-मोठ्या आकाराचे विविध काळातील नगारे ठेवलेले आहेत. सर्व उत्सवांच्या व नित्य आरतीच्या वेळी येथील नगारे वाजवले जातात.
नगारखान्याच्या बाजूला दक्षिणमुखी जगदंबा मातेची मूर्ती असलेली मेघडंबरी आहे. या मूर्तीची स्थापना शिवलिंग स्वामींनी सन १७०५ साली केली असल्याचे सांगितले जाते. येथून पुढे न्यायमंदिर आहे. न्यायमंदिराच्या मधोमध वर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. पायरीमार्गाच्या दोन्ही बाजूला सेवेकरी कक्ष आहेत. येथे कायम सेवक दक्ष असत. येथून वर न्यायाधीश आसन आहे. शिवलिंग स्वामी येथे बसून स्थानिक वादविवादांचा न्यायनिवाडा करीत असत. हे न्यायासन मुघल शैलीत घडवलेले आहे व त्यावर मुघल शैलीतील नक्षीकाम केलेले दिसून येते. या कक्षात चारही बाजूला वातायने आहेत.
या न्यायमंदिराच्या छतावर मधोमध मुख्य शिखर आहे. चारही बाजूंनी इतर सहा शिखरे आहेत. सर्व शिखरे घुमटाकार आहेत. मुख्य शिखरावर कळस व इतर सहा शिखरांवर चांदतारा हे मुस्लिम धर्मियांचे चिन्ह आहे. या न्यायमंदिरात सर्व धर्मीय न्यायनिवाडा केला जात असे म्हणून हे चिन्ह असल्याचे सांगितले जाते.
या मठात महाशिवरात्री, दत्त जयंती, गुरुपौर्णिमा आदी वार्षिक उत्सवांचे आयोजन केले जाते. सर्व उत्सवांच्या वेळी मठात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महाशिवरात्री यात्रा उत्सवाच्या वेळी गुरू महाराजांची पालखी ढोल-ताशांच्या गजरात, गुलाल उधळीत मिरवणुकीने ग्रामप्रदक्षिणा करते. यावेळी हजारो भाविक महाराजांच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी येतात.