दत्तबर्डी दत्त मंदिर

दत्तबर्डी टेकडी, हदगाव, ता. हदगाव, जि. नांदेड

महाराष्ट्रात दत्तभक्तीची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा जोपासणारा दत्तसंप्रदाय शेकडो वर्षांपासून नांदत आहे. पंधराव्या शतकात नृसिंह सरस्वती यांनी दत्त संप्रदायाचा शिस्तबद्ध प्रचार व प्रसार केला. तरीही मूलतः दत्तभक्ती व दत्त देवता प्राचीन काळापासून पूजली जाते. हिंदूंच्या महानुभाव, नाथ, वारकरी तसेच समर्थ आदी संप्रदायांतही श्रीदत्तात्रेयांविषयी उत्कट श्रद्धाभाव आहे. पुराणे व अर्वाचीन पाच उपनिषदांतून श्रीदत्तात्रेयांना वर्णाश्रमधर्माची प्रतिष्ठा राखणारा, गुरुतत्त्वाचा आदर्श आणि योगाचा उपदेशक म्हटले आहे. नांदेड जिल्ह्यातील हदगाव शहराजवळ असलेल्या दत्तबर्डी टेकडीवरील मंदिरात दत्तात्रेयांची उपासना केली जाते. जिल्ह्यातील दत्त उपासकांबरोबरच विविध संप्रदायांतील भाविक येथे मोठ्या प्रमाणावर दर्शनास येतात.

हदगाव शहरापासून काही अंतरावर असलेल्या दत्तबर्डी टेकडीवर हे हेमाडपंती शैलीचे प्राचीन मंदिर उभे आहे. ग्रामस्थांच्या मते हे मंदिर सातशे ते आठशे वर्षे जुने आहे. परंतु त्याबाबत ठोस माहिती किंवा नोंदी उपलब्ध नाहीत. मंदिराबाबत एक आख्यायिका अशी की पूर्वी या टेकडीवर एका दत्तभक्त ऋषींचा आश्रम होता. आपल्याला श्रीदत्तात्रेयांचे प्रत्यक्ष दर्शन व्हावे म्हणून अन्नपाणी त्यागून ते या ठिकाणी तपश्चर्येस बसले. बारा वर्षाच्या कठीण तपश्चर्येनंतर भगवान श्रीदत्त प्रसन्न झाले. त्यांनी ऋषींना ‘वर माग’ असे सांगितले, तेव्हा ‘आपण याच टेकडीवर वास करावा’, अशी इच्छा ऋषींनी प्रकट केली. ऋषींच्या भक्तीने प्रसन्न होऊन श्रीदत्तात्रेय माता अनसुया आणि पिता अत्रि ऋषी यांच्यासह या टेकडीवर विराजमान झाले. त्यामुळेच या टेकडीला ‘दत्तबर्डी’ हे नामाभिधान प्राप्त झाले आहे.
हदगाव शहराजवळील एका उंच टेकडीवर हे मंदिर वसले आहे. मंदिरापर्यंत येण्यासाठी पक्की सडक आहे, तसेच मंदिरासमोर प्रशस्त वाहनतळ आहे. मंदिराभोवती असलेल्या भक्कम तटबंदीमध्ये दुमजली प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारात दोन्ही बाजूला प्रत्येकी तीन देवकोष्ठके आहेत. त्यात विविध देवी-देवतांची शिल्पे आहेत. प्रवेशद्वाराच्या वरील मजल्यावर नगारखाना आहे. प्रवेशद्वाराच्या छतावर तीन मेघडंबऱ्या आहेत, ज्यांत देवशिल्पे आहेत. प्रवेशद्वारात लोखंडी जाळीदार झडपा आणि त्यात दिंडी दरवाजा आहे. हे प्रवेशद्वार मंदिराच्या मागील बाजूला आहे, जेथून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. तटबंदीत मंदिराच्या समोरील बाजूस सात मजल्याचे ‘गोपुरम्’ प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या प्रत्येक मजल्यावर देवकोष्ठके, त्यात विविध देवतांच्या मूर्ती आणि शीर्षभागी शाल पद्धतीचे आडव्या रचनेचे शिखर आहे. शिखराच्या शीर्षभागी आडव्या ओळीत पाच कळस आहेत. मंदिराच्या फरसबंदी केलेल्या प्रशस्त प्रांगणात तटबंदीला लागून दुमजली इमारती आहेत. यात भक्त निवास, महंत, पुजारी व सेवेकऱ्यांची निवासस्थाने, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी भवन, देवस्थानचे कार्यालय व इतर वास्तू आहेत. प्रांगणात मंदिराच्या उजव्या व डाव्या बाजूला चौथरे आणि त्यावर दीपस्तंभ आहेत. दीपस्तंभाशेजारी धुनीगृह व तुळशी वृंदावन आहे. तुळशी वृंदावनाला लागून स्थानिक देवतांची पाषाणे आहेत. येथे दिवंगत महंतांची समाधी देखील आहे.

सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची संरचना आहे. सभामंडप अर्धखुल्या स्वरूपाचा आहे. त्यात गोलाकार नक्षीदार स्तंभ आहेत. सर्व स्तंभ गोलाकार स्तंभपादावर उभे आहेत. स्तंभदांड्यावर उभ्या धारेची नक्षी व शीर्षकमळ पाहायला मिळते. सभामंडपात गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर शिवपिंडी व स्टेनलेस स्टीलचा आडवा कठडा आहे. येथे मेजावर दत्त पादुका आहेत. गर्भगृहाच्या द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी कोरलेली आहे. प्रवेशद्वारास नक्षीदार लाकडी झडपा आहेत. गर्भगृहात जमिनीवर पितळी मुखवटा असलेली शिवपिंडी आहे. गर्भगृहात मागील भिंतीलगत वज्रपीठावर एकमुखी दत्तात्रेयांची द्विभुज मूर्ती विराजमान आहे. दत्तात्रेयांच्या मागे गोशिल्प व त्रिशूल प्रतिमा आणि पुढे पितळी कमंडलू आहे. गर्भगृहाच्या बाह्य बाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे.

मंदिराच्या छतावर चोहोबाजूंनी बाशिंगी कठडा आहे. या कठड्यात शाल व कुट संरचनेची लघू शिखरे आहेत. गर्भगृहाच्या छतावर तीन थरांचे गोलाकार व वर निमुळते होत गेलेले शिखर शोभून दिसते. शिखराच्या शीर्षभागी एकावर एक असे तीन आमलक व कळस आहेत.

याच टेकडीवर, दत्त मंदिरापासून काही अंतरावर अनसुया माता, अन्नपूर्णा व रेणुका देवी यांचे मंदिर आहे. मंदिरासमोर दीपमाळ आहे. सभामंडप व दोन गर्भगृहे अशी या मंदिराची संरचना आहे. सभामंडपास समोरील बाजूने दोन प्रवेशद्वारे आहेत. मंदिर प्रांगणापेक्षा उंचावर असल्यामुळे प्रवेशद्वारास पायऱ्या आहेत. सभामंडप बंदिस्त स्वरूपाचा आहे, मात्र उजेड व हवा येण्यासाठी यात वातायने आहेत. गर्भगृहाच्या बाह्यभिंतींवर व आत काचेची मिनाकारी सजावट केलेली आहे. दोन्ही गर्भगृहांच्या प्रवेशद्वारांस नक्षीदार लाकडी झडपा बसविल्या आहेत.

डावीकडील गर्भगृहात वज्रपीठावर अनसुया माता व एकमुखी श्रीदत्तात्रेय यांच्या पितळी मूर्ती आहेत. उजव्या बाजूच्या गर्भगृहात वज्रपीठावर रेणुका देवी व अन्नपूर्णा देवी यांच्या पितळी मूर्ती आहेत. अनसुया मंदिराच्या मागील बाजूला अत्रि ऋषींचे मंदिर आहे. मंदिरात जमिनीवर शिवपिंडी आहे. टेकडीच्या दुसऱ्या टोकाला अनसुया मातेची बहीण सायमाय यांचे मंदिर आहे.

येथे दत्त जयंतीचा मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतो. यावेळी सात दिवसांच्या हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. सलग सात दिवस मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन, संगीत, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन असते. शेवटच्या दिवशी श्रीदत्तात्रेयांची पालखी मिरवणूक काढण्यात येते. गुरुपौर्णिमा, हनुमान जयंती, गणेश जयंती, शारदीय नवरात्र, चैत्र पाडवा, दसरा, दिवाळी, कोजागिरी पौर्णिमा, कार्तिक पौर्णिमा, श्रावण मास आदी वर्षभरातील सण व उत्सव मंदिरात साजरे केले जातात. सर्व उत्सवांच्या वेळी परिसरातील हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी येथे येतात. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या वेळी दत्त शिखर येथील महंत, दत्तबर्डीच्या महंतांच्या भेटीला येतात. मंदिरात दर्शनाला येणाऱ्या भाविकांची रोज वर्दळ असते. त्यातही गुरुवारी भाविकांची विशेष गर्दी असते.

उपयुक्त माहिती:

  • हदगाव येथून २ किमी अंतरावर
  • नांदेड येथून ७० किमी अंतरावर
  • जिल्ह्यातील अनेक शहरांतून हदगावसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय

दत्तबर्डी दत्त मंदिर दत्तबार्डी हिल,

हदगांव, ताल। हदगांव, जिला. नांदेड़

Back To Home