सिद्धेश्वर मंदिर

होट्टल, ता. देगलूर, जि. नांदेड

नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यात वसलेले होट्टल हे गाव महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहास आणि स्थापत्यकलेचा एक अनमोल ठेवा आहे. या गावाचे प्राचीन नाव ‘पोटल’ किंवा ‘पोटलनगरी’ असे होते. ११व्या शतकात कल्याणीच्या चालुक्य राजांच्या काळात हे एक महत्त्वाचे शहर होते. ऐतिहासिक नोंदींनुसार, येथे एकेकाळी भव्य प्रासाद आणि अनेक मंदिरे होती. आजही येथे असलेली मंदिरे त्याची साक्ष देतात, म्हणूनच हे गाव ‘मंदिरांचे गाव’ म्हणून प्रसिद्ध आहे. येथील सिद्धेश्वर मंदिर हे स्थापत्य आणि शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. या मंदिराच्या बाहेरील भिंतींवरील नृत्यमुद्रेतील गणेश, विविध अप्सरा आणि सुरसुंदरींची शिल्पे आजही पाहणाऱ्याला थक्क करतात.

प्राचीन समृद्ध शिल्पकलेची साक्ष देणारी अनेक मंदिरे देशभरात पाहायला मिळतात. खजुराहो मंदिर समूह, कोणार्क येथील सूर्यमंदिर, अजिंठा लेणी, वेरूळचे कैलास मंदिर, कोल्हापूर येथील खिद्रापूर मंदिर, महाबलीपुरम येथील रथ मंदिरे, हम्पी मंदिर समूह अशा कितीतरी मंदिरे व लेणी यांची उदाहरणे आहेत. प्राचीन शिल्पकलेचा समृद्ध वारसा सांगणाऱ्या मंदिरांच्या पंगतीत होट्टल येथील सिद्धेश्वर मंदिराचे स्थानही विशेष आहे. येथील महादेवाचे स्थान जागृत आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

देगलूर तालुक्यात चालुक्य राजघराण्याशी संबंधित सापडलेल्या एकूण २३ शिलालेखांपैकी ३ शिलालेख होट्टल गावात मिळाले आहेत. त्यामध्ये येथील मंदिरांना दिलेल्या दानासंदर्भात उल्लेख आहेत. यातील पहिला शिलालेख इ.स. १०७० मधील व शेवटचा इ.स. ११२० या वर्षाचा आहे. यावरून हे मंदिर इ.स. १०७० पेक्षाही जुने, म्हणजे सुमारे हजार वर्षे प्राचीन आहे. ही मंदिरे कल्याणी चालुक्य राजवंशातील राजांच्या किंवा मांडलिक राजाच्या पदरी असलेल्या ‘देव’ नावाच्या महसुली अधिकाऱ्याने बांधली असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

मंदिराभोवती प्रशस्त प्रांगण आहे. या प्रांगणात उंच अधिष्ठानावर सिद्धेश्वर मंदिर उभे आहे. अधिष्ठानात अधःपाद, कणी, पुष्पथर व उपान असे चार थर आहेत व त्यावर मंदिर उभारण्यात आले आहे. ताऱ्याच्या आकारातील या मंदिरास तीन दिशांना प्रवेशद्वारे व प्रवेशद्वारांसमोर अर्धमंडप आहेत. प्रवेशद्वारांसमोर प्रत्येकी पाच पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूस सिंह व त्यावर स्वार शस्रधारी योद्ध्यांचे शिल्प आहे. अर्धमंडपात दोन्ही बाजूस कक्षासने आहेत. या कक्षासनांवर बाह्य बाजूस सुरसुंदरी शिल्पांचे दोन थर आहेत. विविध भावमुद्रातील या सुरसुंदरी शिल्पांचे सौंदर्य अप्रतिम आहे. असे सांगितले जाते की या कक्षासनांतील पाषाणास विशिष्ट ठिकाणी वाजवले असता त्यातून सप्तसूर उमटतात. अर्धमंडपात दोन्ही बाजूंच्या कक्षासनात प्रत्येकी दोन अर्धस्तंभ आहेत. स्तंभपाद चौकोनी आहेत, तर स्तंभदंड चौकोनी, षटकोनी, अष्टकोनी, द्वादशकोनी, गोलाकार अशा विविध भौमितिक आकारात आहेत. स्तंभात शीर्षभागी चौकोनी कणी व त्यावर हस्त आहेत. अर्धमंडपाच्या छतावर (वितान) विविध नक्षी कोरलेल्या आहेत.

सभामंडपात प्रत्येकी चार नक्षीदार स्तंभांच्या चार रांगा आहेत. येथील स्तंभपाद चौकोनी आहेत व त्यावर चारही बाजूंनी सुंदर कोरीव काम आहे. स्तंभदंडाचा खालील सुमारे दोन फूट भाग चौकोनी आहे. त्यावरील भाग गोलाकार, षटकोनी, अष्टकोनी, द्वादशकोनी व पुन्हा चौकोनी अशा विविध भौमितिक आकारांत दिसतो. स्तंभदंडावर बारीक कलाकुसरीच्या नक्षी कोरलेल्या आहेत. स्तंभदंडातील चौकोनी पटावर कीर्तिमुख, पुत्तलिका, भौमितिक नक्षी व पर्णपुष्प नक्षी पाहायला मिळतात. स्तंभांच्या शीर्षभागी चौकोनी कणी व त्यावरील हस्तांवर तुळई आहेत. वितानावर चक्राकार नक्षी आहे. सर्व हस्त, तुळई व वितानाच्या कोनांवर विविध नक्षी कोरलेल्या आहेत. अर्धखुल्या स्वरूपाच्या सभामंडपात भाविकांना बसण्यासाठी कक्षासने व मध्यभागी एका चौथऱ्यावर अखंड पाषाणातील नंदीची मूर्ती आहे.

पुढे अंतराळाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला जाळीदार वातायने व स्तंभ पुत्तलिका आहेत. या पुत्तलिकांच्या अंगावरील वस्त्रे व अलंकार अत्यंत बारीक तपशिलासह कोरलेले आहेत. वातायने व स्तंभांवर कलात्मक नक्षीकाम आहे. अंतराळ सभामंडपापेक्षा काही इंच उंच आहे व यात आत जाण्यासाठी एक पायरी आहे. प्रवेशद्वाराच्या उत्तरांगावर मकर तोरण आहे. पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार लागते. प्रवेशद्वारास दोन वेलबुट्टीशाखा, पद्मशाखा, नरशाखा, गरुडशाखा व दोन स्तंभशाखा अशा एकूण सात द्वारशाखा आहेत. द्वारशाखांवर खालील बाजूस हातात नरमुंड व त्रिशूल धारण केलेले रुद्रगण द्वारपाल, द्वारपालिका व गंगा-यमुना शिल्पे आहेत. ललाटबिंबावर गजलक्ष्मीचे शिल्प, तर ललाटपट्टीवर पानाफुलांच्या नक्षी आहेत. उत्तरांगावर शिखरशिल्पांचे तोरण आहे. मंडारकावर चंद्रशीला व इतर नक्षी आहेत.

गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी शिवपिंडी आहे. शिवपिंडीवर छत्र धरलेला तांब्याचा नाग व छताला जलधारा धरलेले अभिषेकपात्र टांगलेले आहे. मंदिराबाहेरून अभिषेकासाठी ओतलेले पाणी भिंतीतून आत येऊन येथील शिवपिंडीवर पडते, अशी अनोखी रचना येथे पाहायला मिळते. यासाठी गर्भगृहाच्या बाह्यभिंतीत एक पाषाणकुंभ कोरलेला आहे. त्याची रचना अशी आहे की भाविकांकडून त्या कुंभात ओतलेले पाणी गर्भगृहाच्या भिंतीतील नलिकेतून थेट शिवपिंडीवर पडते. आजही तो पाषाणकुंभ मंदिराच्या बाह्यभिंतीत सुस्थितीत आहे.

मंदिराच्या बाह्य भिंतींवर विविध मूर्तीशिल्पे आहेत. यात मध्यभागी नृत्यगणेश व त्याच्या दोन्ही बाजूस सुरसुंदरी आहेत. यात मृदुंग वाजवणारी मर्दला, लहान लेकराला कडेवर घेतलेली पुत्रवल्लभा, रती, नर्तकी, दर्पणा, वीणावादिनी, विषकन्या, शत्रूमर्दिनी, पत्रलेखिका, धनुर्धारिणी, शुकसारिका आदी विविध सुरसुंदरी शिल्पे आणि अर्धा महादेव व अर्धा विष्णू असे हरिहर शिल्प आहे. मंदिराच्या मागील भिंतीतील तीन देवकोष्ठकांत तांडव नृत्य करणारे नटराज शिल्प आहेत. या मंदिराच्या शेजारी पार्वती मंदिर आहे. या दोन्ही मंदिरांची रचना व आकार सारखेच आहे. पार्वती मंदिराच्या गर्भगृहात जमिनीवर शिवपिंडीची केवळ शाळुंका आहे, त्यात लिंग पाषाण नाही.

येथे तीन दिवस चालणारा नृत्य, नाट्य व संगीत महोत्सव ‘होट्टल महोत्सव’ म्हणून मराठवाड्यात प्रसिद्ध आहे. या महोत्सवासाठी अनेक पर्यटक उपस्थिती दर्शवतात. पौष मासातील शेवटच्या सोमवारी बुट्टी जत्रा साजरी केली जाते. यावेळी भाविक ‘बुट्टी’ म्हणजे बांबूपासून बनवलेल्या टोपलीत देवासाठी पुरणपोळीचा नैवेद्य आणतात. हा नैवेद्य देवाला अर्पण केल्यानंतर मंदिर परिसरात उपस्थित इतर भाविकांना अन्नदान केले जाते. यालाच ‘दासोहा’ असे म्हणतात. मंदिरात महाशिवरात्री व श्रावणातील सर्व सोमवारी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा येथील हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी येतात. भाविकांसोबतच येथील शिल्पकलेचा आस्वाद घेण्यासाठी अनेक पर्यटक व अभ्यासकही येथे येतात.

उपयुक्त माहिती:

  • देगलूर येथून ९ किमी अंतरावर
  • नांदेड येथून ९० किमी अंतरावर
  • देगलूरसह नांदेडमधील अनेक शहरांतून होट्टलसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवासाची सुविधा नाही
  • संपर्क : शेषराव सूर्यवंशी, मो. ९०२१७१४६९९

सिद्धेश्वर मंदिर

होटल, त. देगलूर, जिला. नांदेड़

Back To Home