बाळगीर महाराज मठ हे नांदेड शहरातील एक ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. शहराच्या गाडीपुरा भागात वसलेला हा मठ ‘दशनाम गोसावी‘ संप्रदायातील गिरी परंपरेचा आहे. या मठाची स्थापना सुमारे तीनशे वर्षांपूर्वी थोर तपस्वी संत बाळगीर महाराज यांनी केली होती. आजही या मठामध्ये गुरुशिष्य परंपरेतून महंतांची नियुक्ती केली जाते. या मठात दर महिन्याच्या पौर्णिमेस अन्नदान केले जाते.
नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील ‘राहेर‘ हे बाळगीर महाराजांचे जन्मगाव मानले जाते. या पवित्र भूमीत महाराजांचे बालपण व्यतीत झाले. त्यामुळेच गोदावरी नदीच्या काठावर वसलेले राहेर हे गाव संतांच्या वास्तव्याने पुनीत झालेले क्षेत्र मानले जाते. त्यांना लहानपणापासूनच अध्यात्माची ओढ होती. त्यांनी दशनाम गोसावी संप्रदायाची दीक्षा घेऊन खडतर तपश्चर्या केली. राहेर येथील गोदावरी काठावर तसेच अन्य तीर्थक्षेत्री भ्रमण करून त्यांनी ईश्वर साधना केली.
समाजाला आचार–विचारांची योग्य दिशा देणाऱ्या संतांच्या मालिकेत बाळगीर महाराजांचे स्थान अग्रगण्य आहे. जातीभेदापलीकडे जाऊन मानवतेची शिकवण देणाऱ्या महाराजांनी भुकेल्याला अन्न, तहानलेल्यांना पाणी आणि विद्यार्थ्यांना शिक्षणास मदत करावी, असे संदेश दिले. आपले हे समाजकार्य अविरत सुरू राहावे म्हणून त्यांनी गुरुशिष्य परंपरेचा स्वीकार केला. समाजाला भक्तिमार्गाकडे वळवण्यासाठी आणि गोसावी संप्रदायाचा वारसा जपण्यासाठी त्यांनी माहूर (वडगुंफा) व आयुष्याच्या उत्तरार्धात नांदेड येथे मठांची स्थापना केली. त्यांच्या या कार्यामुळे आजही नांदेड आणि आसपासच्या परिसरात दत्त भक्तांची मोठी संख्या पाहायला मिळते.
नांदेड शहरातील गाडीपुरा भागात, गोदावरी नदीच्या तीरावर संत बाळगीर महाराज मठ आहे. रस्त्यापेक्षा उंचावर असलेल्या या मठास भक्कम तटबंदी असून त्यात भव्य प्रवेशद्वार आहे. हे प्रवेशद्वार सुमारे आठ फूट उंच असून तेथे दहा पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला सुरक्षा कठडे आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी दोन गोलाकार स्तंभ, त्यावर महिरप तोरण व सज्जा आहे. या प्रवेशद्वारातून प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणापेक्षा उंचावर असलेल्या या दुमजली मठात येण्यासाठी आणखी सुमारे १५ पायऱ्या आहेत. सुमारे आठ फूट लांबीच्या या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला व मध्यभागी संरक्षक कठडे आहेत.
मठात समोरील बाजूला बाळगीर महाराजांचे समाधी मंदिर आहे. या मंदिराची रचना सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी आहे. सभामंडप व अंतराळात चौकोनी स्तंभ असून छताला पितळी घंटा टांगल्या आहेत. अंतराळात उजव्या बाजूला वज्रपीठावर गणेशाची मूर्ती आहे. पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. त्यासमोर एका मेजावर बाळगीर महाराजांचा पितळी मुखवटा आहे. प्रवेशद्वाराच्या स्तंभशाखांतील तोरणात पानफुलांची नक्षी आहे. गर्भगृहात वज्रपीठावर मध्यभागी बाळगीर महाराजांची मूर्ती विराजमान आहे. महाराजांच्या मूर्तीच्या डावीकडे एकमुखी दत्त व उजव्या बाजूला अनुसूया मातेची मूर्ती आहे. या मूर्तींच्या मागे चांदीच्या नक्षीदार प्रभावळी आहेत.
मठात उजव्या बाजूला बाह्यभिंतीवर अष्टविनायकांची छायाचित्रे लावली आहेत. येथेच उजवीकडे सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी रचना असलेले स्वतंत्र गणेश मंदिर आहे. सभामंडपाचे प्रवेशद्वार साधे व सभामंडप काहीसा अरुंद आहे. अंतराळाचे अर्धचंद्राकार कमान असलेले प्रवेशद्वार उंचावर असल्याने तेथे चार पायऱ्या आहेत. पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे, जे अरुंद व खुजे आहे. त्याच्या द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी आहे. गर्भगृहात वज्रपीठावर श्रीगणेशाची शेंदूर चर्चित स्वयंभू मूर्ती आहे. मूर्तीच्या माथ्यावर पाचू बसवलेला आहे. गर्भगृह व अंतराळाच्या बाह्यबाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे.
मठाच्या मागील बाजूस असलेल्या कक्षात दिवंगत महंतांच्या समाध्या आहेत. या कक्षाच्या मागील दरवाजातून बाहेर येताच प्रांगणात एक लहान मंदिर दिसते. मंदिराचे प्रवेशद्वार साधेसे असून येथे वज्रपीठावर त्रिमुखी दत्तात्रेयांची संगमरवरी मूर्ती आहे. मूर्तीसमोर वज्रपीठावर श्रीदत्तात्रेयांच्या पादुका आहेत. दत्तात्रेय मंदिराच्या शेजारीच महादेवाचे मंदिर आहे. मंदिरात मध्यभागी जमिनीवर मोठी शिवपिंडी आहे. त्यावर जलधारा धरण्यासाठी तांब्याचे अभिषेक पात्र छताला टांगले आहे. बाजूला एक पितळी त्रिशूल आहे. मठात अन्नछत्र इमारत, पुजारी, सेवेकरी व महंतांची निवासस्थाने आहेत.
येथे ‘दत्त जयंती‘ हा मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. याशिवाय दर महिन्याच्या पौर्णिमेस मंदिरात उत्सव असतो. यावेळी आलेल्या भाविकांना महाप्रसादाचे वाटप होते. चैत्र पाडवा, राम नवमी, गणेश जयंती, दसरा, दिवाळी आदी सण व उत्सव येथे पारंपरिक पद्धतीने साजरे होतात. यावेळी मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन, संगीत, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. माघ महिन्यात मठातून पायी दिंडीचे आयोजन होते. ही दिंडी माहूर येथील दत्त शिखर मंदिरात माघ शुक्ल चतुर्दशीला पोहोचते व माघ पौर्णिमेस तेथे महाअभिषेक करून परतते. सोमवार, मंगळवार, गुरुवार, पौर्णिमा, अमावस्या आदी दिवशी मंदिरात दर्शनाला येणाऱ्या भाविकांची गर्दी मोठी असते.