नांदेड शहराची जागतिक ओळख आणि शीख धर्मीयांचे अत्यंत पवित्र श्रद्धास्थान म्हणून येथील तख्त सचखंड श्री हुजूरसाहेब गुरुद्वारा प्रसिद्ध आहे. गोदावरी नदीच्या तीरावर वसलेले हे स्थान शीख धर्मातील अकाल तख्त (अमृतसर), तख्त श्री हरिमंदिरसाहेब (पटणा साहेब), तख्त श्री केशवगढसाहेब (आनंदपूर), तख्त श्री दमदमासाहेब (तळवंडी) आणि तख्त सचखंड श्री हुजूरसाहेब (नांदेड) या पाच सर्वोच्च धर्मपीठांपैकी (तख्त) एक आहे. शिखांचे दहावे गुरु, श्री गुरु गोविंद सिंग यांनी आपल्या आयुष्यातील शेवटचा काळ नांदेडमध्ये व्यतीत केला आणि याच भूमीवर त्यांनी १७०८ मध्ये देह ठेवला होता. त्यामुळे या स्थानाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
गुरु नानक हे शीख धर्माचे प्रवर्तक व पहिले गुरू होते. विख्यात संपादक खुशवंतसिंह यांच्या ‘ए हिस्ट्री ऑफ द सिख्स’ या ग्रंथाच्या पहिल्या खंडातील माहितीनुसार, त्यांचा जन्म तलवंडी राय भोई (सध्याचे नानकाना साहिब) येथे १५ एप्रिल १४६९ रोजी झाला.
त्यांच्या वडिलांचे नाव मेहता कल्याणदास बेदी, तर आईचे नाव तृप्ता असे होते. वयाच्या सातव्या वर्षी त्यांना प्राथमिक शिक्षणासाठी एका पंडिताकडे पाठवण्यात आले. त्यानंतर दोन वर्षांनी एका मुस्लिम मौलवींकडे त्यांनी पर्शियन आणि अरेबिक भाषेचे शिक्षण घेतले. लहानपणापासूनच त्यांना अध्यात्माची ओढ होती. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांचा विवाह झाला, परंतु वैवाहिक जीवनात त्यांना रस नव्हता. ते फकीर आणि धर्मगुरूंच्या सहवासात काळ व्यतीत करीत असत. कालांतराने तलवंडीतून ते सुलतानपूर येथे आले. तेथील नवाब दौलतखान लोदी याच्याकडे ते लेखाधिकारी म्हणून काम करू लागले. याच काळात त्यांची अध्यात्माकडील ओढ वाढली. एके दिवशी सकाळी नदीत स्नान करताना त्यांना पहिला साक्षात्कार झाला. ‘जन्मसाखी’ या त्यांच्या चरित्रग्रंथानुसार त्यांना परमेश्वराने दर्शन देऊन सांगितले की ‘तू म्हणजे मी आहे. तुझ्याद्वारे माझा नाममहिमा वाढेल. तू लोकांमध्ये जाऊन त्यांना पूजा कशी करायची ते शिकव.’ या काळात ते तीन दिवस अदृश्य होते. ते नदीत बुडाले, असे लोकांना वाटले; परंतु चौथ्या दिवशी ते परत आले. ‘जगात कोणी हिंदू नाही, कोणी मुसलमान नाही’, अशी घोषणा त्यांनी केली. त्यानंतर त्यांनी संसारत्याग केला. त्यावेळी त्यांचे वय तेरा वर्षे होते. गृहत्याग करून त्यांनी तीर्थाटन केले. ते मक्का, मदिना आणि बगदादलाही गेल्याचे सांगण्यात येते.
आपल्या जीवनकाळात त्यांनी ‘इक ओंकार’ म्हणजे ‘ईश्वर एक आहे’, या तत्त्वाचा प्रचार केला. सगुण भक्ती तसेच अनिष्ट शक्तींचे अस्तित्व त्यांनी नाकारले. परमेश्वराची अवतार कल्पनाही त्यांनी नाकारली. सर्व चराचर सृष्टी ही परमेश्वराची निर्मिती असून तो स्वयंभू, सर्वव्यापी व अद्वितीय आहे, अशी शिकवण गुरु नानक यांनी दिली. गुरु नानक यांनी प्रवर्तित केलेल्या शीख धर्माने जातीव्यवस्था आणि मूर्तीपूजेचा धिःकार केला. मानवतेची सेवा, सहिष्णुता व बंधुता या तत्त्वांना महत्त्व देणारा व ऐहिक जीवनावर भर देणारा धर्म त्यांनी सांगितला. आपल्या चार यात्रा पूर्ण केल्यानंतर गुरु नानक हे कर्तारपूर साहेब येथे आले. जीवनातील अंतिम १८ वर्षे त्यांनी येथे निवास केला. येथेच रावी नदीच्या किनाऱ्यावर त्यांनी ‘नाम जपो, किरत करो, वंड छको’ म्हणजे प्रभूनामाचे स्मरण करा, प्रामाणिकपणे मेहनत करा आणि जे काही आहे ते एकमेकांत वाटून खा, असा संदेश दिला. २२ सप्टेंबर १५३९ रोजी पहाटेच्या समयी त्यांचे महानिर्वाण झाले.
गुरु नानक यांच्यासह शिखांचे एकूण दहा गुरू आहेत. त्यातील अखेरचे देहधारी गुरू गोविंदसिंह (१६६६ ते १७०८) यांचा महाराष्ट्राशी जवळचा संबंध होता. ते १९ जुलै १७०७ रोजी नांदेडमध्ये वास्तव्यास आले होते. १८ ऑगस्ट या दिवशी त्यांच्यावर दोन पठाणांनी प्राणघातक हल्ला केला. हे पठाण सरहिंदचा सुभेदार वजिरखान याने पाठवले होते. या हल्ल्यानंतर याच ठिकाणी ७ ऑक्टोबर १७०८ रोजी त्यांचे परलोकगमन झाले. याविषयीची अधिकृत नोंद देणारी तत्कालीन ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. त्यात ‘गुरुशोभा’ हा ग्रंथ त्यांच्या वास्तव्याचा प्रत्यक्षदर्शी पुरावा आहे. तसेच ११ नोव्हेंबर १७०८ रोजी लिहिले गेलेले ‘अखबारात-ए-दरबार-ए-मुअल्ला’ यात आणि औरंगजेबाच्या नंतर आलेला बादशहा बहादूरशहा विषयीच्या साधन ग्रंथातून याविषयीची नोंद मिळते.
परलोकगमनापूर्वी तीन दिवस आधी, ४ ऑक्टोबर १७०८ या दिवशी गुरू गोविंदसिंह यांनी देहधारी गुरूंची परंपरा समाप्त करून गुरुग्रंथ साहिबला गुरुपदी (गुरुता गद्दी) विराजमान केले. त्यामुळे या धर्माच्या दृष्टीने या स्थानाला असाधारण महत्त्व आहे.
एकूण १४३० पाने आणि २,६८,५४७ शब्द असलेल्या गुरुग्रंथ साहिबमध्ये गुरु नानक यांची, तसेच अन्य काही गुरूंची वचने आणि प्रार्थना आहेत. यामध्ये कबीर, रविदास, बाबा फरीद यांच्याप्रमाणेच संत नामदेवांच्या रचनांचाही समावेश आहे. ज्या स्थानावर गुरू गोविंदसिंह यांची प्राणज्योत अनंतात विलीन झाली, त्याच स्थानावर सन १८३२ ते १८४० या काळात सध्याची वास्तू उभारण्यात आली. हैदराबादच्या निजामाने लाहोर येथील शीख रेजिमेंट बोलावून आपल्या प्रदेशातील बंड मोडून काढले होते. त्यातील काही सेनानी, तसेच निझामाचा दिवाण चंदुलाल महाराज व पंजाबचे महाराज रणजितसिंग यांनी पुढाकार घेऊन या वास्तूची निर्मिती केली.
एकोणिसाव्या शतकामध्ये उभ्या राहिलेल्या या वास्तूत हिंदू व मुघल कलाशैलीचा उत्कृष्ट मिलाफ आहे. पश्चिमाभिमुख असलेल्या या गुरुद्वाराच्या तटबंदीत चार भव्य प्रवेशद्वारे आहेत. सुमारे १.८२ लाख चौरस मीटर परिसरात विकसित केलेल्या या वास्तूसंकुलात भाविकांसाठी शेकडो खोल्या, बहुउद्देशीय सभागृहे आणि लंगरची सोय आहे. लंगर भवनमध्ये एकाच वेळी २००० भाविक प्रसाद ग्रहण करू शकतात.
प्रांगणात असलेली सुंदर उद्याने, ग्रेनाईटचा प्रभावी वापर व जागोजागी असलेल्या हिरवळीमुळे गुरुद्वाराच्या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे. प्रांगणाच्या मध्यभागी एका उंच जागेवर मुख्य वास्तू उभी आहे. हे बांधकाम विटा आणि चुन्यामध्ये करण्यात आले असून त्यावर उत्कृष्ट दर्जाचा गिलावा आहे. येथील चारही कोपऱ्यांवर असलेले अष्टकोनी मिनार या वास्तूची शोभा आणखी वाढवतात. या वास्तूच्या दर्शनी भागात एका चौथऱ्यावर सुमारे २५ मीटर उंचीचा ध्वजस्तंभ आहे. त्यावर १.८२ मीटर उंचीचा सोन्याचे पाणी दिलेला बाण आहे.
गुरुद्वाराच्या सौंदर्यात येथील नक्षीकाम मोठी भर घालते. भिंतींवर आणि छतावर काढलेली चित्रे ‘फ्रेस्को’ तंत्राचा वापर करून साकारलेली असावीत, असे दिसून येते. यात लाल, पिवळा आणि निळ्या रंगांचा प्रामुख्याने वापर केलेला आहे. मुघल चित्रशैली आणि काचेवरील चित्रकारी येथे दिसते. घुमटाच्या आतील बाजूस आणि पहिल्या मजल्यावरील छतावर व भिंतींवर तांब्याचा पत्रा बसवून त्यावर सोन्याचे पाणी चढविलेले आहे. असे सांगितले जाते की यासाठी ५० किलोहून जास्त सोने वापरले आहे. याशिवाय संगमरवरी दगडांवर वैशिष्ट्यपूर्ण कोरीवकाम केलेले आहे. त्यात विविधरंगी मौल्यवान खडे बसवून भौमितिक नक्षी आणि पक्ष्यांच्या प्रतिमा कोरल्या आहेत.
या वास्तूच्या मध्यभागी असलेल्या मुख्य गाभाऱ्याला ‘सिंहासन साहिब’ म्हटले जाते. याच स्थानावर गुरू गोविंदसिंह अनंतात विलीन झाले होते. गुरुग्रंथ साहिब यांची गुरुपदी स्थापना झाल्यापासून येथे अखंड नंदादीप (शुद्ध तुपाचा दिवा) तेवत आहे. येथे ग्रंथसाहिबाचे अविरत पठण सुरू असते. पवित्र शस्त्रे या ठिकाणी जतन करून ठेवलेली आहेत. गुरुद्वाराच्या शिखरावर पाच मीटर उंचीचा देखणा डोम (घुमट) आहे. जमिनीपासून या वास्तूची एकूण उंची सुमारे १५ मीटर आहे.
गुरुद्वारातील दैनंदिन पूजाविधी मध्यरात्री २ वाजल्यापासून सुरू होतो. रात्री २ ते ३ या वेळेत श्री जपसाहेब व श्री सुखमणी साहेब यांचे पाठ होतात. हे पाठ सुरू असताना मणजी साहेब, शस्त्र व पोशाखांना गोदावरीच्या पवित्र पाण्याने स्नान घातले जाते. हे पाणी आणण्यासाठी खास माणसाची नियुक्ती केली जाते, त्याला ‘घागरीया’ म्हणतात. पहाटे ३ ते ६ या वेळेत कीर्तन सादर होते. सकाळी ६.१५ वाजता भोग प्रसाद दाखवला जातो. सकाळी ६.४५ पर्यंत १० मिनिटे हुकुमनामाचे वाचन होते. त्यानंतर ८ वाजेपर्यंत कीर्तन आनंद साहेब सादर केले जाते. सकाळी ८.३० ते १० च्या दरम्यान अखंड पाठाची समाप्ती होते व लगेच दुसऱ्या दिवसासाठीच्या अखंड पाठाची सुरुवात केली जाते.
याशिवाय कार्तिक शुद्ध द्वितीया (गुरु गोविंद सिंह यांनी गुरु ग्रंथ साहिबला गुरुपदी विराजमान केले तो दिवस), कार्तिक शुद्ध पंचमी (गुरु गोविंद सिंह यांनी सचखंड गमन केले तो दिवस), कार्तिक शुद्ध पौर्णिमा (श्री गुरु नानक देवजी महाराजांचा जन्म दिवस), पौष शुद्ध सप्तमी (श्री गुरु गोविंद सिंह यांचा जन्म दिवस आणि वैशाखी खालसा पंथाचा स्थापना दिवस) हे उत्सव येथे साजरे केले जातात. उत्सवकाळात देशभरातून हजारो भाविक येथे उपस्थित असतात.