अपरंपार स्वामी मठ

मुदखेड, ता. मुदखेड, जि. नांदेड

मराठवाडा ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. गोदावरीच्या खोऱ्यात अनेक महान संत, तपस्वी आणि सिद्ध पुरुषांनी आपल्या वास्तव्याने आणि तपश्चर्येने ही भूमी पावन केली आहे. नांदेड जिल्ह्यात अनेक धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळे आहेत. त्यापैकीच एक अत्यंत महत्त्वाचे आणि भाविकांचे श्रद्धास्थान असलेला अपरंपार स्वामी मठ प्रसिद्ध आहे. हा मठ वीरशैवांच्या पंचपीठांपैकी रंभापुरी पीठाची शाखा आहे. मूळ संस्थापक असलेले अपरंपार स्वामी यांच्या नावाने हा मठ ओळखला जातो. मुदखेड शहराच्या सांस्कृतिक जडणघडणीत या मठाचे स्थान अनन्यसाधारण आहे.

मुदखेड शहराला मोठी ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे. याच शहरात अपरंपार स्वामींनी वास्तव्य केले होते. स्वामी हे एक महान सिद्ध पुरुष आणि तपस्वी होते. त्यांच्या नावामागील अर्थाप्रमाणेच त्यांचा महिमा आणि लीला ‘अपरंपार’ (ज्याला सीमा नाही अशी) होत्या, अशी भाविकांची श्रद्धा आहे. स्वामींनी आपल्या हयातीत अनेक दीन-दुबळ्यांचे दुःख दूर केले आणि लोकांना भक्तीचा मार्ग दाखवला. त्यांनी मुदखेड येथेच संजीवन समाधी घेतली. आज त्याच जागेवर एक सुंदर आणि भव्य मठ उभा आहे. हा मठ ६०० वर्षे प्राचीन असल्याचे सांगितले जाते. मूळ मठ जुना असला तरी कालानुरूप त्यामध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यानुसार १९६६ मध्ये मोठे दगडी गर्भगृह व १९८९ मध्ये त्यावर शिखर बांधण्यात आले.

मुदखेड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेला हा मठ प्रशस्त आहे. मठाचा परिसर स्वच्छ आणि नीटनेटका आहे. मठाची इमारत जुन्या धाटणीची असून ती अत्यंत देखणी आहे. मठाच्या बांधकामात दगडी नक्षीकाम आणि जुन्या वास्तुकलेची झलक दिसते. मठाच्या दर्शनी भागात सुमारे २० फूट उंचीची तटबंदी आहे. या तटबंदीत असलेल्या दुमजली प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही स्तंभशाखांमध्ये दीपकोष्ठके आहेत. प्रवेशद्वाराच्या दुसऱ्या मजल्यावर नगारखाना आहे. प्रांगणात डावीकडे एका मोठ्या चौथऱ्यावर एक उंच दीपस्तंभ व काही पाषाणी मूर्ती आहेत.

प्रांगणातून सात पायऱ्या चढून उंच जगतीवर असणाऱ्या मूळ मठात प्रवेश होतो. सभामंडप व मध्यभागी गर्भगृह अशी या मठाची रचना आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वारावरील स्तंभशाखांवर दीपकोष्ठके व उत्तरांगावर मंगलप्रतिके कोरलेली आहेत. प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. सभामंडपात भाविकांना बसण्यासाठी आसनांची व्यवस्था आहे. प्रांगणात मध्यभागी मठाचे गर्भगृह आहे. या गर्भगृहाच्या दर्शनी भागात देवलिंग स्वामी व शिवलिंग स्वामी यांच्या समाध्या आहेत. येथील गर्भगृहात मध्यभागी एका दगडी मखरात ईश्वरय्या स्वामी शिवाचार्य यांची मूर्ती आहे. या मूर्तीला धातूचा मुखवटा आहे. या मूर्तीच्या उजवीकडे गुरू बाळसिद्ध स्वामी महाराज यांचे समाधी स्थान व डावीकडे गुरू अपरंपार स्वामी यांची संजीवन समाधी आहे. गर्भगृहाशेजारी एका चौथऱ्यावर बस्वलिंग स्वामी शिवाचार्य यांची शुभ्र संगमरवरी मूर्ती व त्यासमोर शिवपिंडी आहे.

या मठात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम सुरू असतात. महाशिवरात्री आणि दत्त जयंतीला येथे जत्रा असतात. या काळात मठात होम-हवन, अभिषेक, महापूजा आणि कीर्तनाचे आयोजन केले जाते. या उत्सवांसाठी केवळ नांदेड जिल्ह्यातूनच नव्हे, तर संपूर्ण मराठवाड्यातून, तसेच तेलंगणा आणि कर्नाटकातूनही भाविक मोठ्या संख्येने येतात. दर गुरुवारी आणि एकादशीला मठात भाविकांची विशेष गर्दी असते. स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन अनेक भाविक आपल्या अडचणी दूर होण्यासाठी येथे साकडे घालतात. गुरुवारी सायंकाळी होणारी आरती आणि भजनासाठी अनेक भाविक उपस्थित राहतात. महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी येथे कुस्ती स्पर्धा भरविल्या जातात. सोलापूर, नागपूर या ठिकाणचे मल्ल त्या ठिकाणी येतात. या मठाच्या अंतर्गत वसमत, मालेगाव (ता. वसमत), शंभोली (ता. मुदखेड), पाटनूर (ता. अर्धापूर) येथे शाखा आहेत.

उपयुक्त माहिती:

  • नांदेड येथून २६ किमी अंतरावर
  • नांदेड जिल्ह्यातील अनेक शहरांतून मुदखेडसाठी एसटी व रेल्वेसेवा उपलब्ध
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : वैजनाथ भालेराव, अध्यक्ष, मो. ७३७८४७४८७२,
  • सुरेश शेटे, उपाध्यक्ष, मो. ९८८१८८५९६४

अपरंपार स्वामी मठ

मुदखेड, ताल. मुदखेड, जिला. नांदेड़

Back To Home