सत्य गणपती मंदिर

दाभड, ता. अर्धापूर, जि. नांदेड

गणपती हा भाविकांचा लाडका देव आहे. म्हणूनच गणेशाच्या नावापुढे बाप्पा हा लडिवाळ शब्द लागला आहे. गणेश पुराणात गणपतीच्या रंजक कथा व विविध नावे आली आहेत. त्याचबरोबर स्थानावरून व मंदिर बांधणाऱ्यांच्या नावावरूनही गणपती मंदिरांना विविध नावे देण्यात आली आहेत. पण नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात दाभाड या गावी असे एक मंदिर आहे जिथे भाविकांनी व्यक्त केलेली इच्छा सत्यात उतरते. म्हणून या गणपतीस सत्य गणपती हे नामाभिधान प्राप्त झालेले आहे. मराठवाड्यातील सिद्धस्थान (जागृत देवस्थान) अशी या स्थानाची ओळख आहे.

असे सांगितले जाते की हे देवस्थान सुमारे तीनशे ते साडेतीनशे वर्षांपूर्वीचे आहे. त्याकाळी गावाशेजारील पिंपळाच्या झाडाखाली गणेशाची स्वयंभू पाषाण मूर्ती प्रकट झाली होती. गावातील लोक या गणपतीच्या दर्शनाला येत. हा गणपती नवसाला पावतो, अशी भाविकांना प्रचिती येऊ लागली. हळू हळू या गणपतीची ख्याती आधी तालुक्यात मग जिल्ह्यात पसरली. १९९३ साली या पिंपळाच्या झाडाखाली सत्य गणपती मंदिर बांधण्यात आले. मंदिराबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते की ज्या पिंपळाच्या झाडाखाली गणपती प्रकट झाला त्या झाडाच्या एकाच फांदीला पिंपळाची व वडाची पाने लागतात. पिंपळाचे पान देठासहित येते तर वडाच्या पानाला देठ नसतो. हा येथील दैवी चमत्कार मानला जातो.

दाभाड गावाच्या वेशीवर असलेल्या मंदिरासमोर स्वागतकमान आहे. येथून मंदिरापर्यंतच्या मार्गावर अनेक पूजा साहित्य विक्रीची दुकाने आहेत. मंदिराच्या प्रशस्त फरसबंदी प्रांगणात पूर्णपणे बंदिस्त केलेली एक विहीर आहे. प्रांगणात लोखंडी स्तंभांवर पत्र्याचे छत टाकून भाविकांच्या सोयीसाठी दर्शनमंडप उभा करण्यात आला आहे. दर्शनमंडपाला लागून पिंपळाच्या झाडाखाली सन १९९३ साली नव्याने बांधलेले मंदिर असून सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची संरचना आहे. प्रांगणापेक्षा उंचावर असलेल्या सभामंडपास तीन प्रवेशद्वारे असून तिन्ही प्रवेशद्वारांसमोर प्रत्येकी पाच पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूस सुरक्षा कठडे आहेत. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात हवा व प्रकाश येण्यासाठी खिडक्या आहेत. सभामंडपात स्टेनलेस स्टीलचे सुरक्षा कठडे लावून रांगेचे व्यवस्थापन केले आहे. सभामंडपाच्या मागील बाजूस असलेल्या दरवाजातून मंदिराच्या मागे असलेल्या पिंपळाच्या झाडाखालील सत्य गणपतीकडे जाता येते.

मंदिरात भाद्रपद मासातील दहा दिवसांचा गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. या दहा दिवस मंदिरात गणेशाचा महाअभिषेक, गणेश याग, अथर्वशीर्ष पठण, भजन, कीर्तन, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावेळी महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या राज्यांतून हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. देवास मोदक, नारळाची माळ, मुकुट, वस्त्र, दुर्वा व जास्वंदी आदी गोष्टी अर्पण केल्या जातात. गणेश जयंती, संकष्टी चतुर्थी, मंगळवार, अंगारकी चतुर्थी, विनायकी या दिवसांत येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या हजारोंमध्ये असते. दररोज सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत भाविकांना या मंदिरात सत्य गणपतीचे दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती:

  • अर्धापूर येथून ६ किमी अंतरावर
  • नांदेड शहरापासून १५ किमी अंतरावर
  • अर्धापूर व नांदेड येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवासाची सुविधा नाही

सत्य गणपति मंदिर

दाभाड, ताल. अर्धपुर, जिला. नांदेड़

Back To Home