अपरंपार महादेव मंदिर

पाटनुर (लहान), ता. अर्धापूर, जि. नांदेड

स्मशानभूमी हीच महादेवाची तपोभूमी मानली गेली आहे. त्यामुळे स्मशान, समाधिस्थळे अशा ठिकाणी महादेवाची मंदिरे पहायला मिळतात. काही मंदिरे योग्यांच्या तपोभूमीच्या ठिकाणी निर्माण झाली व त्या त्या महापुरुषांच्या समाधीही त्याच मंदिरात किंवा मंदिर परिसरात पहायला मिळतात. काही मंदिरांत गुरू-शिष्य परंपरेतील अनेक साधू, योगी व संन्यासीजनांची समाधिस्थळे आहेत. असेच एक गुरू-शिष्य परंपरेतील संन्यासीजनांच्या अनेक समाध्या असलेले अपरंपार महादेव मंदिर अर्धापूर तालुक्यातील पाटनूर (लहान) या गावी आहे. येथील जागृत महादेव भक्तांच्या हाकेला धावून येतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

असे सांगितले जाते की हे मंदिर चारशे ते पाचशे वर्षांपूर्वीचे आहे. मंदिरात गुरू-शिष्य परंपरेतील साधूंच्या सुमारे दहा ते बारा समाध्या मंदिरात आहेत. सामाजिक बदल घडवून आणणाऱ्या, ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या साधू-संन्यासी जनांचे हे मुख्य ठिकाण होते. मंदिरातील महादेवाची प्राचीन पाषाण मूर्ती व मंदिरामागे असलेल्या बेलाच्या झाडातून निघत असलेली विभूती हे येथील वैशिष्ट्य आहे.

पाटनूर (लहान) या गावापासून चार किलोमीटर अंतरावर डोंगराच्या पायथ्याशी मंदिराची पहिली स्वागतकमान आहे. रस्त्याच्या दुतर्फा दोन चौकोनी स्तंभ व त्यावरील तुळईवर महिरपी बाशिंग आहे. बाशिंगावर मध्यभागी आमलक व त्यावर कळस आहे. बाशिंगात असलेल्या देवकोष्ठकात शिवपिंडी आहे. या कमानीपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगर माथ्यावर महादेवाचे मंदिर आहे. मंदिरासमोर प्रशस्त वाहनतळ आहे. पुढे मंदिराची दुसरी स्वागतकमान आहे. स्वागत कमानीत रस्त्याच्या दोन्ही बाजूला महिरपी कमानीने जोडलेल्या स्तंभांवर सज्जा आहे. सज्जावर दोन्ही बाजूस एकावर एक असे दोन आमलक व कळस आहेत. मधल्या भागात महिरपी बाशिंग आहे. या बाशिंगात मध्यभागी अपरंपार महादेवाचे चित्र आहे.

पुढे मंदिराचे पेव्हर ब्लॉक आच्छादित प्रांगण आहे. प्रांगणात मंदिरासमोर दोन अष्टकोनी दीपमाळा आहेत. प्रांगणात महावृक्ष व त्यांच्या सभोवती पार बांधलेले आहेत. पारावर महावृक्षाखाली दगडी दिवे व काही पाषाण आहेत. सभामंडप व गर्भगृह अशी रचना असलेल्या मंदिराच्या सभामंडपास दोन प्रवेशद्वारे आहेत. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात हवा व प्रकाश येण्यासाठी खिडक्या आहेत. खिडक्यांना लोखंडी जाळ्या लावलेल्या आहेत. सभामंडपात प्रत्येकी चार चौकोनी स्तंभांच्या चार रांगा आहेत. बाह्य बाजूचे स्तंभ भिंतीत आहेत. सभामंडपास उजव्या व डाव्या बाजूला व गर्भगृहाच्या दोन्ही बाजूला दोन असे एकूण सहा दरवाजे आहेत. सभामंडपात दगडी बांधणीचा गोलाकार दीपस्तंभ छतातून वर गेलेला आहे. दीपस्तंभाच्या बाजूची सभामंडपातील जमीन काही इंच उंच असून या उंच भागावर गुरुवर्य अपरंपार महाराजांची समाधी आहे. समाधीवर नंदी व शिवपिंडी आहे. या समाधीच्या बाजूला गुरुवर्य मल्लिकार्जुन महाराज, बसवलिंग महाराज, शंकर आर्या महाराज, गुरू भुजंग आर्या महाराज यांच्या समाधी आहेत. महाशिवरात्रीच्या दिवशी गावातून येथे पालखीत आलेला महादेवाचा मुखवटा अपरंपार महाराजांच्या समाधीवर ठेवून पूजा केली जाते. समाधीजवळ नक्षीदार चौथरा व चौथऱ्यावर गुरू अपरंपार महाराजांची मूर्ती आहे. मूर्तीच्या चारही बाजूंनी चार वामन स्तंभ व त्यावर कमानी आहेत. कमानींवर घुमटाकार छत आहे.

सभामंडपात मध्यभागी काही इंच उंच चौथरा व त्यावर गर्भगृह आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर महिरपी कमान आहे. गर्भगृहाच्या भिंतीत देवकोष्ठके आहेत. वज्रपीठावरील मखरात महादेवाची प्राचीन मूर्ती आहे. गर्भगृहातून बाहेर पडण्यासाठी उजव्या बाजूला दरवाजा आहे. मंदिराच्या छतावर चहूबाजूंनी सुरक्षा कठडा आहे. गर्भगृहाच्या छतावर चार थरांचे गोलाकार शिखर आहे. शिखराच्या खालील तीन थरात प्रत्येकी आठ देवकोष्ठके आहेत. शिखराच्या चौथ्या निमुळत्या थरावर उभ्या धारेच्या नक्षी व प्रत्येक थर कमळदल नक्षीच्या वेटोळ्याने विभागलेले आहेत. शिखरात शीर्षभागी आमलक व त्यावर कळस आहे. मंदिरास लागून दोन्ही बाजूस इमारती आहेत. त्या अन्नछत्र व सांस्कृतिक सभागृह म्हणून वापरल्या जातात. उजव्या बाजूच्या इमारतीस लागून जिना आहे. तेथून मंदिराच्या छतावर जाता येते. मंदिराच्या मागील बाजूस बेलाचे झाड आहे. या झाडाखाली विभूती आहे. असे सांगितले जाते की या बेलाच्या झाडातून आपोआप विभूती निघते. ही विभूती कपाळास लावल्याने शारीरिक व मानसिक दुखणे, आजारपण दूर होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

मंदिरात महाशिवरात्री हा मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी प्रांगणात, मंदिरासमोर शुष्क काष्ठ पेटवून विस्तव केला जातो. नवस फेडण्यासाठी भाविक या पेटत्या विस्तवावरून चालून देवाच्या दर्शनासाठी मंदिरात येतात. या प्रकाराला इंगळांचा नवस म्हणतात. या दिवशी महादेवाची पालखी प्रदक्षिणा केली जाते. राज्यातील अनेक भागांतून हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी यावेळी येथे येतात. यावेळी मंदिरात महाअभिषेक, भजन, कीर्तन, प्रवचन, जागरण आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मंदिरात श्रावण महिन्यात भाविकांची गर्दी असते. श्रावणातील प्रत्येक दिवशी येथे दुपारी व सायंकाळी महाप्रसादाचे वाटप केले जाते. याशिवाय सोमवार, गुरुवार, पौर्णिमा व अमावस्या या दिवशी भाविकांची वर्दळ असते.

उपयुक्त माहिती:

  • अर्धापूर येथून १८ किमी अंतरावर
  • नांदेड येथून ३५ किमी अंतरावर
  • अर्धापूर येथून पाटनूरसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही

अपरंपार महादेव मंदिर

पतनूर (छोटा), ताल. अर्धपुर, जिला. नांदेड़

Back To Home