भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले केदारनाथ मंदिर उत्तराखंड राज्यातील रुद्रप्रयाग जिल्ह्यात समुद्रसपाटीपासून सुमारे ३५०० मीटर उंचीवर आहे. महाभारत युद्धानंतर आपल्या हातून घडलेल्या पापाचे क्षालन करण्यासाठी पाच पांडव शंकराच्या दर्शनाला गेले तेव्हा त्यांना केदारनाथ, तुंगनाथ, रुद्रनाथ, मध्यमेश्वर आणि कल्पेश्वर या पाच ठिकाणी शंकराचे विविध रूपांत पंचकेदार दर्शन झाले. याच केदारनाथचे दक्षिणपीठ म्हणून प्रसिद्ध असलेले मंदिर हादगाव तालुक्यातील केदारगुडा डोंगरावर आहे. जमिनीत सुमारे पाच फूट खोल असलेल्या या शिवपिंडीस ‘गुप्तकेदार’ म्हणूनही संबोधले जाते.
हेमाडपंती स्थापत्यशैलीतील दगडी बांधकाम असलेले मंदिर सुमारे ९०० वर्षे प्राचीन आहे, असे सांगितले जाते. या मंदिराबाबत आख्यायिका अशी की महादेव काशी सोडून उत्तराखंड येथे गेले तेव्हा तेथील गुप्तकाशी या ठिकाणी त्यांचा गुप्त वास झाला. त्यानंतर महादेव पाच ठिकाणी प्रकट झाले. त्यापैकी एक दंडकारण्यातील हे केदारगुडा ठिकाण असून यास गुप्त केदार नावाने ओळखले जाते. मंदिरासमोर असलेल्या चक्रतीर्थ कुंडातील पाणी शेतात शिंपडले असता पिकाला बरकत येते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
मंदिरापर्यंत पक्की डांबरी सडक असून प्रवेशद्वारासमोर रस्त्याच्या दुतर्फा प्रसाद व पूजा साहित्याची दुकाने आहेत. सुमारे ३२ एकर परिसरात पसरलेल्या या मंदिरास भक्कम तटबंदी आहे.
तटबंदीत विशाल प्रवेशद्वार आहे. दगडी बांधकाम असलेल्या मूळ प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस विटांनी बांधलेले चौकोनी स्तंभ आहेत. या स्तंभांवर तीन थरांत प्रत्येकी दोन देवकोष्ठके आणि त्यात देव प्रतिमा आहेत. स्तंभांवरील सज्जावरील मध्यभागी असलेल्या मेघडंबरीत महादेवाची उभी मूर्ती आहे. मेघडंबरीवर घुमटाकार शिखर व त्यावर कळस आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस भिंतीत दीपकोष्ठके आहेत व प्रवेशद्वारावर महिरपी कमान आहे.
मंदिराच्या तटबंदीत आणखी दोन प्रवेशद्वारे आहेत. प्रांगणात उजव्या बाजूच्या प्रवेशद्वाराजवळ तीन थरांची गोलाकार दीपमाळ आहे. दीपमाळेतील थर वर्तुळाकार रिंगणाने विभागले आहेत. प्रांगणाच्या खोलगट भागात असलेल्या मंदिरात येण्यासाठी मंदिराच्या भोवतीने असलेल्या सुमारे सात पायऱ्या उतरून खाली यावे लागते. पुढे सभागृहाचे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारासमोर दोन पायऱ्या आहेत. अर्धखुल्या स्वरूपाच्या सभामंडपात प्रत्येकी चार नक्षीदार स्तंभांच्या चार रांगा आहेत. स्तंभपाद चौकोनी आहेत आणि स्तंभदंड चौकोनी, षटकोनी, अष्टकोनी व गोलाकार अशा विविध भौमितिक आकारात आहेत. शीर्षभागी वर्तुळाकार कणी आणि त्यावर हस्त आहेत. हस्तांवर तुळई व तुळईवर छत आहे.
वितान षटकोनी असून छतास पितळी घंटा टांगलेली आहे. सभामंडपात भाविकांना बसण्यासाठी प्रदक्षिणा मार्ग सोडून कक्षासने आहेत. बाह्य बाजूचे स्तंभ या कक्षासनांत आहेत. कक्षासनांवर तुळईपर्यंत पोहोचणाऱ्या लहान संगमरवरी स्तंभिका लावलेल्या आहेत. सभामंडपातील जमीन, कक्षासने व स्तंभांचा खालील सुमारे तीन फूट भाग संगमरवरी फरशीने आच्छादित आहे. सभामंडपात मध्यभागी वज्रपीठावर नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. नंदीच्या डाव्या व उजव्या बाजूला सभामंडपातून बाहेर पडण्यासाठी दरवाजे आहेत. सभामंडपात अंतराळाकडील बाजूस भिंतीत देवकोष्ठके व त्यात देवमूर्ती आहेत. पुढे अंतराळ आहे. अंतराळात गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला देवकोष्ठके असून त्यात काळ्या पाषाणातील चतुर्भुज प्रतिहारी द्वारपाल शिल्पे आहेत. द्वारपालांच्या तीन हातात शंख, चक्र व गदा आहेत आणि एक हात आशीर्वाद मुद्रेत आहे. द्वारपालांच्या डोक्यावर मुकुट व अंगावर वस्त्रे कोरलेली आहेत. द्वारपालांच्या पायाजवळ दोन्ही बाजूस शक्तीशिल्पे आहेत.
गर्भगृहाच्या द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी व ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे.
गर्भगृह अंतराळापेक्षा खोल आहे. त्यामुळे दोन पायऱ्या उतरून आत यावे लागते. गर्भगृहात जमिनीवर शिवपिंडी आहे. शिवपिंडीतील पितळी शाळुंका जमिनीच्या पातळीवर आहे व आतील लिंगपाषाण सुमारे पाच फूट खोल जमिनीत आहे. शिवलिंगावर छत्र धरलेला पितळी नाग आहे. या शिवपिंडीतून अखंड जलधारा वाहती आहे. गर्भगृहातील जमीन, भिंती व छत संगमरवरी फरशीने आच्छादित आहेत.
मंदिराच्या प्रांगणात विविध औषधी वनस्पती, वृक्ष व प्राचीन समाध्या आहेत. प्रांगणात दुर्गा देवी मंदिर, मारुती मंदिर व शिवपिंडी असलेली अनेक लहान मंदिरे आहेत. प्रांगणात गोलाकार मोठा पाषाण आहे. ते खांद्यावर उचलून मंदिराभोवती प्रदक्षिणा घातली असता मनातील इच्छा पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. प्रांगणात दगडी भिंती असलेले गोड्या पाण्याचे चक्रतीर्थ कुंड आहे. येथील पाणी आपल्या शेतात टाकले असता पिकाला रोग लागत नाही व भरघोस पीक येते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. कुंडाभोवती सुरक्षा जाळ्या लावलेल्या आहेत. मंदिराच्या प्रांगणात पुजारी व महंतांची निवासस्थाने, भक्तनिवास व अन्नछत्र आहेत. दररोज सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत भाविकांना येथे महाप्रसादाचे वाटप केले जाते.
मंदिरात महाशिवरात्री हा मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी राज्यभरातून हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. मंदिरात फाल्गुन वद्य प्रथमा या दिवशी मोठी जत्रा भरते. दोन्ही वार्षिक उत्सवांच्या वेळी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. देवाच्या लघु रुद्राभिषेकाने दिवसाची सुरुवात होते व दिवसभर भजन, कीर्तन, संगीत, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दररोज सकाळी ५.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत भाविकांना या मंदिरात केदारनाथ महादेवाचे दर्शन घेता येते.