भाद्रपद मासातील दहा दिवसांचा पार्थिव गणेशोत्सव महाराष्ट्राचा लोकप्रिय उत्सव आहे. मातीच्या गणेश मूर्तींची घरात, मंदिरात अथवा सार्वजनिक ठिकाणी प्राणप्रतिष्ठा करून भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते चतुर्दशी हा दहा दिवसांचा गणेशोत्सव साजरा केला जातो. अनेकदा असे गणेशोत्सव नवसाने सुरू होतात. पुढे परंपरा म्हणून कायम स्वरूपात सुरू राहतात. महाराष्ट्रात असे अनेक गणेशोत्सव आजतागायत सुरू आहेत. अनेकदा अशा गणेशोत्सवातील मखराचे रूपांतर गणेश मंदिरात झाले असल्याचे पाहावयास मिळते. नांदेड जिल्ह्यातील पाळज गावात अशाच स्वरूपाचे गणेश मंदिर असून ते सुमारे पाऊणशे वर्षे प्राचीन आहे.
हे मंदिर १९४८ साली बांधले गेले. या मंदिराबाबत आख्यायिका अशी की १९४८ साली पाळज गावात प्लेगची भयानक साथ पसरली होती. लोक किड्यामुंग्यांसारखे मरू लागले. तेव्हा गावाच्या प्रमुखाने गणपतीला साकडे घातले. गणपती ग्रामप्रमुखाच्या स्वप्नात आला व लाकडी गणेश मूर्ती घडवून दहा दिवसांचा गणेशोत्सव साजरा केल्यास रोगराई नाहीशी होईल, असा दृष्टांत दिला.
मिळालेल्या दृष्टांतानुसार ग्रामप्रमुखाने कर्नाटकातील निर्मलग्राम येथील मूर्तिकार गुंडाप्पा यांच्याकडून लाकडी गणेशमूर्ती एका रात्रीत घडवून घेतली व गावात गणेशाचे मंदिर बांधून दहा दिवसांचा गणेशोत्सव सुरू केला. देवाने दिलेल्या दृष्टांतानुसार गावातील रोगराई नाहीशी झाली. त्यानंतर ही मूर्ती विसर्जित न करता दर वर्षीच्या गणेशोत्सवात याच मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाऊ लागली. आजतागायत हा गणेशोत्सव अखंड सुरू आहे. गणेशोत्सवानंतर मंदिरात गणेश मूर्तीचे छायाचित्र ठेवून वर्षभर पूजा केली जाते.
गावापासून काही अंतरावर मोकळ्या मैदानात हे मंदिर असून मंदिराच्या आसपास मंगल कार्यालय, अन्नछत्र, स्वयंपाकघर, सेवेकरी व पुजाऱ्यांची निवासस्थाने व देवस्थानचे कार्यालय आहे. गणेशोत्सव काळात या मैदानात दहा दिवसांचा जत्रोत्सव साजरा केला जातो व दहा दिवस बाजार भरतो. इतर वेळेस या मैदानाचा वापर वाहनतळ म्हणून केला जातो. मंदिराच्या पेव्हर ब्लॉकने आच्छादित प्रांगणात लोखंडी स्तंभांवर पत्र्याचे गजपृष्ठाकृती छत असलेला रांगमंडप आहे.
मुखमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे.
सभामंडप प्रांगणापेक्षा उंचावर असून प्रवेशद्वारास सात पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला सुरक्षा कठडे आहेत. दोन्ही बाजूच्या सुरक्षा कठड्यात प्रत्येकी एक नक्षीदार स्तंभ आहे. या स्तंभांवर मुखमंडपाचे छत आहे. सभामंडपात उजव्या व डाव्या बाजूला आणखी दोन दरवाजे असून त्यासमोर नव्याने बांधलेले रांगमंडप आहेत.
तिन्ही रांगमंडपात स्टेनलेस स्टीलचे सुरक्षा कठडे लावून रांगांचे व्यवस्थापन करण्यात येते. सभामंडपाच्या द्वारशाखांवर पाना-फुलांची नक्षी व ललाटबिंबस्थानी गणपतीची मूर्ती आहे. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात उजेड व हवा येण्यासाठी वातायने आहेत. पुढे असलेल्या गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर स्टेनलेस स्टीलचे सुरक्षा कठडे लावून अंतराळाची रचना केलेली आहे. गर्भगृह मुक्तद्वार स्वरूपाचे असून चारही कोपऱ्यांवर चार स्तंभ एकमेकांना महिरपी तोरणाने जोडलेले आहेत. गर्भगृहाची मागील भिंत, दरवाजे व छत काचेच्या मिनाकारीने सजवलेले आहेत. गर्भगृहात वज्रपीठावर श्रीगणेशाची लाकडी मूर्ती उत्सव काळात विराजमान असते. इतर वेळेस या मूर्तीचे छायाचित्र वज्रपीठावर ठेवण्यात येते. वज्रपीठाच्या मागे सुवर्णप्रभावळीत पाना-फुलांची नक्षी आणि वर कीर्तीमुख आहे. गर्भगृहाच्या बाह्यबाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे.
मुखमंडपाच्या छतावर पाच मेघडंबरी आहेत. मेघडंबरीवर शिखर रचना असून त्यांवर आडव्या ओळीत प्रत्येकी तीन कळस आहेत. सभामंडपाच्या छतावर चोहोबाजूंनी बाशिंगी कठडा आहे. या कठड्यात समोरील बाजूच्या तीन देवकोष्ठकांत गणपती, लक्ष्मी व सरस्वती यांच्या मूर्ती आहेत. याशिवाय असलेल्या इतर देवकोष्ठकांत विविध देवतांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या छतावर मध्यभागी कळस आहे.
भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते चतुर्दशी हा दहा दिवसांचा गणेशोत्सव येथील मुख्य वार्षिक उत्सव असून तो मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. फक्त या दहा दिवसांत मंदिरातील मूळ काष्ठ गणेशमूर्ती वज्रपीठावर स्थापित केली जाते. इतर वेळेस ही मूर्ती कपाटात सुरक्षित ठेवून मूर्तीच्या छायाचित्राचे पूजन केले जाते. या मूर्तीसोबत पार्थिव गणेशमूर्तीचीही स्थापना करण्यात येते. या दहा दिवसांत सुमारे तीन ते चार लाख भाविक गणेशाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. उत्सव काळात मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन, संगीत अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते व महाप्रसादाचे वाटप केले जाते. शेवटच्या दिवशी काष्ठ मूर्ती व त्या मूर्तीसमोर बसवलेली पार्थिव गणेश मूर्तीची रथात बसवून मिरवणूक काढण्यात येते. मूर्ती नदीतीरावर नेल्या जातात. काष्ठ गणेशमूर्तीवर गंगाजल शिंपडून मूर्ती परत मंदिरात आणली जाते तर पार्थिव गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाते. दहा दिवस मंदिरासमोरील मैदानात विविध वस्तूंची दुकाने सजून या परिसराला बाजारपेठेचे स्वरूप येते. यात मनोरंजनाचे खेळ, कपडे, गृहपयोगी वस्तू, कृषी अवजारे व उत्पादने आदी वस्तूंचा समावेश असतो. या वस्तूंच्या खरेदी-विक्रीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते.
मंदिरात गणेश जयंती, चैत्र पाडवा, श्रावण मास, दसरा, दिवाळी असे इतर धार्मिक सण व उत्सव साजरे केले जातात. सर्व उत्सवांच्या वेळी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मंदिरात दर्शनाला येणाऱ्या भाविकांची रोजच गर्दी असते.