डोलामाता मंदिर,

झुलासण, ता. कडी, जि. मेहसाणा

गुजरातच्या झुलासण येथे वसलेले डोलामाता मंदिर हे भारताच्या ‘गंगा-जमुनी तहजीब’ (हिंदू आणि मुस्लिमांमधील सांस्कृतिक सलोखा) या एकात्मतेच्या परंपरेचे एक खरे प्रतीक आहे. संपूर्ण राज्यात आणि बहुदा देशातही हे मंदिर एकमेव मानले जाते, कारण येथे एका मुस्लिम स्त्रीला ‘डोलामाता’ या दैवी रूपात पूजले जाते. सुमारे ८०० वर्षे जुने असल्याचे सांगितले जाणारे हे मंदिर हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजांतील असंख्य भक्तांचे श्रद्धास्थान आहे. डोलामाता ही भक्तांचे रक्षण करणारी आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करणारी देवी आहे, अशी भाविकांची दृढ श्रद्धा आहे.

झुलासण हे भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांचे मूळ गाव म्हणूनही प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे, या लहानशा गावातील जवळपास प्रत्येक घरातील किमान एक तरी व्यक्ती परदेशात स्थायिक झाली आहे. येथे भाविकांमध्ये अशी दृढ श्रद्धा आहे की डोलामाताची खऱ्या भक्तीने पूजा केल्यास परदेशातील व्हिसा लवकर मिळण्यास मदत होते. याच कारणामुळे या देवीला ‘डॉलर देवी’ असेही नाव पडले आहे.

लोककथेनुसार, सुमारे आठ शतकांपूर्वी जवळील पानसर गावात एका सय्यद मुस्लिम कुटुंबात डोलामाताचा जन्म झाला होता. त्या काळात मोहम्मद घोरीच्या आक्रमणांमुळे या भागात राजकीय अस्थिरता पसरली होती. या अराजकतेचा फायदा घेऊन दरोडेखोर आणि लुटारूंनी गावांवर छापे टाकण्यास सुरुवात केली. एकदा अशाच एका टोळीने झुलासणच्या आसपासच्या परिसरावर हल्ला केला. डोलामाताने अत्यंत शौर्याने त्यांचा प्रतिकार केला आणि या लढ्यात तिला वीरमरण आले. तिच्या मृत्यूनंतर तिचे शरीर एका फुलात रूपांतरित झाले असे म्हटले जाते. तिच्या त्यागाने आणि या चमत्काराने भारावून जाऊन गावकऱ्यांनी ज्या ठिकाणी ते फूल सापडले त्याच ठिकाणी एक मंदिर उभारले. अशा प्रकारे एक दैवी रक्षक म्हणून डोलामाताची पूजा सुरू झाली.

आणखी एक स्थानिक कथा या कथेतील गूढता वाढवते. असे सांगितले जाते की, एके दिवशी गावातून जात असताना डोलामाताने परिधान केलेल्या दागिन्यांच्या मोहाने काही दरोडेखोर तिच्या मागे लागले. त्यांच्यापासून वाचण्यासाठी तिने एका वडाच्या झाडाजवळ आश्रय घेतला, जिथे आधीपासूनच सती मातेचे स्थान होते. अत्यंत हताश होऊन डोलामाताने रक्षणासाठी प्रार्थना केली. यावर प्रसन्न होऊन देवीने डोलामाताला आपल्या दैवी रूपात सामावून घेतले असे मानले जाते. तेव्हापासून गावात पुन्हा प्रवेश करण्याची हिंमत कोणत्याही दरोडेखोराने केली नाही, असे म्हणतात.

मूळतः या मंदिराची रचना एखाद्या मकबऱ्यासारखी होती. पुढे गावकऱ्यांनी गांधीनगरच्या अक्षरधामच्या धर्तीवर एक भव्य मंदिर उभारण्याचे स्वप्न पाहिले. झुलासणचे स्थानिक रहिवासी तसेच परदेशात राहणाऱ्या गावकऱ्यांच्या आर्थिक मदतीतून २००२ मध्ये मंदिराचा पूर्ण जीर्णोद्धार करण्यात आला. गावाच्या वेशीवर एका मोठ्या भूखंडावर वसलेल्या या मंदिर परिसरात तीन भव्य कमानी असलेले एक प्रभावी प्रवेशद्वार आहे. याच्या वरच्या बाजूला असलेल्या घुमटाकार रचनेत घोड्यावर बसलेल्या डोलामाताची मूर्ती आहे. या प्रवेशद्वारापासून मंदिराकडे जाणारा एक पक्का रस्ता आहे, ज्याच्या दोन्ही बाजूंना हिरवीगार उद्याने आहेत.

या रस्त्याने थोडे पुढे गेल्यावर डाव्या बाजूला जोगाणी मातेचे भव्य मंदिर दिसते. राजस्थानी वालुकाश्माचा वापर करून नागर शैलीत बांधलेल्या या मंदिरात मुखमंडप, सभामंडप आणि गर्भगृह आहे. स्थानिक लोकदेवता असलेल्या जोगाणी मातेची येथे प्रतिष्ठापना करण्यात आली असून तिची अत्यंत श्रद्धेने पूजा केली जाते.

पुढे डोलामाताचे मुख्य आणि विस्तीर्ण मंदिर आहे, जे द्रविड वास्तुकलेच्या प्रभावातून राजस्थानच्या लाल वालुकाश्माचा वापर करून बांधले गेले आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर उंच गोपुरासारखी रचना आहे. मंदिराचे द्वार, खांब आणि स्तंभ उत्कृष्ट कोरीव समाजाने सजवलेले आहेत. दरवाजाच्या स्तंभांच्या पायथ्याशी द्वारपालांची शिल्पे आहेत, तर उंबरठ्यावर गजलक्ष्मी देवीची प्रतिमा कोरलेली आहे. गणेश, हत्ती, मंगल कलश आणि डोलामाताचे वाहन असलेल्या घोड्यांची उंच कोरीव शिल्पे मंदिराच्या मुख्य दरवाजांवर शोभून दिसतात. विशेष म्हणजे, संपूर्ण परिसरात, प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांवर आणि शिखराच्या चारही बाजूंना घोड्यांचे नक्षीकाम पाहायला मिळते.

प्रवेशद्वार आणि सभामंडप या दोन्ही ठिकाणच्या स्तंभांवर विविध मुद्रांमधील सुरसुंदरींची सूक्ष्म कोरीव कामे आहेत. या स्तंभांवर नाजूकपणे कोरलेली मकरतोरणेही आहेत. सभामंडपाच्या छतावर झुंबरासारखी नक्षीदार रचना केली आहे. वरच्या भागात जाळीदार काम असल्याने मंडप हवेशीर आणि प्रकाशमान राहतो. यावर पायऱ्यांच्या पिरॅमिडसारखे थरांचे शिखर उभारलेले असून त्यावर कोरलेला आमलक आणि सुवर्ण कलश स्थापित केला आहे.

सभामंडपाच्या मध्यभागी पितळी कठडा असलेला एक मंच आहे, ज्यावर संगमरवरी तीन गर्भगृहे आहेत. मधल्या गर्भगृहात डोलामाताची मुख्य मूर्ती – वेदीवर बसलेली दगडाची मूर्ती प्रतिष्ठापित आहे, जिला चमकदार रंगाची साडी नेसवलेली आहे. तिच्यासमोर घोड्याची मूर्ती आहे. डाव्या बाजूच्या गाभाऱ्यात अस्त्र-शस्त्रांनी सुसज्ज असलेली अंबाजी देवीची उभी चतुर्भुज मूर्ती आहे. सुंदर वस्त्रे आणि अलंकारांनी नटलेल्या या देवीच्या मस्तकावर भव्य मुकुट आहे. उजव्या बाजूच्या गाभाऱ्यात सती मातेची मूर्ती आहे. देवीसमोर अखंड पवित्र ज्योत तेवत असते. सभामंडपातील लहान मंदिरांमध्ये अंबा माता, उमिया माता, भैरव आणि गणेश आदी देवता विराजमान आहेत.

मंदिर प्रांगणात एक यज्ञशाळा असून गार्गाडिया हनुमान आणि मेलाडी माता यांची वेगळी मंदिरे आहेत. जवळच वराई मातेला समर्पित एक सुंदर सुवर्णमयी मंदिर आहे, ज्याच्या भिंतींवर नाजूक सोन्याचे नक्षीकाम केले आहे.

डोलामाता मंदिराची देखभाल ‘श्री डोलामाताजी संस्था ट्रस्ट’द्वारे केली जाते, जे रोजचे धार्मिक विधी आणि आरतीची व्यवस्था पाहतात. स्थानिक समाज सर्व शुभकार्यांचा प्रारंभ डोळामाता देवीचे आशीर्वाद घेऊनच करतो. देवी गावाचे आजारपण आणि संकटांपासून रक्षण करते, असा भक्तांचा ठाम विश्वास आहे. दररोज शेकडो भाविक या मंदिराला भेट देतात. विशेष म्हणजे, अंतराळवीर सुनिता विल्यम्स यांनी आपल्या अंतराळ मोहिमेवर जाण्यापूर्वी या मंदिराला भेट दिली होती. मूळचे झुलासण येथील रहिवासी असलेले त्यांचे वडील दीपक पंड्या, अमेरिकेत स्थायिक होण्यापूर्वी वयाच्या २२ व्या वर्षांपर्यंत तिथेच राहत होते. सुनिता अंतराळात असताना, त्यांच्या सुरक्षित पुनरागमनासाठी ग्रामस्थांनी मंदिरात अखंड ज्योत तेवत ठेवली होती — ही ज्योत तब्बल चार महिने सतत तेवत होती. मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण करून परत आल्यावर सुनिता यांनी स्वतः मंदिरात येऊन देवीचे दर्शन घेतले व प्रार्थना केली.

रविवारी आणि गुरुवारी शेजारच्या गावांतील अनेक मुस्लिम भाविकही मंदिरात दर्शन घेण्यासाठी आणि नवस बोलण्यासाठी येतात. हिंदू भाविक नारळ आणि सुखडी (एक गोड पदार्थ) अर्पण करतात, तर मुस्लिम भाविक देवीला चादर अर्पण करतात. ही चादर पुजाऱ्यांकडून आदराने देवीच्या मस्तकानी जवळ ठेवली जाते. नवस पूर्ण झाल्यावर कापडी घोड्यांच्या प्रतिकृती अर्पण करण्याची एक अनोखी परंपरा येथे आहे. डोळामाता लवकर व्हिसा मिळवून देते या दृढ विश्वासामुळे गुजरात, राजस्थान, पंजाब आणि हरियाणा येथून मोठ्या संख्येने भाविक येथे येतात. वर्षाभरात विविध सण-उत्सव साजरे केले जातात, ज्यामध्ये नवरात्रोत्सव हा सर्वात भव्य असतो. या नऊ दिवसांच्या उत्सवादरम्यान अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते आणि मंदिर परिसरात स्थानिक जत्रेचे आयोजन केले जाते.

मुख्य वैशिष्ट्ये :

  • कडी शहरापासून १८ किमी आणि मेहसाणापासून ३७ किमी अंतरावर स्थित
  • कडी आणि मेहसाणा येथून राज्य परिवहन (ST) बस सेवा उपलब्ध
  • खाजगी वाहनांसाठी मंदिराच्या निर्धारित पार्किंग क्षेत्राची सोय
  • लगतच्या परिसरात राहण्याची किंवा भोजनाची कोणतीही सोय उपलब्ध नाही
Back To Home