गोव्याच्या दक्षिण भागातील पारोडा गावात वसलेल्या चंद्रेश्वर भूतनाथ मंदिरास सुमारे दीड हजार वर्षांहून जुना इतिहास आहे. शिवशंकराचे हे मंदिर त्याच्या चंद्रेश्वर रूपाची प्रचिती देते. गोव्यामधील एका उंच अशा चंद्रनाथ टेकडीवर हे देवालय स्थित आहे. देशातील अनेक मंदिरांत सूर्याचा किरणोत्सव होतो. या मंदिरातील शिवपिंडीवर मात्र चैत्र पौर्णिमेला थेट चंद्रकिरणे पडतात. हे या मंदिराचे आगळे वैशिष्ट्य मानले जाते. येथे स्वयंभू स्वरूपात विराजमान असलेल्या चंद्रेश्वरासोबत त्याच्या १०८ गणांपैकी एक असलेल्या भूतनाथाचेही मंदिर आहे.
चंद्रेश्वर भूतनाथ मंदिराचा इतिहास हा गोव्यातील भोज राजवंशाशी निगडित आहे. पौराणिक आख्यायिकांनुसार भोज हे महाभारतातील यादवांच्या कैकेय या उपकुळातील होते. इसवी सनाच्या पाचव्या ते आठव्या शतकात दक्षिण गोव्याबरोबरच सध्याचा उत्तर कन्नड आणि बेळगाव जिल्हा येथे त्यांचे राज्य होते. चंद्रनाथ वा चंद्रेश्वर हे या राजवंशाचे कुलदैवत. या दैवताच्या नावावरूनच भोजांनी आपल्या राजधानीस चंद्रपूर असे नाव दिल्याचे सांगण्यात येते. चंद्रपूर, म्हणजे हल्लीचे चांदोर हे पारोड्यापासून सुमारे आठ किमी अंतरावर आहे.
गोवा गॅझेटियरनुसार, भोज राजवंशातील एक राजा चंद्रवर्मन याने पाचव्या शतकात पारोड्यातील टेकडीवर शिवमंदिर उभारले असावे आणि त्यानेच येथील शिवलिंगास चंद्रेश्वर वा चंद्रनाथ असे नाव दिले असावे. दहाव्या शतकात हा भाग कदंबांच्या ताब्यात आला. कदंब राजांनीही या मंदिरास संरक्षण दिले.
पौराणिक आख्यायिकेनुसार, सुर-असुरांनी केलेल्या समुद्रमंथनाच्या वेळी लक्ष्मी, कौस्तुभ मणी, कल्पवृक्ष, सुरा, धन्वंतरी, कामधेनू, ऐरावत, रंभा-मेनका, सप्तमुखी उच्चैःश्रवा अश्व, हलाहल, शारंग धनुष्य, पांचजन्य शंख, अमृत आणि चंद्र ही चौदा रत्ने प्राप्त झाली. यातील हलाहल या जहाल विषाचे शंकरांनी प्राशन केले. त्यामुळे त्यांच्या शरीरात प्रचंड उष्णता निर्माण झाली. तेव्हा शितलता प्राप्त व्हावी याकरीता त्यांनी चंद्रास आपल्या माथ्यावर धारण केले. तेव्हापासून त्यांना चंद्रेश्वर असे नाव प्राप्त झाले. चंद्राने शंकरास आपला स्वामी मानले आहे. असे सांगितले जाते की दर चैत्री पौर्णिमेस चंद्र आपल्या स्वामींच्या चरणांस स्पर्श करतो. पूर्वी या मंदिरातील शिवपिंडीवर चंद्रकिरण पडले की त्यातून पाणी ओसंडत असे, अशी दंतकथाही येथे सांगितली जाते.
स्कंद पुराणातील सह्याद्री खंडामधील चंद्रेश्वर माहात्म्य या अध्यायात या स्थानाची महती अशी सांगितली आहे की येथील कुशवती नदी ही ब्रह्मदेवाच्या चरणकमलापासून उत्पन्न झालेली आहे. ती देवतास्वरूप व ऋषीजनांना प्रिय अशी नदी होती. एकदा पुष्कळ वर्षे पर्जन्यवृष्टी न झाल्याने मोठा दुष्काळ पडला. त्यामुळे सर्व ऋषी या नदीची स्तुती करू लागले. त्याच प्रमाणे ते भगवान शंकरास शरण गेले. त्यांची स्तुतीवचने ऐकल्यानंतर प्रसन्न झालेल्या शंकराने कित्येक योजने उंच असे पर्वतप्राय रूप धारण केले व तो त्यांच्यासमोर उभा राहिला. त्याने ऋषींना अभय देऊन सांगितले की माझ्या शरीरापासून उत्पन्न झालेल्या पाण्याने तुमची उपजिविका होईल. तसेच चंद्रसंपर्क झालेल्या या पाण्याचे प्राशन केल्यास तुमचा पापनाश होईल व जीवनही समृद्ध होईल. धार्मिक श्रद्धेनुसार, पारोडा येथील चंद्रेश्वराची टेकडी ही चंद्रचूड (चंद्रेश्वर) महालिंग मानली जाते.
समुद्रसपाटीपासून ३४८ मीटर उंच असलेल्या या चंद्रनाथ टेकडीवर वसलेल्या या भव्य मंदिराचे आजवर अनेकदा जीर्णोद्धार झाले आहेत. मंदिराची सध्याची वास्तू सतराव्या शतकातील असल्याचे सांगण्यात येते.
तिचेही काही प्रमाणात नूतनीकरण करण्यात आले आहे. मंदिराच्या गर्भगृहातील मूळ गुंफा मात्र प्राचीन काळापासूनची आहे. मुल्लेम गावापासून मंदिराकडे येणाऱ्या पायरी मार्गास प्रारंभ होतो. तेथेच एक भव्य प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. या मार्गावर काही अंतरावर शंखभैरवाचे मंदिर आहे. भाविकांची अशी श्रद्धा आहे की चंद्रेश्वराच्या कृपाशीर्वादाला पात्र होण्यासाठी आधी गावाचा राखणदार असलेल्या शंखभैरवाचे दर्शन घेणे महत्त्वाचे असते. येथून पुढे आल्यानंतर काही तीर्थे आहेत. कपिल तीर्थ, गणेश तीर्थ, कमंडलू तीर्थ अशी त्यांची नावे आहेत. या तीर्थांत बारमाही पाणी असते. ‘कमंडलू तीर्थ’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या तळ्याच्या पाण्याने देवांना रोज अभिषेक घालण्याची प्रथा येथे आजही पाळली जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी भाविकांतर्फे घालण्यात येणाऱ्या अभिषेकासाठीसुद्धा हेच पाणी वापरण्याची परंपरा आहे.
ज्यांना या चारशेच्या आसपास असलेल्या पायऱ्या चढून वर येणे शक्य नाही त्यांच्यासाठी मोटारगाडी वरपर्यंत येईल असा रस्ता बांधण्यात आला आहे. हा रस्ता जेथे संपतो तेथून टेकडीच्या माथ्यावर येण्यासाठी काही पायऱ्या चढाव्या लागतात.
वर वृक्षराजीने वेढलेल्या एका पठारासारख्या प्रशस्त जागेमध्ये गोमंतकीय मंदिर स्थापत्यशैलीत चंद्रेश्वर भूतनाथाचे मंदिर स्थित आहे. नगारखान्यासारखा मुखमंडप, सभामंडप, महामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. महामंडपातून गर्भगृहास प्रदक्षिणामार्ग आहे. मंदिराच्या कमानदार प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस भिंतीवर समुद्रमंथनाचे भव्य उत्थितशिल्प आहे. मुखमंडपास कौलारू छत आहे. येथून मंगळुरी कौलांनी आच्छादलेले दोन पातळ्यांचे छत असलेल्या अर्धखुल्या सभामंडपात प्रवेश होतो. यापुढे बंदिस्त स्वरूपाचा महामंडप आहे. संगमरवरी फरशा बसवलेले रुंद चौकोनाकार स्तंभ असलेल्या या महामंडपाच्या छताकडील भाग गोमंतकीय शैलीतील काष्ठशिल्पांनी समृद्ध आहे. लाकडात कोरलेली देवकोष्टके, कोरीव स्तंभांवरील गजमुखे, व्यालप्रतिमा, विविध देव-देवतांची काष्ठशिल्पे, छतावरील नक्षीकाम याने हा महामंडप शोभायमान झालेला आहे. महामंडपात गर्भगृहाच्या अगदी समोर उंच चौथऱ्यावर नंदी स्थापित आहे.
गर्भगृहाचे प्रवेशद्वार आणि दर्शनी भिंतीवरही लाकडी नक्षीकाम केलेले आहे. प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबस्थानी गणपतीची मूर्ती आहे.
द्वारशाखांवर साखळीची नक्षी असून खालच्या बाजूला द्वारपालांची शिल्पे कोरलेली आहेत. मंडारकासमोर लाकडात कोरलेली दोन नंदीशिल्पे आहेत. गर्भगृहाच्या दर्शनीभिंतीवर दोन्ही बाजूंना लाकडी देवकोष्ठके आहेत. त्यांत गणपती आणि नवदुर्गा यांच्या मूर्ती आहेत. या दोन्ही मूर्ती काळ्या पाषाणांत घडविण्यात आल्या आहेत. दर्शनीभिंतीच्या दोन्ही बाजूंना असलेल्या स्तंभासमोर वैष्णव द्वारपालांच्या प्राचीन मूर्ती आहेत.
मंदिरातील गर्भगृह हे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. ते एका भव्य अशा शिळेमध्ये कोरलेले आहे. या शिळेचा काही भाग गर्भगृहाच्या प्रदक्षिणा मार्गामध्ये पाहावयास मिळतो. गर्भगृहात चंदेरी प्रभावळीत चंद्रेश्वर भूतनाथाची मुखवटाधारी मूर्ती स्थापित आहे. तिच्या समोर शिवपिंडी असून त्यावर शंकराचा मुखवटा ठेवलेला आहे. असे सांगितले जाते की ही शिवपिंडी आणि गर्भगृह असलेली मूळ गुंफा एकाच पाषाणाची आहे. गर्भगृहात चंद्रनाथ, गणपती, नवदुर्गा, महालक्ष्मी आणि विष्णू या पाच देवतांची पूजा केली जाते. त्यामुळे ते पंचायतन स्थान म्हणून ओळखले जाते. गर्भगृहावर अष्टकोनी रचना, त्यावर घुमटाकार आणि त्यावर दुहेरी आमलक व कळस अशा स्वरूपाचे शिखर आहे. शिखरावर चारही दिशांना देवकोष्टके असून त्यात देव-देवतांच्या मूर्ती विराजमान आहेत.
मंदिर परिसरात तुळशीवृंदावन तसेच दीपमाळ आहे. येथील पिंपळाच्या झाडानजीक चंद्रेश्वराचा प्रधान असलेल्या भूतनाथाचे स्थान आहे. तेथील मोठ्या लाकडी मखरामध्ये उंच टोकदार शिळेच्या स्वरुपातील भूतनाथ स्थापित आहे. तो भूतांचा स्वामी मानला जातो. या ठिकाणाची रचना अशी आहे की भूतनाथ आणि चंद्रेश्वर हे दोघेही एकमेकांना झरोक्यातून पाहू शकतात. मुख्य मंदिरापासून काही अंतरावर काचेने बंदिस्त केलेल्या एका दालनात काळ्या पाषाणात घडविलेल्या अनेक मूर्ती मांडलेल्या आहेत. त्यात प्रामुख्याने यज्ञकार्य करणारे कपिल, अत्रि, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वसिष्ठ आणि त्यांच्यासोबत वसिष्ठपत्नी अरुंधती यांच्या मूर्ती आहेत. त्यामागे शिवपार्वती विवाहाचा प्रसंग विविध मूर्तींद्वारे उभा केला आहे. मंदिर परिसरातच उत्सवादरम्यान वापरले जाणारे चार रथ आहेत. त्यात विजय रथ (घोडा), अंबारी रथ (हत्ती), चंडी रथ (चांदी) आणि महारथ (विशाल रथ) यांचा समावेश आहे.
चैत्र पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जाणारा हनुमान जन्मोत्सव हा येथील सर्वात मोठा व प्रसिद्ध उत्सव मानला जातो. चैत्र शुद्ध एकादशीपासून पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवात विविध धार्मिक विधी, लघुरुद्र, अभिषेक, आरती, कीर्तन आदी उपक्रम पार पडतात. उत्सवाच्या पहिल्या रात्री देवाचा शिबिकोत्सव, दुसऱ्या रात्री अंबारीतून मिरवणूक, तिसऱ्या दिवशी चांदीच्या रथातून, तर चौथ्या दिवशी विजयरथातून मिरवणूक काढण्यात येते. पाचव्या रात्री येथे दिवजांची भोवर होते. याच वेळी देवाची महारथातून मिरवणूक काढली जाते. पाचही दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. उत्सवाच्या दिवसात रोज दुपारी व रात्री अन्नप्रसाद असतो. एरवी शांत असणारी ही टेकडी जत्रेच्या निमित्ताने गजबजून जाते.
येथे वर्षभरामध्ये होणाऱ्या अन्य उत्सवामध्ये, प्रत्येक सोमवारी भजनाचा कार्यक्रम असतो. यावेळी चांदीच्या पालखीतून मंदिर परिसरात देवाची मिरवणूक निघते. महाशिवरात्री, दिवजोत्सव, शिमगोत्सव, श्रावणी सोमवार आणि नवरात्र हे उत्सवही येथे भव्यतेने साजरे होतात. विजयादशमीच्या दिवशी चंद्रेश्वर-भूतनाथ देवालयात तरंगोत्सव होतो. दुपारी तीनच्या दरम्यान श्री चंद्रेश्वर व श्री भूतनाथ यांचे अवसर येतात. उपस्थित भक्तगणांना कौल देऊन झाल्यावर चंद्रेश्वर-भूतनाथाची पालखी, अवसर व तरंग शंख-भैरोबाच्या मंदिरात येतात. तरंगासोबत त्रिशूल घेऊन कुर्पे गावचा सेवेकरी असतो. हा त्रिशूल कुर्पे येथील माधवनाथ देवाचा मान असतो. नवरात्रीत त्याची पूजा-अर्चा होते. दसऱ्याला टेकडीच्या माथ्यापासून पारोंदा बाजारापर्यंत देवाची पालखी मिरवणूक निघते. चंद्रेश्वराची बहीण आपल्या भावाला भेटण्यासाठी येते. पालखी पुनश्च मंदिरात गेल्यावर दसरोत्सवाची सांगता होते. या उत्सवांची पर्वणी साधण्यासाठी गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील भाविक या मंदिरात येत असतात.