कामाक्षी देवी मंदिर

शिरोडा, ता. फोंडा, जि. दक्षिण गोवा

आसाममधील सुप्रसिद्ध कामाख्या देवीशी नाते सांगणारे कामाक्षी मंदिर गोव्यातील अतिशय नयनरम्य स्थळी वसले आहे. येथे सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात हे मंदिर उभारण्यात आले आहे. मंदिरात महिषासुरमर्दिनीच्या स्वरूपामध्ये कामाक्षी देवी विराजमान आहे. ही देवी मूळची सासष्टीतील राय गावातील असल्याचे सांगण्यात येते. ती अतिशय जागृत देवता मानली जाते. तिच्यापाशी आपले गाऱ्हाणे मांडण्यासाठी गोव्यातील भाविकांसोबतच महाराष्ट्र व कर्नाटकमधील भक्तमंडळी येत असतात. प्रत्येक अमावास्येला तसेच येथे साजऱ्या केल्या जाणाऱ्या विविध उत्सवांच्या वेळी या मंदिरात अलोट गर्दी उसळते.

शिरोडा येथील मंदिरात असलेली देवीची प्रतिमा ही महिषासुरमर्दिनीची आहे, जिला तिच्या मोहक डोळ्यांमुळे कामाक्षी म्हटले जाते. ही देवी येथे कशी आली या संदर्भात वेगवेगळी माहिती उपलब्ध आहे. काही जाणकारांच्या म्हणण्यानुसार तिचे मूळ स्थान कामरूप देशात म्हणजेच सध्याच्या आसाममध्ये आहे. काही विद्वानांच्या मते मात्र तिचे स्थान तमिळनाडूतील कांचीपुरम येथे आहे. देवीच्या एका आख्यायिकेत तिला कावूर येथे जाऊन आमंत्रण दिल्याचा उल्लेख आहे, तर गोव्यातील एका भक्ताला आसाममधील एका नदीत स्नान करताना ही मूर्ती सापडली, असा उल्लेख दुसऱ्या एका आख्यायिकेत आहे. असे सांगितले जाते की गोव्यात पार्वतीच्या कामाक्षी अवताराच्या पुजनाची सुरुवात कदंब राजवंशातील (पहिला) जयकेशी याने केली होती.

एका आख्यायिकेनुसार, सासष्टी तालुक्यातील लोटली येथील रामनाथाचा एक भक्त आसाम येथे यात्रेसाठी गेला होता. तेथे नदीत स्नान करताना त्याला देवीची मूर्ती सापडली. त्याने ती कपड्यात गुंडाळून आपल्या वस्तुंमध्ये ठेवली आणि घरी निघाला. घराकडे येताना त्याने आपल्या मुलीच्या सासरी म्हणजे राय गावात एक मुक्काम केला. तो स्नानाला गेला असता त्याच्या चीजवस्तू नीट ठेवताना त्याच्या मुलीने उत्सुकतेपोटी कपड्याची गुंडाळी उघडली. त्यात देवीची मूर्ती पाहून तिने ती जमिनीवर उभी ठेवली. त्यानंतर ती मूर्ती तेथून हलवता येईना. राय गावातील ग्रामस्थांनी हा शुभशकून मानत देवीची तिथेच स्थापना केली.

इ.स. १५१०मध्ये गोव्यात आल्यानंतर काही काळातच पोर्तुगीजांनी येथे धार्मिक अत्याचारांचा कहर केला. अनेक देवालये पाडून टाकली. पोर्तुगीजांच्या या धर्मांध राजसत्तेची नजर राय गावातील मंदिरावरही पडली. मंदिरातील देवीच्या मूर्तीची विटंबना होऊ नये, यासाठी गावकऱ्यांनी तातडीने येथून मूर्ती हलवण्याचा निर्णय घेतला. गावात कुंभारकाम करणाऱ्या एका व्यक्तीने ती जबाबदारी घेतली आणि त्याने रात्रीच्या अंधारात नदी ओलांडून शिरोडा येथे देवीची मूर्ती आणली. तिथे तिची स्थापना करण्यात आली. यामुळे राय गावातील कुंभारांना शिरोडा मंदिरातील उत्सवात खास मान आहे. पहिला दिवा लावण्याचा वंशपरंपरागत अधिकार त्यांना देण्यात आला आहे. दिवजा उत्सवासाठी मातीचे दिवेही तेच पुरवतात. या मंदिरातील रायेश्वर, लक्ष्मीनारायण, शांतादुर्गा या देवीच्या सहकारी देवता देखील राय येथील वेगवेगळ्या मंदिरांमधून शिरोड्यात आणण्यात आल्या आहेत.

याबाबत अशीही कथा सांगण्यात येते की फोंडा तालुक्यातील रायकर आडनावाच्या एका कुटुंबाच्या घरात १५६४ ते १५६८ या दरम्यानच्या काळात प्रथम देवीची मूर्ती हलविण्यात आली. मात्र ती जागाही सुरक्षित वाटत नसल्याने मग ही मूर्ती फोंडा तालुक्यातीलच बारभाट गावात नेण्यात आली. पण ती जागाही धोकादायक वाटल्याने शेवटी कामाक्षी देवालयाची स्थापना थळ-शिरोडा येथे करण्यात आली. त्यासाठी कोमुनिदादकडून जागा मिळवण्यात आली. कोमुनिनाद म्हणजे गोव्यातील जमिनीच्या मालकीचा एक प्रकार आहे. जिथे जमीन सामुहिक मालकी हक्काची असते. ही एक प्राचीन व्यवस्था आहे. या जमिनीचे व्यवस्थापन गावातील धार्मिक आणि सामाजिक कामासाठी केले जाते. अद्यापही काही ठिकाणी ही व्यवस्था अस्तित्वात असल्याचे सांगितले जाते.

डोंगरांनी वेढलेल्या या मंदिराभोवती हळूहळू बांधकामांची गर्दी झालेली दिसत असली, तरी मंदिराचा मूळ परिसर विस्तृत आहे. देवालयाचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेला आहे. तेथेच एक पुष्करणी आहे. आत देवालयाच्या उजवीकडे एक मंदिर आहे. या मंदिराचा सभामंडप मोठा आहे. आत वेगवेगळ्या गर्भगृहांत रायेश्वराचे लिंग, लक्ष्मीनारायणाची मूर्ती, ढाल तलवार घेतलेली शांतादुर्गेची मूर्ती, ग्रामपुरुष लिंग, महाडेश्वर लिंग विराजमान आहेत. या मंदिराच्या जवळच एक छोटी बंदिस्त बारव आहे. गोलाकार स्वरुपात दिसणारी ही विहीर तळात चौकोनी आहे. त्याच्या जवळच कामाक्षी हवन मंडप आहे. तिथेच तुळशी वृंदावनही आहे. मंदिर प्रांगणात भक्तनिवास व सभागृहही आहे.

मुख्य मंदिरासमोर गोमंतकीय पद्धतीची सहा मजली दीपमाळ आहे. मंदिरात प्रवेश करताच प्रथम देवीचा प्रशस्त असा कौलारु सभामंडप लागतो. सज्जा असलेल्या लाकडी बांधकामाने त्याचे छत तोललेले आहे. पुढील मंडपात प्रवेश करण्यासाठी असलेला प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना वेताळ, काळभैरव, सटी आणि खुटी आदी देवतांची स्थाने आहेत. प्रवेशद्वार लाकडी नक्षीने सुशोभित करण्यात आले आहे. त्यापुढे असलेल्या अर्धसभामंडपातून पुढील महामंडपात जाणाऱ्या प्रवेशद्वारावर दगडी नक्षीकाम आहे. त्यानंतर लागणाऱ्या मुख्य सभामंडपाचा तोल नक्षीदार खांबांनी सावरला आहे. हंड्या झुंबरे असलेल्या छतावरही लाकडी नक्षीकाम आहे. पुढे अंतराळ असून त्याची दर्शनी भिंत चांदीच्या पत्र्याने मढवण्यात आली आहे. त्यावर नाजुक कोरीव काम आहे. त्याच भिंतीवर डाव्या उजव्या बाजुला असलेल्या देवकोष्टकात एका बाजुला त्रिमुखी दत्त तर दुसऱ्या बाजुला गणपती विराजमान आहेत. नक्षीकामांनी सजलेल्या द्वारचौकटीवर कीर्तीमुख व त्यावरील भागात गणपती आहे. गर्भगृहाचे प्रवेशद्वारही चांदीच्या पत्र्याने सजवलेले आहे. गर्भगृहात महिषासुरमर्दिनीच्या स्वरुपातील देवीची मूर्ती आहे. देवी चतुर्भुज असून देवीच्या वरच्या दोन हातात तलवार आणि ढाल आहे. खालच्या दोन्ही हातांनी ती महिषासुराचा वध करत आहे.

मंदिरात विविध उत्सव साजरे केले जातात. त्यात लक्ष्मीनारायण शिबिकोत्सव, कामाक्षी शिबिकोत्सव, रायेश्वर रथोत्सव आणि कामाक्षी लालखोत्सव यांचा समावेश आहे. उत्सवकाळात मंदिर दिवे, फुले आणि विद्युत रोषणाईने सजवले जाते. अमावस्येला कामाक्षी आणि लक्ष्मीनारायणाच्या पालखी मिरवणुका (शिबिकोत्सव) मंदिर परिसरात काढल्या जातात. यात शेकडो भक्त सहभागी होतात. चतुर्दशीला रायेश्वराची आणि पंचमीला शांतादुर्गेची पालखी मिरवणूक असते. नवरात्रोत्सवात वार्षिक उत्सव साजरा केला जातो. यावेळी सायंकाळी विवाहित स्त्रिया मातीचे दिवे (दिवजा) घेऊन मंदिराभोवती मिरवणूक काढतात. याशिवाय दसरा, गोकुळाष्टमी, महाशिवरात्री, शिमगो म्हणजे होळी हे उत्सवही येथे साजरे होतात.

माघ कृष्ण चतुर्दशी ते फाल्गुन शुद्ध षष्ठीपर्यंत एक आठवडा येथे जत्रा असते. हा जत्रोत्सव या मंदिरातील विशेष महत्त्वाचा उत्सव आहे. या उत्सवात गुलालोत्सव, शिबिकोत्सव, लालखोत्सव, खांद्यावरील रथोत्सव असे कार्यक्रम असतात. माघ कृष्ण चतुर्दशीस रात्री रायेश्वर आणि कामाक्षी यांची जोडीने मिरवणूक काढली जाते. फाल्गुन शुद्ध प्रतिपदेस रायेश्वराची खांद्यावरील रथातून आणि कामाक्षी देवीची लालखीतून (विशिष्ट प्रकारची पालखी) अशी जोडीने मिरवणूक शिरोडा येथील ग्रामदेव रवळनाथाच्या मंदिरापर्यंत जाते.

 

उपयुक्त माहिती:

  • फोंडा येथून १३ किमी आणि पणजी येथून ३७ किमी अंतरावर
  • फोंडा येथून राज्य परिवहन बसची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
  • संपर्क : मंदिर कार्यालय, दूरध्वनी : ०८३२ २३०६२२५

कामाक्षी देवी मंदिर

शिरोडा, फोंडा, जिला दक्षिण गोवा

Back To Home