महालक्ष्मी मंदिर

दादा वैद्य मार्ग, पणजी, जि. उत्तर गोवा

महालक्ष्मी म्हणजे मूळ प्रकृती, आदिमाया, दुर्गा, महिषासुरमर्दिनी, जगदंबा अशी विविध नावे धारण करणारी ही शक्तिपीठ देवता समृद्धीचीही देवता मानली जाते. गोमंतकात राज्य केलेल्या कदंब राजघराण्याप्रमाणेच शिलाहार राजवंशाचीही ती कुलदेवता होती. या देवीचे पणजीतील मंदिर हा येथील हिंदू बांधवांच्या संघर्षाचा परिपाक आहे. पोर्तुगीजांच्या जुलमी धर्मसत्तेने सुमारे ३०० वर्षांनंतर पणजीमध्ये जे मंदिर बांधण्यास परवानगी दिली ते हे मंदिर होय. येथील महालक्ष्मीस पणजीच्या ग्रामदेवतेचा मान आहे. चैत्री पौर्णिमेस येथे होणाऱ्या उत्सवात हजारो भाविक सहभागी होतात.

‘दुर्गासप्तशती’ या ग्रंथात महालक्ष्मीचे वर्णन प्रसन्नवदना, कमलासना व महिषासुरमर्दिनी असे करण्यात आले आहे. ‘देवीमाहात्म्य’ या ग्रंथात महालक्ष्मी देवीची अवतारकथा देण्यात आली आहे. ती अशी की एकदा देवांचा पराभव करून महिषासुर हा दैत्य जगाचा स्वामी बनला. तेव्हा पराजित झालेल्या देवांनी भगवान विष्णू व शंकर यांस साकडे घातले. महिषासुराच्या अत्याचाराची कथा ऐकून विष्णू व शंकर हे क्रूद्ध झाले. त्यावेळी त्यांच्या, तसेच ब्रह्मदेव, इंद्रादी देवांच्या देहातून मोठे तेज बाहेर पडले. ते सर्व दिव्य तेज एकत्र झाले व त्यातून एक स्त्रीदेवता प्रकट झाली. तिने दानवांशी युद्ध करून महिषासुराचा वध केला. या देवीला महिषासुरमर्दिनी किंवा महालक्ष्मी असे म्हणतात. पणजीतील मंदिरात ही देवी सौम्य रूपात विराजमान आहे.

पणजीचे प्राचीन नाव पांजनी खली असे होते. याचा अर्थ ज्या खाडीकिनारी लहान होड्या जाऊ शकतात अशी जागा. पूर्वी हे एक लहानसे खेडे होते. याचा सर्वांत प्राचीन उल्लेख ७ फेब्रुवारी ११०७च्या कदंब राजा त्रिभुवनमल्ल ऊर्फ विजयादित्य याच्या शिलालेखात आढळतो. या भागाचा कारभार कदंब राजाने गंडगोपाल केलिमा यास दिला होता. आदिलशाही काळात येथे मोठा किल्ला बांधण्यात आला होता. नोव्हेंबर १५१०मध्ये गोवा बेट जिंकल्यानंतर पोर्तुगीजांनी याच परिसरात आपली सैन्य छावणी उभारली. पणजीतील महालक्ष्मी मंदिराच्या इतिहासास याच कालखंडात प्रारंभ होतो. त्यावेळी कर्नाटकातील कारवार-कुमठा भागामध्ये हविक (हव्यक वा अहिछात्र) ब्राह्मण राहात असत. हे मुख्यतः पंचद्रवीड यजुर्वेदीय ब्राह्मण होत. त्यांतील काही ब्राह्मण सोळाव्या शतकात पणजी परिसरात आले. ते महालक्ष्मीचे उपासक होते व ते दानप्राप्तीसाठी जेथे जात तेथे महालक्ष्मीची मूर्ती सोबत घेऊन जात असत. येथील ताळगावात आल्यानंतर त्यांना पोर्जुगीजांच्या धर्मांधतेच्या क्रूर कहाण्या समजल्या. त्या ऐकून आपल्या दैवताची विटंबना होईल या भयाने त्यांनी येथून पळ काढला. वाटेत त्यांना एक मोठी अश्वशाला दिसली. तेथे ते लपून बसले. ही अश्वशाला पोर्तुगीज सरकारची होती. त्यावेळी येथे राघवेंद्र कामत महामयी हे एक मातब्बर गृहस्थ होते. ते पोर्तुगीज फौजेसाठी काम करीत असत. त्यांना हे ब्राह्मण अश्वशालेत लपल्याचे समजले. तेथे ते असुरक्षित असल्याचे जाणून त्यांनी त्या सर्वांना आपल्या वाड्यामध्ये आणून ठेवले. आदिलशाही राजवाड्याच्या (जुने सचिवालय) समोर हा वाडा होता. यानंतर त्यांना त्या ब्राह्मणांना डिचोली तालुक्यातील मये गावात सुरक्षित पाठवले. त्यांनी तेथे महालक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना केली. पुढे ३०० वर्षे ही मूर्ती मये गावात होती.
.स. १८१७मध्ये एके रात्री पणजीतील एक प्रतिष्ठित गृहस्थ नारायण कामत महामयी यांना स्वप्न पडले. स्वप्नात महालक्ष्मी दिसली. दुसऱ्या दिवशी सकाळीच आपल्या सोबत काही लोकांना घेऊन ते मये येथे गेले आणि तेथून त्यांनी महालक्ष्मीची मूर्ती आणली. ही मूर्ती राया कामत घाणेकर यांच्या वाड्यामध्ये ठेवण्यात आली. दरम्यानच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि त्यानंतर पुण्याचे पेशवे यांच्या भय व दबावामुळे पोर्तुगीजांच्या अत्याचारांस लगाम बसला होता. तरीही येथे नवे हिंदू मंदिर उभारण्याची कोणाची प्राज्ञा होत नव्हती. मात्र नारायण कामत महामयी यांनी आपली प्रतिष्ठा पणास लावून गोव्याचा उदारमतवादी राज्यपाल काँदे डी रिओ पार्दो याच्याकडून मंदिर उभारण्यास परवानगी मिळवली. तीन शतकांत अशी परवानगी पहिल्यांदाच मिळाली होती.

यानंतर पणजीच्या नागरिकांनी मंदिर उभारणीसाठी एक हजार शहा अशर्फी एवढी रक्कम जमा केली. त्यातून येथे मंदिर बांधण्यात आले. या मंदिरात १० जुलै १८१८ रोजी आषाढ शुक्ल सप्तमीच्या मुहूर्तावर महालक्ष्मीच्या मूर्तीची अन्य परिवार देवतांसह प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या मंदिरास मार्च १८७०मध्ये मोठा सभामंडप बांधण्यात आला. त्याचा खर्च गौरी सोयरू शेणवी डेम्पो या पणजीतील धनिकाने केला. तो जीर्ण झाल्यानंतर, त्यांच्या घराण्यातील वसंतराव श्रीनिवास शेणवी डेम्पो यांनी त्याची पुनर्बांधणी केली. रविवार, ता. ९ जानेवारी १९८३ रोजी गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाधीश विद्याधिराजतीर्थ श्रीपाद वडेर स्वामी यांच्या हस्ते या नव्या सभामंडपाचे उद्‌घाटन करण्यात आले.

अल्टिन्हो टेकडीच्या पायथ्याशी, पणजीच्या दाट लोकवस्तीच्या भागात एका प्रशस्त प्राकारात हे भव्य मंदिर वसले आहे. साधारणतः तीन मजले एवढ्या उंचीच्या या मंदिराची संरचना मोठा सभामंडप, महामंडप आणि गर्भगृह अशी आहे. सभामंडपाच्या समोर तारकाकृती आकाराचा जांभ्या दगडात बांधलेला आठ स्तरीय दीपस्तंभ आहे. त्याच्या मागे मोठा वटवृक्ष असून त्यास उंच पार बांधलेला आहे.

मंदिराचा सभामंडप उंच चौरसाकार आहे. सपाट दर्शनी भिंत असलेल्या या मंडपास महिरपी कमान आणि गजमुखांनी सुशोभित केलेले उंच प्रवेशद्वार आहे. त्यावरील भागात दोन छोटी गवाक्षे आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस उंच देवळ्यांत वैष्णव द्वारपालांच्या मूर्ती, तसेच दोन तुलसी वृंदावने आहेत. उंच आणि प्रशस्त असा हा सभामंडप डाव्या आणि उजव्या भिंतींत बसवलेल्या जाळीदार खिडक्यांमुळे प्रकाशमान आहे. आत वरील समोरील तिन्ही बाजूंस कठडे असलेला सज्जा आहे. येथे जाण्यासाठी समोरच्या बाजूस दोन वर्तुळाकार जिने आहेत. सभामंडपाच्या भिंतींवर कृष्णधवल रंगात दशावतारांची, तसेच गजेंद्रमोक्ष, समुद्रमंथन आणि त्यात सापडलेली रत्ने अशा पौराणिक प्रसंगांची चित्रे रेखाटलेली आहेत. महामंडपास रुंद असे प्रवेशद्वार आहे. त्याच्या वरील भागात गरुडविमानाची मोठी प्रतिकृती लावलेली आहे. आत मध्यभागी मंदिराचे गर्भगृह आहे. त्यास महामंडपातूनच प्रदक्षिणा मार्ग आहे. गर्भगृहाच्या भिंती संगमरवरी फरशांनी सुशोभित केलेल्या आहेत. त्याच्या छोट्याशा खुल्या अंतराळाच्या दोन्ही बाजूंस असलेल्या भिंतीमधील देवळ्यांमध्ये द्वारपालांच्या रंगीत मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर कोरीव नक्षीकाम केलेला चांदीचा पत्रा जडवलेला आहे. येथे द्वारस्तंभांवर सिंह प्रतिमा, गरूड आणि हनुमंत यांची शिल्पे कोरलेली आहेत. द्वारचौकटीच्या ललाटबिंब स्थानी गणेशाची मूर्ती आहे. वरच्या भागात मयुरांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. आत चांदीच्या वज्रपीठावर चांदीचा मोठा देव्हारा आहे. त्यात चांदीच्या सिंहासनावर महालक्ष्मीची पितळी मुखवटा असलेली चतुर्भूज मूर्ती प्रतिष्ठापित आहे. नाकात नथ, गळ्यात अलंकार, मस्तकी मुकूट धारण केलेली अशी ही प्रसन्नवदन देवी वस्त्रालंकारांनी आणि पुष्पमालांनी शृंगारलेली आहे. गाभाऱ्यात एका पेटीमध्ये देवीची मूळची जुनी, काळ्या पाषाणातील मूर्ती ठेवण्यात आली आहे. गर्भगृहावर उंचच उंच असे शिखर आहे. चारही कोपऱ्यांत लघुशिखरे आणि मध्ये चारही बाजूंनी वर निमुळते होत गेलेले शिखर अशी त्याची रचना आहे. त्यावर आमलक आणि उंच कळस आहे.

मंदिराच्या प्राकारात मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळच वरदविनायकाचे मंदिर आहे. महालक्ष्मी मंदिराच्या उजवीकडे मारूतीचे मंदिर आहे. या मंदिराची स्थापना २५ फेब्रुवारी १९२९ रोजी करण्यात आली होती. या मंदिरात संगमरवरी पाषाणात घडवलेली द्रोणागिरीधारी हनुमानाची मूर्ती आहे. त्याचप्रमाणे येथे गणेशाच्या दोन मूर्ती, तसेच शनिदेवाची मूर्ती विराजमान आहे. या शिवाय प्राकारात मूळ मंदिराच्या स्थापनेच्या वेळी उभारलेले शिवमंदिर आहे. त्याच्या उजवीकडे रवळनाथाचे तसेच रामपुरूष व ग्रामपुरुष या परिवार दैवतांची मंदिरे आहेत.

महालक्ष्मी मंदिरात रोज दुपारी १२.३० व रात्री ८ वाजता देवीची आरती केली जाते. त्याच प्रमाणे येथील विनायक मंदिरात दुपारी १२ व रात्री ७.३० वाजता गणेशाची आरती केली जाते. देवस्थानतर्फे येथे रामनवमी, हनुमान जयंती, चैत्र पौर्णिमा, विजयादशमी, गणेशोत्सव, रथसप्तमी, महाशिवरात्र तसेच मार्गशीर्षातील कालोत्सव आदी उत्सव मोठ्या भक्तिभावाने व उत्साहाने साजरे केले जातात. येथे दर नागपंचमीपासून सप्ताह साजरा केला जातो. जुन्या काळी महामारी निवारणासाठी येथील लोकांनी सात दिव देवीचा उत्सव साजरा केला होता. त्याची स्मृती म्हणून येथे सात दिवस अखंड भजन केले जाते. चैत्री पौर्णिमेचा उत्सव हा या मंदिरातील एक महत्त्वाचा उत्सव होय. या दिवशी येथे देवीची भव्य रथयात्रा काढली जाते. उत्सवादरम्यान येथे पारंपरिक नाट्यप्रयोग साजरा केला जातो. या प्रयोगाच्या वेळी सभामंडपातील खास गरूडासनावर देवीची मूर्ती स्थापन केली जाते. गोव्यातील हजारो देवीभक्त या उत्सवात सहभागी होतात.

उपयुक्त माहिती:

  • पणजी बस स्थानकापासून २ किमी अंतरावर
  • राज्यातील अनेक शहरांतून पणजीसाठी राज्य परिवहन बसची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापासून काहीशा दूर असलेल्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : मंदिर कार्यालय, दू. ०८३२ २४२२४१०
Back To Home