नागेश मंदिर

नागेशी, बांदिवडे, ता. फोंडा, जि. उत्तर गोवा

गोव्यातील अनेक मंदिरांना पोर्तुगीजांच्या उपद्रवाचा, स्थलांतराचा इतिहास आहे. बांदिवडेतील श्री नागेश महारुद्र संस्थान मात्र यास अपवाद आहे. पौराणिक आख्यायिकेनुसार सुमारे तीन हजार वर्षांपासून येथे नागेशाचे स्थान आहे. तर ऐतिहासिक नोंदींवरून सुमारे सातशे वर्षांपासून हे देवस्थान येथे स्थित आहे. गोमंतकातील शैव आणि नाथ संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेले हे मंदिर महादेवास समर्पित आहे. धार्मिक महत्त्वाबरोबरच भव्यता, वास्तुसौंदर्य, काष्ठशिल्पे, भव्य दीपस्तंभ आणि मंदिरासमोरील सुंदर तलाव यांमुळे हे मंदिर भाविकांबरोबरच पर्यटकांचेही आकर्षण स्थान बनले आहे.

नागेश मंदिराविषयीची पौराणिक आख्यायिका भगवान परशुरामाशी निगडित आहे. ती अशी की विष्णुचा सहावा अवतार असलेल्या भगवान परशुरामाने सह्याद्रीपासून समुद्रापर्यंतची बारा कोस रुंद आणि चार कोस लांब भूमी सागरदेवतेकडून प्राप्त करून घेतली व वसाहतयोग्य बनवली. त्यानंतर या स्थानी परशुरामाने दिग्विजयार्थ यज्ञ केला. त्याच्या सिद्धीसाठी अनेक विद्वान ब्राह्मणांची आवश्यकता असल्याने परशुरामाने उत्तरेकडील त्रिहोत्रपूर येथून भारद्वाज, कौशिक, वत्स, कौंडिण्य, कश्यप, वसिष्ठ, जमदग्नी, विश्वामित्र, गौतम आणि अत्री अशा तपस्वी विद्वान सारस्वत ब्राह्मणांना गोमंतकात आणले. मराठी विश्वकोशानुसार, मिथिला देशाची एकूण १२ नावे होती. त्यातील एक नाव तैरभुक्ती असे होते. त्याचा अपभ्रंश तिहोत्र असा झाला. सध्याच्या बिहार राज्यातील गंगेच्या उत्तरेकडील भागास तिरहूत क्षेत्र असे म्हणतात. येथून आलेल्या या ब्राह्मणऋषींची ६६ कुळे होती.

या कुळांनी त्यांच्यासमवेत त्यांची मंगेशी, महालक्ष्मी, मांगिरिश महादेव, शांतादुर्गा, सप्तकोटेश्वर, महालसा ही कुलदैवतेही येथे आणली. याचे वर्णन सह्याद्री खंडाच्या उत्तररहस्यामध्ये आलेले आहे. श्री. म. माटे यांनी १९३७ साली लिहिलेल्या ‘परशुराम चरित्र व पंचमानव हिंदुसमाज’ या पुस्तकात आद्य परशुरामाचा काळ सुमारे सात हजार वर्षांपूर्वीचा असल्याचे म्हटले आहे. तर इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी १९१४ साली ‘भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे’च्या द्वितीय संमेलन वृत्तांतात प्रसिद्ध केलेल्या निबंधात ‘चित्पावनांचे १४ मूळ पुरूष ३०८८ वर्षांमागे कोंकणात वसाहत करिते झाले’, असे मत मांडले आहे. हे लक्षात घेता बांदिवडेतील नागेशाचे स्थान हे किमान तीन हजार वर्षांपासून विद्यमान असल्याचे स्पष्ट होते.

या मंदिराविषयीचा एक महत्त्वाचा ऐतिहासिक पुरावा मंदिरातीलच शिलालेखातून प्राप्त झाला आहे. सध्या हा काळ्या पाषाणात संस्कृत-मराठी भाषेत कोरलेला शिलालेख मंदिराच्या दीपस्तंभानंजीक असलेल्या कार्यालयाच्या भिंतीवर लावलेला आहे. विजयनगर साम्राज्याच्या वीर प्रताप देवराय महाराय या राजाच्या कारकिर्दीतील हा शिलालेख आहे. त्यावर ‘श्रीशालिवाहन शके १३३५ पौष बहुल ३०’ (२४ डिसेंबर १४१३) अशी कालनोंद आहे. या साली ‘गोमंतकात नंजण गोसावी हा प्रतिहस्त असताना, माईन शेणवी वागळे यांनी वेद खंडिकेचे कुळागर, नागझरी मळो शेत व गोलती वाड्यावरील रुवो कुळागर या जमिनी बांदिवडे येथील श्रीनागेश व श्रीमहालक्ष्मी या देवातांस दिल्याचा’ उल्लेख या शिलालेखात आहे. नंजण गोसावी यास यात ‘धर्माधर्म विचारपटू’ असे म्हटलेले आहे. तो देवरायाच्या काळात त्याचा मांडलिक होता व गोवे सिंहासनावर राज्य करीत होता. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी नागेश देवालयात दीपमाळ लावावी व रात्री देवास गंध, धूप, दीप, तांदळाचा उपहार प्रतिवर्षी समर्पित करावा आणि अखंड ज्योत उभय देवांसन्निध लावावी, अशी आज्ञा या शिलालेखात आहे. यावरून इ.स. १४१३ पूर्वी बांदिवडे गावात नागेश देवस्थान होते. या देवस्थानाची ख्याती यापूर्वीही होती, असे एका ताम्रपटावरूनही सिद्ध होते. फोंडा तालुक्यातील सावईवेरे गावात उपलब्ध झालेल्या एका ताम्रपटात बंदवाड ग्राम (बांदिवडे) आणि नागनाथ (नागेश) यांचा उल्लेख आहे. या ताम्रपटावर ‘शके १२७०, सर्वधारी नामसंवत्सर, श्रावण बहुला अष्टमी’ म्हणजे १८ ऑगस्ट १३४८ अशी कालनोंद आहे. यावरून चौदाव्या शतकातील प्रांरभीच्या काळात हे देवस्थान प्रसिद्ध होते. यानंतर १६२ वर्षांनी पोर्तुगीजांचे गोव्यावर आक्रमण झाले.

हे देवालय बांदिवडे गावातील ज्या वाड्यामध्ये आहे, त्यास नागेशी असे म्हटले जाते. मंदिर अभ्यासक विनायक नारायण शेणवी धुमे यांच्या ‘देवभूमी गोमंतक’ या पुस्तकानुसार, इ.स. १७१० पर्यंत हे देवस्थान अत्यंत लहान स्वरूपात होते. त्याचा कारभार कुंभारजुवे येथील नारायण फोंडे कामत हे पाहात असत. त्यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी व सून यांच्या वतीने वाडिये उपनावाचे गृहस्थ देवस्थानाचे व्यवस्थापन पाहात असत. त्यांनी इ.स. १७८० मध्ये या दोन स्त्रियांच्या मदतीने प्रस्तुतचे नागेश देवालय बांधले. या नंतर वेळोवेळी अनेक दानशूरांनी दिलेल्या देणग्यांतून या मंदिरास सध्याचे भव्य स्वरूप प्राप्त झाले.

नागेशीतील एका मोठ्या बांधीव तलावाकाठी हे देवालय उभे आहे. याचे वैशिष्ट्य असे की या तलावातील पाणी जेव्हा शांत व नीतळ असते त्या मोसमात म्हणजे खास करून कार्तिक-मार्गशीर्ष महिन्यात, या पाण्यात मंदिराच्या गाभाऱ्यातील नागेशाच्या मूर्तीचे, तसेच तेथील दिव्यांचे प्रतिबिंब स्पष्टपणे दिसते. हा एक वास्तुशास्त्रीय चमत्कार गणला जातो. या पश्चिमाभिमुख मंदिरास या तलावाच्या दिशेने तसेच मंदिराच्या मागच्या बाजूने भव्य महाद्वारे आहेत. आत आकाशी व धवल रंगात रंगवलेली मंदिराची भव्य वास्तु उभी आहे. तलावाच्या बाजूने असलेल्या महाद्वारातून प्रवेशताच उजव्या बाजूस भव्य दीपस्तंभ आहे. इ.स. १४१३च्या विजयनगरकालीन शिलालेखात मंदिरासमोर असलेल्या दीपस्तंभाचा उल्लेख आहे. कालांतराने तो जमीनदोस्त झाला. ती उणीव १९७५ मध्ये भरून काढण्यात आली. मंदिरात सध्या असलेल्या या भव्य दीपस्तंभाचे उद्‌घाटन १३ नोव्हेंबर १९७५ रोजी करण्यात आले. मोरजी पेडणे येथील नवसो मुकुंद नारोजी हे या दीपस्तभाचे स्थापत्यकार होत. हा दीपस्तंभ ३५ फूट उंचीचा, पाच स्तरीय अष्टकोनाकार आहे. त्याच्या खालच्या स्तरावर इंद्र (पूर्व), अग्नि (आग्नेय), यम (दक्षिण), निऋति (नैऋत्य), वरुण (पश्चिम), वायु (वायव्य), सोम (उत्तर) आणि ईशान (ईशान्य) या त्या-त्या दिशांच्या देवतांची म्हणजेच अष्टदिक्पालांची शिल्पे कोरलेली आहेत. प्राचीन शिलालेखात ‘दीपमालेशी पणतिया चारशे पेटवून दीपमाळ करावी’ अशी आज्ञा होती. त्यानुसार या नव्या दीपस्तंभावर चारशे पणत्या पेटविण्याची व्यवस्था केलेली आहे, असे सांगण्यात येते. नजीकच येथील प्राचीन मंदिराच्या भिंतीचे काही अवशेष ठेवलेले आहेत. गजमूर्ती, अर्धचंद्रशीला, त्यापुढच्या भागांत कोरलेली रांगोळी यांवरून ते मंडारकाचे अवशेष असल्याचे स्पष्ट होते. स्थानिक लोक त्यास ‘क्षेत्रपाल’ असे म्हणतात.

नागेशाचे हे देवालय गोमंतकीय मंदिर स्थापत्यशैलीचा उत्तम अविष्कार मानले जाते. मुखमंडप, सभामंडप, त्यास दोन्ही बाजूंनी मुखमंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. मंदिराच्या सभामंडपावर उतरते कौलारू छप्पर आहे. सभामंडपाच्या बाजूस असलेल्या मुखमंडपांवर घुमटाकार शिखर आहे. तर गर्भगृहावर अष्टकोनी बसक्या मनोऱ्यासारख्या रचनेवर घुमट व त्यावर सोन्याचा कळस असे शिखर आहे. उंच जगतीवर बांधलेल्या या मंदिराच्या मुखमंडपात पाच अर्धगोलाकार पायऱ्या चढून प्रवेश होतो. मुखमंडपात नंदीची पाषाण मूर्ती आहे. मुखमंडपाच्या छतास हंड्या व झुंबर टांगले आहेत. येथून सभामंडपात, ज्यास गोमंतकीय मंदिर परिभाषेत चौक असे म्हणतात, त्यात प्रवेश होतो. सभामंडपाचे प्रवेशद्वार कमानीच्या आकाराचे व दगडी आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना पाषाणात कोरलेली व्यालशिल्पे आहेत. उतरांगावर रंगीत कीर्तिमुख आहे. त्याच्यावर छताकडील भागात मध्यभागी मोठी नागप्रतिमा व मंडपात चारही बाजूंना छोट्या नागफण्यांची रांग आहे. या देवालयाचा सभामंडप अत्यंत आकर्षक रितीने सजवण्यात आलेला आहे. संगमरवरी फरशी लावलेले रुंद गोल खांब, वेलींची नक्षी कोरलेल्या तुळया, लाकडी छत, त्यावरून टांगलेल्या हंड्या, बिलोरी झुंबर, पितळी घंटा, सज्जासारख्या भागातील विविध देवदेवतांची रंगीत चित्रे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे येथील काष्ठशिल्प पट्टिका, असे या प्रशस्त सभामंडपाचे स्वरूप आहे. सभामंडपातील काष्ठशिल्प पट्टिकेवर अनेक देवदेवतांची शिल्पे, तसेच पौराणिक प्रसंग कोरलेले आहेत. ही शिल्पे पाहण्यासाठी येथे अनेक मंदिर अभ्यासक, तसेच पर्यटक आवर्जून येत असतात.

मंदिराच्या अंतराळाची दर्शनी भिंत तसेच पंचशाखीय प्रवेशद्वार हे चांदीच्या नक्षीदार पत्र्याने मढवलेले आहे. प्रवेशद्वाराच्या वरील भागात नागेश, गणेश आदी देवतांच्या मूर्ती आहेत. दोन्ही बाजूंस चांदीच्या मखरांमध्ये जय आणि विजय या शंख आणि गदाधारी द्वारपालांच्या मोठ्या मूर्ती आहेत. या शैव मंदिराचे द्वारपाल वैष्णव आहेत हे विशेष. गर्भगृहात डावीकडे श्रींचे शयनगृह आहे. आत मध्यभागी पिंडिकेसह नागेशाचे शिवलिंग विराजमान आहे. या पिंडिकेचे मुख उत्तर दिशेस आहे. पिंडिकेवर चांदीचे आवरण आहे. मागच्या बाजूस कीर्तिमुख असलेली चांदीची प्रभावळ आहे. शिवलिंगावर नागेश महादेवाचा शेषधारी मुखवटा आहे. शिवलिंगाच्या दोन्ही बाजूंस चांदीच्या दोन मोठ्या नागमूर्ती आहेत, तर समोरच नंदीची छोटी चांदीची मूर्ती आहे. पिंडिकेच्या चारही बाजूंना उंच समया लावलेल्या आहेत. याच्या मागील भागात चांदीच्या मोठ्या देव्हाऱ्यामध्ये नागेशाची पुरूषाकार, आसनावर बसलेल्या स्वरुपातील मूर्ती, विराजमान आहे. भरजरी वस्त्रालंकारांनी व पुष्पमालांनी शृंगारलेल्या या मूर्तीच्या प्रभावळीवर अनेक नागमूर्ती कोरलेल्या आहेत. मूर्तीच्या मस्तकी वर त्रिकोणाकार असलेला विशिष्ट पद्धतीच्या पगडीसारखा मुकूट आहे.
नागेश महादेवाच्या गाभाऱ्याखेरीज येथे दोन सुशोभित उपगर्भगृहे आहेत. त्यातील एका गर्भागारात लक्ष्मीनारायणाची, तर दुसऱ्या गर्भागारात गणेशाची स्थापना केलेली आहे. पूर्वी लक्ष्मीनारायणाचे वेगळे देवालय नागेश देवालयाच्या डाव्या बाजूस होते. कालांतराने या देवालयातील मूर्ती भग्न झाली. तेव्हा शुभ्र संगमरवरी पाषाणातील नवी मूर्ती घडवण्यात आली व तिची प्रतिष्ठापना १९२९ साली मार्गशीर्ष शुक्ल दशमीच्या मुहूर्तावर मुख्य मंदिरात करण्यात आली. येथे गणपतीचेही वेगळे देवालय होते. त्या देवालयातील मूर्तीचीही मुख्य मंदिरात याच मुहुर्तावर प्रतिष्ठापना करण्यात आली.

मंदिराच्या मागच्या बाजूस पवित्र विहिर आहे. या पाण्यानेच येथील शिवपिंडीस अभिषेक घातला जातो. मंदिराच्या चारहीबाजूंना इमारती आहेत. त्यात कार्यालय, सभागृह, अग्रशाळा, महाजनांची निवासव्यवस्था, भाविकांसाठी उपाहारगृह आदी सोयी-सुविधा आहेत.

या मंदिरात सकाळी ५.३० ते रात्री ११ पर्यंत भाविकांना देवदर्शन घेता येते. येथे सकाळपासून दुपारी ११.३० पर्यंत नित्यनैमित्तिक अभिषेकादी धार्मिक कृत्ये केली जातात. सायंकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत प्रदोषपूजा केली जाते. त्यानंतर पंचोपचार, पूजा, आरत्या आदी कृत्ये होतात. दर सोमवारी रात्री ८.३० ते ९.३० या काळात येथे शिबिकोत्सव होतो. येथे चैत्र शुक्ल एकादशी ते चैत्र वद्य प्रतिपदा या काळात मोठा महोत्सव होतो. महारथोत्सवाने या उत्सवाची सांगता होते. कार्तिक पौर्णिमेस (त्रिपुरारी पौर्णिमा) येथे भव्य जत्रा भरते. या जत्रेस टोंक्याची जत्रा असे म्हणतात. हे शिवालय असल्यामुळे येथे महाशिवरात्रीचा महोत्सवही अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो.

उपयुक्त माहिती:

  • फोंडा येथून ४ किमी आणि पणजी येथून २८ किमी अंतरावर
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • राज्यातील अनेक शहरांतून राज्य परिवहन सेवेच्या बसची सुविधा
  • परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ७२४९३४५०३९, दूरध्वनी ८३२ २३३५०३९
Back To Home