भीमेश्वर मंदिर

नागाव, ता. अलिबाग, जि. रायगड

अलिबाग-रेवदंडा मार्गावर असणाऱ्या नागाव या प्रसिद्ध गावात स्वयंभू भीमेश्वर महादेव मंदिर स्थित आहे. हे मंदिर येथील प्राचीन शिलालेखामुळे भाविकासंह इतिहासकार व अभ्यासकांमध्ये प्रसिद्ध आहे. बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या कुलाबा गॅझेटमधील नोंदींनुसार हा शिलालेख इ.स. १३६७ मधला आहे. नारळी-पोफळीच्या बागांमध्ये असलेल्या या मंदिराचा उल्लेख येथील ग्रामस्थ भीमनाथाचे मंदिर असाही करतात. अलिबाग तालुक्यातील प्राचीन मंदिरांमध्ये या मंदिराचा समावेश होतो.
या मंदिराविषयी आख्यायिका अशी की हे मंदिर जेथे आहे ती जागा पूर्वी शेतजमीन होती. एकदा नांगरणी करताना शेतकऱ्याला नांगराचा फाळ रक्ताने भरलेला दिसला. त्याच रात्री त्याला एक स्वप्न पडले व त्यात ‘मी या नगराचा रक्षक आहे, मला तात्पुरत्या स्वरूपात सावली तयार कर’, असा आदेश मिळाला. त्यानुसार शेतकऱ्याने येथे आसरा केला. शिवपिंडीवर अद्याप नांगर लागल्याची खूण दाखविली जाते. दुसऱ्या आख्यायिकेनुसार, सरखेल कान्होजी आंग्रे यांचे सरदार बिवलकर यांची या देवावर खूप श्रद्धा होती. त्यांची कन्या भीमाताई हिने अपत्यप्राप्तीसाठी येथील महादेवाला नवस केला. काही दिवसांमध्ये तिला पुत्ररत्न झाले. त्यानंतर या स्थानाचे नाव भीमेश्वर ठेवण्यात आले.
भीमेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार १७५८ मध्ये पेशव्यांनी केल्याची नोंद आहे. रस्त्यावरील एका कमानीतून आत आल्यावर समोरच दगडी बांधणीतील वैशिष्ट्यपूर्ण पुष्करणी आहे. त्याच्या बाजूला एक दीपस्तंभ व चार तुळशी वृंदावन आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच एका झाडाखाली दोन पुरातन मूर्ती आहेत. त्या येथील पुष्करणीत सापडल्याचे सांगितले जाते. त्यांपैकी एक देवीची, तर दुसरी भैरवाची आहे.
मंदिरात प्रवेश करण्यासाठी पूर्वेकडे व उत्तरेकडे दरवाजे आहेत. कौलारू मंदिरातील लाकडी दरवाजांची रचना प्राचीन असल्याचे जाणवते. मंडप, सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. हे मंदिर जमिनीपासून उंच अधिष्ठानावर असल्याने मंडपातून सहा पायऱ्या चढून सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपात एका चौथऱ्यावर नंदीची मोठी मूर्ती आहे. या नंदीच्या शिंगांमधून शिवपिंडी पाहण्याची पद्धत आहे. सभामंडपाच्या छताकडील बाजुला जुन्या काळातील काचेचे कंदील आहेत. दुमजली सभामंडपात बांधकामासाठी लाकडाचा जास्त वापर केलेला आहे. सभामंडपात गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवरील नक्षीदार देवकोष्टकांत उजवीकडे गणपती व डावीकडे काळभैरव यांच्या प्राचीन मूर्ती आहेत. गर्भगृहाचे प्रवेशद्वार नक्षीदार द्वारशांखांनी सजलेले आहे. प्रवेशद्वाराच्या मंडोवरावर दोन किर्तीमुख, ललाटबिंबस्थानी गणेशाची मूर्ती व उत्तरांगावर नक्षीकाम आहे. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी भिमेश्वर महादेवाची पिंडी आहे. या पिंडीभोवती धातूचा नाग व शेजारी त्रिशुळ आहे. पिंडीच्या मागील भिंतीवरील देवकोष्टकात पार्वती मातेची संगमरवरी मूर्ती आहे.
मंदिराच्या सभामंडपातील उत्तरेकडील दरवाजातून बाहेर पडताना उजवीकडे असलेल्या पायरीमध्ये एक शिलालेख आहे. सुमारे ६० सेंमी लांबीचा आणि ४५ सेंमी रुंदीच्या या लेखाची शिळा घोटीव अशी आहे. हा शिलालेख इ.स. १३६७ मधील असल्याचा उल्लेख बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या कुलाबा गॅझेटमध्ये आहे. २८ ओळींच्या या शिलालेखातील पहिल्या तीन ओळी संस्कृतमध्ये तर बाकी मजकूर मराठीत आहे. चांगल्या रितीने कोरलेले असल्यामुळे त्यावरील सर्व मजकूर वाचता येतो. पूर्वी ही शिळा सुटी होती. पेशव्यांच्या कारकीर्दीत भीमेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला, तेव्हा ती देवळाच्या पायऱ्यांमध्ये बसविली गेली.
प्रा. शं. गो. तुळपुळे यांच्या ‘प्राचीन मराठी कोरीव लेख’ या ग्रंथात या शिलालेखाचे विवरण दिलेले आहे. ठाणे-कोकणमध्ये हंबीररावांचे राज्य असताना शके १२८९ म्हणजे इ.स. १३६७-६८मध्ये दिलेल्या दानपत्रासंबंधीचा यात उल्लेख आहे. त्यात देवगिरीकर यादवांना लावले जाणारे बिरुद ‘श्रीमत्यप्रौढिप्रतापचक्रवर्ती माहाराजाधिराज’ हंबीररावाच्या नावामागे आहे. त्यावरून ते एकतर यादव वंशांशी संबंधित असावेत किंवा स्वतःला त्याप्रमाणे थोर मानीत असावेत. याशिवाय या लेखात येथील जागेच्या चतुःसीमांचाही उल्लेख आहे. पूर्वेस नाऊ म्हाताऱ्याची वाडी, उत्तरेस चोरलेवाडी, पश्चिमेस पठीआर वाडी, दक्षिणेस कोणिष्टियाची वाडी आहे. या शिलालेखात हिजरी सन ७६९ आणि शक १२८९, प्लवंग संवत्सर यांचा स्पष्ट उल्लेख आहे. एका हिंदू राजवटीने हिजरी कालगणनेचा उल्लेख करण्याइतपत मुसलमानी प्रभाव त्यावेळी वाढल्याचे यावरून प्रतित होते. याशिवाय म्हैरू माहामदु (मेहेर महंमद) दाउवार आया व हाजी दाउवार आया ही मुस्लिम नावे त्यात साक्षीदार म्हणून नोंदवली आहेत.
येथे महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. नोकरी व्यवसायानिमित्त शहरात स्थायिक झालेले येथील गावकरी आवर्जून या उत्सवात सामील होण्यासाठी येतात. या दिवशीचा पालखी सोहळाही नयनरम्य असतो. पूर्ण रात्रभर वाजत गाजत नागावमध्ये फिरून पहाटेच्या सुमारास पालखी भीमेश्वर मंदिरात येते. साधारणतः मंदिर भाविकांसाठी दिवसभर खुले असते.

उपयुक्त माहिती:

  • अलिबागपासून ७ किमी अंतरावर
  • अलिबाग, रेवदंडा व मुरूड येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home