महालक्ष्मी मंदिर

शिरसव, ता. परांडा, जि. धाराशिव

मरीआई, यमाई, कडकलक्ष्मी, अंबाबाई, महालक्ष्मी इत्यादी साऱ्याच देवतांच्या ठायी एकच मातृतत्व आहे. अंबाबाई ही शिवपत्नी तर लक्ष्मी ही विष्णू पत्नी. देवीचा शाक्तपंथ हा शैव आणि वैष्णव पंथापेक्षा वेगळा आणि स्वतंत्र असला तरी देवीचे महादेवाशी अथवा विष्णूशी संबंध जोडून शाक्त पंथामुळे शैव व वैष्णव वाद नाहीसा करण्याचा प्रयत्न केला गेला असावा. त्यामुळेच अंबाबाईला महालक्ष्मी नावाने संबोधले गेले असावे, असे काही अभ्यासकांचे मत आहे. असेच एक महालक्ष्मी देवीचे मंदिर परांडा तालुक्यातील शिरसव गावी आहे. येथील देवी अंबाबाई स्वरूपात आहे व तिला महालक्ष्मी नावाने संबोधले जाते. येथील देवीस फक्त शाकाहारी व गोडाचा नैवद्य दाखवण्याची प्रथा आहे.
सुमारे एक हजार वर्षांपूर्वीचे हे मंदिर त्यातील स्तंभांवर असलेल्या उलट्या नाग शिल्पांमुळे चालुक्य कालीन असल्याचे स्पष्ट होते. या मंदिराची अख्यायिका अशी की देव दानव युद्ध सुरू झाल्यानंतर महादेव दानवांशी लढण्यासाठी निघाले. त्यावेळी पार्वती माता शस्त्रसज्ज होऊन त्यांच्यासोबत निघाली. मात्र माझ्यापेक्षा सात कोस मागे थांब, असे महादेवाने पार्वतीला सांगितल्याने पार्वती माता येथेच थांबून राहिली व मूर्ती रूपात येथे स्थापित झाली.
परांडा तालुक्यातील शिरसव गावातील या मंदिरास पंधरा फूट उंचीची भक्कम दगडी तटबंदी आहे. तटबंदीच्या पाषाणावर विविध पशू व प्राण्यांची शिल्पे कोरलेली आहेत. मंदिरास तटबंदीत दुमजली प्रवेशद्वार आहे. आठ पायऱ्या चढून या दुमजली प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. येथील प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूला द्वारपाल चित्रे रंगवलेली आहेत. प्रवेशद्वाराच्या वरील मजल्यावर नगारखाना आहे. प्रांगणात काही वृक्ष आहेत व त्यांच्या पारावर शिवपिंडी आणि इतर शिल्पे आहेत.
मंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची संरचना आहे. खुल्या स्वरूपाचा येथील मंडप नव्याने बांधलेला आहे. प्रांगणापेक्षा उंचावर असल्यामुळे मंडपाच्या प्रवेशद्वारासमोर तीन पायऱ्या आहेत. सभामंडपात गोलाकार स्तंभ व स्तंभांवर छत आहे. छताला पितळी घंटा व जमिनीवर होमकुंड आहे. पुढे प्राचीन हेमाडपंती स्थापत्यशैलीचे दगडी बांधकाम असलेला मुख्य सभामंडप, अंतराळ व गर्भगृह आहे. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात समोरील बाजूस कठडा व त्यात प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारासमोर कासव शिल्प आहे. सभामंडपात प्रत्येकी चार नक्षीदार स्तंभांच्या चार रांगा आहेत. बाह्य बाजूचे स्तंभ कठडा व भिंतीत आहेत. मधील चार स्तंभांच्या मध्यभागी रंगशिला आहे. सर्व स्तंभ चौकोनी स्तंभपादांवर उभे आहेत व स्तंभदंडात चौकोन, षट्कोन, अष्टकोन, वर्तुळ असे विविध भौमितिक आकार आहेत. स्तंभांच्या शीर्षभागी कणी व त्यावर हस्त आहेत. या हस्तांवर उलटे नाग कोरलेले आहेत. ही चालुक्य काळातील बांधकामाची निशाणी असल्याचे सांगितले जाते. मुख्य सभामंडपात डाव्या बाजूला मखरात गणपती व उजव्या बाजूला चतुर्भुज भैरव शिल्प आहे. भैरवाच्या मागील दोन हातांत त्रिशूल व डमरू आणि पुढील दोन हातांत नाग आहेत. भैरवमूर्तीच्या बाजूने भिंतीवर उभ्या धारेच्या द्वारशाखांसारखी रचना आहेत. त्यातील ललाटबिंबस्थानी देवीशिल्प व ललाटपट्टीत गजथर आहे. सभामंडपात देवीची उत्सव काळात वापरली जाणारी पालखी आहे.
पुढे अंतराळ व गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. अंतराळापेक्षा उंचावर असल्यामुळे गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर एक पायरी आहे. द्वारशाखांवर स्तंभनक्षी, ललाटबिंबावर इष्ट शिल्प व तोरणात शिखरनक्षी आहेत. प्रवेशद्वार व नक्षीदार झडपांना पितळी अच्छादन आहे. गर्भगृहात वज्रपिठावर देवीची काळ्या शाळीग्राम पाषाणातील चतुर्भुज उभी मूर्ती आहे. देवीच्या हातात विविध आयुधे व अंगावर वस्त्रे आणि अलंकार आहेत. देवीच्या डोक्यावर चांदीचा मुकुट आहे. गर्भगृहाच्या छतावर चारही कोपऱ्यांवर चार सिंहशिल्पे आहेत. मध्यभागी पाच थरांचे गोलाकार, उंच व वर निमुळते होत गेलेले शिखर आहे. हे शिखर नव्याने बांधण्यात आले असल्याचे सांगितले जाते. शिखराच्या खालील बाजूला कमळदल रिंगण आहे. शिखराच्या सर्व थरात प्रत्येकी बारा देवकोष्टके व त्यात देवमूर्ती आहेत. प्रत्येक दोन देवकोष्टकांमधे शक्तीमूर्ती आहेत. सर्व देवकोष्टकांवर व देवकोष्टकांच्या मधील शक्तीशिल्पाच्या वरील बाजूस लघूशिखरे, त्यांवर आमलक व कळस आहेत. मुख्य शिखराच्या शीर्षभागी एकावर एक असे तीन आमलक व कळस आहे. या शिखरावर एकूण १२१ कळस आहेत.
या उंच शिखराबाबत अख्यायिका अशी की पूर्वी मंदिरावर शिखर नव्हते. त्यावेळी गावात दुमजली घर बांधल्यास ते कोसळत असे. परंतू शिखर बांधल्यानंतर दुमजली घरे टिकून राहू लागली. मंदिरात चैत्र महिन्यात देवीचा वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी ढोल ताशांच्या गजरात, गुलाल उधळीत, पालखी मिरवणुकीने देवी ग्रामप्रदक्षिणा करते. यावेळी हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी, नवस फेडण्यासाठी व पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी येतात. याशिवाय मंदिरात चैत्र पाडवा, शाकंभरी पौर्णिमा, शारदीय नवरात्रौत्सव, दसरा, दिवाळी आदी सण व उत्सवांचे आयोजन केले जाते.

उपयुक्त माहिती

  • परांडा येथून २० किमी, तर धाराशिव येथून ५० किमी अंतरावर
  • परांडा येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Back To Home