इसवी सनाच्या बाराव्या शतकाच्या आरंभी जन्मलेले थोर बंडखोर संत, श्रेष्ठ कन्नड कवी, समाजसुधारक आणि साक्षात्कारी योगी पुरूष महामानव बसवेश्वर यांचे एक प्रसिद्ध मंदिर धाराशिव जिल्ह्यातील जेवळी या गावात आहे. बसवेश्वर हे उत्तर कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्रात प्रभावशाली असलेल्या लिंगायत अथवा वीरशैव या पंथाचे उद्गाते होते. बसवण्णा या नावानेही ओळखले जाणारे बसवेश्वर हे शंकराचे भक्त व नंदीचा अवतार मानले जातात. अनेक मंदिरांप्रमाणेच या मंदिरातही बसवेश्वरांची नंदीस्वरूपात पूजा केली जाते.
‘भारतीय साहित्याचे निर्माते – बसवेश्वर’ (एच. तिप्पेरुद्रस्वामी, अनुवाद रोहिणी तुकदेव, साहित्य अकादमी, २००३) या चरित्रग्रंथानुसार, बसवेश्वर यांचा जन्म इ.स. ११३१ मध्ये कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील इंगळेश्वर-बागेवाडी या गावात एका सुप्रतिष्ठित ब्राह्मण कुटुंबात झाला. काही अभ्यासकांच्या मते हे जन्मसाल ११०५ असे आहे. त्यांचे वडिल मादिराज ऊर्फ मादरस हे बागेवाडी अग्रहाराचे प्रमुख होते. बसवेश्वरांच्या आईचे नाव मादलांबा असे होते. ती बागेवाडीच्या नंदीश्वर या ग्रामदेवतेची परमभक्त होती. अशी आख्यायिका सांगितली जाते की मादलांबा हिला एकदा स्वप्न पडले की महादेवाने नंदीला लोककल्याणाच्या हेतूने अवतार घेण्याची आज्ञा केली. त्यानुसार नंदीने प्रकाशरूप धारण करून मादलांबाच्या गर्भात प्रवेश केला. यानंतर मादलांबा गर्भवती झाली. त्यामुळे बसवेश्वर यांना नंदीचा अवतार मानला जातो.
बसवेश्वर यांच्या जन्मानंतर त्यांना कुडलसंगम येथील थोर शैव संत जातवेदमुनी तथा ईशान्य गुरू यांनी शुभाशिर्वादपर लिंगदीक्षा दिली होती. जन्माच्यावेळीच त्यांचे लिंगधारणेद्वारे उपनयन झाले असल्याने त्यांनी आपल्या मुंजीस विरोध केला. परंतु वडिलांनी मुंजीचा आग्रह धरल्याने त्यांनी घर सोडले. त्यावेळी ते आठ वर्षांचे होते. तेथून ते कुडलसंगम येथे जातवेदमुनी यांच्या अध्ययनकेंद्रात गेले. जातवेदमुनी हे शैव धर्ममताच्या कालामुख पंथाचे गुरू होते. त्यांच्याकडून बसवेश्वर यांनी धर्मशिक्षण घेतले.
आपल्या गुरूंच्या आग्रहाखातर त्यांनी तरूणपणी विवाह केला. त्यांचे मामा बलदेव हे कलचुरी घराण्याचे सामंत बिज्जल यांचे कोषाध्यक्ष होते. बलदेव यांची कन्या गंगांबिका आणि बिज्जलाची मानलेली बहिण नीलांबिका या दोघींशी त्यांचा विवाह झाला. विवाहानंतर ते बिज्जलाची राजधानी मंगवाडा (मंगळवेढे) येथे राहू लागले. कालांतराने बिज्जलाने बंड पुकारून कल्याणच्या चालुक्य घराण्याचे राज्य ताब्यात घेतले. त्याच्या आग्रहावरून बसवेश्वर यांनी त्याच्या राज्याचे मंत्री (कोषाध्यक्ष) म्हणून जबाबदारी स्विकारली. याच काळात त्यांनी मोठे धार्मिक आणि सामाजिक कार्य केले. जात, संप्रदाय अथवा लिंगाधारित भेदभाव न करता सर्वांना समान सामाजिक व धार्मिक संधी खुल्या करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य बसवेश्वर यांनी केले. त्यांनी स्त्रियांची धार्मिक शृंखलांतून मुक्तता केली. वेदांतील कर्मकांडाला त्यांनी कडाडून विरोध केला. शेकडो देवदेवतांच्या उपासनेवर टीका करून त्यांनी एकेश्वरवादाचा प्रसार केला. वीरशैव धर्माचे प्रेषित असलेल्या बसवेश्वरांचे ‘लिंगैक्य’(निधन) इ.स. ११६७ मध्ये झाले.
लोहारा-अचलेर मार्गावर जेवळी येथे नंदीस्वरूपातील बसवेश्वरांचे मंदिर आहे. ग्रामस्थांच्या मते हे मंदिर ३०० वर्षे प्राचीन आहे. भक्कम तटबंदी असलेल्या मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर एक मोठी विहीर व ध्वजस्तंभ आहे.
तटबंदीत असलेल्या प्रवेशद्वारातील कमानीकृती प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला चौथरे आहेत. येथील प्रशस्त प्रांगणात मध्यभागी महात्मा बसवेश्वरांचे मंदिर आहे. तटबंदीच्या आतील बाजूने अनेक ओवऱ्या आहेत. उत्सवांच्या काळात धार्मिक विधीसाठी या ओवऱ्यांचा वापर केला जातो.
हेमाडपंती रचनेचे हे दुमजली मंदिर उंच अधिष्ठानावर बांधलेले आहे. चार पायऱ्या चढून मंदिराच्या अधिष्ठानावर प्रवेश होतो. येथून प्रदक्षिणा मार्ग सोडून मंदिराचे बांधकाम आहे. एका अरुंद दरवाजातून मंदिरात प्रवेश होतो. दरवाजापासून जवळच असलेल्या वज्रपिठावर दोन्ही बाजूला शिवपिंडी व मध्यभागी अखंड पाषाणातील नंदीची मोठी मूर्ती आहे. नंदी मूर्तीच्या मागील भिंतीवर महात्मा बसवेश्वर यांची मोठी प्रतिमा आहे. या दुमजली मंदिराच्या वरच्या मजल्यावर चारही बाजूने तीन-तीन कमानीदार खिडक्या आहेत. अशाच प्रकारचे आणखी एक मंदिर येथील ओवऱ्यांमध्ये आहे. त्याची रचनाही या मंदिराप्रमाणेच आहे. लहान दरवाजातून आत गेल्यावर तेथील वज्रपिठावर दोन शिवपिंडींच्यामध्ये नंदीमूर्ती आहे. ओवऱ्यांमध्ये असलेल्या मंदिरावर लहान शिखर आहे.
या मंदिरात अक्षय तृतियेपासून तीन दिवस मोठी यात्रा असते. यात्रेच्या पहिल्या दिवशी पहाटे मंदिरातील शिवलिंग व नंदीची पंचकलश पुजा केली जाते. त्यानंतर परिसरातील अनेक पशुधन व बैलजोड्यांची गावातून पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढली जाते. बैलजोड्यांची मिरवणूक हे या यात्रेचे आकर्षण असते. या वेळी बैलांना बैलपोळा सणाप्रमाणे सजविण्यात येते. ही मिरवणूक गावातून पुन्हा मंदिर परिसरात आल्यानंतर येथे जिल्हास्तरीय पशू प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. यावेळी उत्कृष्ट बैलजोड्यांना पुरस्कार दिले जातात. या यात्रेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे प्रथेप्रमाणे शेकडो लोक विस्तवावरून पळतात. हे दृश्य पाहण्यासाठी हजारो भाविक येथे उपस्थित असतात. अक्षय तृतिया हा दिवस महात्मा बसवेश्वर यांचा जयंती दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने येथील उत्सवात दरवर्षी बसवेश्वर यात्रा समितीतर्फे साहित्यातील मानाचा समजला जाणारा बसवरत्न पुरस्कार देण्यात येतो. महात्मा बसवेश्वरांचा वैचारिक वारसा जपण्यासाठी आणि त्याला उभारी देण्यासाठीचा हा अभिनव उपक्रम ग्रामस्थांनी येथे सुरू केलेला आहे.