हिंदू धर्मात जटा या वैराग्याचे प्रतीक मानल्या जातात. त्यामूळेच अनेक साधू, संन्यासी व साध्वी यांच्या डोक्यावर जटा वाढलेल्या दिसतात. महादेव हे वैराग्याचे स्वामी समजले जातात. ते कायम ध्यानमग्न व तपाचरण करीत असतात. त्यामूळे त्यांच्या डोक्यावर जटा असतात. स्वर्गातून अवतरलेल्या गंगेचा आवेग महादेवाने आपल्या जटांमध्ये झेलला होता. महादेवाच्या या रूपाचे वर्णन करणारे नाव म्हणजेच जटाशंकर. महादेवाची जटाशंकर रूपातील अनेक मंदिरे देशभरात प्रसिद्ध आहेत. त्यातीलच एक प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिर धाराशिव जिल्ह्यातील मुलज गावात आहे.
हेमाडपंती स्थापत्यशैलीतील दगडी बांधकाम असलेले हे मंदिर सुमारे सातशे ते आठशे वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. मंदिराची अख्यायिका अशी की रावणाने सीतेचे हरण करून आकाशमार्गाने लंकेला नेले तेव्हा सीतेच्या शोधार्थ निघालेले श्रीराम येथील जटाशंकर महादेवाचे दर्शन घेऊन पुढे कर्नाटकातील अमृतकुंभ येथे गेले होते.
गावाकडून मंदिराकडे येणाऱ्या रस्त्यावर मंदिराची स्वागतकमान आहे. दोन्ही बाजूला चौकोनी स्तंभ व त्यांना जोडणारी अर्धचंद्राकार कमान असे स्वागतकमानीचे स्वरूप आहे. येथील दोन्ही स्तंभांवर गजराज शिल्पे आहेत. उजव्या स्तंभावर गजराज शिल्पाच्या बाजूला गदाधारी मारूती व डाव्या स्तंभावर गरूड शिल्प आहे. वरील अर्धचंद्राकार कमानीवर मध्यभागी महादेवाचे उठावशैलीतील शिल्प आहे. या दोन्ही स्तंभांवर विविध देवतांची चित्रे रंगविलेली आहेत. स्तंभांलगत खालच्या बाजूला असलेल्या दोन चौथऱ्यांवर नंदीमूर्ती आहेत.
मंदिराभोवती असलेल्या आवारभिंतीतील प्रवेशद्वारातून पेव्हरब्लॉकची फरसबंदी असणाऱ्या प्रशस्त प्रांगणात प्रवेश होतो. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस एकमेकांसमोर दोन लहान मंदिरे आहेत व त्यांत शिवपिंडी आहेत. उजव्या बाजूच्या मंदिरामागे काही विरगळ व सतीशिळा आहेत. मुख्य मंदिराच्या दोन्ही बाजूस प्रत्येकी दोन दीपमाळा आहेत. सभामंडप व गर्भगृह अशी मूळ मंदिराची संरचना आहे.
या मूळ मंदिरासमोर काही वर्षांपूर्वी नव्याने मंडपाची बांधणी केलेली भासते. या मंडपाचा पुढील अर्धा भाग सुमारे दोन फूट खाली आहे. तीन पायऱ्या खाली उतरून मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या खोलगट भागात येता येते. येथे चारही कोपऱ्यांवर चार नक्षीदार अर्धस्तंभ आहेत. या मंडपाच्या दोन्ही बाजूला भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहेत. मध्यभागी चौथऱ्यावर नंदीची मूर्ती आहे. असे सांगितले जाते की पूर्वी हा स्वतंत्र नंदीमंडप होता.
मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराला पर्ण, पुष्प व स्तंभ अशा द्वारशाखा आहेत व त्याखालील बाजूस द्वारपाल शिल्पे आहेत. द्वारपालांच्या हातात त्रिशूल, डमरू, नागपाशसहित विविध आयुधे आहेत. ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती व त्यावरील भागात तोरण नक्षी आहे. प्रवेशद्वाराच्या वरील बाजूला सज्जावर बाशिंग आहे. त्यात मध्यभागी मयूर, दोन्ही बाजूला हंस व वरील बाजूला कीर्तीमुख आहे. येथून एक पायरी उतरून सभामंडपात प्रवेश होतो. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात हवा येण्यासाठी गवाक्ष आहेत. सभामंडपात प्रत्येकी चार नक्षीदार स्तंभांच्या चार रांगा आहेत. बाह्यबाजूचे स्तंभ भिंतीत आहेत. स्तंभपाद चौकोनी व स्तंभ चौकोन, षट्कोन, अष्टकोन, वर्तुळ असे विविध भौमितिक आकारात आहेत. स्तंभदंडातील चौकोनी पटलांवर विविध नक्षी कोरलेल्या आहेत. सभामंडपात लोखंडी जाळ्या लावून दर्शनरांगेचे व्यवस्थापन केलेले आहे. सभामंडपात अंतरळाच्या दर्शनी भिंतीजवळ पार्वतीची अष्टभुजा महिषासुरमर्दिनी रूपातील मूर्ती आहे. तिने पायाखाली राक्षस दाबून धरलेला आहे. पार्वतीच्या सर्व हातात विविध आयुधे आहेत.
सभामंडपापेक्षा गर्भगृह काहीसे खाली आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारास पाच द्वारशाखा आहेत. द्वारशाखांच्या खालील बाजूस द्वारपाल व द्वारपालिका शिल्पे आहेत. ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती व ललाटपट्टीवर विविध आकृतीबंध आहेत. तोरणात शिखरनक्षी आहे. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी स्वयंभू शिवपिंडी आहे. शिवपिंडीवर छत्र धरलेला पंचफणी पितळी नाग आहे व छताला जलधारा धरलेले अभिषेक पात्र टांगलेले आहे. शिवपिंडीच्या मागे भिंतीलगत पाषाणी तोरण आहे. त्यात महादेव व पार्वतीचे गौरीहर स्वरूपात उठाव शैलीतील शिल्प आहे.
बाजूला चौथऱ्यावर महादेवाचा पितळी मुखवटा आहे. गर्भगृहाच्या छतावर पिरॅमिडसारखी उतरत्या पायऱ्यांची रचना असलेले चौकोनी शिखर व त्यावर कळस आहे.
प्रांगणात मंदिराशेजारी गोड्या पाण्याची पुष्करणी आहे. त्यात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. प्रांगणात तटबंदीला लागून प्राचीन पिंपळवृक्ष आहे. नवसपूर्तीनंतर भाविकांकडून या वृक्षाच्या फांद्यांना नवसाचे पाळणे टांगले जातात. पिंपळवृक्षाच्या पारावर दोन्ही बाजूस भिंती व त्यावर छत आहे. छताखाली, वृक्षाच्या बुंध्याला टेकून नरसिंहदेवाची शेंदूरचर्चित मूर्ती आहे. प्रांगणात अनेक इमारती आहेत. त्यांचा वापर भक्तनिवास, स्वयंपाक घर, अन्नछत्र, भांडार कक्ष अशा विविध प्रयोजनासाठी केला जातो.
मंदिरात चैत्र पाडव्याला मानाच्या काठ्या लावून वार्षिक जत्रोत्सव सुरू होतो. हा जत्रोत्सव पंधरा दिवस साजरा केला जातो. पाडव्याच्या दिवशी गुढी उभारली जाते. चैत्र शुद्ध अष्टमीला देवाचा पार्वती सोबत विवाह सोहळा साजरा केला जातो. गावातील मानकरी देवीचे कन्यादान करतात. वेदोक्त मंत्र, सनई चौघडे, ढोल ताशांच्या गजरात देवाचा विवाह संपन्न होतो. जमलेल्या वऱ्हाडी मंडळींसाठी गोडधोडाच्या पांगतींचे आयोजन केले जाते. देवाच्या विवाहात अक्षता टाकून वरातीत नाचण्यासाठी परीसरातील हजारो भाविक मंदिरात उपस्थित असतात.
मंदिरात महाशिवरात्री व श्रावणातील तिसऱ्या सोमवारी विशेष जत्रोत्सव आयोजित करण्यात येतो. दसरा, दिवाळी, नवरात्री आदी सण व उत्सव मंदिरात साजरे केले जातात. सर्व उत्सवांच्या वेळी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे व महाप्रसादाचे आयोजन केले जाते. सोमवार, अमावस्या व पौर्णिमेला येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते.