ऊत्तरेश्वर मंदिर

तेर, ता. धाराशिव, जि. धाराशिव

धाराशिव जिल्ह्यातील तेर या प्राचीन काळातील समृद्ध गावाचा इतिहास थेट इसवीसन पूर्व तिसऱ्या शतकापर्यंत सापडतो. भारतीय पुरातत्व विभागाने ऐतिहासिक गाव म्हणून या गावाची नोंद केली आहे. येथे सन १९५७, १९६६, १९७५, १९८७, १९८८ अशा पाच वेळा उत्खनन मोहिमा राबवल्या गेल्या. यात तांब्याची नाणी, दगडी पाटे-वरवंटे, लोखंडी दिवे, बाणाची व भाल्याची टोके, सूऱ्यांची पाती, मणी, बांगड्या, अर्धवट जळालेले धान्य इतकेच काय तर प्राचीन स्तुप व मंदिरेही सापडली. बाराव्या शतकातील संत गोरोबा कुंभारांच्या या गावी भाजक्या विटा वापरून बांधलेले उत्तरेश्वर हे प्राचीन व प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिराचे आगळे वेगळे स्थापत्य व शिल्पसौदर्य पाहण्यासाठी जगभरातून अभ्यासक येतात. या विटांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्या हलक्या आहेत व त्या पाण्यावर तरंगतात.
हे मंदिर सुमारे तिसऱ्या शतकातील असल्याचे मत जाणकार व्यक्त करतात. सन १९०१ साली ब्रिटिश अधिकारी हेनरी कझिन्स यांनी या मंदिराला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी या मंदिराबाबत असे मत नोंदवले होते की ‘उत्तरेश्वरमंदिर अत्यंत प्राचीन असण्याचा सर्वात सबळ पुरावा म्हणजे हे मंदिर बांधताना पाषणाचा वापर केलेला नाही.’ पुरातत्त्वशास्त्रज्ञ आणि इतिहासकार डॉ. अरविंद जामखेडकर यांच्या मते हे मंदिर कलचुरी राजघराण्याच्या काळातील असावे. काही जाणकार ते चालुक्यकालीन असल्याचे मत व्यक्त करतात. एकंदरीत हे मंदिर कोणत्या काळातील असावे, याबाबत एकवाक्यता नसली तरी ते प्राचीन असल्याबाबत तज्ज्ञांचे एकमत आहे.
रस्त्यालगत असलेल्या या मंदिराची भक्कम तटबंदी भाजलेल्या विटा वापरून बांधलेली आहे. या पुरातन तटबंदीला अलिकडील काळात गिलावा केलेला आहे. तटबंदीतील प्रवेशद्वारातून मंदिराच्या फरशी आच्छादित प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात काही प्राचीन वृक्ष व उजव्या बाजूच्या तटबंदीत आसने आहेत. हे मंदिर सध्या भारतीय पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारित आहे. मंदिरासमोर वज्रपिठावर नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. नंदी मूर्तीवर घुंगरमाळ, पाठीवरील झुल, वशिंड, शेपटी आदी अत्यंत बारीक तपशिल कोरलेला आहे. प्रांगणात मंदिरासमोर असलेल्या अर्धभींती पाहून पूर्वी येथे लाकडी छताचा सभामंडप असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो. या अर्धवट भिंतीलगत काही प्राचीन शिवपिंडी, समाधीपाषाण, वीरगळ आदी शिल्पे आहेत. तटबंदीच्या भिंतीलगत विष्णू व महादेव यांच्या प्राचीन व जीर्ण मूर्ती आहेत.
पुढे मंदिराचे अंतराळ आहे. पूर्वी अंतराळाच्या प्रवेशद्वाराला पाच द्वारशाखा असलेली लाकडी चौकट होती. ती सध्या तेर येथीलच रामलिंगप्पा लामतुरे संग्रहालयात ठेवण्यात आलेली आहे. या द्वारशाखेच्या वरील तोरणात चौऱ्या ढाळणारे यक्ष, किन्नर व देवी दैवतांची शिल्पे आहेत. ललाटपट्टीवर कोरीवकामात हंस, मोर व इतर पक्षी आणि प्राण्यांची शिल्पे कोरलेली आहेत. चौकटीत पुष्पशाखा, पर्णशाखा, नरशाखा, सिंहशाखा, व्यालशाखा तपशिलासह कोरलेल्या आहेत.
अंतराळापुढे गर्भगृहाचे लाकडी प्रवेशद्वार आहे. येथील द्वारशाखांवर जुजबी नक्षीकाम आहे. ८ फूट बाय ८ फूट चौरस गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी शिवपिंडी आहे. उंच पाषाणपिठावर असलेल्या या शिवपिंडीची शाळूंका चौकोनी आहे. गर्भगृहात मागील भिंतीलगत काळ्या पाषाणातील दोन द्विभुज सूर्यमूर्ती आहेत. मूर्तींच्या दोन्ही हातात कमळ पुष्प व पायाजवळ सात घोडे कोरलेले आहेत. मूर्तींच्या डोक्यावर मुकुट, गळ्यात विविध प्रकारच्या माळा, कमरबंध, उदरबंध, मेखला तसेच विविध वस्त्रे कोरलेली आहेत. मूर्तींच्या दोन्ही बाजूला पायाजवळ दोन शक्तीमूर्ती आहेत. त्या दिवस व रात्रीचे प्रतीक असल्याचे सांगितले जाते.
मंडोवरावर नक्षीदार स्तंभांच्या रांगा आहेत. दोन स्तंभांच्या मधल्या जागेत मकरतोरण नक्षी आहे. स्तंभांमध्ये स्तंभपाद, स्तंभदंड, कणी, हस्त असे भाग विटा वापरून घडवले असल्याने ते वेगळे व वैशिष्ट्यपूर्ण आहेत. विटांचे मोजमाप १६ इंच रूंद ९ इंच उंच व २१ इंच लांब असे आहे. स्तंभांवर सज्जा व छतावर शिखर आहे. द्रविडी शैलीतील या शिखराचा छतापासूनचा भाग वर लहान लहान होत जाऊन कळसाजवळ बिंदुरूप होतो.
या मंदिरात महाशिवरात्री, प्रदोष, श्रावणी सोमवार तसेच पौर्णिमा, अमावस्या आदी दिवशी भाविकांची वर्दळ असते. सुमारे सतराशे वर्षापूर्वीच्या या मंदिराचे अनोखे सौंदर्य व स्थापत्य शास्त्र अभ्यासण्यासाठी जगभरातील अभ्यासक मंदिराला भेट देतात.

उपयुक्त माहिती

  • धाराशिवपासून २९ किमी अंतरावर
  • धाराशिव येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
Back To Home