भगवद्गीतेच्या दहाव्या अध्यायात भगवान श्रीकृष्णाने आपण ‘सिद्धांनां कपिलो मुनिः’ म्हणजे सर्व सिद्धांमधील कपिल मुनी ते मीच, असे सांगून ज्यांचा गौरव केला आहे, त्या कपिल मुनींची तपोभूमी म्हणून वेल्हाळे परिसराची ओळख सांगितली जाते. या गावामध्ये कपिल मुनींच्या नावाने प्रसिद्ध असलेले कपिलेश्वर महादेवाचे प्राचीन मंदिर स्थित आहे. भूमीज स्थापत्य शैलीत बांधलेले हे मंदिर सुमारे एक हजार वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगण्यात येते. प्राचीन शिल्पसौंदर्याबरोबरच अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण व दुर्मीळ अशा शिवपिंडीसाठी हे मंदिर ओळखले जाते.
भुसावळ तालुक्यातील हा परिसर कपिल मुनींच्या पौराणिक आख्यायिकांशी जोडलेला आहे. वेल्हाळे येथून सुमारे १५ किमी अंतरावरील कंडारी या गावातही कपिलेश्वर मंदिर आहे. कपिल मुनींनी या मंदिरात त्यांची माता देवहुती हिला सांख्यदर्शनाचा उपदेश केला होता, अशी आख्यायिका आहे. देशात उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील शरयू नदीकाठचे महंगूपूर गाव, गौतम बुद्धांचे बालपण जेथे व्यतीत झाले ते कपिलवस्तू अशा काही ठिकाणी कपिल मुनींचे जन्मस्थान दाखविले जाते.
स्थानिक लोकश्रद्धेनुसार, वेल्हाळे ही कपिल मुनींची जन्मभूमी आहे. येथील मंदिरातील कपिलेश्वर महादेवाच्या पिंडीची स्थापना त्यांनीच केली असल्याची लोकधारणा आहे. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य असे सांगितले जाते की २१ जून या वर्षीतील सर्वांत मोठ्या दिवशी मंदिरातील शिवलिंगावर थेट सूर्यकिरणे पडतात.
वेल्हाळे गावातील या मंदिराबाबत आणखी एक कथा अशी की ‘लवथवती विक्राळा ब्रह्मांडा माळा’ या शंकराच्या सुप्रसिद्ध आरतीमधील ‘ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा’ या पंक्तीत वेल्हाळा या गावाचा उल्लेख आलेला आहे. समर्थ रामदास स्वामींनी १७व्या शतकात ही आरती लिहिली आहे. ‘मराठी व्युत्पत्ती कोशा’मध्ये वेल्हाळ या शब्दाचा एक अर्थ ‘लाडका, प्रिय’ असा दिलेला आहे. उमावेल्हाळा या शब्दाचा अर्थ ‘उमेस प्रिय’ असा होतो. मात्र आरतीत उमावरून जळगाव तालुक्यातील उमाळा आणि वेल्हाळावरून वेल्हाळे या ग्रामनामांचा उल्लेख रामदासांनी केल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या मंदिराचा नेमका इतिहास अज्ञात आहे. मात्र मंदिराची रचना लक्षात घेता ते यादवकालीन असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. इसवी सनाच्या अकराव्या शतकात नाशिक, खानदेश, औंरगाबाद या परिसरात सेऊणचंद्र दुसरा याची सत्ता होती. या काळात हे मंदिर उभारण्यात आले असावे असे मानण्यात येते. हे मंदिर नागर स्थापत्यशैलीतील भूमीज प्रकारचे व शुष्कसांधी पद्धतीचे आहे. शुष्कसांधी पद्धतीने बांधण्यात आलेली मंदिरे हेमाद्री ऊर्फ हेमाडपंताच्या काळापूर्वी (तेरावे शतक) अस्तित्वात असली, तरी ती हेमाडपंती या नावाने ओळखली जातात. त्यामुळे हे मंदिरही हेमाडपंती शैलीतील असल्याचे म्हटले जाते.
गावाच्या भरवस्तीतील हे पुरातन मंदिर उंच जगतीवर बांधले आहे. त्याची जागोजागी मोठी पडझड झालेली आहे. वेळोवेळी केलेल्या दुरूस्तीकामांमध्ये विटांचा वापर केल्याचे दिसते. उर्वरित बांधकामातून मंदिराचे प्राचीन सौंदर्य लक्षात येते. सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. ११ पायऱ्या चढून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. पायऱ्यांच्या बाजूला बसण्यासाठी दगडांचा बैठकीसारखा भाग आहे.
सभामंडपाचे प्रवेशद्वार चार शाखीय असल्याचे दिसते. द्वारचौकटीवर कोरीव नक्षीकाम आहे. सभामंडपातील स्तंभांवर स्तंभपुत्तलिका आहेत. स्तंभदंडाच्या भागात शंकरासह अन्य काही देवतांची शिल्पे कोरलेली असावीत असे दिसते. स्तंभशीर्षस्थानी यक्षांची शिल्पे आहेत. सभामंडपात मध्यभागी नंदीची दगडी मूर्ती आहे. तिच्यासमोर होमकुंड आहे. दोन स्तंभांच्यामधून अंतराळात प्रवेश होतो. तेथील डाव्या व उजव्या बाजूच्या भिंतीवर देवकोष्टके कोरलेली आहेत.
गर्भगृहास पंचशाखीय प्रवेशद्वार आहे. कोरीव नक्षीकामाने सुशोभित असलेल्या द्वारशाखा आणि द्वारस्तंभांच्या खालच्या भागात द्वारपालांची शिल्पे कोरलेली आहेत. नाजूकशा द्वारस्तंभावर छोट्या देवकोष्ठकात देवीचे शिल्पही आहे. द्वारचौकटीच्या ललाटबिंबस्थानी गणेशाची मूर्ती आहे. प्रवेशद्वाराच्या मंडारकावरील अर्धचंद्रशीला आणि किर्तीमुखे काहीशी झिजलेली आहेत. गर्भगृहात एक चौकोनी आकाराची शिवपिंडी आहे. असे सांगण्यात येते की येथे श्रीयंत्रावर शिवलिंग स्थापन करण्यात आलेले आहे व त्याच्या शाळुंकेसारख्या भागाचा आकार हा कदंब झाडाच्या पानासारखा आहे. अशा प्रकारे वैशिष्ट्यपूर्ण रचना असलेली शिवपिंडी दुर्मिळ आहे. या पिंडीवर अभिषेक पात्र टांगलेले आहे. गर्भगृहाच्या मागील भिंतीवर एका दगडी अधिष्ठानावर पार्वतीमातेची आणि गणेशाची मूर्ती आहे.
गर्भगृहातील वितानावरील (आतील छतावरील) भागात चारही बाजूंना चार त्रिकोणी कोपरे आणि मध्यभागी गोलाकारात नक्षीकाम केलेले आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूचा आकार हा त्रिस्तरीय आहे. बेलाच्या पानाचा आकार असणाऱ्या या मंदिराच्या बाह्यभिंतीवरही कोरीव शिल्पांचे सुंदर नमुने आहेत. मंदिराच्या समोर एक मोठी दगडी विहिर आहे. विहिरीच्या आजूबाजूला भाविकांना बसण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. काही निखळलेल्या मूर्तीं तिथेच आवारात मांडून ठेवण्यात आल्या आहेत. खोलेश्वर महादेवाचे एक छोटेसे मंदिर येथे आहे. कपिलेश्वर महादेवाच्या या मंदिरात दर सोमवारी दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते. श्रावणी सोमवारी येथे दर्शनासाठी पहाटेपासूनच रांग लागते. महाशिवरात्रीला येथे रुद्राभिषेक, जागरण आदी धार्मिक कार्यक्रम उत्साहाने पार पडतात.