
नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या नवापूर शहर रेल्वे स्थानकाचा अर्धा भाग महाराष्ट्रात तर अर्धा भाग गुजरात राज्यात आहे. या तालुक्यात अनेक लहान मोठी धरणे आहेत. त्यातील भरडू, खडकी, बोरपडा, नागझरी (रंगावली), खोकसा, खेरवा, भवरे, हलदानी आदी प्रकल्प खास आहेत. या तालुक्यातील धनराट गावातील हिंदळा देवीचे प्राचीन मंदिर प्रसिद्ध आहे. येथील जागृत देवी नवसाला पावणारी व हाकेला धावून येणारी असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. येथील माघ पौर्णिमेपासून आठ दिवस भरणारी जत्रा व त्यावेळी भरणारा बैल बाजार विशेष प्रसिद्ध आहे.
मंदिराची अख्यायिका अशी की हिंदळा देवीचा जन्म येथून जवळच असलेल्या कामोद खेड्यात झाला. स्वर्गातून अवतरलेली ही देवी या खेड्यात आपले बालपण आनंदात व्यतीत करीत होती. एक दिवशी ती उंच झाडाला बांधलेल्या झोपाळ्यावर झोके घेत असताना झोपाळ्याची दोरी तुटली व हिंदळा देवी आकाशात उंच उडून धनराट गावात येऊन पडली. येथे येऊन पडल्यानंतर देवीने याच गावात राहण्याचे ठरवले व देवीच्या इच्छेनुसार भक्तांनी देवीचे मंदिर बांधले. त्यामुळे देवीचे वास्तव्य धनराट गावी कायम झाले. हे देवस्थान प्राचीन काळापासून येथे असल्याचे सांगितले जाते. काही वर्षांपूर्वी झालेल्या जिर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झालेले आहे.
गावाबाहेरील मोकळ्या मैदानात असलेल्या या मंदिरासमोर दोन गोलाकार स्तंभ व त्यावर तुळई अशा स्वरूपाची स्वागत कमान आहे. सभांडप व गर्भगृह अशी या छोटेखानी मंदिराची रचना आहे. सभामंडपास समोरील बाजूने दोन प्रवेशद्वारे आहेत. सभामंडपात २० गोलाकार स्तंभ व त्यावरील तुळईवर छत आहे. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात प्रकाश व हवा येण्यासाठी खिडक्यांची व्यवस्था आहे. सभामंडपात भाविकांना बसण्यासाठी
आसने आहेत. पुढे अंतराळाचे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस नक्षीदार गोलाकार स्तंभ व त्यावर महिरपी कमान आहे. पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. गर्भगृहात देवीच्या संगमरवरी पादुका व त्यापुढे असलेल्या देवकोष्टकात हिंदळा देवीची १६ भुजांची मूर्ती आहे. देवीने हातांत विविध आयुधे धारण केलेली आहेत. देवीच्या डोक्यावर मुकुट व अंगावर दागिने आहेत. मूर्तीच्या पाठशिळेवर पानाफुलांची नक्षी आहे. देवकोष्टकाच्या डावीकडे लहान मखरात देवीची प्राचीन मूर्ती व मखरासमोर नवसाचे पाषाण आहेत. भाविक आपल्या मनात ईच्छा धरून येथील मुख्य पाषाण उचलण्याचा प्रयत्न करतात. मनातील इच्छा पूर्ण होणार असल्यास हा पाषाण उचलला जातो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. गर्भगृहातून बाहेर पडण्यासाठी उजव्या व डाव्या बाजूला दोन दरवाजे आहेत. मंदिराच्या छतावर चहुबाजूने कठडा आहे. गर्भगृहाच्या छतावर घुमटाकार शिखर व त्यावरील स्तूपीवर कळस आणि ध्वजपताका आहे. शिखरावर उभ्या धारेची नक्षी व शिखराच्या चारही बाजूंना व्याघ्रशिल्पे आहेत.
मंदिरात माघ पौर्णिमा ते वद्य अष्टमी अशी आठवडाभर यात्रा असते. हा मंदिरातील मुख्य वार्षिक उत्सव असतो. यावेळी महाराष्ट्रासह गुजरात व मध्य प्रदेशातून हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. उत्सवकाळात परिसरातील शेतकरी आपल्या शेतात पिकवलेले धान्य, शिरा व शिजलेल्या अन्नाचा नेवेद्य देवीस अर्पण करतात. या वेळी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. जत्रोत्सवादरम्यान विविध वस्तूंची दुकाने सजून परिसरास बाजारपेठेचे स्वरूप प्राप्त होते. बाजारात विविध खाद्यपदार्थ, घरगुती वापराच्या वस्तू, कपडे, खेळणी, कृषी अवजारे व मनोरंजनाची साधने उपलब्ध होतात. यावेळी येथे बैलांचा मोठा बाजार भरतो. शेतकरी आपल्या गरजेनुसार उमद्या बैलांची खरेदी–विक्री करतात. त्यात लाखोंची उलाढाल होते. याशिवाय मंदिरात शारदीय नवरात्र, दसरा, दिवाळी आदी वार्षिक सण साजरे केले जातात. सर्व उत्सवांच्या वेळी तसेच दर मंगळवारी, शुक्रवारी व पौर्णिमा–अमावस्येला येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते.