दत्त मंदिर संस्थान

रावेर, ता. रावेर, जि. जळगाव

एकेकाळी खान्देशाची राजधानी असलेल्या बऱ्हाणपुरला जाणाऱ्या हमरस्त्यावरील रावेर हे एक महत्त्वाचे ऐतिहासिक गाव. थोरले बाजीराव पेशवे यांनी २८ एप्रिल १७४० (वैशाख शुद्ध शके १६६२) रोजी याच गावात नर्मदा तीरी अखेरचा श्वास घेतला. १८०३ मध्ये यशवंतराव होळकर यांनी लुटून उद्ध्वस्त केलेले हे गाव पुढे सूर्याजीराव निंबाळकर यांच्या ताब्यात आले. आज तालुक्याचे ठिकाण असलेल्या या गावास धार्मिकृष्ट्या महत्त्व आहे ते येथील प्राचीन दत्त मंदिरामुळे. सुमारे २०० वर्षांची परंपरा असलेल्या या मंदिरातील रथयात्रा पंचक्रोशीत सुप्रसिद्ध आहे.

या मंदिराचा इतिहास असा सांगितला जातो, की संत दत्त महाराज ऊर्फ सच्चिदानंद बाबा यांनी एकोणिसाव्या शतकात, १८३३ मध्ये या मंदिराची स्थापना केली. या मंदिरासाठी त्यांनी बऱ्हाणपूर येथील एका जुन्या किल्ल्यातील लाकडे विकत आणली होती. त्याच प्रमाणे एका कासारास पंचधातूचे प्रमाण सांगून त्याच्याकडून १७ इंच उंचीची दत्तमूर्ती घडवून घेतली होती. सच्चिदानंद स्वामी यांची माहिती अशी की त्यांचा जन्म माहूर येथे .. १७८० मध्ये भाद्रपद शुद्ध १५ रोजी एका ब्राह्मण कुटुंबात झाला. ते १५ वर्षांचे असताना त्यांच्या मातापित्यास देवाज्ञा झाली. त्यानंतर काही काळाने स्वामींनी आपले घर एका शिक्षकास दान करून गाव सोडले. सद्‌गुरुच्या शोधात ते नांदेड येथे गोदातीरी ध्यान करीत असताना त्यांची भेट नाथ संप्रदायी संत हरिदास यांच्याशी झाली

यानंतर स्वामींनी दक्षिण यात्रा केली नंतर माहूर येथे जाऊन १२ वर्षे तपश्चर्या केली. असे सांगण्यात येते की माहूर येथेच त्यांना दत्तात्रेयाचे सगुण रूपात दर्शन झाले. दत्ताकडून त्यांना एक छडी पादुका मिळाल्या. यानंतर ते बऱ्हाणपूरला गेले. त्यांची किर्ती सर्वत्र पसरली होती. असा सत्पुरूष आपल्या गावी यावा यासाठी रावेर येथील सुपूशेठ वाणी काही ब्राह्मणांसह त्यांच्याकडे गेले. त्यांच्या विनंतीस मान देऊन स्वामी रावेर येथे आले. कालांतराने त्यांनी येथे दत्तात्रेयाचे मंदिर उभारले.

या मंदिरात श्रीकृष्णाची मूर्तीही विराजमान आहे. दत्त मंदिरात कृष्ण भगवान कसे प्रकटले याचीही एक आख्यायिका सांगितली जाते. ती अशी की एकदा सच्चिदानंद स्वामी मंदिरात ध्यानस्थ बसले होते. अचानक ते म्हणाले कीअपने मंदिर मे गोपालजी पधार रहे है.’ त्यावेळी कोणाच्याही ते लक्षात आले नाही. मात्र काही वेळातच मध्य प्रदेशातील खरगोन या भागातून रायरीकर नावाचे एक गृहस्थ श्रीकृष्णाची काळ्या पाषाणातील मूर्ती घेऊन मंदिरात आले. त्यांनी असे सांगितले की गेल्या काही दिवसांपासून मला स्वप्नदृष्टान्त होत होता. साक्षात श्रीकृष्ण स्वप्नात येऊन, ‘मला स्वामी सच्चिदानंदांकडे घेऊन चला’, असे सांगत होते. त्यानुसार मी आज आलो. ही मूर्ती आजही येथील मंदिरात विराजमान आहे. असे सांगण्यात येते की सच्चिदानंद स्वामी यांनी येथे अनेक चमत्कार घडवले. रावेरच्या बाहेर असलेल्या एका शांत ठिकाणी कुंवरस्वामी महाराज मस्तानशाहवली बाबा यांच्या सत्संगात त्यांनी भाविकांना दैवी अनुभूती घडविली होती. वयाच्या १०८व्या वर्षी . . १८८८मध्ये भाद्रपद शुद्ध नवमीला त्यांनी येथे संजिवन समाधी घेतली होती.

रावेर गावात एका मोठ्या मराठेशाही पद्धतीच्या दुमजली वाड्यामध्ये हे दत्त मंदिर वसलेले आहे. लाकडाचा मोठ्या प्रमाणावर वापर करून बांधलेल्या या जुन्या वाड्यास तीन बाजूंनी ओवऱ्या आहेत. त्या मधोमध मोठी मोकळी जागा त्यात छोटे होमकुंड आहे. उजव्या बाजूस ओवरीत एका देवळीत हनुमानाची संगमरवरी मूर्ती आहे. डावीकडे दत्त मंदिर सच्चिदानंद स्वामी समाधी मंदिराचा प्रशस्त सभामंडप आहे. त्यात दगडी कोरीव चौथऱ्यावर बसवलेले लाकडी सुरूदार स्तंभ महिरपी कमानीने जोडलेले आहेत. सभामंडपाच्या भिंतीवर दत्त वारकरी संप्रदायातील विविध संत महात्म्यांच्या, तसेच देवदेवतांच्या तसबिरी लावलेल्या आहेत. समोरच्या बाजूस लाकडी रेलिंगच्या मागे मंदिराचे गर्भगृह आहे. रेलिंगसमोर उंच आसनावर सच्चिदानंद स्वामींच्या पादुका त्यांची तसबीर आहे. गर्भगृहात उंच चौथऱ्यावर बारीक नक्षीकाम केलेला चांदीचा पत्रा जडवलेला सुंदर मखर आहे. त्यात दत्त, श्रीकृष्ण आणि विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती विराजमान आहेत. गर्भगृहाच्या उजव्या बाजूस स्वामींच्या गादीचे स्थान आहे

सच्चिदानंद स्वामी यांनी त्यांच्या जीवनकाळात मंदिरामध्ये रथोत्सव सुरू केला होता. दरवर्षी दत्तजयंतीला होणाऱ्या रथोत्सवासाठी स्वामींचे शिष्य रामभाई बेटावदकर यांनी सुमारे २१ फूट उंचीचा अष्टमुखी सुमारे सात ते आठ टन वजनाचा भव्य रथ समर्पित केला आहे. या सोहळ्यात रावेरमधील हजारो भाविक सहभागी होतात. याच्या दुसऱ्या दिवशी येथे कृष्णमूर्तीची मिरवणूक काढण्यात येते, तर तिसऱ्या दिवशी पांडुरंगाची पालखी काढण्यात येते. मंदिरात स्वामींचा संजीवन समाधी दिनही भक्तीभावाने साजरा करण्यात येतो

उपयुक्त माहिती

  • रावेर बसस्थानकापासून दीड किमी अंतरावर
  • जळगाव जिल्ह्यातील अनेक शहरांतून रावेरसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा आहे
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९८६०८८८८२१, ९४०४०५०४०३
Back To Home