पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील धामणी येथील म्हाळसाकांत खंडोबा मंदिर हे हजारो भाविकांचे प्रमुख श्रद्धास्थान व कुलदैवत आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार येथील खंडोबाची मूर्ती ही राज्यातील सर्वाधिक मोठी मूर्ती आहे. ब्रिटिश राजवटीतही या क्षेत्राचे माहात्म्य ओळखून या मंदिराभोवती असलेल्या देवराईच्या रक्षणाचे लेखी आदेश देण्यात आले होते, असे वर्णन जिल्हा गॅझेटियरमध्ये आहे. माघ पौर्णिमेला या ठिकाणी भरणाऱ्या यात्रेसाठी हजारो भाविक उपस्थित राहतात. या जत्रेतील बैलगाडा शर्यतींमुळे या परिसराची सांस्कृतिक ओळख सर्वदूर पसरली आहे. राज्य शासनाकडून या क्षेत्राला ‘क’ दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून मान्यता मिळाली आहे.
धामणी येथील मंदिराबाबत आख्यायिका अशी की खंडोबाचे निस्सीम भक्त असलेल्या तांबेबाबांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन देव निमगावहून धामणी गावाकडे येण्यासाठी निघाले. प्रवासादरम्यान तांबेबाबांच्या मनात शंका निर्माण झाली आणि त्यांनी देव मागे आहेत का हे पाहण्यासाठी वळून पाहिले.
तांबेबाबांच्या या कृतीमुळे खंडोबा तिथेच गुप्त झाले आणि त्या जागी ईश्वरी अंश असलेले सागाचे एक छोटे रोपटे उगवले. पुढे याच ठिकाणी सागाचे विशाल वन तयार झाले आणि यालाच आज ‘सागदरा’ म्हणून ओळखले जाते. याबाबत दुसरी कथा अशी की मूळ खंडोबा हे धामणलिंग गडावर वास्तव्यास होते व त्यांची सेवा करण्यासाठी भगत आणि तांबे कुटुंबीय दररोज गडावर चढून जात असत. परंतु वृद्धत्वामुळे त्यांना डोंगरावर चढणे कठीण होत होते. त्यांच्या कष्टांची जाणीव देवाला झाली. देवाने भक्तांना दृष्टांत देऊन पायथ्याशी असलेल्या निवडुंगाच्या बेटावर प्रकट होण्याचे आश्वासन दिले. माघ पौर्णिमेच्या पहाटे तिथे एक वाघ प्रकट झाला आणि तो काही क्षणात तिथेच गुप्त झाला. ज्या ठिकाणी वाघ दिसला तिथे जमिनीतून सात स्वयंभू लिंगे म्हणजे ‘सप्तलिंग’ प्रकट झाली. या सप्तलिंगांना खंडोबाचा संपूर्ण परिवार मानले जाते आणि यात म्हाळसाई व बाणाई यांसह इतर देवगणांचा समावेश होतो.
अठराव्या व एकोणिसाव्या शतकातील पुणे जिल्हा गॅझेटिअरमधील माहितीनुसार,
ब्रिटिश राजवटीत या परिसरातील सागाच्या वनाबाबत एक विशेष ऐतिहासिक प्रसंग घडला. एका ब्रिटिश अधिकाऱ्याने या देवराईतील झाडे तोडण्याचा आदेश दिला आणि तो मजूर घेऊन तिथे पोहोचला. झाडांवर घाव घालताच अधिकारी व मजुरांना शारीरिक व्याधींचा त्रास सुरू झाला व त्यांनी ग्रामस्थांकडे क्षमायाचना केली. या घटनेनंतर ब्रिटिश अधिकाऱ्याने या सागदरा परिसराचे धार्मिक महत्त्व ओळखून या सागाच्या झाडांची देवराई म्हणून नोंद केली. या वनातील एकाही पानाला किंवा लाकडाला कोणीही स्पर्श करू नये व त्याचे रक्षण करावे, असा लेखी आदेश त्याने काढला. ही ऐतिहासिक नोंद आजही सरकारी दप्तरी असल्याचे सांगण्यात येते.
या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी भाविकांना पुणे-नाशिक महामार्गावरील मंचर या मुख्य बाजारपेठेपासून काही अंतरावर असलेल्या धामणी गावाकडे यावे लागते. हे मंदिर निसर्गसमृद्ध परिसरात, एका उंच चौथऱ्यावर वसलेले आहे. मंदिराचा हा संपूर्ण परिसर सागाच्या दाट झाडांनी व्यापलेला आहे आणि याला सागाची देवराई म्हणून ओळखले जाते. सागदऱ्यातील वृक्षांना ईश्वराचा अंश मानले गेल्यामुळे आजही स्थानिक लोक या निसर्गाचे रक्षण करतात.
वाहनतळापासून पाच ते सहा पायऱ्या चढून मंदिराच्या चौथऱ्यावर प्रवेश होतो. या पायरी मार्गाच्या दोन्हीकडे मोठी गजशिल्पे आहेत. पायरी मार्गाला लागूनच एक खालून वर निमुळता होत जाणारा दीपस्तंभ आहे. या दीपस्तंभाशेजारी असलेल्या चौथऱ्यावर श्वानशिल्प आहे. त्यापुढे सुमारे १० फूट उंचीची तटबंदी आहे. या तटबंदीत दर्शनी भागात दोन प्रवेशद्वारे आहेत. दोन्ही प्रवेशद्वारांच्या मध्यभागी तटबंदीच्या वर ‘जय मल्हार’ असा भला मोठा फलक लावलेला आहे. या प्रत्येक प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना लहान चौथऱ्यांवर सिंह शिल्पे आहेत. प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर हातात भाला असलेली द्वारपाल शिल्पे आहेत. या प्रवेशद्वारांना वरच्या बाजूने शिखरसदृश कलाकुसर आहे व त्याच्या शीर्षभागी खंडोबाचे वाहन असलेल्या घोड्याची शिल्पे आहेत. तटबंदीमध्ये असलेल्या या प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात भाविकांचे ऊन व पावसापासून संरक्षण होण्यासाठी मोठा मंडप उभारण्यात आला आहे. मंडपात डावीकडे ओवऱ्या आहेत. या ओवऱ्यांमध्ये पौराणिक माहिती व चित्रे रंगविलेली आहेत. याशिवाय येथे भाविकांना बसण्यासाठी बाकांची सुविधा आहे. या ओवऱ्यांसमोर एका चौथऱ्यावर पाषाणी बांधणीची प्राचीन दीपमाळ आहे.
खुला मंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मुख्य मंदिराची संरचना आहे. मंडपात मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या चौथऱ्यावर काळ्या पाषाणातील नंदी व त्यासमोर शुभ्र संगमरवरातील कासवमूर्ती आहे. प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर गणपतीचे शिल्प आहे. येथून मंदिराच्या अंतराळात प्रवेश होतो. अंतराळात गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या डावीकडे खंडोबा व उजवीकडे म्हाळसादेवी यांच्या घोड्यावर स्वार अशा मूर्ती आहेत. अंतराळातून पायऱ्या उतरून काहीशा खोल असलेल्या गर्भगृहात प्रवेश होतो. गर्भगृहाच्या भिंतीला लागून वज्रपिठावर स्वयंभू सप्तलिंगे व त्यामागे श्री म्हाळसाकांत खंडोबा, म्हाळसाई व बाणाई यांच्या आकर्षक व भव्य मूर्ती आहेत. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार येथील खंडोबाची मूर्ती ही जिल्ह्यातील सर्वाधिक मोठी मूर्ती आहे. खंडोबाच्या एका हातात त्रिशूळ व दुसऱ्या हातात डमरू आहे. या मूर्तींना सुंदर रंगांनी सजवलेले आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील गर्भगृहात या तीन मूर्तींसह डावीकडील भिंतीमध्ये असलेल्या वज्रपिठात खंडोबाच्या बहिणीचीही मोठी मूर्ती आहे. महाराष्ट्रातील विविध लोककथांनुसार अंबेजोगाई येथील योगेश्वरी देवीला खंडोबाची बहीण मानले जाते. या मंदिरात तिची स्वतंत्र मूर्ती स्थापित आहे. खंडोबाच्या भक्ती परंपरेत या बहिणीला विशेष मान आहे. ही देवी भक्तांचे रक्षण करणारी व परिवाराला जोडून ठेवणारी एक शक्ती मानली जाते. मंदिराच्या शिखरावर जाण्यासाठी पायऱ्यांची रचना असून हे शिखर पारंपरिक नागर शैलीतील नक्षीकामाने युक्त आहे. या शिखरावर सर्व बाजूंनी देवकोष्टके आहेत व शीर्षभागी पितळी कळस आहे.
मंदिरात वर्षभर विविध सण आणि उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. माघ पौर्णिमेला भरणारी दोन दिवसांची जत्रा हा येथील सर्वात मोठा उत्सव आहे. या यात्रेची सुरुवात देवाला हारतुरे वाहून व विधिवत पूजा करून होते. या सोहळ्यात बैल आणि बैलगाडा मिरवणूक, नवसाच्या बैलगाडा शर्यती व पालखी सोहळा यांचा समावेश असतो. धामणीची बैलगाडा शर्यत ही कोणत्याही बक्षिसासाठी नसून ती केवळ देवावरील श्रद्धेपोटी खेळली जाते. या यात्रेच्या दुसऱ्या दिवशी गावातून गाडीबगाड व बैलगाड्यांची मोठी मिरवणूक काढली जाते. हजारो भाविक ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ असा जयघोष करत भंडारा आणि खोबऱ्याची उधळण करतात. या दोन दिवसांच्या कार्यक्रमात कुस्त्यांचा आखाडा व विविध करमणुकीचे कार्यक्रम आयोजित केले जातात. चैत्र पौर्णिमेला मंदिरात वासंतिक चंदन उटी सोहळा पार पडलतो. या दिवशी स्वयंभू सप्तलिंगावर चंदनाचा लेप लावला जातो. मार्गशीर्ष महिन्यात चंपाषष्ठी उत्सव साजरा केला जातो आणि खंडोबाचे नवरात्र बसते. सोमवती अमावस्येच्या दिवशीही येथे विशेष धार्मिक विधी केले जातात.