सिद्धेश्वर मंदिर

सागरगड, ता. अलिबाग, जि. रायगड

अलिबाग जवळील सागरगड हा बहामनी राजवटीत बांधलेला प्राचीन किल्ला .. १६६० मध्ये शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडून जिंकून घेतला. पुढे पुरंदरच्या तहात इतर २२ किल्ल्यांसोबत सागरगड देखील मुघलांच्या ताब्यात गेला. आगऱ्याहून सुटका झाल्यावर महाराजांनी .. १६७० मध्ये पुन्हा हा किल्ला ताब्यात घेतला. .. १६७९ साली इंग्रज कप्तान फ्रान्सिस मौलिव्हेर याला याच किल्ल्यावर अटकेत ठेवले होते. पुढे हा किल्ला सिद्धी, आंग्रे त्यानंतर ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. या ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या किल्ल्याच्या सानिध्यात सिध्देश्वर महादेवाचे प्राचीन मंदिर आहे.

.. १६६० साली किल्ला ताब्यात घेतल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी हे मंदिर बांधले असावे, असा अंदाज व्यक्त केला जातो. या मंदिराबाबत अख्यायिका अशी की एका व्यापाऱ्याने संततीप्राप्तीसाठी देवास नवस केला होता. सिद्धेश्वराच्या कृपेने व्यापाऱ्यास पुत्रप्राप्ती झाली. तेव्हा त्याने या मंदिराचा जिर्णोद्धार करून समोरील सभामंडप बांधला. पूर्वी या मंदिरात नंदी नव्हता. परंतू काही वर्षांपूर्वी मंदिर परिसरात असलेल्या तलावाच्या सफाईदरम्यान नंदीची मूर्ती सापडली. त्या नंदीची या मंदिरात स्थापना करण्यात आली.

पेणअलिबाग मार्गावरील कार्लेखिंड ओलांडून पुढे खंडाळे गावातून कच्चा रस्ता सिद्धेश्वर डोंगरांच्या पायथ्याशी जातो. डोंगराच्या पायथ्याशी असलेला ओढा पार केल्यावर बांधीव पायऱ्यांचा मार्ग आहे. त्यानंतर सुमारे अर्धा तास डोंगर वाट चढल्यावर सिध्देश्वर मंदिराजवळ पोहचता येते. मंदिरासमोरील प्रांगण पेव्हर ब्लॉक आच्छादित आहे. सभामंडप, अंतराळ गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात (गूढमंडप) प्रवेशद्वारासमोर एका चौथऱ्यावर अखंड पाषाणातील नंदीची प्राचीन मूर्ती आहे. हीच मूर्ती तलावात सापडल्याचे सांगितले जाते. सभामंडपात उजेड हवा येण्यासाठी खिडक्या आहेत. सभामंडपावर पत्र्याचे छत आहे. या सभामंडपाचे बांधकाम अलिकडील काळातील आहे.

पुढे प्राचीन बांधकाम असलेले अंतराळ गर्भगृह आहे. अंतराळाच्या द्वारशाखांवर अस्पष्ट नक्षी आहे. अंतराळात गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस देवकोष्टके आहेत. त्यापैकी उजव्या बाजूच्या देवकोष्ठात गणपतीची शेंदूरचर्चित चतुर्भुज मूर्ती आहे. या गणपतीच्या वरील डाव्या हातात पद्म उजव्या हातात शस्त्र आहे. खालील डावा हात अभय मुद्रेत आणि उजव्या हातात मोदक आहे. डाव्या बाजूच्या देवकोष्ठात वीरगळ शिल्प आहे दोन्ही देवकोष्टकांसमोर चौथरे आहेत. अंतराळापेक्षा उंचावर असल्यामुळे गर्भगृहाच्या प्रवेशद्वारास दोन पायऱ्या आहेत. प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी स्वयंभू शिवपिंडी त्यावर छत्र धरलेला पितळी नाग आहे. शिवपिंडीवर जलधारा धरलेले तांब्याचे अभिषेक पात्र बाजूला पितळी त्रिशूल आहे. गर्भगृहाच्या भिंतीतील देवकोष्टकांत देवतांच्या मूर्ती आहेत. भिंतीलगत भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहेत. अंतराळ गर्भगृहाच्या छतावर दोन स्वतंत्र घुमटाकार शिखरे आहेत.

मंदिरात महाशिवरात्री हा मूख्य वार्षिक उत्सव साजरा केला जातो. त्यावेळी येथे मोठी यात्रा असते. यावेळी मंदिरात महाअभिषेक, भजन, किर्तन, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. येथील ग्रामस्थ आगरी कोळी बांधव सर्व कार्यक्रमाचे नियोजन करतात. श्रावणातील सर्व सोमवारी तसेच पौर्णिमा, अमावस्या प्रदोष इत्यादी दिवशी भाविकांची मोठी उपस्थिती असते. मंदिराजवळ असणाऱ्या सिद्धेश्वर धबधब्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत या परिसरात पर्यटकांची वर्दळ असते. मंदिरापासून काही अंतरावर सप्तमातृका स्थान आहे. येथे सप्तमातृका पाषाण आहेत.

उपयुक्त माहिती

  • अलिबागपासून खंडाळा किमी अंतरावर
  • अलिबाग, पेण येथून खंडाळेसाठी एसटी खासगी वाहनांची सुविधा
  • खासगी वाहने सिद्धेश्वर डोंगराच्या पायथ्यापर्यंत येऊ शकतात
  • मंदिरा शेजारी असलेल्या मठात मुक्कामाची सुविधा
  • संपर्क : श्री. तानू, सेवेकरी, मो. ७०५७१११५०४
Back To Home