
प्राचीन काळी बाणकोट खाडीतील एक नामांकित आणि गजबजलेले व्यापारी बंदर म्हणून महाडची ओळख होती. घाटमाथा आणि कोकण यांच्यातील व्यापारी दुवा म्हणून या शहराकडे पाहिले जात असे. घाटमाथ्यावरून येणाऱ्या विविध वस्तू या बंदरातून जगभर पाठविल्या जात असत. अशा या शहराची ग्रामदेवता म्हणून जाकमाता देवी प्रसिद्ध आहे. व्यापारी वर्गाची देवी म्हणून तिची पूर्वीपासून ख्याती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या येथील कोट किल्ल्याचे जाकमाता रक्षण करते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
ऐतिहासिक, सामाजिक आणि व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचे असलेले महाड हे सावित्री नदीच्या तीरावर वसलेले एक प्राचीन शहर आहे. क्लॅडियस टॉलेमी या इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात होऊन गेलेल्या ग्रीक ज्योतिषशास्त्रज्ञ व भूगोल शास्त्रवेत्त्या लेखकाच्या एका ग्रंथामध्ये रायगड जिल्ह्यातील स्थानांचा उल्लेख आहे. त्याने चौलला ‘शेमुल’, गोरेगावला ‘हिप्पोकुर साऊथ ऑफ शेमुल’ आणि महाडला ‘बालेपाटना’ म्हटले आहे. टॉलेमीच्या काळाच्या पूर्वीपासून महाडचा ग्रीकशी व्यापारी संबंध होता. इ.स. पूर्व २२५ इतक्या जुन्या नोंदीतही महाड या व्यापारी बंदराचा उल्लेख आढळतो. पूर्वी हे शहर महिकावती नावाने प्रसिद्ध होते. कुंभोजवंशीय बुद्धधर्मीय राजा विष्णू पुलित याचे इ.स.च्या पहिल्या शतकात येथे राज्य होते. तेराव्या शतकात देवगिरीच्या यादवांचा या भूभागावर अंमल होता. त्यावेळी महाडचे व्यापारी महत्त्व खूप होते. मोठी बाजारपेठ म्हणून या नगरीला महा–हाट म्हणत. त्याचे पुढे
महाड झाले. पोर्तुगीजांच्या लिखाणात या शहराचा उल्लेख गव्हाची बाजारपेठ म्हणून आलेला आहे. पुणे, सातारा, सांगली व कोल्हापूर येथून गहू, कापड व विविध प्रकारचे अलंकार महाबळेश्वरमार्गे येथे येत व येथून समुद्रमार्गे ते जगभर पाठविले जात असत.
घाटमाथ्यावर म्हणजेच महाबळेश्वरमधून उगम पावलेली सावित्री नदी ही घाटमाथा आणि कोकण यांच्यातील व्यापाराचा दुवा समजली जात असे. या नदीला मधुनदी म्हणजेच ‘रिव्हर आफ हनी’ असे ब्रिटिशकाळात म्हटले जात होते. या नदीतून घाटमाथ्यावरील मधाचा कोकणात व्यापार होत असे. इ.स. १५३८ मध्ये आलेल्या डी कॅस्ट्रो या फ्रेंच प्रवाशाने देशातील गव्हाची फार मोठी उलाढाल महाड बंदरातून होत होती, अशी नोंद केलेली आहे. त्यामुळेच जेथे व्यापारी पेठा तेथे जाकमाता असे समीकरण असल्याने कोकणात अनेक ठिकाणी जाकमाता देवीची मंदिरे आहेत. जाकमाता ही यक्षिणीचा अवतार असल्याने या देवीला व्यापारी वर्गाची देवी, असेही संबोधले जाते. जाखडी हा कोकणातील परंपरागत नृत्य प्रकार आहे. त्या नावाशी साधर्म्य असणारी ही देवी आहे. जखडणे या शब्दातूनच जाखमाता किंवा जाकमाता या शब्दाची
उत्पत्ती झाली असावी. म्हणजेच भक्तांशी घट्ट नाते असणारी ही देवी आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. येथील अनेक वैश्यवाणी कुटुंबांची ही देवी कुलदेवता आहे.
‘पंडित जॅक्सन’ म्हणून ख्यातकीर्त असलेले भारतविद्याशास्त्रज्ञ आणि ब्रिटिश सनदी अधिकारी ए. एम. टी. जॅक्सन यांनी लिहिलेल्या ‘फोकलोअर नोट्स’ या द्वीखंडी ग्रंथाच्या दुसऱ्या कोकण खंडामध्ये त्यांनी जाकमाता किंवा जाखाईची नोंद केलेली आहे. या ग्रंथानुसार जाखाई वा जाकमाता या लोकदेवता आहेत. हिंग्लज, चंपावती, भागवती, महिकावती, गोलंबादेवी आदी लोकदेवतांप्रमाणेच जाखमातेचीही पूजा केली जात असे. रत्नागिरी जिल्ह्यात जाखाईला दुर्गादेवीचा अवतार मानला जातो. संगमेश्वर येथील माखजन आणि जाकमाता या देवींची गुरव आणि भोई पुजाऱ्यांकडून पूजा केली जात असल्याची नोंदही जॅक्सन यांनी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची दुर्गाभवानीवर श्रद्धा होती. ऐतिहासिक नोंदींनुसार, स्वतः शिवाजी महाराजांनी महाडच्या जाकमाता मंदिरासाठी राजापूरजवळ असलेल्या धोपेश्वर येथील गुरवांची पुजारी म्हणून नियुक्ती केली होती. यातील अर्धे पुजारी येथील वीरेश्वर देवस्थानाचे तर अर्धे पुजारी जाखमातेचे असतील व महाशिवरात्रीच्या रात्री ते आपल्या कामांची अदलाबदल करतील, असे ठरवून देण्यात आले होते. तेव्हापासूनची ही प्रथा आजही येथे पाळली जाते. या देवीस वीरेश्वर महादेवाची बहीण मानले जात असल्याने ती शिवपरिवारातील असल्याचे स्पष्ट होते.
महाड शहराच्या बाजारपेठेजवळ असलेल्या कोट किल्ल्याच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराजवळ जाखमातेचे मंदिर आहे. श्रीमंत बाळाजी बाजीराव तथा नानासाहेब पेशवे यांच्या काळात (इ.स. १७४० ते १७६१) त्यावेळचे पेशवाईतील रायगडचे सुभेदार व महाडचे रहिवासी यशवंत महादेव पोतनीस यांनी वीरेश्वर मंदिरासोबतच जाखमाता मंदिराची मराठा स्थापत्यशैलीनुसार नव्याने बांधकाम केल्याची नोंद आहे. यशवंत महादेव हे संभाजी राजांचे पुत्र छत्रपती शाहू यांचे पोतनीस, खासनवीस होते. शाहू राजांचे अठरा कारखाने व खाजगी कारभार या गोष्टी त्यांच्याकडे होत्या. शाहू राजांनीच त्यांच्याकडे तत्कालीन रायगड तालुक्याचा कारभार सोपवला होता व त्यांना ४० हजारांचा सरंजाम दिला होता. त्यांनी त्या काळात बांधलेल्या मंदिराचा काही वर्षांपूर्वी जीर्णोद्धार करण्यात येऊन, मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले.
सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची संरचना आहे. गर्भगृहातील एका उंच वज्रपिठावर देवीची वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आहे. मूर्तीच्या एका हातात ढाल, दुसऱ्या हातात तलवार आहे. मोठे डोळे व चेहरा तजेलदार आहे. महाडच्या प्रसिद्ध छबिना उत्सवाची सुरूवात जाकमाता देवीच्या पालखी मिरवणुकीने होते. या मिरवणुकीत शहरातील देवदेवतांच्या काठ्या सहभागी होतात. यावेळी जाकमातेची पालखी मिरवणुकीने वीरेश्वर मंदिरात नेली जाते. नवरात्रोत्सव हा येथील मोठा उत्सव असतो. उत्सव काळात भजन, कीर्तन, गोंधळ, पूजा–अर्चा या धार्मिक कार्यक्रमांसोबतच विविध स्पर्धा, सांस्कृतिक, वैचारिक कार्यक्रम व व्याख्याने होतात. शहरातील गुणवंतांचा सत्कार, तसेच प्रतिकूल परिस्थितीवर मात करून कुटुंबाचा आधार बनलेल्या महिलेचा जाकमाता स्त्री–शक्ती पुरस्काराने गौरव केला जातो.