धोंडीराज महाराज समाधी मंदिर

पलूस, ता. पलूस, जि. सांगली

अक्कलकोच्या स्वामी समर्थांच्या समृद्ध अध्यात्म परंपरेचा वारसा सांगणारे आणि वारकरी संप्रदायातील भजन, प्रवचन, नामचिंतनाचा वसा सांभाळणारे एक संत म्हणून सांगलीमधील पलूस येथील धोंडीराम महाराज प्रसिद्ध आहेत. शिर्डीचे साईबाबा, शेगावचे गजानन महाराज गोंदवले येथील गोंदवलेकर महाराज यांच्या समकालीन असणारे धोंडीराज महाराज यांना त्यांच्या हयातीतच भाविकांनी दैवत्व बहाल केले होते. महाराजांनी १९०५ साली सुरू केलेली अन्नदानाची परंपरा आजही येथे अखंडपणे सुरू आहे. धोंडीराज महाराज समाधी मंदिरात साजरा होणारा यात्रोत्सव हा जिल्ह्यातील महत्त्वाचा धार्मिक उत्सव मानला जातो

साईबाबांप्रमाणेच धोंडीराज महाराजांचे मूळ गावाविषयी वेगवेगळे अंदाज बांधले जातात, पण निश्चित अशी माहिती कुणीही सांगू शकत नाही. असे सांगितले जाते की महाराजांनी वयाच्या बाराव्या वर्षी घर सोडले. वेगवेगळ्या ठिकाणी भ्रमण करत ते पलूस येथे आले. काहींच्या मते ते पलूसला आले तेव्हा ४५ वर्षांचे होते. पण गावातील काहींना त्यांचे प्रथम दर्शन लहान मुलाच्या रूपात तर काहींना वृद्ध व्यक्तीच्या रूपात झाले होते. महाराजांचे पलूस येथील आगमन अचानकच झाले. पण त्यांचे या परिसरात येणे हे वरदानस्वरूप असल्याची येथील ग्रामस्थांची भावना आहे. महाराजांच्या येण्यानंतर या परिसराचा कायापालट झाला, अशी त्यांच्या अनुयायांची श्रद्धा आहे

एका अख्यायिकेनुसार, एकदा एक भक्त धोंडीराज महाराजांसाठी सोन्याची अंगठी घेऊन आला महाराजांना ती घालण्याचा आग्रह करू लागला. त्यावेळी महाराजांनी आपल्या खांद्यावरील झोळीत हात घातला आणि तोच हात त्या भक्तासमोर धरला. भक्ताने त्या हातात अंगठी घालण्यासाठी आपला हात पुढे केला, तोच त्याला महाराजांच्या प्रत्येक बोटात अंगठ्याच अंगठ्या दिसल्या. आणखी अंगठी घालायला जागाच शिल्लक नव्हती. आपण बाबांना सोन्याची अंगठी घालतो आहोत, याचा त्याला काहीसा अभिमान वाटल्याने महाराजांनी ही किमया केल्याचे सांगितले जाते.

दुसऱ्या कथेनुसार, धोंडीबुवांचे भक्त त्यांना खाण्यासाठी अनेक पदार्थ आणून देत असत. ते त्यांच्या झोळीत असत. जेवणाच्या वेळी ते आपल्या खांद्यावरची झोळी समोर ठेवत असत. त्या वेळी सोबत असणाऱ्या भक्तांना ते त्यातील पदार्थ देत असत. सोबत कितीही भक्त असले तरी झोळीतील पदार्थ कमी पडत नसत. त्यातूनच येथे अन्नदान मोहीम सुरू झाली. असे सांगितले जाते की कोल्हापूरच्या एका सरदार घराण्यातील व्यक्तीचे महाराजांच्या कृपाप्रसादामुळे भले झाले होते. त्यांनी महाराजांना दर वर्षी तनखा द्यायचे ठरवले. पहिल्यावेळी ती रक्कम त्यांच्यापर्यंत आली तेव्हा महाराजांनी ती स्वीकारायला नकार देऊन त्यातून भक्तांसाठी महाप्रसाद बनवून वाटायला सांगितले. तेव्हापासून येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात येऊ लागले.

धोंडीराज महाराजांनी केलेल्या अध्यात्मिक मार्गदर्शनामुळे भाविक त्यांना अवतारस्वरुप मानतात. पलुसमध्ये असलेले त्यांचे समाधी मंदिर आणि मठाच्या माध्यमातून त्यांची आध्यात्मिकसामाजिक कार्याची परंपरा त्यांच्या अनुयायांनी सुरूच ठेवली आहे. पलूसच्या मुख्य बाजारपेठेजवळ धोंडीमहाराजांचे मंदिर आणि मठ आहे. रस्त्यालगत असलेल्या कमानीवजा प्रवेशद्वारातून या समाधी मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. महाराजांचे जास्तीत जास्त भक्त हे वारकरी संप्रदायातील असल्यामुळे या सभामंडपात भजनप्रवचनादी असे नित्य कार्यक्रम सुरू असतात. या सभामंडपासमोर धोंडीराज महाराजांचे समाधी स्थान आहे. त्याशेजारी चांदीच्या पत्र्याची चौकट असलेली महाराजांची प्रतिमा ठेवण्यात आली आहे

समाधीमंदिरापासून जवळच महाराजांच्या नावाने एक मठ आहे. त्याच्या दुमजली बहुउद्देशीय इमारतीमध्ये महाराजांच्या संगमरवरी मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे. त्याच्या दोन्ही बाजूला श्रीदत्त, शंकर आणि गणपती यांच्या मूर्ती समोर नंदी आहे. असे सांगितले जाते की सध्या मठामध्ये ज्या ठिकाणी महाराजांची संगमरवरी मूर्ती आहे, तेथे पूर्वी एक उंबराचे झाड होते. अनेकदा त्या झाडाखाली धोंडीराज महाराज बसत असत. महाराजांचे महानिर्वाण मे १९०८ मध्ये झाले. तेव्हाही ते त्याच झाडाखाली होते

धोंडीराज महाराजांनी आपले गुरू अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांच्या स्मरणार्थ यात्रा सुरू केली होती, जी आता धोंडीराज महाराज यात्रा म्हणून ओळखली जाते. वैशाख शुद्ध प्रतिपदेला होणाऱ्या या यात्रेत गाथा पारायण, नामस्मरण मेळा, भजन, कीर्तन आणि अन्नदान यांचा समावेश असतो. या उत्सवाच्या दिवशी येथे वाटली जाणारी खीर विशेष मानली जाते. पहाटेपासून त्यासाठी तयारी केली जाते. एका प्रचंड मोठ्या भांड्यात तयार होणाऱ्या या प्रसादाच्या खिरीसाठी साऱ्या वस्तू भाविकांकडून उपलब्ध होतात. उत्सवासाठी आलेले हजारो भाविक या खिरीचा लाभ घेतात.

धोंडीराज महाराजांचे देहावसान १९०८ या वर्षात, वैशाख शुद्ध नवमीला झाले. त्याच्या आदल्या दिवशी धोंडीराज महाराजांनी पलुसमधील सर्व देवतांचे दर्शन घेतले होते. त्याचे स्मरण म्हणून दरवर्षी त्या दिवशी रथोत्सव सोहळा आयोजित केला जातो. यावेळीही हजारो भाविक उपस्थित असतात

उपयुक्त माहिती

  • सांगलीपासून ३५ किमी अंतरावर
  • सांगली जिल्ह्यातील अनेक शहरांतून पलूससाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा आहे
  • संपर्क : मंदिर कार्यालय, दूरध्वनी : 02346226785
Back To Home