
कल्याणचे चालुक्य, देवगिरीचे यादव, बहामनी, तसेच मराठ्यांची सत्ता पाहिलेल्या सांगोला तालुक्यातील प्राचीन मंदिरांत कोळे येथील महादेव मंदिराचा समावेश होतो. दुग्ध उत्पादन आणि हस्तशिल्प उद्योग यासाठी ओळखल्या जाणाऱ्या कोळे गावात तेराव्या शतकातील हेमाडपंती स्थापत्यशैलीत बांधलेले महादेवाचे मंदिर आहे. या मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे येथील कामशिल्पे. शाक्तांच्या प्रभावामुळे अनेक मंदिरांत कामशिल्पे पाहावयास मिळतात. खजुराहो येथील मंदिर हे त्याचे जगप्रसिद्ध उदाहरण आहे. या महादेव मंदिरात मोठ्या प्रमाणावर कामशिल्पे असल्यामुळे त्यास सोलापूर जिल्ह्यातील खजुराहो, असेही म्हटले जाते.
प्राचीन शिलालेखांमध्ये ‘संगोलीया’, ‘सांगोली’, ‘सांघोले’ असा उल्लेख असलेल्या सांगोला हा ऐतिहासिक काळात मान परगण्याचा भाग होता. कोळे हे या तालुक्यातील एक छोटेसे गाव आहे. अफझलखानाच्या वधानंतर शिवरायांच्या आज्ञेनुसार नेतोजी पालकर यांनी या प्रदेशातील जी गावे लुटली होती त्यात कोळेचा समावेश असल्याची ऐतिहासिक नोंद आहे. या भागावर इ.स. ११४६ मध्ये कल्याणच्या चालुक्य घराण्यातील अखेरचा उल्लेखनीय राजा जगदेकमल्ल याची सत्ता होती. यानंतर येथे कलचुरी घराण्याची राजवट आली. तेराव्या शतकात पंढरपूर, वेळापूर भागात देवगिरीच्या यादव घराण्याची सत्ता होती असे शिलालेखीय प्रमाण आहे. हेमाद्री उर्फ हेमाडपंत हा यादवांचा करणाधिपती म्हणजेच मुख्य प्रधान होता. त्याने प्रसारित केलेल्या मंदिर स्थापत्यशैलीस हेमाडपंती शैली असे म्हणतात. कोळे येथील मंदिर याच शैलीतील आहे.
कोळे गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी हे प्राचीन महादेवाचे मंदिर आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत आल्यावर उजवीकडे एक अर्धखुला सभामंडप आहे. या सभामंडपाच्या पुढील बाजूला मारुती व गणेश यांच्या शेंदूरचर्चित मूर्ती आहेत.
याशिवाय येथे विठ्ठल–रुख्मिणीच्या काळ्या पाषाणातील मूर्ती आहेत. हा सभामंडप मुळ मंदिरासमोर नंतरच्या काळात बांधल्याचे जाणवते. या सभामंडपातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या प्रांगणाच्या सुरूवातीला नंदीमंडपाप्रमाणे रचना असलेले एक हेमाडपंती रचनेचे मंडप आहे. यामध्ये स्तंभ व दगडी कक्षासने आहेत. या मंडपाच्या पुढे प्रांगणात एका चौथऱ्यावर अखंड कोरीव पाषाणातील मोठा नंदी आहे. या नंदीच्या दोन्ही बाजूला दोन लहान नंदीमूर्ती आहेत.
मुखमंडप, सभांडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. येथील मुखमंडप व सभामंडप हे अर्धखुले स्वरूपाचे आहेत व त्यातील भिंतींमध्ये भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहेत. या दगडी कक्षासनांवर नंतरच्या काळात संगमरवरी फरशा लावलेल्या आहेत. येथील स्तंभांवर बारीक कोरीवकाम केलेले आहे. सभामंडपातील देवकोष्टकांमध्ये गणपती, शिवपिंडी व विरभद्र मूर्ती आहेत. सभामंडपात दगडी खांबांवरील तुळयांवर
विविध शिल्पे कोरलेली आहेत. एका तुळईवर सतीशिळेवर असतो त्याप्रमाणे एक हात कोरलेला आहे. त्या हातात बांगड्या कोरलेल्या दिसतात. त्यापुढे अंतराळ व गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वाराच्या द्वारशांखांवरही कलाकुसर केलेली आहे. येथील लहानशा गर्भगृहातील शिवपिंडी मात्र वैशिष्ट्यपूर्ण व दुर्मिळ अशी आहे. या प्राचीन शिवपिंडीची रचना ही नंदीच्या पाठिवर बसलेली, अशी आहे. अखंड काळ्या पाषाणातील या पिंडीच्या समोरील बाजूस नंदीमुख आहे. चौकोनी शिवपिंडीवर पितळी पाच फण्यांचा नाग आहे. असे सांगितले जाते की अशी रचना असलेली सोलापूर जिल्ह्यातील ही एकमेव शिवपिंडी आहे. या मुख्य पिंडीशिवाय आणखी एक लहान पिंडी गर्भगृहात आहे.
मुखमंडपावर बाहेरील बाजूने विविध कामशिल्पे आहेत. मंदिराच्या मुखमंडप व गर्भगृहावर शिखरे आहेत. मुख्य शिखरावर अनेक लहान लहान शिखरे आहेत. शिखराच्या अग्रभागी तीन आमलक व त्यावर कळस आहे. मंदिराच्या प्रांगणात अनेक प्राचीन विरगळ आहेत. या मंदिरात दैनंदिन पूजा–आरती केली जाते. येथे दर सोमवारी, तसेच श्रावणी सोमवार, शिवरात्र, महाशिवरात्र, आषाढी एकादशी या दिवशी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. श्रावणी सोमवारनिमित्त येथे भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात येते.