आनंदमूर्ती स्वामी संस्थान

ब्रह्मनाळ, ता. तासगाव, जि. सांगली

गृहस्थाश्रम सोडताही साधना करता येते हे सप्रमाण सिद्ध करणारे आनंदमूर्ती हे समर्थ पंयाचतनातील सर्वात कमी वयाचे अधिकारी पुरुष मानले जातात. रामदास स्वामी चाफळकर, रंगनाथ स्वामी निगडीकर, जयराम स्वामी वडगावकर, केशवस्वामी भागानगरकर आणि आनंदमूर्ती ब्रम्हनाळकर अशी या पंचायतानातील अधिकारी पुरुषांची नावे होत. असे सांगितले जाते की आपल्या गुरूच्या समाधीपुढे जेव्हा आनंदमूर्ती किर्तनासाठी उभे राहत तेव्हा ती समाधी डोलत असे. या आनंदमूर्तीचा मठ आणि समाधी तासगाव तालुक्यातील ब्रम्हनाळ येथे आहे. येथे आल्यावर अध्यात्मिक अनुभुती मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

श्री आनंदचरीतामृत या ग्रंथानुसार, आनंदमूर्ती यांचे मूळ नाव होते अनंत बाळंभट ब्रम्हनाळकर. कोल्हापूर पासून ४० किलोमीटर अंतरावर नदीकाठी असलेले भडसगाव हे त्यांचे मूळ गाव. त्यांच्या पुर्वजांना अठरा गावचे जोशीपण मिळाल्याने ते आगळ या गावी स्थायिक झाले होते. याच ठिकाणी सोळाव्या शतकात बाळंभट ब्रम्हनाळकर यांच्या घरात अनंतभट यांचा जन्म झाला. वडील पट्टीचे वैदिक होते. लहानपणापासूनच अनंतभटांना सत्संग, भजनकीर्तनाची आवड होती. वयाच्या सतराव्या वर्षीच त्यांचे दशग्रंथ मुखोत्गत होते. सांख्य, योग या शास्त्रात ते प्रवीण झाले होते. उत्तम ज्योतिषीही होते. त्यामुळे नकळतच आपल्या विद्येचा त्यांना अभिमान वाटे.

मिरज तालुक्यातील ढालगावच्या अप्पाजीपंत देशपांडे यांचे पुरोहितपण त्यांच्याकडे होते. जोशीवृत्तीसाठी त्यांचे पूर्ण परिसरात भ्रमण सुरू असे. एकदा बाहेरगाहून परतल्यानंतर त्यांना अप्पाजीपंतांनी एका स्वामीकडून उपदेश घेतल्याचे कळले. त्यामुळे, संतापलेले अनंतभट, ‘आम्ही त्यांचे कुलगुरू असताना त्यांनी दुसरे गुरु केलेच कसे,’ असे म्हणत जाब विचारण्यासाठी देशपांडे यांच्या घरी गेले. त्यांनी ज्यांच्याकडून गुरु मंत्र घेतला होता ते रघुनाथ स्वामी तेथे होते. चिडलेल्या अनंतभटांची भेट रघुनाथ स्वामींबरोबर होताच जीवा शिवाची भेट व्हावी तसा प्रकार घडला. त्यांचा अभिमान गळून पडला आणि ते गुरुचरणी लीन झाले.

आपल्या सद्गुरूंनी आपल्यावर गुरुकृपा कशी केली याचे वर्णन श्री आनंदमूर्तींनी करून ठेवले आहे. त्यात ते म्हणतात

रंका दिव्य रूप करून ठेविले। आनंदमूर्ति केले आनंद रूप। 

स्वप्रकाशा चिदानंदा आनंदघना। सिद्ध स्वानंदघना।

आपल्या वैदिक मुलाने गुरुउपदेश घेतला ही गोष्ट आनंद भटजींच्या वडिलांना मात्र आवडली नाही. त्यांनी रागाने आपल्या मुलाला आणि आपल्या सुनेला घराबाहेर काढले. पत्नी आणि दोन महिन्यांच्या मुलासह अनंत भटजींनी घर सोडले. ते आपल्या गुरूंच्या घरी रघुनाथ स्वामींकडे गेले. सांगली पासून १२ किमी अंतरावर असणाऱ्या वसगडे या गावी जाऊन राहिले. स्वामींनी गावकऱ्यांच्या मदतीने त्यांचा सांभाळ केला. तेथे राहून अनंतभट संपूर्णपणे गुरु सेवेत मग्न झाले होते.

एकदा आपल्या शिष्याची परीक्षा पाहण्यासाठी रघुनाथ स्वामींनी वसगडे गाव सोडले. अचानक गायब झालेल्या आपल्या गुरूंचा शोध अनंतभटजींनी सतत तीन वर्षे घेतला. अखेर कर्नाटकातल्या संकेश्वर येथे त्यांची गाठ आपल्या गुरुबरोबर पडली. आपल्या शिष्याने आपल्याला शोधून काढल्याने स्वामी आनंदित झाले. शिष्याला पाहून झालेला आनंद त्यांनी आपल्या शिष्याचे नाव आनंदमूर्ती असे ठेवून व्यक्त केला. पुढे तेच नाव सर्वत्र प्रसिद्ध झाले. आपल्या कार्याने, मार्गदर्शनाने त्यांनी आपल्या शिष्यांना अध्यात्माचा आनंद दिला. अनेकांना त्यांनी आयुष्याचा मार्ग दाखवला. गृहस्थाश्रम सोडताही साधना करता येते, हे गुरुकृपेमुळे त्यांना कळले. त्यांनी अनेक प्रासादिक पद्यरचनाही केल्या आहेत. ब्रम्हनाळ येथे साधनेसाठी राहणाऱ्या आनंदमूर्तीचे १६६६ मध्ये महानिर्वाण झाले.

आनंदमुर्तींनी आयुष्यभर श्रीरामाची उपासना केली. जनसामान्यांना शहाणे करण्यासाठी यांनी महत्वाची भुमिका बजावली. या गुरुशिष्यामधील असीम प्रेमभावना मृत्युनंतरही कायम राहिली. आनंदमूर्तींच्या महानिर्वाणानंतर त्यांच्या गुरुच्या समाधीसमोरच त्यांचीही समाधी उभारण्यात आली. आताही या दोन्ही गुरु शिष्याच्या समाध्या विशेष कीर्तन प्रसंगी डोलतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

ब्रह्मनाळ गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी आनंदमूर्ती स्वामींचा मठ आहे. मंदिराभोवती असलेल्या आवारभिंतीतील प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात असलेल्या उद्यानात मोठमोठी चाफ्याची झाडे आहेत. चारपाखी पत्र्याचे छत असलेला या मठाच्या बांधणीत अधिकाधीक लाकडांचा वापर आहे. सभामंडप आणि प्रदक्षिणामार्ग सोडून अंतराळ गर्भगृह अशी या मठाची संरचना आहे. उंच जगतीवर असलेल्या या मठाच्या प्रवेशद्वारातून येथील सभामंडपात प्रवेश होतो. बंदिस्त असलेल्या या सभामंडपात लाकडी स्तंभ आहेत. या स्तंभांच्या वरील बाजूस असलेल्या सज्जासारख्या जागेवर अनेक देवदेवतांच्या प्रतिमा लावलेल्या आहेत. याशिवाय सभामंडपाच्या भिंतीवर आनंदमूर्ती त्यांचे गुरू रघुनाथस्वामी यांचे कार्य सांगणाऱ्या माहितीच्या अनेक प्रतिमा लावलेल्या आहेत. अंतराळ हे सभामंडपाहून काहीसे उंच आहे. प्रवेशद्वाराजवळ असलेले चार खांब महिरपी कमानीने एकमेकांशी जोडलेले आहेत. खांबांच्या वरील बाजूस वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकाम आहे. गर्भगृहात आनंदमूर्ती यांच्या पुजेतील अनेक देवांच्या मूर्ती आणि पादुका आहेत. येथे चैत्र शुद्ध प्रतिपदा ते दशमी रामनवमी उत्सव, भाद्रपद शुद्ध एकादशी ते चतुर्थी या काळात रघुनाथस्वामींची तर कार्तिक शुक्ल चतुर्दशीला आनंदमूर्तीची पुण्यतिथी साजरी केली जाते. याशिवाय महाशिवरात्रीलाही येथे मोठा उत्सव असतो.

मठापासून साधारणतः एक किमी अंतरावर कृष्णा नदीच्या तिरावर आनंदमूर्ती रघुनाथ स्वामी यांच्या समाध्या आहेत. आनंदमूर्ती यांच्या पत्नी आणि पुत्र यांच्याही समाध्या याच परिसरात आहेत. या परिसरात मोठमोठ्या ओवऱ्या आहेत. रामनवमीचा उत्सव येथे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दररोज सकाळी ते १२ सायंकाळी ते या वेळेत भाविकांना मठात येऊन दर्शन घेता येते. सायंकाळी .३० वाजता येथे आरती होते

उपयुक्त माहिती

  • तासगाव येथून २० किमी, तर सांगली येथून १९ किमी अंतरावर
  • तासगाव येथून ब्रह्मनाळसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मठाच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
Back To Home