महाकाली मंदिर

कवठे महांकाळ, जि. सांगली

देवी माहात्म्यातील पौराणिक आख्यायिकेनुसार, मूळ प्रकृती आदिमाया भगवती महालक्ष्मीने तमोगुण आणि सत्त्वगुणांपासून महाकाली आणि महासरस्वती ही दोन रूपे निर्माण केली त्यांना आपापल्या गुणांनी योग्य असा स्त्रीपुरुषांचा एकेक जोडा उत्पन्न करण्यास सांगितले. त्यातून पुढे विश्वाची सृष्टीची निर्मिती झाली. अशा प्रकारे महाकाली ही जशी संहारिणी आहे, तशीच ती विश्वजननी पोषिणीही आहे, असे मानले जाते. या देवीचे सांगली जिल्ह्यातील एक प्रसिद्ध स्थान म्हणजे कवठे महांकाळ येथील प्राचीन मंदिर होय.

कवठे महांकाळ हा तालुका दुष्काळी भाग समजला जातो. परंतु येथील ग्रामदेवी महाकालीमुळे तालुक्याची प्रगती होत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. या मंदिरातील गर्भगृहात देवीसोबतच महादेवाची पिंडीही आहे. त्यामुळे हे स्थान म्हणजे शिवशक्तीचा संगम आहे, अशी मान्यता आहे. येथे महाकालीला अंबाबाई असेही म्हटले जाते. या मंदिराची आख्यायिका अशी की येथील कमंडलू नदीतील अंबिका कुंडात धनगर समाजातील एक व्यक्ती स्नान करीत असताना त्यास महाकालीची मूर्ती सापडली. त्याला देवीची नियमित पूजाअर्चा करणे जमत नसल्याने त्याने ती मूर्ती गावच्या पाटलांकडे सोपवली. त्यानंतर गावाने मिळून नदीकाठी या मूर्तीची स्थापना केली. ब्रिटिशांनी प्रसिद्ध केलेल्यासांगली गॅझेटियरमध्येही महाकालीची मूर्ती येथील कुंडात सापडल्याचा उल्लेख आहे.

महाकालीची मूर्ती सापडल्याचा तो काळ .. १५५० ते १६०० च्या दरम्यानचा असल्याचे ग्रामस्थ सांगतात. अलीकडेच जीर्णोध्दारानंतर या मंदिरास आधुनिक स्वरूप प्राप्त झाले. गाव वाढत गेल्याने सध्या हे मंदिर गावाच्या मध्यवर्ती भागात आले आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारापुढे सुमारे २५ फूट उंचीची काळ्या पाषाणातील दीपमाळ आहे. मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारावरील लाकडी चौकटीत सिंह, व्याल पानाफुलांचे नक्षीकाम आहे. सभामंडप, अंतराळ गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. सभामंडप मोठा बंदिस्त आहे. डाव्या उजव्या बाजूने दर्शन रांगेची व्यवस्था केलेली आहे. अंतराळात एका अर्धगोलाकार चौथर्‍यावर कासव आहे

गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवर सोनेरी पत्रा असलेले उठावदार सूर्यमुख आहे. गर्भगृहाच्या लाकडी द्वारशाखांवर पानाफुलांचे नक्षीकाम आहे. गर्भगृहातील द्वारशाखेवर मात्र तीन, चार स्तर दिसतात. प्रथम संगमरवरी कमान, मग चांदीचा पत्रा असलेली नक्षीकाम केलेली चौकट, त्याच्या आत पुन्हा संगमरवरी मखर ज्यावर द्वारपाल पानाफुलांच्या नक्षी कोरलेल्या आहेत. आत चांदीच्या सिंहासनावर देवी विराजमान आहे. देवीची मूर्ती काळ्या पाषाणातील आहे. टपोरे डोळे, सरळ सुबक नाक, नाकात मोत्याची नथ, कपाळावर मळवट त्यावर ठसठशीत कुंकू, सोन्या, चांदीच्या दागिन्यांनी सजलेले असे या देवीचे रूप आहे. कवठे महांकाळची ही महाकाली कोल्हापूरची महालक्ष्मी तुळजापूरची तुळजाभवानी यांची बहिण असल्याचे मानले जाते. येथे गर्भगृहातच एका बाजूला महादेवाची मोठी पिंडी आहे. त्या समोर नंदी आहे. त्यामुळे हे शिवशक्तीचे स्थान असल्याचे सांगितले जाते. मंदिर परिसरात विठ्ठलरुक्मिणीचे मंदिर आहे. मंदिराची दोन शिखरे दिसतात. त्यावर विविध नक्षीकामाबरोबर विविध देवीदेवतांची कोष्ठके आहेत.

या मंदिरात नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. पहाटेच्या काकड आरतीपासून उत्सवाला सुरुवात होते. मग त्रिकाल आरती, कीर्तन, भजन, पोत खेळणे, धनगरी ओव्या, गोंधळी गीते अशा अनेक कार्यकामांचे आयोजन केले जाते. रात्री आरती झाल्यानंतर पालखी प्रदक्षिणा होते. दसर्‍याच्या दिवशी पालखी मंदिराबाहेर पडते. यावेळी सोने लुटण्यासाठी पालखी पळवत नेली जाते. गावात पालखी मार्गावर फुलांच्या पायघड्या घातल्या जातात. हा सोहळा पहाण्यासाठी अनेक भाविक येथे येतात. भोंगळे समाज, माळी, तेली, गोंधळी, चांभार, रामोशी अशा सर्वच जातीचे लोक एकत्र येत हा उत्सव साजरा करतात. यावेळी गावच्या पाटलांना देवीला वारा घालण्याचा, तर माळी समाजाकडे पालखी वाहण्याचा मान असतो. येथील संबळ वादकही पिढ्यान् पिढ्या येथे संबळ वादनाची सेवा देत आहेत. नवरात्रीच्या नऊ दिवसांत प्रत्येक समाजाला देवीची सेवा करण्याची संधी मिळते. जागृत आणि नवसाला पावणारी देवी म्हणून येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात.

उपयुक्त माहिती

  • कवठे महांकाळ बस स्थानकापासून किमी अंतरावर
  • मुंबई, पुणे, सांगली, कोल्हापूर येथील अनेक शहरांतून कवठे महांकाळसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home