भारतात अनेक प्रसिद्ध गुहा मंदिरे आहेत. यात डोंगरातील खडकात खोदलेल्या व कलात्मक शिल्पे असलेल्या मंदिरांचा समावेश होतो. यातील काही गुहामंदिरे योगी व संन्याश्यांची तपोभूमी म्हणूनही ओळखली जातात, तर काही गुहा या क्षेत्रपाल रक्षकदेवतांची मंदिरे म्हणून प्रसिद्ध आहेत. मिरज तालुक्यातील भोसे येथील डोंगरातील गुहेत असेच एक प्राचीन मंदिर आहे. भोसे गावच्या हद्दीमधील या मंदिरातील दंडोबा देव जागृत व नवसाला पावणारा असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. डोंगरातील भुयारातून कोरलेला प्रदक्षिणा मार्ग हे या मंदिराचे एक वैशिष्ट्य आहे.
या स्थानाबद्दल अशी आख्यायिका सांगण्यात येते की रामायण काळातील दंडकारण्यामध्ये सांगली जिल्ह्याचा हल्लीचा हा परिसर मोडत असे. येथील डोंगरातील गुहेमध्ये प्राचीन काळापासून शिवलिंग प्रतिष्ठापित होते. हा डोंगर दंडकारण्यात येत असल्याने त्यातील महादेवास दंडोबा वा दंडनाथ या नावाने ओळखले जाऊ लागले. श्रीराम, लक्ष्मण आणि सीता हे वनावासाचा काळ व्यतीत करीत असताना श्रीरामाने येथील गुहेत साधना केली होती. काही अभ्यासकांच्या मते दंडोबाचे येथील स्थान हे चौदाव्या शतकातील आहे. या काळात या प्रदेशात बहामनी सुलतानांची सत्ता होती. मंदिरात अखंड धुनी असल्याने हे स्थान नवनाथांच्या काळातील असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो. तसे असेल तर मंदिराचे प्राचीनत्व हे दहाव्या वा अकराव्या शतकापर्यंत मागे जाते.
दंडोबाचे हे मंदिर मिरज तालुक्यातील भोसे, सिद्धेवाडी, मालगाव, खांडेराजुरी व कवठे महांकाळ तालुक्यातील खरशिंग अशा पाच गावांच्या हद्दीत, साधारण ११०० हेक्टरहून अधिक पसरलेल्या डोंगरावर आहे. पायथ्यापासून सुमारे ५ ते ६ किलोमीटर अंतर चढून या मंदिराकडे येता येते. आता थेट मंदिरापर्यंत येण्यासाठी गाडीरस्ता बनविण्यात आलेला आहे. जांभ्या दगडाच्या या डोंगरावर या मंदिराच्या गुहेसह अजून अशा अनेक लहान मोठ्या गुहा आहेत. प्राचीन काळातील अनेक ऐतिहासिक अवशेष येथे काळाच्या ओघात पुसले गेल्याचे आढळते.
वनक्षेत्र हद्दीत असलेल्या या मंदिराच्या समोर एक लहान काळ्या पाषाणातील दीपमाळ आहे. समोर खुला सभामंडप आहे. गुहेतील या मंदिरात प्रवेश करताच अत्यंत गारवा जाणवतो. सभामंडपाच्या डाव्या बाजूला एका चौथर्यावर काळ्या पाषाणातील गणेश मूर्ती आहे. येथून बारा पायर्या उतरून गुहेतील मुख्य मंदिरात प्रवेश होतो. पायऱ्या जेथे संपतात तेथील एका चौथऱ्यावर काळ्या पाषाणातील काळभैरवाची मूर्ती आहे. त्याशेजारी कुबेराचीही मूर्ती व एक लहान पिंडी आहे. गर्भगृहाच्या समोरील बाजूस काळ्या पाषाणातील नंदी आहे. गर्भगृहाच्या बाहेर बालाजी रूपातील विष्णुचे कोष्टक आहे. तर दुसर्या बाजूला दुर्गा देवीची मूर्ती आहे. गर्भगृहाबाहेर अर्धनारी नटेश्वराची धातूची मूर्तीही आहे. गर्भगृहाला लाकडी नक्षी केलेले द्वार व द्वारशाखा आहेत. दोन पायर्या खाली उतरून गर्भगृहात प्रवेश होतो. येथे काळ्या पाषाणातील दंडनाथाची शिवपिंडी आहे. चतुरस्र ब्रह्म भागावर अष्टकोनी विष्णूभाग, त्यावर शक्तीयोनी व वर शिवभाग लिंग अशी रचना असलेली ही शिवपिंडी तीन फूट उंच आहे. पिंडीच्या वर अभिषेक पात्र आहे. बाजूला पितळी त्रिशूल, डमरू व पंचफणी नाग आहे.
गर्भगृहाच्या बाहेरून गुहेतच आत प्रदक्षिणा मार्ग कोरलेला आहे. हा मार्ग मंद दिव्यांच्या प्रकाशात अंधुकसा दिसतो. मंदिराच्या बाजूला काही लहान गुहा आहेत. एका गुहेच्या आत आणखी काही गुहा आहेत. त्या दहा ते बारा फूट खोल असल्याचे स्थानिक सांगतात. येथे आत सरपटत जावे लागते. या गुहांमध्ये शिवपिंडी आहेत.
मुख्य मंदिराच्या सभामंडपाकडे जाण्याआधी केदारलिंग मंदिराकडे जाणारा मार्ग व पायऱ्या दिसतात. या मार्गाने वर गेल्यावर पाचमजली मनोऱ्यासारख्या भासणाऱ्या शिखराचे दर्शन होते. हे शिखर सुमारे चारशे वर्षापूर्वीचे आहे. या डोंगरावर किल्ला नसल्याने या शिखराचे निर्माण नक्की कोणत्या उद्देशाने वा कारणाने झाले याविषयीच्या नोंदी आढळत नाहीत. या पाच मजली शिखरातील पहिले तीन मजले पिरॅमिडसारखी रचना असलेले चौकोनाकार आहेत. त्यावरील दोन मजले षट्कोनी आहेत. या शिखरावर चढण्यासाठी जागा आहे. शिखराच्या टोकावर भगवा ध्वज फडकत असतो. येथपर्यंत चढता येते. येथे चार–पाच माणसे एकावेळी उभी राहू शकतील एवढी जागा आहे. या शिखरावरून खूप दूरवरचे विहंगम दृश्य दिसते. असे सांगितले जाते की कलशावर जेथे आता ध्वज लावलेला आहे, तेथे आधी एक छिद्र होते. त्यातून नाणी टाकली असता ती थेट गुहेतील मंदिराच्या पिंडीवर पडत असत. आता हे छिद्र बुजवून त्यावर ध्वज लावलेला आहे. येथून काही अंतरावर केदारलिंग महादेवाचे मंदिर आहे.
मंदिरात महाशिवरात्र व श्रावणातील तिसरा सोमवार हे मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. या वेळी देवास लघुरुद्र व महाअभिषेक घालून दिवसाची सुरुवात होते. दिवसभरात मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन, जागरण, संगीत व महाप्रसादाचे आयोजन केले जाते. यावेळी परिसरातील हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. श्रावणातील प्रत्येक सोमवारी मंदिरात महाप्रसादाचे आयोजन केले जाते. दर सोमवार, रविवार, पौर्णिमा व अमावस्या या दिवशी भाविकांची संख्या मोठी असते. वनविभागाच्या अखत्यारीत असलेल्या व निसर्गसौंदर्याने नटलेल्या या मंदिर परिसरात भाविकांसोबतच वन्यजीव अभ्यासक, निसर्गप्रेमी व पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात.