दानम्मा देवी मंदिर

गुड्डापूर, ता. जत, जि. सांगली

अनेक चमत्कारांतून आपले देवत्व सिद्ध केलेल्या मानवता धर्माचा दीपस्तंभ म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते, त्या दानम्मा देवी यांचा लौकिक वरदायिनी असा आहे. महाराष्ट्राच्या भूमीत बाराव्या शतकामध्ये जन्मास आलेल्या दानम्मा या लिंगायत धर्मात महान शरणी म्हणून ओळखल्या जातात. त्यांना पार्वतीचा अवतारही मानले जाते. समाजातील अनिष्ट चालीरिती, रूढीपरंपरा यांच्याविरोधात बंड करणाऱ्या दानम्मा देवी यांची अनेक मंदिरे देशभरात आहेत. महाराष्ट्रातील गुड्डापूर या गावात दानम्मांचे समाधी स्थान आहे. त्यामुळे येथील मंदिराला श्रद्धापीठाचा दर्जा प्राप्त झालेला आहे.

दानम्मा देवींची कथा अशी की बाराव्या शतकात जत तालुक्यातील उमराणी या गावात त्यांचा जन्म झाला. त्या महात्मा बसवेश्वर यांच्या समकालीन होत्या. त्यांचे मूळ नाव लिंगम्मा. त्यांचा विवाह शुंग गावातील संगमनाथ नावाच्या शिवभक्ताशी झाला. पुढे दोघेही गुड्डापूरला आले. येथे दानधर्म करीत, लोकांना नीतिमान आयुष्याचे धडे देत त्यांचा जीवननिर्वाह सुरू होता. लिंगम्मा नेहमी अन्नदान दानधर्म करीत असल्याने पुढे महात्मा बसवेश्वरांनी तिचे दानम्मा असे नामकरण केले. याच नावाने त्या ओळखल्या जातात. सोलापूरचे सिद्धयोगी सिद्धरामेश्वर यांच्याकडून दानम्मा यांनी शिवदीक्षा घेतली होती. पुढे बसवेश्वरांच्याअनुभवमंटपा सहभागी होऊन त्यांनी नित्य इष्टलिंग साधना केली. असे सांगण्यात येते की विलक्षण एकाग्रतेने साधना कशी करावी याचा उत्तम आदर्श म्हणून बसवेश्वरांनी अनुभवमंटपात दानम्मांचा दाखला दिला होता.

अनुभवमंटप हे लिंगायत धर्मातील एखाद्या प्राचीन विद्यापीठासारखे, लोकशाहीवादी चर्चेचे ठिकाण होते. त्यात सहभागी होणारेशरणआपले अनुभवकथन, वैचारिक आदानप्रदान करीत असत. इतर जण ते आपापल्या अनुभवांशी आणि विचारांशी ताडून पाहात असत. त्यातून ते सत्यापर्यंत पोचत असत. ते सत्य शब्दांत उतरल्यावर वचनसाहित्य बने. बसवेश्वरांच्या काळात अशा अनुभवमंटपांची संख्या तीनशे ते साडेतीनशे होती त्यांत जातीभेद, लिंगभेद यांना थारा नव्हता. बसवेश्वर हे कलचुरी घराण्याचा राजा बिज्जल याचे प्रधानमंत्री कोषाध्यक्ष होते. या बिज्जलाने बंड पुकारून कल्याणच्या चालुक्यांचे राज्य ताब्यात घेतले होते. त्याच्या दरबारातील काही वैदिक धर्मानुयायी मंत्र्यांनी बसवेश्वरांविरोधात आघाडी उघडली. असे सांगण्यात येते की त्यांची हत्या घडवून आणण्यात आली. त्यानंतर त्यांनी स्थापन केलेल्या लिंगायत धर्माविरोधात युद्ध पुकारण्यात आले. त्यात अनेक लिंगायत धर्मीयांची हत्या करण्यात आली, तसेच त्यांचे वचनसाहित्य नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कल्याण प्रतिक्रांती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रकरणात दानम्मा यांचे शौर्य प्रकट झाले. त्यांनी सम्राटाच्या सेनेविरोधात आपल्या पतीसमवेत निकराची झुंज दिली शरणीसेनेचे नेतृत्त्व केले. यानंतर त्यांनी भारतभर संचार करून बसवतत्त्वांचा प्रसार केला. त्यांच्या साधनेमुळे त्यांच्याभोवती चमत्कारकथांचे वलय निर्माण झाले.

सांगली जिल्ह्यातील वाडपुरी येथे यादव सम्राट सेऊणदेव यादव महादेवराय यादव यांनी वरदानी दानम्माचे देऊळ बांधून त्यास एक गाव इनाम दिल्याची शिलालेखीय नोंद आहे. गुड्डुपूर येथे त्यांचेलिंगैक्य’ (निर्वाण) झाल्यानंतर बाराव्या शतकात येथे त्यांचे मोठे मंदिर उभारण्यात आले. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे पहाटे कन्यारूपात, दुपारी युवतीरूपात संध्याकाळी वृद्धरूपात देवीची पूजा बांधली जाते. गुड्डापूरच्या वेशीवर मंदिराची पहिली स्वागत कमान आहे. रस्त्याच्या दुतर्फा चौथरे त्यावरील प्रत्येकी दोन स्तंभांवर तुळई, असे स्वागत कमानीचे स्वरूप आहे. या कमानीपासून दीड किलोमीटर अंतरावर मंदिर आहे. मंदिरास लाल दगडात बांधलेली भक्कम तटबंदी मोठे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस सुमारे सहा फूट रुंदीचे भक्कम नक्षीदार स्तंभ त्यावरील सज्जावर पाच मजली गोपूर आहे. गोपुरात प्रत्येक मजल्यावर मध्यभागी गवाक्ष दोन्ही बाजूस विविध देवतांच्या मूर्ती आहेत. शीर्षभागी शिखर कळस आहेत. प्रवेशद्वारास दोन्ही बाजूस नक्षीदार लाकडी झडपा आहेत. झडपांना चमकदार पितळी धातूची फुले लावलेली आहेत. प्रवेशद्वारातून आत प्रांगणात प्रवेश केल्यावर तटबंदीला लागून दुमजली इमारती आहेत

मंदिरासमोर प्राचिन दीपमाळा आहेत. दर्शनमंडप, सभामंडप, अंतराळ गर्भगृहे अशी मंदिराची संरचना आहे. दर्शनमंडपावर असलेली भली मोठी नंदीची मूर्ती लक्ष वेधून घेते. पुढे भुमिज स्थापत्यशैलीतील दगडी बांधकाम असलेल्या मंदिराच्या प्राचीन सभामंडपाचे प्रवेशद्वार आहे. सभामंडपाच्या द्वारशाखांवर खाली द्वारपाल वर भौमितिक आकृत्या कोरलेल्या आहेत. येथील ललाटबिंबावर शिवपिंडी आहे. प्रवेशद्वारास रजत अच्छादान आहे. सभामंडपात प्रत्येकी तीन चौकोनी स्तंभांच्या चार रांगा आहेत. मधल्या चार स्तंभांमधील जमीन काही इंच उंच आहे येथील चौथऱ्यावर नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे

सभामंडपात उजव्या बाजूला पहिले अंतराळ आहे. त्यापुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. येथील द्वारशाखांवर पानफुलांच्या नक्षी, ललाटबिंबावर शिवपिंडी मंडारकावर कीर्तिमुख आहेत. गर्भगृहात जमिनीवर मल्लिकार्जुन शिवलिंग आहे. पुढे दुसरे अंतराळ त्यापुढे गर्भगृहाचे नक्षीदार प्रवेशव्दार आहे. गर्भगृहात वज्रपिठावर दानम्मा देवींचे पती संगमनाथ यांचा चांदीचा मुखवटा आहे. यापुढे तिसरे अंतराळ गर्भगृह आहे. त्यातील वज्रपिठावर वीरभद्र मूर्ती आहे. चौथ्या गर्भगृहात महात्मा बसवेश्वरांच्या पादुका शिवलिंग आहे. पुढे पालखी कक्षात देवींची उत्सवकाळात वापरली जाणारी पालखी ठेवलेली आहे. मंदिरात प्रत्येक सोमवारी सर्व उत्सवांच्या वेळी पालखी सोहळा पार पडतो.

मंदिराच्या अंतराळात प्रत्येकी चार नक्षीदार स्तंभांच्या चार रांगा आहेत. येथील स्तंभपाद स्तंभावरील कणी चौकोनी आहे. हे स्तंभ चौकोनी, षट्कोनी, अष्टकोनी, वर्तुळाकार अशा विविध भौमितिक आकारात घडवलेले आहेत. कणीवर हस्त त्यावरील तुळईवर छत आहे. पुढे मुख्य गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. गर्भगृहाच्या तिन्ही द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी, ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती शिवपिंडी आहे. प्रवेशद्वारास रजत अच्छादन आहे. मंडारकावर देवीची उत्सवमूर्ती आहे. येथून भाविकांना दानम्मा देवींचे दर्शन घ्यावे लागते. गर्भगृहात वज्रपीठावर दानम्मा देवींची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. देवीस उंची वस्त्रे, अलंकार हारफुलांनी सजवलेले असते. मूर्तीच्या मागील प्रभावळीवर मध्यभागी शिवपार्वती दोन्ही बाजूस मयूर पानाफुलांच्या नक्षी आहेत.

मंदिराच्या छतावर दर्शन मंडपावर एक गर्भगृहावर तीन अशी एकूण चार शिखरे आहेत. दर्शन मंडपाकडील शिखर सहा थरांचे आहे. त्यातील प्रत्येक थरात बारा देवकोष्टके आहेत. शीर्षभागी आमलक त्यावर कळस आहे. गर्भगृहावरील शिखरे पाच थरांची आहेत. प्रांगणात मंदिराचे छोटेखानी स्वयंपाकघर आहे. येथे देवींच्या दैनंदिन नैवेद्यासाठी पुरणपोळ्या केल्या जातात. बाजूच्या कक्षात शिधा साठवण केंद्र आहे. येथे भाविकांच्या प्रसादासाठी लाडू बनवण्यात येतात त्यापुढील कक्षात प्रसाद विक्री केंद्र आहे. प्रांगणात मोठे स्वयंपाकघर आहे. येथे रोज चालणाऱ्या अन्नछत्रासाठी शेकडो किलो महाप्रसाद तयार केला जातो. मंदिराच्या प्रांगणात भक्त निवासाच्या आठ इमारती आहेत. त्यांत सर्व सोयींनी युक्त सुमारे २२५ खोल्या आहेत. प्रांगणातील कक्षात मंदिर ट्रस्टचे कार्यालय आहे.

महाशिवरात्र, श्रावणी सोमवार, श्रावण अमावस्या कार्तिक अमावास्या हे देवींच्या उत्सवाचे मुख्य दिवस येथे मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. यावेळी मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन, संगीत आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. देवींची पालखी मिरवणूक काढली जाते. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यातून हजारो भाविक देवींच्या दर्शनासाठी नवस फेडण्यासाठी येतात. गुरुवारी रविवारी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची विशेष गर्दी असते.

मंदिरापासून सुमारे सात किलोमीटर अंतरावर संगतीर्थ देवस्थान आहे. असे सांगितले जाते की येथे दानम्मा देवींचा विवाह सोहळा संपन्न झाला होता. येथील मंदिरात नैसर्गिक पाण्याचा अखंड स्रोत आहे

उपयुक्त माहिती

  • जत शहरापासून २३ किमी, तर सांगलीपासून १११ किमी अंतरावर
  • जत येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. 9405511401, 8275255109
  • वेबसाईट : http://www.shridanammadevi.org/contact.html
Back To Home