खरसुंडी, ता. आटपाडी, जि. सांगली
नाथ संप्रदायाच्या उदयानंतर अनेक देवतांच्या नावापुढे नाथ शब्द जोडला जाऊ लागला. नाथ संप्रदायाचा प्रसार व प्रचार वाढला तसे ८४ सिद्धनाथ सामान्य माणसांच्या देव्हाऱ्यात आणि देवळांत पुजले जाऊ लागले. नाथ संप्रदाय मुळात शैव पूजक असल्याने सिद्धनाथ हा शिवशंकराचा अवतार मानून त्याला शिवस्वरूपात पुजले जाऊ लागले. या पंक्तीतील एक सिद्धनाथाचे प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिर आटपाडी तालुक्यातील खरसुंडी गावात आहे. देव सिद्धनाथ अत्यंत जागृत व भक्तांच्या हाकेला धावून येणारा आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
हेमाडपंती स्थापत्यशैलीतील बांधकाम असलेले हे मंदिर सुमारे हजार वर्षे पुरातन असल्याचे सांगितले जाते. पौराणिक कथांनुसार, उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील सोनारी येथे या देवाचे प्रमुख स्थान आहे. माणदेशातील भोजा नामक धनगराच्या भक्तीवर प्रसन्न होऊन हा सिद्धनाथ देव दहाव्या शतकात म्हसवड येथे आला व तेथून तो कालांतराने खरसुंडी येथे प्रकट झाला. याबाबत आख्यायिका अशी की खरसुंडी जवळच असलेल्या चिंचोली या गावात नायाप्पा (नायबा) गवळी हा सिद्धनाथाचा भक्त राहात होता. तो नेमाने दर शनिवारी म्हसवडला जाऊन सिद्धनाथाची दह्यादुधाने पूजा करायचा. त्याची कपिला नावाची ‘कुंवार’ गाय होती. नायाप्पा सिद्धनाथला निघाला की ती हंबरडा फोडत असे व तो येईपर्यंत त्याची वाट पाहात असे.
पुढे वृद्धापकाळामुळे नायाप्पाला म्हसवडला जाणे कठीण झाले. मात्र त्याचे मन सिद्धनाथाच्या चरणीच होते. त्यातून एके रात्री सिद्धनाथाने नायाप्पाला स्वप्नदृष्टांत दिला व सांगितले की ‘आता तुला म्हसवडला येण्याचे कारण नाही. मी स्वतःच तुझ्याकडे येईन. तू जनावरे चारतोस त्या कुरणात जेथे तुझ्या लाडक्या गाईच्या कासेतून दुधाच्या धारा पडतील, तेथे मी प्रकट होईन.’ या दृष्टांतानुसार एके दिवशी अचानक नायप्पाची कपिला ही कुंवार म्हणजे कधीच न व्यालेली गाय एका जागेवर पान्हा सोडू लागली. तिच्या आचळातून दुधाऐवजी खरवसाच्या धारा वाहात होत्या. त्या खरवसाचे थरावर थर साचून त्यास दोन पिंडींचा आकार प्राप्त झाला. ही घटना त्याने गावकऱ्यांना सांगितली. तेव्हा गावकऱ्यांनी या घटनेची शहानिशा केली. त्यांची खात्री पटल्यानंतर, जेथे त्या शिवपिंडी तयार झाल्या. तेथे सर्वांनी मिळून मंदिर बांधण्याचा संकल्प केला. तेच हे सिद्धनाथाचे मंदिर. या ठिकाणास तेव्हापासून खरवस पिंडी म्हणून ओळखले जाऊ लागले. त्याचाच अपभ्रंश होऊन खरसुंडी असे नाव त्या गावास पडले.
सिद्धनाथ मंदिरास दुहेरी तटबंदी आहे. पहिल्या तटबंदीत दुमजली प्रवेशद्वार आहे. हे संपूर्ण प्रवेशद्वार नक्षीकामाने सुशोभित आहे. मंदिराच्या तटबंदीत उजव्या बाजूस आणखी एक प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारालगत आत उजव्या बाजूला एक व डाव्या बाजूला तीन चौथरे आहेत. त्यांवर पाच थरांच्या नक्षीदार दगडी दीपमाळा आहेत. दीपमाळा पायाकडे चौकोनी आहेत. पहिल्या थरात गजाशिल्पे व दीपकोष्टके आहेत. दुसरा थर षटकोनी, तर त्यावरील थर गोलाकार आहेत. चौथऱ्याच्या बाजूला काही गजराज शिल्पे व तुलसी वृंदावन आहे. प्रवेशद्वाराजवळील कक्षात नगारा आहे. पुढे पेव्हर ब्लॉकची फरसबंदी असलेल्या प्रांगणात मध्यभागी चौथऱ्यावर मारूतीचे मंदिर आहे.
पुढे मंदिराची दुसरी तटबंदी आहे. त्यात नगारखाना असलेले दुमजली प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूस दंडधारी द्वारपाल व ललाटबिंबस्थानी गणपतीची मूर्ती आहे. प्रवेशद्वाराच्या आतील दोन्ही बाजूंस पहारेकरी कक्ष आहेत. प्रवेशद्वाराच्या दुसऱ्या मजल्यावर महिरपी कमानीने जोडलेले बारा नक्षीदार स्तंभ व त्यावर छत आहे. डाव्या बाजूस असलेल्या कक्षात सिद्धनाथांचे भक्त नायाप्पा गवळी यांच्या ‘त्या’ कपिला गायीची मूर्ती आहे.
येथून पुढे मंदिराचा नव्याने बांधलेला दुमजली व बंदिस्त स्वरूपाचा सभामंडप आहे. त्याच्या प्रवेशद्वारास चांदीची नक्षीदार महिरपी कमान आहे. सभामंडपातील सहा लाकडी स्तंभांवर वरच्या मजल्याचा सज्जा आहे. सज्जाला सुरक्षा कठडा आहे. पुढे दगडी बांधकाम असलेल्या प्राचीन मंदिराच्या मूळ सभामंडपाचे प्रवेशद्वार आहे. या सभामंडपाची दर्शनी भिंत व प्रवेशद्वार रजतपटलाने आच्छादित आहे. द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी व ललाटबिंबावर गणेशमूर्ती आहे. ललाटबिंबाच्या वरील बाजूस तोरणात पाच शिखरांची नक्षी आहे.
सभामंडपात प्रत्येकी पाच नक्षीदार स्तंभांच्या चार रांगा आहेत. बाह्य बाजूच्या रांगेतील नक्षीदार कोरीव स्तंभ भिंतीत आहेत. येथील स्तंभही रजतपटलाने आच्छादित आहेत. स्तंभांच्या शीर्षभागी कणी व हस्त आहेत. हस्तांवर तुळया व तुळयांवर छत आहे. छताला पितळी घंटा टांगलेली आहे. सभामंडपातील जमीन फरशी आच्छादित आहे व त्यात मध्यभागी एका चौथऱ्यावर नंदीची मूर्ती आहे. मंदिराच्या गर्भगृहाचे नक्षीदार प्रवेशद्वारही रजतपटलाने आच्छादित आहे. या प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी व वरील दोन्ही बाजूंस गजशिल्पे आहेत. ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. गर्भगृहात वज्रपिठावर चांदीच्या मखरात सिद्धनाथ व योगेश्वरी देवी यांच्या स्वयंभू पाषाणमूर्ती व त्या समोर शिवपिंडी आहे. मखर नक्षीकामाने सुशोभित आहे. त्याच्या दर्शनी भागात दोन्ही बाजूंस सूरसुंदरी आहेत. सोमवार ते शनिवार या मूर्तींस वेगवेगळा शृंगार व आरास केली जाते. मूर्तींच्या मागे चांदीच्या प्रभावळीत मध्यभागी कीर्तिमुख आहे. सिद्धनाथांच्या डोक्यावर छत्र धरलेला पांचफणी नाग आहे.
मंदिराच्या छतावर चहुबाजूंनी कठडा आहे. गर्भगृहाच्या छतावर समोरील बाजूस लहान घुमटाकार शिखर व त्याच्या मागे उंच चौकोनी शिखर आहे. शिखराच्या चारही बाजूंमध्ये देवकोष्टके व त्यात विविध देवतांच्या मूर्ती आहेत. देवकोष्टकाच्या वरील बाजूस चढत्या अंतराने तीन आमलक व त्यावर कळस आहेत. मूळ दगडी बांधकाम असलेल्या शिखरावर संगमरवरी फरशीचे आच्छादन केलेले आहे. निमुळत्या होत गेलेल्या शिखरात पायऱ्यांसारखी रचना आहे. शीर्षभागी कमळ फुलांची नक्षी असलेले आमलक, त्यावर कळस व ध्वजपताका आहे. शिखरावरील हा सोन्याचा कळस नेलकरंजी येथील भक्तांनी अर्पण केलेला आहे. करवीर पीठाच्या शंकराचार्यांच्या हस्ते १९७९मध्ये या कलशाची स्थापना करण्यात आली.
मंदिराच्या बाह्य बाजूस भिंतींवर काही प्राणी व मानवी आकृत्या कोरलेल्या आहेत. गोमुखाच्या बाजूला असलेल्या दोन चौकोनी स्तंभांवर अष्टभैरव शिल्प आहेत. मंदिराच्या प्रांगणात एका कक्षात गणेशमूर्ती संग्रहालय आहे. त्यात लहान आकारातील विविध गणेशमूर्ती आहेत. पुढे सिद्धनाथाची पत्नी मलाई देवी व पुत्र आग्नेय यांचे मंदिर आहे. बाजूला लक्ष्मी–नारायण, यमाई देवी, राधा–कृष्ण, छोटा मारुती, दुर्गादेवी, सती माता, दत्त आदी मंदिरे व काही समाध्या आहेत. प्रांगणातील नवग्रह मंदिरात मध्यभागी असलेल्या चौथऱ्यावर नवग्रहांच्या मूर्ती आहेत. येथे नवग्रह जननशांती आदी विधी केले जातात. या मंदिराच्या खाली तळघर आहे. या परिसरात जीर्ण अवस्थेतील काही पाषाण मूर्तीं आहेत.
मंदिरात चैत्र पाडवा, रामनवमी, अक्षयतृतीया, दसरा, नवरात्र आदी उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. चैत्र पाडव्यास मंदिरात पंचांगाचे वाचन व वर्षभरातील हवामान व पीक पाण्याची ‘भाकणूक’ म्हणजे ज्योतिष कथन केले जाते. चैत्र शुद्ध नवमी, अर्थात रामनवमीस, देवाला हळद व तेल लावले जाते. चैत्र वद्य अष्टमीस सिद्धनाथ व योगेश्वरी यांच्या विवाह सोहळ्यास प्रारंभ होतो. चैत्र वद्य द्वादशी या दिवशी विवाह सोहळा संपन्न होऊन मंदिरातील लोखंडी सासनकाठ्यांसह देवाची वरात म्हणून मिरवणूक काढली जाते. यावेळी देवाची पालखी परिसरातील सर्व गावांना प्रदक्षिणा घातली जाते. कार्तिक वैद्य प्रतिपदा ते नवमी या काळात येथे सिद्धनाथ जन्मकाळ साजरा केला जातो. येथील सर्व वार्षिक उत्सवांच्या वेळी हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी येतात. मंदिरात रोज दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्याही मोठी असते. या मंदिराच्या छतावर चढून नवस बोलल्यास ती इच्छा पूर्ण होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.