घंटाळी मंदिर

ठाणे शहर, जि. ठाणे

कोळी आणि पाठारे प्रभूंची कुलदेवता असलेल्या घंटाळी देवीचे मंदिर हे ठाण्यातील प्राचीन मंदिरांपैकी एक मानले जाते. ब्रिटिश सत्ताकाळात, सुमारे सव्वाशे ते दीडशे वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले हे मंदिर नौपाडा, विष्णू नगर जवळील घंटाळी पथावर स्थित आहे. घंटा आणि टाळी या शब्दांच्या समुच्चयातून या स्वयंभू देवीचे नाव साकारलेले आहे. कोणत्याही देवळात या दोहोंचा संगम असतोच, परंतु या देवीचे हे नादमय नाव येथे घंटा बांधण्याचा नवस करण्यात येत असल्यामुळे पडल्याचे सांगण्यात येते.

घंटाळी देवीच्या मंदिरामुळेच त्या समोरच्या रस्त्याला घंटाळी पथ असे नाव पडले आहे. आज शहराच्या मुख्य भागात आलेले हे मंदिर पूर्वी मुख्य वस्तीपासून दूरवर होते. मंदिराच्या अवतीभवती दाट वृक्षराजी होती. सुमारे साठ वर्षापूर्वीही मंदिराकडे येण्यासाठी मातीचे कच्चे रस्ते होते. त्या रस्त्यांच्या बाजुला अनेक वाड्या, भातशेती होती. त्यामुळे पावसाळ्यात या रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य असे. तेव्हा चिखलाने भरलेल्या रस्त्यामध्ये टाकलेल्या दगडांवर पाऊल ठेवत लोक घंटाळी देवीच्या दर्शनास येत असत. बकुळीच्या आणि आब्यांच्या वृक्षराईत, त्यांच्या दाट छायेत फिरण्यासाठी पूर्वी येथे नागरिक येत असत. टेंभीनाका परिसरातील नागरिकांचे हे सकाळसंध्याकाळ फिरण्याचे ठिकाण होते. या भागात पूर्वीपासूनच मध्यमवर्गीय मराठी लोकांची वस्ती होती

मंदिराबाबत आख्यायिका अशी की या भागात पूर्वी मोठ्या वृक्षराजीत लपलेले एक तळे होते. त्या तळ्याच्या काठी शंकराचे मंदिर होते. मंदिरात नियमित येणाऱ्या एका भक्ताला या तळ्याच्या काठी असलेल्या एका आम्रवृक्षामागे देवीची स्वयंभू मूर्ती असल्याचा साक्षात्कार झाला. ती मूर्ती सापडल्यानंतर त्या देवीची विधिवत पूजा करून तिची स्थापना करण्यात आली. ठाण्यातील जोशीबेडेकर महाविद्यालयाच्या इतिहास विभागातील सहायक प्रोफेसर डॉ. इंद्राणी रॉय यांच्याएक्स्प्लोरिंग ठाणे : हेरिटेज टूरिस्ट डेस्टिनेशन’ (इंटरनॅशनल जर्नल ऑफ इनोव्हेटिव्ह सायन्स अँड रिसर्च टेक्नॉलॉजी, जुलै २०१९) या लेखातही, हे मूलतः शंकराचे देऊळ होते, असे म्हटले आहे. या लेखानुसार, या मंदिराच्या उभारणीची नेमकी माहिती उपलब्ध नाही. सुमारे १२० ते १५० वर्षांपूर्वी ते अस्तित्वात आल्याचे सांगण्यात येते. हा काळ सुमारे १८७५नंतरचा आहे. त्यावेळी ठाण्यात ब्रिटिशांची सत्ता होती. १८८२ च्यागॅझेटियर ऑफ बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या १४व्या खंडात या मंदिराचा उल्लेख आहे. हे मंदिरबॉम्बे रोडवर होते त्यास ब्रिटिश सरकारकडून आठ शिलिंग म्हणजे तेव्हाचे चार रूपये वर्षासन मिळत होते, अशीही नोंद या गॅझेटियरमध्ये आहे. डॉ. इंद्राणी रॉय यांच्या लेखात असे म्हटले आहे की रावसाहेब केशवराज भास्करजी कोठारे यांच्या पूर्वजांनी हे मंदिर बांधले.

येथील जुने मंदिर लाकडी बांधणीचे होते. त्यात भगवान शंकर आणि घंटाळी देवी यांची दोन स्वतंत्र गर्भगृहे होती. .. १९०१मध्ये या दोन गर्भगृहांदरम्यान नवे गर्भगृह उभारून त्यात श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. .. १९४० आणि १९७२ मध्ये या जुन्या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याची नोंद आहे. पुढे २०१३ मध्ये केशवराव भास्करजी कोठारे यांच्या वंशजांनी हे मंदिर हिंदू जागृती न्यासाकडे सूपूर्द केले. त्यावर्षी धनत्रयोदशीच्या दिवशी मंदिराच्या वास्तूचे खरेदीखत बक्षिसपत्र हिंदू जागृती न्यासाच्या हवाली करण्यात आले. आता न्यासातर्फे मंदिराचा कारभार पाहिला जातो.

रहदारीने कायम वाहत्या असलेल्या रस्त्याशेजारी आलेले हे मंदिर नव्या जुन्या वास्तुरचनेचे संगम बनले आहे. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी नजरेत भरतात त्या मंदिर प्रांगणात असलेल्या दोन दीपमाळा आणि एक मोठा वृक्ष. कैलासपती नाव असलेला हा वृक्ष दुर्मिळ श्रेणीत मोडतो. या वृक्षाची रचना शंकराच्या जटांची आठवण करून देते. याची सुवासिक फुलेही शंकराच्या पिंडीसारखी असतात. मंदिराच्या प्रांगणात पत्र्याचे छप्पर घालण्यात आल्याने त्याचे रूपांतर दर्शनमंडपात झाले आहे. या मंडपाच्या प्रवेशद्वारावर मोठी घंटा आहे. त्यावरनवस फेडण्या घंटा बांधिती, म्हणूनी नाम असे घंटाळीअसा कोरीव लेख आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वारानजीक सिंहाची दोन मोठी आणि दोन लहान अशी चार शिल्पे आहेत. मंदिराला तीन गाभारे असल्यामुळे मंदिरात प्रवेश करण्यासाठीही एकमेकांशेजारी तीन दरवाजे आहेत. तिन्ही दरवाजे सारखेच आहेत. त्यातील मध्यभागी असलेल्या दरवाजाच्या वरील भिंतीत गणपतीची मूर्ती आहे. इतर दोन दरवाजांच्या वर श्रीकार आणि ओमकार आहे. आत मोठा उंच सभामंडप आहे. येथे दोन्ही बाजूंना लाकडी पायऱ्या आहेत.

सभामंडपाच्य समोर ओळीने तीन गर्भगृहे आहेत. डावीकडून पहिल्या गर्भगृहात शिवपिंडी आहे. शिवलिंगामागे पार्वतीमातेची मूर्ती आहे. या गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर जुन्या पद्धतीची नक्षी आणि कीर्तीमुख आहे. मधल्या राम मंदिराच्या गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या डावीकडील देवळीत गणेशाची तर उजवीकडील देवळीत पंचमुखी हनुमानाची मूर्ती आहे. आत श्रीरामलक्ष्मणसीतेच्या प्रसन्न मूर्ती आहेत. तिसऱ्या गर्भगृहात घंटाळीदेवी, महिषासूरमर्दिनी आणि दुर्गादेवीच्या वस्त्रलंकारित मूर्ती आहेत. येथील शंकर आणि देवीच्या गर्भगृहाचे काम पूर्णपणे दगडी आहे. गर्भगृहांना लागूनच एक खोली आहे, तेथे मंदिराच्या पुजाऱ्यांची राहण्याची व्यवस्था आहे.

मंदिरात दुपारचा ते पर्यंतचा काळ वगळता सकाळी ते रात्री या काळात भाविक दर्शन घेऊ शकतात. नवरात्रात मात्र या वेळेत बदल करण्यात येतो. मंदिरात रोज सायंकाळी .३० वाजता आरती होते. नवरात्रोत्सवादरम्यान रात्री .३० वाजता आरती होते. या परिसरात अनेक गुजराती भाषिक राहत असल्याने येथे गुजराती भाषेतही आरती केली जाते. येथे रामनवमी, हनुमान जयंती, नवरात्र, त्रिपुरारी पौर्णिमा आदी उत्सव होतात. माघी पौर्णिमेला देवीचा वाढदिवस साजरा करण्यात येतो. येथील नवरात्रोत्सव प्रसिद्ध आहे. या उत्सवासाठी येथे विशेष व्यवस्था करण्यात येते. उत्सवाच्या पहिल्या दिवशी पहाटे पाच वाजता घट बसवून मंदिरात पूजा केली जाते. उत्सवादरम्यान कुंकूमार्चन, कुमारिका पूजन, भोंडला, देवीचा गोंधळ, होम, हवन, भजन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रमांबरोबरच विविध सांस्कृतिक कार्यक्रमही होतात. या उत्सवादरम्यान हजारो भाविक देवीचे दर्शन घेतात.

उपयुक्त माहिती

  • ठाणे रेल्वे स्थानकापासून किमी अंतरावर
  • राज्यातील अनेक शहरांतून ठाण्यासाठी एसटी रेल्वेची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो.९५९४२९१३२८
Back To Home