प्राचीन काळी श्रीस्थानक वा स्थानिकीय पाटन (पत्तन) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ठाणे नगरीस मोठी धार्मिक व ऐतिहासिक परंपरा आहे. या शहराचे ग्रामदैवत असलेले कौपिनेश्वर मंदिर त्या इतिहास आणि परंपरेची साक्ष देते. अनेक ठाणेकरांचे ते आराध्य दैवत व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. शहरातील सर्वांत प्राचीन मंदिरांमध्ये याचा समावेश होतो. येथील वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात असलेली शिवपिंडी. ही पिंडी शाळुंकेपासून सुमारे पाच फूट उंचीची आहे. भाविकांची अशी श्रद्धा आहे की दरवर्षी या पिंडीचा आकार काही प्रमाणात वाढतो.
ठाणे शहराला सुमारे तेराशे वर्षांचा इतिहास आहे. या शहराची पहिली नोंद इ.स. ६३६ची आहे. त्या काळात हे शहर एवढे श्रीमंत होते की खलिफा उमर इब्न अल् खत्ताब याचा एक सरदार उस्मान इब्न अबी अल् अस अथ तकाफी याच्या आरमाराने लुटीच्या उद्देशाने या शहरावर हल्ला केला होता. त्यावेळी येथे चालुक्यांची सत्ता होती. तानाह, तबेह, ताना ही ठाण्याची प्राचीन नावे. कोकणनृपती शिलाहारांच्या काळातील, इ.स. ९९७ आणि १०१८च्या ताम्रपटात ठाण्याचा उल्लेख श्रीस्थानक म्हणून करण्यात आला आहे. शिलाहार नृपती अपरादित्य (द्वितीय) याच्या रविवार, चैत्र शुद्ध १५, शके ११०७ म्हणजे ७ मार्च ११८५च्या शिलालेखात ठाण्याचा उल्लेख ‘स्थानकीय पाटन’ या नावाने करण्यात आला आहे.
उत्तर कोकणच्या या शिलाहार राजांची ठाणे ही राजधानी होती. शिलाहार हे शिवभक्त होते. त्यांनी अंबरनाथच्या प्रसिद्ध शिवालयासह परिसरात अनेक मंदिरे बांधली. त्यापैकी एक महत्त्वाचे देवस्थान म्हणून कौपिनेश्वराची ख्याती होती. शिलाहारांनंतर अनेक राजवटी बदलत गेल्या. बहामनी काळात ठाणे गुजरातच्या सल्तनतीचा भाग होता. पोर्तुगीजींना १५३० ते १५३३ या काळात दोनदा, तर गुजराती सल्तनतीने एकदा हे शहर लुटले अशी नोंद ‘बॉम्बे गॅझेटियर’मध्ये आहे. सोळाव्या शतकात पोर्तुगिजांनी ठाण्यावर ताबा मिळविला. ‘बॉम्बे गॅझेटियर’मधील उल्लेखानुसार, पोर्तुगीजांच्या सत्तेनंतर ‘येथील जुन्या हिंदू वा मुस्लिम ठाण्याचा पत्ता लागत नाही. पूर्वीच्या प्रवाशांनी वाखाणलेली मंदिरे आणि मशिदी पोर्तुगीजांनी (१५३० ते १५६०) उद्ध्वस्त केली आणि त्यांचे दगड चर्च आणि अन्य धार्मिक इमारतींसाठी वापरले. याचा बदला म्हणून पुढे मराठ्यांनी (१७३७ ते १७४०) अनेक गिरिजाघरे व ख्रिस्ती इमारती उद्ध्वस्त केल्या.’
वसईच्या रणसंग्रामात पेशव्यांनी वसई आणि साष्टी बेटातून पोर्तुगीजांचे पारिपत्य केले. या संग्रामातील एक योद्धे रामाजी महादेव बिवलकर यांच्याकडे पुढे पेशव्यांनी मराठा आरमाराची जबाबदारी दिली. १७५७ मध्ये ते कल्याणचे पूर्ण सुभेदार झाले. विवेकानंद गोडबोले यांच्या ‘सुभे कल्याण’ या इतिहास ग्रंथानुसार, आपल्या या कारकिर्दीत सुभेदार रामाजी बिवलकर यांनी कल्याणचे रामेश्वर मंदिर, पुण्याचे ओंकारेश्वर मंदिर अशी शंकराची १०८ मंदिरे बांधली. त्याच प्रमाणे त्यांनी ठाण्यातील कौपिनेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. बॉम्बे गॅझेटियरने सुमारे १७६० असे जीर्णोद्धाराचे साल असल्याचे म्हटले आहे. असे सांगण्यात येते की पोर्तुगिजांनी ठाण्यातून पलायन केल्यानंतर सुभेदार बिवलकर यांनी ठाण्याची व्यवस्था लावण्यास सुरूवात केली. त्यावेळी मासुंदा तलावात अर्धवट बुडालेल्या अवस्थेत असलेले भव्य शिवलिंग त्यांना दिसले. बिंब राजाच्या राजवटीत स्थापन केलेल्या कौपिनेश्वराच्या मंदिरातील ते लिंग असल्याचे त्यांना कळले. ते मूळ मंदिर पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केले त्यावेळी तेथील शिवलिंग त्यांनी मासुंदा तलावात ढकलून दिले होते. सुभेदार बिवलकर यांनी येथे दगडी बांधणीचे मंदिर उभारून त्यात या शिवलिंगाची पुनःप्रतिष्ठापना केली. पुढे १३७ वर्षांनी, १८९७ साली या मंदिराची डागडुजी करण्याची आवश्यकता निर्माण झाली. त्यावेळी ठाण्यातील हजारो लोकांनी एकत्र येऊन आठ हजार रुपयांचा निधी गोळा करून मंदिराचा जीर्णोद्धार केला.
ठाणे शहरातील सध्याच्या जांभळी नाका परिसरात हे मंदिर स्थित आहे. गजबजलेल्या ऐन बाजारपेठेत असणाऱ्या या मंदिरात जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत. बाजारपेठेतून मंदिरातून जाणारा मार्ग दुकानांच्या गर्दीत हरवल्यासारखा भासतो. हा मंदिराचा मुख्य मार्ग आहे. सकाळी सहा ते दुपारी साडेबारापर्यंत व दुपारी साडेतीन ते रात्री दहा वाजेपर्यंत या मार्गावरील दरवाजा खुला असतो. बाहेरून एखाद्या जुन्या वाड्याची रचना भासणाऱ्या असलेल्या या मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या बाजुला असलेले दोन खांब त्याच्या प्राचिनत्वाची साक्ष देतात. दुसरा मार्ग मंदिराच्या मागील बाजूस आहे. पूर्वी तेथवर मासुंदा तलावाचे पाणी येई असे जुने जाणते सांगतात. तिसरा मार्ग या मुख्य मंदिराशेजारी असलेल्या मंदिरसमुहांच्या बाजूने आहे.
नंदीमंडप, सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत जाताच नजरेत भरते ती नंदीमंडपातील नंदीची भव्य मूर्ती. हा नंदी मोठ्या अखंड शिळेतून घडवण्यात आला असावा. या नंदीच्या अंगावरील कलाकुसर पाहण्यासारखी आहे. त्याच्या गळ्यातील घुंगरमाळ, नाकातील वेसण, गळ्यातील घंटामाळ याशिवाय दोरखंड दाखवणारी कलाकुसरही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. नंदिमंडपातही अलिकडच्या काळात सुधारणा झाल्याच्या खुणा दिसत असल्या तरी त्याची रचना मुख्य मंदिराच्या सजावटीशी नाते सांगणारी आहे.
मंदिराचा सभामंडप खुला असून अशा रचनेला ‘रंगमंडप’ असे संबोधले जाते. या विस्तृत मंडपावर सध्या छत असून तेथे कीर्तन–प्रवचनादी अनेक कार्यक्रम सुरू असतात. सभामंडपात प्रवेश करण्यासाठी चार पायऱ्या चढाव्या लागतात. त्याच्या जवळच एक सती वृदांवन आहे. ते वृंदावन ठाणे शहराचे कोतवाल बुबाजी नाईक यांच्या पत्नीचे आहे. वसईच्या मुक्तीसाठी झटणाऱ्या अणजूरच्या गंगाजी नाईक यांच्या बंधूंपैकी ते एक होते. १७४६ मध्ये त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी सती गेल्या. त्यानंतर त्याचे वृंदावन येथे उभारण्यात आले.
गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराकडील भिंतीजवळ गणपती, विष्णू आणि पार्वती यांच्या मूर्ती आहेत. गणपती आणि पार्वती यांच्या मूर्ती मोठ्या असून, विष्णूची दगडात कोरलेली मूर्ती मात्र छोटी आहे. या दोन मोठ्या मूर्तींची उभारणी नंतरच्या काळात करण्यात आली असल्याचे सांगण्यात येते. दगडी कोरीवकाम असलेल्या या प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर गणपतीची छोटी मूर्ती आहे. गर्भगृह काहीसे खोलवर आहे. चार पायऱ्या उतरून त्यात प्रवेश होतो. आत सुमारे पाच फूट उंचीची, एकाच पाषाणात कोरलेली शिवपिंड आहे. गाभाऱ्याच्या चार कोपऱ्यात कमानी असून काही देवळ्याही आहेत. एका देवळीत पार्वतीची दगडी मूर्ती आहे. त्याच्या शेजारच्या कोपऱ्यात छोटी शिवपिंडी आहे.
येथे दर सोमवारी भाविकांची मोठी गर्दी होते. श्रावणी सोमवार व महाशिवरात्रीच्या दिवशी या मंदिरातील शिवपिंडीला फुलांची वाडी भरली जाते. ती पहाण्यासाठी आणि पिंडीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी रांग लागते. गेल्या काही वर्षांपासून बर्फाची सजावटही केली जाते. समुद्रमंथनाच्या वेळी निर्माण झालेले हलाहल विष शंकराने प्राशन केले. त्यामुळे त्यांच्या अंगाची लाहीलाही होऊ लागली. म्हणून शंकराच्या पिंडीला येथे बर्फाची वाडी भरण्याची परंपरा सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात येते.
कौपिनेश्वर मंदिर परिसरात इतर देवतांचीही अनेक स्वतंत्र मंदिरे आहेत. त्यापैकी काही मंदिरे एकमेकांना लागूनच आहेत. काही मात्र स्वतंत्र आहेत. मुख्य सभामंडप आणि गर्भगृहाच्या शेजारीच असलेले विठ्ठल रखुमाईचे स्वतंत्र मंदिर छोटेखानी असले तरी देखणे आहे. त्याच्या डाव्या हाताला गणपती मंदिर, शितळादेवी मंदिर, पंचमुखी शिवलीला मंदिर आणि राम मंदिर आहे. पंचमुखी शिवलिंग मंदिरातील मोठ्या शिवपिंडीवर वरच्या बाजूला आणखी चार दगडी मुखवटे आहेत, तर गणेश मंदिरातील गणपतीची मूर्ती पद्मासनात आहे व गणपतीने सोंड हातात धरलेली आहे. रामाच्या मंदिरासमोर मारुतीचे मंदिरही आहे. येथे आणखीही काही मारुतीची मंदिरे आहेत. त्यात दक्षिणमुखी हनुमान मंदिरातील मूर्ती अतिशय सुंदर आहे. दक्षिणेला मुख असलेल्या या मंदिरातील हनुमानाची प्रतिमा तीन ते साडेतीन फूट उंच आहे. त्याच्या हातात पर्वतशिखर आहे व पायाखाली त्याने राक्षसाला चिरडले आहे. या दक्षिणमुखी हनुमानाच्या उजव्या बाजुलाच हनुमानाचे आणखी एक मंदिर आहे. ते गणपती–मारुती मंदिर म्हणून ओळखले जाते. या मंदिरात हनुमानाची सुबक मूर्ती आहे. त्याच्या मागच्या बाजूला हनुमानाला पाठ लावूनच गणपतीची स्वयंभू मूर्ती आहे. ही मूर्ती कोरलेली नाही, पण त्यातून गणपतीच्या ओंकारस्वरूपाचा भास होतो.
या मंदिराच्या उजव्या बाजुला कालिकामातेचे स्वतंत्र मोठे मंदिर आहे. प्रशस्त सभामंडप असलेल्या या मंदिरात कालिकामातेच्या समोर वाघमूर्ती आहे. देवीच्या डाव्या बाजूला वेताळ, काळभैरव, शंकर, हनुमान यांच्या मूर्ती दिसतात. या मंदिराच्या अगदी समोर दत्तमंदिर आहे. त्याच्या बाजूलाच दोन मोठ्या दीपमाळा आहेत. त्या १८९५ मध्ये उभारण्यात आल्या असल्याचे सांगण्यात येते. त्या दीपमाळांच्या मधोमध एक छोटे पण वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे. ते कामधेनु, कल्पवृक्ष आणि गुरु वसिष्ठ यांचे मंदिर आहे. येथील दत्तमंदिरातील दत्ताचे मुख उत्तरेला आहे. मंदिराच्या मधोमध गर्भगृह व भोवती प्रदक्षिणा मार्ग आहे.
या मंदिर संकुलात महाशिवरात्र, श्रावणी सोमवार, आषाढी एकादशी, रामनवमी, हनुमान जयंती व दत्तजयंती उत्सव साजरे होतात. चातुर्मासानिमित्त येथे होणारी प्रवचने– कीर्तने आजही ठाण्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. कौपिनेश्वर मंदिर ट्रस्टने १९७७ मध्ये येथे ज्ञानकेंद्र हे ग्रंथालय सुरू केले आहे. दरवर्षी ठाण्यातून निघणाऱ्या नववर्ष स्वागत यात्रेच्या तयारीसाठी मंदिर परिसरातच बैठका होतात. या भव्य शोभायात्रेचा आरंभ कौपिनेश्वराच्या मंदिरातूनच होतो. पूर्वीपासूनच ठाण्यातील अनेक ऐतिहासिक घटनांचे कोपिनेश्वर मंदिर हे महत्त्वाचे केंद्र राहिले आहे. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात अनेक महत्वाच्या गुप्त बैठका येथे होत, असे सांगितले जाते. १९१७ मध्ये या मंदिराच्या आवारात गोभक्तांचे संमेलन भरले होते. त्या संमेलनाला राष्ट्रपिता महात्मा गांधी हजर होते, अशी नोंद आहे.