शैव दर्शनातील ‘श्रीमत्तोत्तरतंत्र’ ग्रंथानुसार हाटक म्हणजे सुवर्ण, तर ‘पराख्यातंत्र’नुसार हाटक म्हणजे सुवर्ण सिंहासनावर विराजमान असलेला महादेव. हाटकेश्वर वा हटकेश्वर हे शंकराचे नाव विशेष प्रसिद्ध आहे. देशात हटकेश्वराची अनेक प्रसिद्ध मंदिरे आहेत. यातील तामिळनाडू राज्यातील श्रीशैलम, गुजरात मधील द्वारका, महाराष्ट्रातील जुन्नर व धुळे तसेच उत्तर भारतात अनेक ठिकाणची हटकेश्वराची सुप्रसिद्ध मंदिरे आहेत. हटकेश्वराची शिवपिंड तंत्र संप्रदायात विशेष महत्त्वाची मानली जाते. हटकेश्वराचे असेच एक प्राचीन व प्रसिद्ध मंदिर तासगावमध्ये आहे.
पुराणकथेनुसार, सतीच्या विरहाने दुःखी झालेले महादेव दिगंबरावस्थेत पृथ्वीभ्रमण करीत असताना द्वारकेत एका ऋषी आश्रमात पोहोचले. महादेवाचे दिगंबर सुवर्णरूप पाहून ऋषिपत्नी मोहित झाली. त्यामुळे क्रोधीत झालेल्या ऋषीने महादेवाला, तुमचे सुवर्णलिंग पृथ्वीवर गळून पडेल, असा शाप दिला. त्या शापाने महादेवाचे सुवर्णलिंग पृथ्वीवर अनेक ठिकाणी गळून पडले. परिणामी पृथ्वीवर हाहाकार माजला. हे पाहून सर्व ऋषींनी महादेवास साकडे घातले. तेव्हा, या सुवर्ण शिवपिंडीची नित्य पूजा केल्यास पृथ्वीवरील दुःख व संकटे दूर होतील व पूजा करणाऱ्यांना मनोवांच्छित फळ प्राप्त होईल, असा आशीर्वाद महादेवाने दिला. तेव्हापासून हटकेश्वर शिवपिंडी पुजली जाऊ लागली. असे सांगितले जाते की भाविकांना ही शिवपिंडी सामान्य दिसत असली तरी सिद्ध, योगी व तंत्रिकांना ही सुवर्ण शिवपिंडी दिसते.
हे मंदिर सुमारे हजार वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. मंदिरांचे हेमाडपंती स्थापत्यशैलीतील दगडी बांधकाम, मंदिरावरील शिल्पकला व विशाल प्रवेशद्वारे मंदिराचे प्राचिनत्व अधोरेखीत करतात. मंदिर शहराच्या गजबजलेल्या भागात रस्त्यालगत आहे. मंदिराच्या सभोवती भक्कम आवारभिंत आहे. त्यात समोरील व उजव्या बाजूला अशी दोन प्रवेशद्वारे आहेत. मंदिर रस्त्यापेक्षा उंचावर असल्यामुळे दोन्ही प्रवेशद्वारांसमोर प्रत्येकी १५ पायऱ्या आहेत. समोरील बाजूचे प्रवेशद्वार दुमजली आहे व त्याच्या वरील मजल्यावर नगारखाना आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस पहारेकऱ्यांसाठी चौथरे आहेत. प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी व ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. ललाटबिंबावरील सज्जाच्या वरील बाजूस शिखरशिल्प व त्याच्या दोन्ही बाजूस कमळ फुलांची नक्षी आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस भिंतीत दीपकोष्टके आहेत. या प्रवेशद्वारातून आत जाताच प्रांगणात दोन्ही बाजूस अष्टकोनी चौथरे व त्यावर दोन थरांच्या दीपमाळा आहेत. दीपमाळांच्या शीर्षभागी शिखर व दीपप्रज्वलन करण्यासाठी स्वतंत्र हस्त आहेत.
उजव्या बाजूच्या दुमजली प्रवेशद्वाराच्या पहिल्या मजल्याच्या छतावर दोन्ही बाजूला दोन शिखरे व त्यावर कळस आहेत. शिखरांच्या मध्ये असलेल्या दुसऱ्या मजल्याच्या छतावर रांगेत तीन शिखरे व त्यावर कळस आहेत. या प्रवेशद्वाराजवळ मंदिराच्या प्रांगणात चौथरा व त्यावर तुलसी वृंदावन आहे. प्रांगणात दोन पायऱ्या असलेल्या वर्तुळाकार चौथऱ्यावर मध्यभागी शिवपिंडी व समोर नंदीची मूर्ती आहे. पुढे चार चौकोनी स्तंभ, त्यावर छत आणि शिखर असलेला नंदीमंडप आहे. त्यात काळ्या पाषाणातील नंदीची मूर्ती आहे.
मंदिराच्या सभामंडपात प्रत्येकी चार नक्षीदार पाषाणी स्तंभांच्या चार रांगा आहेत. चौकोनी स्तंभपादावर उभ्या असलेल्या स्तंभांच्या शीर्षभागी कणी आहेत. स्तंभदंडांवर विविध धार्मिक चित्रे रंगवलेली आहेत. सर्व स्तंभ एकमेकांना महिरपी कमानीने जोडलेले आहेत. कमानीवर तुळई व तुळईवर छत आहे. सभामंडप बंदिस्त स्वरूपाचा (गूढमंडप) आहे. त्यातील भिंतींवर विविध पौराणिक चित्रे रंगवलेली आहेत. सभामंडपात जमिनीवर मध्यभागी कासव शिल्प आहे.
अंतराळाच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या व उजव्या बाजूला प्रत्येकी दोन देवकोष्टके आहेत. त्यात डावीकडे गणेशाची चतुर्भूज मूर्ती व दुसऱ्या देवकोष्टकात विठ्ठल–रुक्मिणीच्या मूर्ती आहेत. प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूच्या पहिल्या देवकोष्टकात पार्वतीची मूर्ती व दुसऱ्या देवकोष्टकात मारूतीची मूर्ती आहे. अंतराळाच्या या प्रवेशव्दाराच्या दोन्ही बाजूंना द्वारपालांची चित्रे रंगवलेली आहेत. अंतराळातील डाव्या भिंतीवरील गरुड, तर उजव्या भिंतीवर हनुमान यांची चित्रे रंगवलेली आहेत. अंतराळात उजव्या व डाव्या बाजूला बाहेर पडण्यासाठी प्रवेशद्वारे आहेत.
गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरील द्वारशाखांवर खालील बाजूस शंख, चक्र, गदाधारी चतुर्भुज द्वारपाल शिल्पे आहेत. वर स्तंभशाखा, वेलबुट्टीशाखा, पर्ण व पुष्पलता नक्षी आहेत. ललाटबिंबावर गणपती शिल्प असून तोरणात दोन्ही बाजूला शिखर शिल्पे व मध्ये चौकट नक्षी आहे. मंडारकावर कीर्तीमुख कोरलेले आहे. कीर्तीमुखाच्या उजव्या बाजूला पद्म व डाव्या बाजूला चक्रनक्षी कोरलेल्या आहेत. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी स्वयंभू शिवपिंडी व त्यावर जलधारा धरलेले तांब्याचे अभिषेकपात्र छताला टांगलेले आहे.
सभामंडपाच्या छतावर चहुबाजूने सुरक्षा कठडा आहे. चारही कोनांवर लघूशिखरे व त्यावर कळस आहेत. गर्भगृहाच्या छतावर नऊ थरांचे चौकोनी शिखर आहे. शिखरात समोरील बाजूला असलेल्या देवकोष्टकात महादेवाची नंदीआरूढ मूर्ती आहे.
महाशिवरात्र हा येथील मुख्य वार्षिक उत्सव आहे. श्रावण मास, कार्तिक पौर्णिमा, दसरा, दिवाळी आदी सण व उत्सव येथे उत्साहाने साजरे केले जातात. उत्सव काळात मंदिरामध्ये भजन, कीर्तन, प्रवचन, संगीत आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याप्रसंगी देवाचे दर्शन घेण्यासाठी व नवस फेडण्यासाठी हजारो भाविक येथे येतात. दर सोमवारी तसेच पौर्णिमा, अमावस्या, प्रदोष आदी दिवशी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते.