हिंदू धर्म मूलतः पंचमहाभूतांचे पूजन करणारा निसर्गपूजक आहे. पृथ्वी, जल, वायू, अग्नी आणि आकाश ही ती पंचमहाभूते आहेत. त्यांतील पृथ्वीतत्त्वाचे प्रतिक म्हणजे डोंगर–दऱ्या. यातूनच डोंगऱ्यादेव, दऱ्यादेव, सुळकाई अशा देवतांच्या नैसर्गिक रूपातच पूजनाची परंपरा सुरू झाली. कालौघात अनेक ठिकाणी या देवतांच्या मूर्ती स्थापित झाल्या. असे असले तरी काही ठिकाणी अजूनही या देवता नैसर्गिक मूळ रूपात पुजल्या जातात. त्यातील एक प्राचीन मंदिर सुळेवाडीजवळील डोंगरात आहे. येथे डोंगरातून प्रकटलेल्या सुळक्यास सुळकाई म्हणून पूजले जाते.
सुमारे १५ कोटी वर्षांपूर्वी सह्याद्रीची निर्मिती झाली. येथील डोंगर सुळक्याचे वयही कोट्यवधी वर्षांचे असावे. मात्र सुळकाई देवीचे येथील स्थान पाचशे ते सहाशे वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. या मंदिराबाबतची आख्यायिका अशी की मूळस्थान येथील रेवणसिद्धनाथांस भेटण्यासाठी कोल्हापूरची अंबाबाई आली होती. त्यावेळी रेवणनाथ ध्यानस्थ बसले होते. म्हणून अंबाबाई नंदीच्या मागे बसून राहिली. रेवणनाथ ध्यानातून जागे झाले तेव्हा त्यांनी अंबाबाई आपल्या भेटीस आल्याचे पाहिले. त्यांनी तिला बहुमानाने सुळेवाडीच्या डोंगरावरील सुळक्यात विराजमान होण्यास सांगितले. रेवणनाथाच्या म्हणण्यानुसार देवी या सुळक्यात विलीन झाली. तेव्हापासून ती सुळकाई या नावाने पुजली जाऊ लागली. या देवीवरूनच येथील गावाला सुळेवाडी म्हणून ओळख मिळाली.
सुळेवाडी गावाच्या जवळ असलेल्या डोंगरमाथ्यावर हे मंदिर आहे. मंदिराच्या प्रांगणापर्यंत पक्का रस्ता आहे. काही वर्षांपूर्वी झालेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे आधुनिक स्वरूप प्राप्त झालेले आहे. काँक्रिटने बांधलेल्या या मंदिराचे अधिष्ठान प्रांगणापेक्षा सुमारे चार फूट उंच असल्यामुळे सहा पायऱ्या चढून वर जावे लागते. दुमजली मंदिराच्या तळमजल्यावर सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सभागृह व वरील मजल्यावर मंदिर अशी मंदिर वास्तूची रचना आहे. सभागृहासमोर ऐसपैस मोकळे अंगण आहे. येथील जमीन कोटा फरशीने आच्छादित आहे. अंगणात डाव्या व उजव्या बाजुला वरील मंदिराकडे जाण्यासाठी प्रत्येकी २० पायऱ्या आहेत व मध्यभागी सभागृहाचे प्रवेशद्वार आहे. सभागृहात उजेड, हवा येण्यासाठी दोन्ही बाजूच्या भिंतींत खिडक्या आहेत. वरील मजल्यावर चारही बाजुंनी कठडा व मधोमध मंदिर आहे. कठड्यात डाव्या व उजव्या बाजूला १६ अर्धस्तंभ आहेत. या स्तंभांवर रोषणाईसाठी विजेचे दिवे लावलेले आहेत.
सभामंडप व गर्भगृह अशी रचना असलेल्या मंदिराच्या सभामंडपात जाण्यासाठी दोन पायऱ्या चढून जावे लागते. पूर्ण खुल्या स्वरूपाच्या सभामंडपात समोरील बाजूस चार व गर्भगृहाच्या दोन्ही बाजूस प्रदक्षिणा मार्गावर सहा स्तंभ आहेत. स्तंभपाद चौकोनी व स्तंभदंड षटकोनी आहेत. स्तंभदंडात खालील बाजूस व शीर्षभागी कमळ फुलांची नक्षी आहे. हे सर्व स्तंभ एकमेकांना महिरपी कमानीने जोडलेले आहेत. प्रत्येक महिरपी कमानीच्या दोन्ही बाजूस कमळ फुलांची नक्षी आहे. प्रदक्षिणा मार्गाच्या बाजूला मंदिराच्या परिसरात सापडलेल्या प्राचीन मूर्ती, शिवपिंडी व नंदी ठेवलेले आहेत.
पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस नक्षीकाम आहे. द्वारशाखांवर पुष्पलता नक्षी व लालटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. गर्भगृहात मधोमध स्वयंभू सुळक्याचे टोक आहे. हा सुळका जमिनीतून वर आलेला आहे. सुळक्याच्या टोकावर सुळकाई देवीचा मुखवटा हळदी कुंकवाने चितारलेला आहे. देवीला उंची वस्त्रे व गळ्यात कवड्याच्या माळा आहेत. देवीच्या बाजूला शेंदूर लावलेला कौल लावण्याचा पाषाण आहे.
मंदिराच्या छतावर पुढील बाजूला दोन, उजव्या व डाव्या बाजूला प्रत्येकी एक व गर्भगृहावर मुख्य अशी एकूण पाच शिखरे आहेत. सभामंडपावर मध्यभागी असलेले शिखर घुमटाकार व इतर शिखरे चौकोनी आहेत. मुख्य शिखरात चारही भिंतीत प्रत्येकी दोन–अंगी शिखर, त्यावर शीर्षभागी अर्धआमलक व कळस आहेत. सर्व शिखरांत शीर्षभागी आमलक, त्यावर कळस व ध्वजपताका आहेत.
वैशाख मासातील पहिला सोमवार ते गुरुवार या चार दिवसांत देवीचा वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी होणाऱ्या यात्रेत बैलगाड्यांची शर्यत व कुस्त्यांचे फड रंगतात. या चार दिवसांत राज्यभरातून हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. विविध वस्तुंची दुकाने सजून परिसरास बाजारपेठेचे स्वरूप प्राप्त होते. मंदिरात नवरात्र उत्सव, दसरा, दिवाळी, चैत्र पाडवा आदी सण साजरे केले जातात. दर मंगळवारी, शुक्रवारी व रविवारी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते.