डोंगराई देवी मंदिर

कडेपूर, ता. कडेगाव, जि. सांगली

प्राचीन काळापासून मानवप्राणी निसर्गाच्या विराट शक्तिशाली रूपांची पूजा करत आला आहे. मानवी जीवनाचा आधार आणि संस्कृतीचे विकासस्थान ठरणाऱ्या नद्या, सागर, वृक्ष, डोंगर यांना देव मानून हजारो वर्षांपासून त्यांची पूजा केली जात आहे. कालौघात अशा स्थानी देवालये उभी राहिली आणि विकसित होत गेली. पुढे त्यांना रंजक आख्यायिका जोडल्या गेल्या. कडेगांव तालुक्यातील कडेपूर गावच्या डोंगरात असेच डोंगराई देवीचे एक प्राचीन मंदिर आहे. या देवीस नवसपूर्तीनिमित्त लाकडी अवयव वाहण्याची प्रथा आहे

डोंगराई देवीप्रमाणेच कडेपूरमध्ये वडलाई देवीचेही स्थान आहे, तर गावातील नदीपलीकडे देवटकी देवीचे स्थान आहे. या तिन्ही देवी सख्या बहिणी असल्याचे मानले जाते. नामस्पष्टिकरण कहाणीनुसार, कडासुर नावाच्या राक्षसामुळे या गावास कडेपूर म्हणून ओळखले जाते. हा कडासुर अत्यंत मातला होता. त्याने गावातील लोकांना सळो की पळो करून सोडले होते. तेव्हा येथील लोकांनी तुळजाभवानीची प्रार्थना केली. त्या हाकेस देऊन तुळजाभवानी येथे डोंगराई देवीच्या रूपाने धावून आली. येथील डोंगरामध्ये कडासुराशी तिचे घनघोर युद्ध झाले. त्यात अखेर देवीने कडासुराचा वध केला आणि त्याच्या छळापासून लोकांची सुटका केली. यानंतर भाविकांनी देवीला येथेच कायम वास्तव्य करण्याची विनंती केली. त्यास मान देऊन डोंगराई देवी या ठिकाणी मूर्तीरुपात स्थिर झाली.

हेमाडपंती स्थापत्यशैलीतील हे मंदिर तेराव्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. मंदिरासाठी जेथून पायरी मार्ग सुरू होतो, तेथे प्रशस्त वाहनतळ आहे. वाहनतळाच्या बाजुला भागुबाई देवीचे हेमाडपंती स्थापत्यशैलीतील मंदिर आहे. भागुबाई ही डोंगराई देवीची सखी मानली जाते. तिची आख्यायिका अशी की भागुबाई नित्य नेमाने डोंगराई देवीसाठी शिदोरी घेऊन येथे येत असे. एके दिवशी डोंगराईने भागुबाईस भोपळ्याच्या बिया दिल्या तळ्याच्या काठावर लावण्यास सांगितल्या. भोपळ्याचे भरघोस पीक आल्यावर बैलगाडीभर भोपळे घेऊन ये, असे देवीने भागुबाईस सांगितले. परंतु त्याच वेळी देवीने अशी अटही घातली की ते भोपळे घेऊन येताना कोणत्याही परिस्थितीत मागे वळून पाहायचे नाही. देवीच्या सांगण्यानुसार काही दिवसांनी भागुबाई बैलगाडीत भोपळे घेऊन डोंगराच्या पायथ्याशी पोहोचली. अचानक कोणी तरी तिला मागून हाक मारली. तिने मागे वळून पाहिले त्याचक्षणी भागुबाईचे शिळेत रूपांतर झाले. यानंतर भागुबाईस पूर्वस्थितीत आणण्यास डोंगराईने असमर्थता दर्शवली, परंतु आद्य पूजेचा मान भागुबाई देवीस मिळेल, असा वर दिला. त्यामुळे येथे येणारे भक्त आधी भागुबाईचे दर्शन घेऊन मग डोंगराई देवीच्या दर्शनाला जातात

वाहनतळापासून डोंगराई देवी मंदिरापर्यंत सुमारे दोनशे पायऱ्या चढून यावे लागते. डोंगराई देवीच्या मंदिराभोवती एखाद्या किल्ल्यासारखी भक्कम तटबंदी आहे. येथील तटबंदी आणि त्यात असलेले भव्य प्रवेशद्वार प्रतापगड किल्ल्यावर असलेल्या भवानी मंदिराची आठवण करून देते. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस उत्तुंग मजबूत बुरूज आहेत. भोवती कमान असलेल्या प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर खालील बाजूस द्वारपाल शिल्पे कोरलेली आहेत. ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती ललाटपट्टीच्या दोन्ही बाजूंस अश्वमुखे आहेत. प्रवेशद्वाराच्या आत दोन्ही बाजूंस पहारेकरी कक्ष आहेत. प्रवेशद्वारावर आतल्या बाजूस एक अश्वमुख उजव्या बाजूस गोलाकार दीपमाळ आहे. दीपमाळेच्या चौकोनी पायात वंदन मुद्रेतील सूरसुंदरींची तीन शिल्पे आहेत. त्या शेजारी असलेल्या स्वतंत्र शिळेवरही काही शिल्पे कोरलेली आहेत

मंदिराच्या प्रांगणात पेव्हर ब्लॉकची फरसबंदी आहे. प्रांगणात एका चौथऱ्यावर मोठी दीपमाळ आहे. डोंगराई देवीच्या मंदिरासमोर पत्र्याचे छत असलेला मंडप आहे. दर्शनमंडपापेक्षा उंचावर असलेल्या सभामंडपाच्या प्रवेशद्वारास तीन पायऱ्या आहेत. त्याच्या द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी आहे. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात प्रत्येकी चार चौकोनी स्तंभाच्या चार रांगा आहेत. बाह्य बाजूचे स्तंभ भिंतीत आहेत. सभामंडपात गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर सिंहाची संगमरवरी मूर्ती आहे. गर्भगृह सभामंडपापेक्षा काहीसा उंचावर आहे. सभामंडपात उजव्या बाजूस वज्रपिठावर डोंगराई देवीची नवी मूर्ती आहे. असे सांगितले जाते की गर्भगृहातील प्राचीन मूर्तीच्या जागी नवी मूर्ती बसवण्याचे ठरले होते. त्यासाठी येथील मूळ जुनी मूर्ती काढण्याचा प्रयत्न केला असता त्या जागेतून रक्तप्रवाह सुरू झाला. त्यामुळे तो प्रयत्न सोडून नवी आणलेली मूर्ती सभामंडपातच स्थापित करण्यात आली.

गर्भगृहाच्या द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. मंडारकाच्या चंद्रशिळेवर कीर्तिमुख दोन्ही बाजूंस कमळ फुलांची नक्षी आहे. प्रवेशद्वारास चारही बाजूने चांदीच्या पत्र्याने मढविलेले आहे. गर्भगृहात वज्रपिठावर डोंगराई देवीची चार फूट उंचीची काळ्या पाषाणातील सिंहारुढ चतुर्भुज मूर्ती आहे. देवीच्या पायाशी जखमी कडासुर राक्षस त्याचे वाहन रेडा आहे. देवीच्या डोक्यावर मुकुट, नाकात मोत्यांची नथ, अंगावर उंची वस्त्रे अलंकार आहेत. देवीच्या पाठशिळेवर पानाफुलांची नक्षी आहे. मूर्तीच्या मागील बाजूस असलेल्या सुवर्ण प्रभावळीत मध्यभागी कीर्तिमुख दोन्ही बाजूंस पानाफुलांची नक्षी आहे. या मूर्तीच्या बाजूला देवीची स्वयंभू मूर्ती आहे. वज्रपिठावर समोरील बाजूस देवीची पितळी सिंहारूढ उत्सवमूर्ती आहे. मंदिराच्या मागे बाह्य बाजूस भिंतीतील देवकोष्टकांत विविध देवतांच्या मूर्ती आहेत. अभिषेक तीर्थाच्या गोमुखावर चार स्तंभांवर नक्षीदार घुमटाकार शिखर कळस असलेला मंडप आहे

गर्भगृहाच्या छतावर सात थरांचे चौकोनी शिखर आहे. शिखराच्या प्रत्येक थरात पानाफुलांची नक्षी सातव्या थरावर चारी कोनात चार लघूशिखरे, त्यावर आमलक कळस आहेत. मध्यभागी एकावर एक असे दोन आमलक त्यावर कळस आहे.

डोंगराई देवीच्या मंदिराच्या शेजारी तुकाई देवीचे मंदिर आहे. या मंदिराच्या गर्भगृहातील वज्रपिठावर तुकाई देवीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. वज्रपिठाच्या डाव्या उजव्या बाजूच्या चौथऱ्यात दोन रांजण आहेत. या रांजणांची अशी आख्यायिका सांगितली जाते की सुमारे तीनशे वर्षापूर्वी या भागात भयानक दुष्काळ पडला होता, तेव्हा मंदिरात आलेल्या प्रत्येक भक्ताला या रांजणातून पीठ धान्य प्राप्त झाले होते

मंदिराच्या छतावर चहूबाजूने कठडा मध्यभागी दोन थरांचे शिखर आहे. शिखराच्या पहिल्या षटकोनी थरात सर्व बाजूला सूर्यनक्षी आहे. दुसऱ्या गोलाकार थरात कमळ दल नक्षींचे रिंगण वरील निमुळत्या होत गेलेल्या भागावर उभ्या धारेची नक्षी आहे. शिखरात शीर्षभागी एकावर एक असे दोन आमलक त्यावर कळस आहे. मंदिराच्या प्रांगणात महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारासामोर नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. अरूंद प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर गणेश मूर्ती वरील दोन्ही बाजूस कीर्तिमुख आहेत. गर्भगृहात फरशी आच्छादित जमिनीवर मध्यभागी शिवपिंडी मागील वज्रपिठावर स्थानिक देवतांचे पाषाण आहेत. मंदिराच्या घुमटाकार शिखरावर कळस आहे.

श्रावणातील मंगळवारी शुक्रवारी देवीचा जत्रोत्सव साजरा केला जातो. दसऱ्याच्या आदल्या दिवशी डोंगराई देवीची बहीण वडलाई देवी हिची पालखी डोंगराच्या पायथ्याशी येते त्याचवेळी डोंगराई देवीची पालखी पायऱ्या उतरून पायथ्याशी जाते. दोन्ही देवींची भागुबाई देवीच्या मंदिराजवळ भेट झाल्यानंतर या पालख्या डोंगराई देवीच्या मंदिरात येतात. येथे विधिवत पूजन झाल्यानंतर वडलाई देवी पालखीत बसून आपल्या स्थानी परत जाते.

मंदिरात चैत्र पाडवा, दिवाळी, शारदीय नवरात्र, महाशिवरात्र आदी वार्षिक उत्सव साजरे केले जातात. या वेळी परिसरातील हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी नवस फेडण्यासाठी येतात. या मंदिर परिसरात देवीला वाहिलेल्या हात पायांच्या अनेक लाकडी प्रतिकृती दिसतात. भाविकांनी आपल्या हात, पायाचे दुखणे बरे व्हावे म्हणून देवीस केलेल्या नवसाची फेड म्हणून या लाकडी प्रतिकृती वाहिलेल्या आहेत. मंदिराच्या मागच्या बाजूला दगडाचे काही गोटे आहेत. असे गोटे सातारा जिल्ह्यातील पांडवगडावर पाहायला मिळतात. मंदिराच्या आवारात भाविकांना मुक्कामासाठी काही खोल्याही बांधलेल्या आहेत. परतीच्या वाटेकडे मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस एक शिल्प कोरलेले आहे. अश्वारूढ असलेली देवी आपल्या गणांसमवेत येथे दाखविलेली आहे.

उपयुक्त माहिती

  • कडेगावपासून किमी, तर सांगलीपासून ६४ किमी अंतरावर
  • कडेगाव येथून खासगी वाहनांची सुविधा
  • सांगलीतील अनेक शहरांतून कडेगावसाठी एसटी सुविधा
  • मंदिर परिसरात निवास न्याहरीची सुविधा आहे
Back To Home