सागरेश्वर मंदिर

देवराष्ट्रे, ता. कडेगाव, जि. सांगली

सह्याद्रीच्या रांगांमध्ये समुद्राचे अस्तित्व केवळ अशक्य. परंतु समुद्र म्हणजे फक्त खाऱ्या पाण्याचे जलाशय नव्हे. काही गोड्या पाण्याच्या साठ्यांनाही समुद्र म्हटलेले आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे इस्राईलमधील गोड्या पाण्याच्या सरोवरास गॅलिली समुद्र असे संबोधले जाते. या अर्थानेच कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे येथील कधीही आटणाऱ्या गोड्या पाण्याच्या कुंडांना सागर किंवा समुद्र येथील महादेवास सागरेश्वर नावाने संबोधले गेले असावे, असे सांगण्यात येते. येथील वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या परिसरात लहान, मोठी तब्बल ४८ मंदिरे आहेत

सागरेश्वर मंदिराबाबत आख्यायिका अशी की कौंडिण्यपूर (कुंडल) या देशाचा राजा सत्येश्वर एकदा अंबिका देशात शिकारीसाठी गेला होता. शिकारीमागे जाता जाता तो निबिड वनात आला. त्यावेळी त्याला तहान लागली. पाण्याच्या शोधात जात असताना त्याला सुमित्र ऋषी दिसले. त्याने त्यांच्याकडे पाणी मागितले. पण ध्यानमग्नावस्थेत असल्याने सुमित्र ऋषींना त्याची साद ऐकू आली नाही. ते आपल्याकडे दुर्लक्ष करीत आहेत, असे वाटल्याने राजा चिडला. त्याने ऋषींच्या अंगावर किडे टाकले. त्यामुळे ऋषींच्या तपात व्यत्यय आला क्रोधीत होऊन त्यांनी राजाला, ‘तुझ्या अंगात किडे पडतीलअसा शाप दिला. तो शाप ऐकून राजास पश्चाताप झाला. त्याने क्षमायाचना केली. तेव्हा ऋषींनी सांगितले की तुझ्या शरीरात केवळ रात्री किडे पडतील. दिवसा ते नाहीसे होतील.

शापामुळे दुःखी झालेला सत्येश्वर राजा घरी परतला. त्या रात्रीपासून रोज राजाच्या शरीरात किडे पडू लागले. यानंतर काही दिवसांनी राजा पुन्हा त्याच वनात शिकारीसाठी गेला. तेथे त्याला तहान लागली. अचानक त्याला खडकांतून पाझरत असलेले पाणी दिसले. त्याने हात तोंड धुवून ते पाणी प्राशन केले. त्या रात्री त्याच्या हात तोंडावर किडे पडले नाहीत. ते पाहून राणीच्या लक्षात सारे काही आले. तिने त्याला त्या झऱ्याच्या पाण्याने स्नान करावे, असे सांगितले. सत्येश्वराने तेथे जाऊन मोठे कुंड तयार केले आणि त्या पाण्याने स्नान केले. त्यामुळे तो शापमुक्त झाला. या पाण्यात ही दैवी शक्ती कोठून आली, असा प्रश्न त्याला पडला. तेव्हा ऋषींनी त्याला सांगितले की हे जल शंकराच्या जटेतून येत आहे.

सांगली डिस्ट्रिक्ट गॅझेटियर’ (१९६९) मध्ये नमूद करण्यात आलेल्या आख्यायिकेमध्ये समुद्रेश्वर या नावाचे स्पष्टिकरण दिलेले आहे. ते असे की एकदा शंकराने जालंदर नावाच्या एका महाकाय समुद्रीदैत्याचा वध केला. त्यामुळे आनंदी झालेल्या समुद्रदेवतेने शंकराकडे अशी प्रार्थना केली की मी ज्या स्थानी शिवलिंगाची गौरवपूर्वक स्थापना करीन तेथे शंकराने स्वतः राहावे. शंकराने ती विनंती मान्य केली. सागराने येथे स्थापन केलेले शिवलिंग हे सागरेश्वर म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यावेळी येथे शंकराच्या जटेतून गंगेचा छोटा प्रवाह पडला. तो म्हणजेच सत्येश्वर राजास सापडलेला झरा होय. 

तासगाव कराड मार्गावर सागरेश्वर अभयारण्याच्या वेशीवर हा सागरेश्वर मंदिर समूह आहे. रस्त्याला लागून असलेल्या कमानीतून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रवेश केल्यावर प्रांगणात सर्वप्रथम पुजाऱ्यांच्या समाध्या दिसतात. येथील अरूंद प्रवेशद्वारे, छत भिंती असलेल्या लांबलचक चाळवजा प्राचीन वास्तूत १४ स्वतंत्र कक्ष आहेत. हे तपसाधना कक्ष असावेत, असा अंदाज येथील ग्रामस्थ व्यक्त करतात. हे कक्ष नेमके कधी बांधण्यात आले, हे अद्याप अज्ञात आहे. ‘सांगली गॅझेटियरनुसार, हे कक्ष कौंडिण्यपूर येथील राजा हिंगणदेव याने बांधले आहेत

या पुढे सागरेश्वराचे मुख्य मंदिर आहे. मंदिरासमोर विहीर आहे. याच पाण्याने स्नान करून राजा शापमुक्त झाला होता, अशी आख्यायिका सांगितली जाते. आजही या पाण्याने अंघोळ केल्यास त्वचारोग बरे होतात, अशी मान्यता आहे. मंदिरासमोर अलिकडील काळात बांधलेला मंडप आहे. प्रांगणापेक्षा खाली असलेल्या मंडपात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. या मंडपात दोन्ही बाजूस कठडे स्तंभ आहेत. अर्धखुल्या स्वरूपाच्या या मंडपात भाविकांना बसण्यासाठी दोन्ही बाजूस प्रदक्षिणा मार्ग सोडून कक्षासने आहेत. पुढे सभामंडपाचे प्रवेशद्वार आहे. द्वारशाखांवर नक्षीकाम ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस नक्षीदार स्तंभ त्यावरील तोरणात शिखर शिल्पे आहेत. मंडारकास चंद्रशिला आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना दर्शनीभिंतीस टेकून तपस्वी ऋषींची दोन शिल्पे आहेत

सभामंडपात प्रत्येकी पाच नक्षीदार स्तंभांच्या चार रांगा आहेत. स्तंभपाद अधिक रुंद चौकोनी आहे. त्यावर उभे स्तंभ चौकोनी, षटकोनी, अष्टकोनी, गोलाकार अशा विविध भौमितिक आकारात आहेत. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात (गूढमंडप) उजेड हवा येण्यासाठी समोरील भिंतीत खिडक्यांची व्यवस्था आहे. सभामंडपात मध्यभागी वज्रपिठावर सागरेश्वराची उत्सवमूर्ती आहे. मूर्तीच्या मागील बाजूस असलेल्या चौथऱ्यावर नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. पुढे अंतराळाचे प्रवेशद्वार आहे. द्वारशाखांवर पानाफुलाची नक्षी ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. अरूंद अंतराळात भिंतीजवळ उजव्या बाजूला विष्णूची डावीकडे लक्ष्मीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. गर्भगृहात जमिनीवर स्वयंभू शिवपिंडी आहे. या पिंडीखाली पाणी असल्याचे सांगितले जाते. त्यामुळेही या महादेवास सागरेश्वर अथवा समुद्रेश्वर नावाने ओळखले जाते.

मंदिराच्या छतावर चहुबाजूने कठडा आहे. सभामंडपाच्या छतावर चौकोनी शिखर त्यावरील कमलदल नक्षी असलेल्या घुमटावर कळस आहे. अंतराळाच्या छतावर षटकोनी घुमट त्यावरील आमलकावर कळस आहे. गर्भगृहाच्या छतावर मुख्य शिखर द्वादशकोनी आहे. शिखरावर चारही दिशांना व्याघ्रशिल्पे आहेत. त्यावरील आमलकावर कमलदल नक्षी, त्यावर कळस ध्वजपताका आहे. मंदिराच्या छतावर एकूण तीन शिखरे आहेत

सागरेश्वर मंदिराच्या बाजूला गोड्या पाण्याची सुमारे दहा फूट लांब सहा फूट रुंदीची तीन कुंडे आहेत. असे सांगितले जाते की या कुंडांचे पाणी कधीही आटत नाही सर्व ऋतूंत ते एकाच पातळीवर असते. सागरेश्वराच्या मुख्य मंदिराशिवाय येथे सोमनाथ, मल्लिकार्जून, महाकालेश्वर, ओंकारेश्वर, केदारनाथ, भीमाशंकर, काशीविश्वनाथ, त्र्यंबकेश्वर, वैद्यनाथ, नागेश्वर, रामेश्वर आणि घृष्णेश्वर अशी बारा ज्योतिर्लिंग असलेली बारा मंदिरे आहेत. ‘सांगली गॅझेटियरनुसार, यातील सोमनाथ मंदिर भिल नामक कोण्या राजाने बांधले आहे. या लहान मंदिराच्यासमोर कठडे असलेले आंगण आहे. सभामंडप गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. सभामंडपांत नंदी गर्भगृहात जमिनीवर शिवपिंडी आहेत. मंदिराच्या भिंतीत दीपकोष्टके आहेत. मंदिराच्या छतावर चहुबाजूने कठडे, त्यावर शिखर कळस आहेत. याशिवाय प्रांगणात पर्वतेश्वर, धर्मेशिया, सतेश्वर, रमनेश्वर, सिद्धेश्वर, अंबाबाई, कार्तिकस्वामी, कटकस्वामी, डाव्या उजव्या सोंडेचा गणपती आदी एकूण ४८ मंदिरे आहेत. मंदिर परिसरात एकूण १०८ शिवपिंडी काही वीरगळ आहेत. येथील हेमाडपंती स्थापत्यशैलीतील मंदिरे वेगवेगळ्या काळातील असल्याचे जाणकारांचे मत आहे.

मंदिरात चैत्र पाडवा, महाशिवरात्री श्रावणातील शेवटच्या सोमवारी जत्रोत्सव हे मुख्य वार्षिक उत्सव साजरे केले जातात. महाशिवरात्रीस देवाची पालखी मिरवणुकीने ग्रामप्रदक्षिणा घातली जाते. सर्व वार्षिक उत्सवांच्या वेळी हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी नवस फेडण्यासाठी येतात. या वेळी मंदिरात भजन, किर्तन, प्रवचन, जागरण, संगीत आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावेळी संपूर्ण परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघतो

मंदिरापासून जवळच सागरेश्वर अभयारण्य आहे. ८६ चौरस किलोमीटर क्षेत्रफळावरील या अभयारण्यात सांबर, काळवीट, हरिण, तरस, रानमांजर, लांडगे, कोल्हे, ससे आदी प्राणी आहेत. सागरेश्वर मंदिर अभयारण्य या शिवाय देवराष्ट्रे हे गाव देशाचे माजी उपपंतप्रधान संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे जन्मगाव म्हणून ओळखले जाते

उपयुक्त माहिती

  • कडेगावपासून १९ किमी, तर सांगलीपासून ४८ किमी अंतरावर
  • कडेगाव कराड येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात न्याहरीची सुविधा आहे, निवासाची नाही
Back To Home