अंबिका देवी हे पार्वतीचे रूप असल्याची मान्यता आहे. देशात पार्वतीची अनेक रूपे पुजली जातात. महाराष्ट्रात, विशेषकरून पश्चिम महाराष्ट्रात काळम्मा, कालिका, यमाई, अंबाबाई, अंबिका या रूपात पार्वतीची पूजा केली जाते. याच पंक्तितील अंबाबाईचे एक प्रसिद्ध मंदिर कडेगाव तालुक्यातील तोंडोली येथे आहे. हे मंदिर चौदाव्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. येथील जागृत व स्वयंभू देवी नवसाला पावणारी व भक्तांच्या हाकेला धावून जाणारी आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
मंदिराबाबत आख्यायिका अशी की प्राचीन काळी या गावातील ग्रामस्थ आपल्या बैलगाड्या घेऊन गूळ, मिरची व धान्याच्या व्यापारासाठी महाड, चिपळूण व रत्नागिरी येथे जात असत. त्या ठिकाणाहून माल घेऊन ते तोंडोली गावात परतत असत. असेच एकदा त्या गाड्यांच्या बैलांपैकी एका बैलाच्या उजव्या पायातून देवीने पाषाण रूपात गावात प्रवेश केला. गावातील एका भक्ताला स्वप्नदृष्टांत देवून देवीने आपण तोंडोली गावात आल्याचे व जमिनीखाली असल्याचे सांगितले. त्या स्वप्नदृष्टांताप्रमाणे गावकऱ्यांनी देवीने सांगितलेल्या जागेवर खोदून पाहिले. तेथे असलेल्या पाषाणाला मूर्तीस्वरुप आलेले होते. त्या खोदकामात सर्वप्रथम जमिनीतून बाहेर आलेले देवीचे तोंड दिसले म्हणून या गावास तोंडोली नावाने ओळखले जाऊ लागले. पुढे गावकऱ्यांनी या ठिकाणी देवीचे मोठे मंदिर उभारले.
गावाकडून मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर मंदिरासमोर दोन्ही बाजूला नक्षीदार चौकोनी स्तंभ व त्यावर सज्जा असलेली स्वागत कमान आहे. हे सुमारे वीस फूट उंचीचे स्तंभ तीन थरांत विभागलेले आहेत. स्तंभपाद चौकोनी व अधिक रुंद आहेत. कमानीच्या सज्जावर मध्यभागी एक व दोन्ही बाजूस दोन अशी तीन शिखरे व त्यावरील आमलकांवर कळस आहेत. या कमानीतून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. मंदिराची वास्तू तीन मजली आहे. मंदिरासमोर दोन्ही बाजूस असलेल्या चौथऱ्यांवर पाठीवर झुल पांघरलेले व सोंडेत विजय माळा धरलेल्या गजराजांच्या दोन मूर्ती आहेत. मंदिराच्या उजव्या बाजूला असलेल्या मोठ्या चौथऱ्यावर दीपमाळ आहे.
मंदिराच्या मुखमंडपात महिरपी कमानीने जोडलेले चार चौकोनी स्तंभ आहेत. मुखमंडपातून सभामंडपात येण्यासाठी बारा पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूस कठडे आहेत. मुखमंडपाच्या दोन्ही बाजूने वरील मजल्यावर जाण्यासाठी जिने आहेत. दुसऱ्या मजल्यावर सज्जात छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनारूढ पुतळा आहे. छतावर चार स्तंभांवर शिखर व कळस असलेल्या मंडपात वज्रपिठावर गणेशाची मूर्ती आहे.
बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात उजेड व हवा येण्यासाठी भिंतीत गवाक्षे आहेत. सभामंडपात सुमारे ४० चौकोनी स्तंभ आहेत. येथील काही स्तंभांवर वरील बाजूला सिंहमुख व गजमुख शिल्पे आहेत. सर्व स्तंभ महिरपी कमानीने एकमेकांना जोडलेले आहेत. स्तंभांवर शीर्षभागी तुळया व तुळयांवर वरील मजल्याचा सज्जा आहे. सज्जास सुमारे चार फूट उंच जाळीदार सुरक्षा कठडा आहे. सुरक्षा कठड्याला गजमुख शिल्पे आहेत. सज्जावरील सर्व स्तंभ एकमेकांना महिरपी कमानीने जोडलेले आहेत. सज्जावरील स्तंभांवर असलेले छत काँक्रिटचे व सभामंडपाच्या मध्यभागी असलेले घुमटाकार छत अर्धपारदर्शक आहे. छताच्या अशा रचनेमुळे सभामंडपात दिवसा भरपूर प्रकाश असतो. या छताला मध्यभागी काचेचे झुंबर टांगलेले आहे.
सभामंडपापेक्षा उंचावर असलेल्या अंतराळात येण्यासाठी तीन पायऱ्या आहेत. अंतराळात गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर जमिनीवर कासवशिल्प आहे. पुढे मंदिराचे हेमाडपंती स्थापत्यशैलीतील दगडी बांधकाम असलेले प्राचीन गर्भगृह आहे. गर्भगृहाच्या द्वारशाखांवर पानफुलांची नक्षी व ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. गर्भगृहात वज्रपिठावर अंबिका देवीची काळ्या पाषाणातील सुमारे साडेतीन फूट उंचीची चतुर्भुज मूर्ती आहे. देवीच्या दोन्ही उजव्या हातांत तलवार व त्रिशूल आणि डाव्या हातांत डमरू व अमृतपात्र आहे. देवीच्या मस्तकी मुकुट, कानात कुंडले, गळ्यात विविध आभूषणे, हातात कडे, दंडात बाजूबंद, पायात तोडे, कटीस कमरबंध आहेत. देवीने उंची वस्त्रे परिधान केलेली आहेत. देवीच्या चेहऱ्यावरील प्रसन्न भाव व मुकुटाखालून डोकावणारे कुरळे केस शिल्पकारांचे कसब अधोरेखित करतात. मूर्तीच्या पाठशिळेवर मध्यभागी कीर्तिमुख व दोन्ही बाजूंस पर्ण व पुष्पलता नक्षी आहे. मूर्तीच्या मागील चांदीच्या प्रभावळीवर दोन्ही बाजूस खाली कमळफुल, मध्यभागी हातात पद्मफुल असलेल्या गंगा–यमुना, वरील बाजूस शंख– मकरलता व वर मध्यभागी कीर्तिमुख आहे.
मंदिराच्या छतावर चहूबाजूने सुरक्षा कठडा व त्यावर नक्षीदार बाशिंगे आहेत. मुखमंडपाकडील छतावर गणेश मूर्ती व त्यावरील छतावर दोन्ही बाजूंस दोन घुमटाकार लहान शिखरे आहेत. त्यावर आमलक व कळस आहेत. मध्यभागी असलेल्या चौकोनी शिखरात शीर्षभागी आमलक व त्यावर कळस आहे. गर्भगृहाच्या छतावरील शिखरात खालील चौकोनी थरात चारही बाजूने बारा देवकोष्टके व त्यावरील घुमटाकार थरात उभ्या धारेची नक्षी आहे. शिखरात शीर्षभागी आमलक व त्यावर कळस आहे. या मंदिराच्या बाजूला काही अंतरावर अन्नछत्र मंडप आहे. मंदिराजवळ उजव्या बाजूस रामेश्वर, महादेव, हनुमान, विठ्ठल–रखुमाई, दत्तात्रेय, नागेश्वर व भैरवनाथ आदी मंदिरे आहेत.
वैशाख पौर्णिमा हा देवीचा मुख्य वार्षिक जत्रोत्सव येथे मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी पहाटे देवीचा महाअभिषेक करून पूजनाला सुरवात होते. देवीची सिंहासनारुढ उत्सवमूर्ती साजशृंगार करून सजवली जाते. दिवसभरात हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. रात्री गोंधळ पार पडल्यानंतर देवीची पालखी नगर प्रदक्षिणेला निघते. पालखीला खांदा लावण्यासाठी भक्तांची झुंबड उडते. देवीस ओवाळण्यासाठी सुहासिनी पंचारती घेऊन जागोजागी थांबलेल्या असतात. नगर प्रदक्षिणेनंतर दुसऱ्या दिवशी क्रिकेट सामने, कुस्त्यांचे फड व बैलगाड्यांच्या शर्यती रंगतात. मंदिरात कार्तिक पौर्णिमेला दीपोत्सव साजरा केला जातो. मकर संक्रांत, चैत्र पाडवा, शारदीय नवरात्री, दसरा व दिवाळी आदी उत्सव मंदिरात साजरे होतात. मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा व अमावस्या या दिवशी मंदिरात देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते.