‘कोल्हग्रामी नृसिंहदेव। परमात्मा सदाशिव।
तोचि असे प्रत्यक्ष ॥’
सरस्वती गंगाधराने ‘गुरूचरित्रा’त वर्णिलेला हा देव म्हणजेच कोळे नरसिंहपूर येथील श्रीनृसिंह होय. सांगली जिल्ह्यातील वाळवे तालुक्यात कृष्णेच्या काठी हे नृसिंहाचे पवित्र स्थान आहे. काळ्या कुळकुळीत पाषाणातून (शालीग्राम) कोरलेली सोळा हातांची सर्वांगसुंदर मूर्ती हे येथील वैशिष्ट्य आहे. हेच ठिकाण ज्वाला नरसिंह तीर्थ म्हणून प्रसिद्ध आहे. असे सांगितले जाते की हे स्थान हजारो वर्षे प्राचिन आहे. या मंदिरामुळेच या गावाला कोळे नरसिंहपूर हे नाव पडले.
या मंदिराची आख्यायिका अशी की महर्षि व्यासांचे पिता आणि वसिष्ठ ऋषींचे नातू, तसेच ऋग्वेदातील मंत्रद्रष्टे ऋषी पराशर यांचे करवीरस्थानी सोमतीर्थ येथे वास्तव्य असे. ‘करवीर माहात्म्या’त तसा उल्लेख आहे. ‘श्री कृष्णा माहात्म्यम्’ या ग्रंथात असे म्हटले आहे की ‘यदा पुनस्तदा भक्त्या तपः कर्तुं पराशरः। नारसिंहं तदा धायन् कृष्णा तीरे मुनीश्वरः ।।’ याचा अर्थ असा की पराशर ऋषींनी कृष्णातीरी मनोभावे भगवान नरसिंहाची तपस्या केली होती. त्यावेळी परमेश्वराने त्यांना नरसिंहरूपात दर्शन दिले. परंतु ते दर्शन जेव्हा घडले तेव्हा त्या शालिग्राम मूर्तीतून ज्वाला निघत होत्या. म्हणून या क्षेत्राला ज्वाला नरसिंहपूर असेही म्हणतात. ही मूर्ती पृथ्वीवर स्थापित करणे अशक्य असल्याने पराशरांनी ती कृष्णेच्या डोहात विसर्जित केली.
असे सांगण्यात येते की या घटनेनंतर हजारो वर्षांनी कर्नाटकातील अंजन गावात एक ब्राह्मण दाम्पत्य राहात होते. एका साधूच्या शापामुळे त्यांची दृष्टी व वाचा गेली होती. त्यांनी क्षमायाचना केल्यानंतर त्या साधूने त्यांना उःशाप दिला की तुम्ही नरसिंहाची मनोभावे पूजा करून त्यास प्रसन्न केल्यास तुमचे व्यंग नाहीसे होईल. त्यानुसार त्यांनी १२ वर्षे तप केले. त्यानंतर एके दिवशी त्यांना स्वप्नदृष्टांत झाला. भगवान नरसिंहाने स्वप्नात येऊन त्यांना सांगितले की कृष्णेच्या डोहात माझी मूर्ती आहे. तिची माहिती कौंडिण्यपूरच्या भीमराजास सांगा. त्याचवेळी त्यांना दृष्टी व वाचा परत मिळाली. कौंडिण्यपूर म्हणजे आजचे सांगली जिल्ह्यातील कुंडल हे शहर होय. तेथील भीमराजाने येथे येऊन नरसिंहाची शालिग्राम मूर्ती डोहाबाहेर काढली. त्यानंतर त्याने येथे मंदिर बांधले.
‘सांगली गॅझेटियर’मध्ये असे म्हटले आहे की कुंडल येथे सत्येश्वर नावाचा यादव राजा राज्य करीत होता. चैत्र शुद्ध पंचमी, शके ३१० (इ.स. ३८८) मध्ये त्याचे निधन झाले. ‘समुद्रेश्वर माहात्म्या’नुसार सत्येश्वर राजाचे सात वंशज होते. त्यातील भीष्मक हा त्याचा पहिला वंशज होता. याच्याच नावाचा अपभ्रंश भीम असा झाला. यावरून येथील मूळ मंदिर चौथ्या शतकात बांधण्यात आल्याचे स्पष्ट होते. सत्येश्वर हा यादव राजा होता. याच यादव कुळातील रामदेवराय या राजाने नंतर आपला करणाधिप म्हणजे मुख्य प्रधान हेमाद्री यास येथे मंदिर बांधण्याची आज्ञा दिली. हे मंदिर रामदेवराय गादीवर आल्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे इ.स. १२७३ मध्ये बांधण्यात आले असावे.
यानंतरची या मंदिराबाबतची नोंद बाराव्या शतकातील आहे. संत नामदेव महाराजांच्या पूर्वी त्यांच्या पिढीतील सातवे पूर्वज यदूशेट रेळेकर हे थोर विठ्ठलभक्त होते. ते मूळचे परभणी जिल्ह्यातील नरसी ब्राह्मणी या गावचे असल्याचे आधुनिक संशोधनातून स्पष्ट झाले आहे. पूर्वी हे नरसी ब्राह्मणी गाव कराडनजीक होते, असा समज होता. या गावास कोणी भयेनरसिंगपूर म्हणत, तर कोणी कोळे नरसिंगपूर. यामुळे हे यदूशेट इ.स. ११२४ मध्ये येथे देवाच्या सेवेसाठी आले होते, अशी आख्यायिका येथे सांगण्यात येते. ऐतिहासिक नोंदींनुसार, इ.स. १४२६ मध्ये बहामनी सुलतानाने या मंदिराच्या दिवाबत्तीसाठी जमीन दान केली होती. इ.स. १६६२ मध्ये समर्थ रामदास स्वामी या मंदिरात दर्शनासाठी आले होते. इ.स. १७१८ मध्ये छत्रपती संभाजीराजांचे पुत्र व सातारचे छत्रपती श्रीमंत शाहू महाराज (पहिले) यांनीही या मंदिरासाठी जमिनी दिल्या होत्या.
हे मंदिर कोळे नरसिंहपूर गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी व कृष्णेकाठी वसलेले आहे. दगडी दिंडी दरवाजातून या मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या प्रांगणात दोन उंच दीपमाळा व त्यापुढील बाजूस दोन वृंदावने आहेत. डाव्या बाजूचे वृंदावन भुयारात असलेल्या गर्भगृहातील मूर्तीच्या बरोबर वर असल्यामुळे वृंदावनास प्रदक्षिणा घातल्याने देवाला प्रदक्षिणा पूर्ण होते, अशी मान्यता आहे. उजव्या बाजूच्या वृंदावनाच्या भिंतीत एक खिडकी आहे व त्यातून नाणी सोडली असता ती गर्भगृहाच्या दानपेटीत पडतात. या मंदिरातील नृसिंहाची मुख्य मूर्ती १४ फूट खोल भुयारात असल्याने तेथे हवा खेळण्यासाठी या वृंदावनातून नलिकामार्ग ठेवलेला आहे. ‘भानू तुकदेव त्याचा पुत्र गोपाळ भास्कर त्याचा पुत्र भानू गोपाळ’ असा शिलालेख भुयारी मार्गाच्या पहिल्या पायरीवर आहे. येथून नऊ पायऱ्या उतरून खाली गर्भगृहात प्रवेश होतो. येथेच एका कोनाड्यात महालक्ष्मी, गजलक्ष्मी व अठराव्या शतकातील सिद्धेश्वर महाराजांच्या पादुका आहेत. या भूमिगत गाभाऱ्यात सुमारे सहा फूट उंचीची श्रीनृसिंहमूर्ती आहे.
अखंड शिळेत कोरलेल्या या मूर्तीच्या सोळा हातांपैकी चार हात काहीसे भग्न झाले आहेत. मूर्तीच्या डावीकडील हातांत ढाल, वज्र, धनुष्य, पाश अशी आयुधे व एका हाताने हिरण्यकश्यपूचे डोके धरलेले आहे. एका हाताची नखे त्याच्या पोटात घुसवलेली आहेत. उजवीकडील हातांमध्ये मुरली, कमळ, परशू, चक्र ही आयुधे व एका हाताने दैत्याचा पाय पकडलेला आहे. तर उरलेल्या हाताने पोट फाडत आहे. या मूर्तीच्या मानेभोवती असणाऱ्या आयाळीमुळे व विस्फारित नेत्रांमुळे ती उग्र भासते. ताठ कान व गर्जना करण्यासाठी उघडलेल्या तोंडातून जीभ बाहेर डोकावते आहे. विशाल कपाळ व डोक्यावर मुकुट आहे. सुस्पष्ट, रेखीव, प्रमाणबद्ध अवयव, बोलके भाव व देखणे अलंकार असणारी ही मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे.
या मूर्तीच्या मागील प्रभावळीवर मत्स्य, कूर्म, वराह, वामन, नरसिंह, परशुराम, कृष्ण, राम, बौद्ध व कलंकी हे विष्णूचे दहा अवतार कोरलेले आहेत. या क्रमात प्रथम कृष्ण व त्यानंतर राम अवतार आहे. याशिवाय दोन्ही बाजूला मकरमुख आहेत. याच प्रभावळीत मध्यभागी कीर्तिमुख आहे. उंबऱ्यावर बसलेल्या या नृसिंहाने हिरण्यकश्यपूला मांडीवर ठेऊन एक पाय खाली सोडलेला आहे. या मूर्तीच्या उजव्या पायाशी भूदेवी व गरुड आणि डाव्या पायाजवळ प्रल्हाद व लक्ष्मी यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत.
मंदिराच्या मागील बाजूस कृष्णा नदीच्या काठावर उद्यान विकसित करण्यात आलेले आहे. त्याशेजारी महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिराच्या बाहेर चौथऱ्यावर नंदी आहे. मंदिराच्या बाजूला गणेशाची लहान देवळी आहे. येथून जवळच सिध्देश्वर महाराजांचे मंदिर आहे. सिध्देश्वर महारांचे चिरंजीव रामचंद्र महाराज यांची समाधी कृष्णा काठावर आहे. ऐटबाज वळण घेणारे येथील कृष्णेचे पात्र विलोभनीय भासते. वैशाख शुद्ध सप्तमीपासून पौर्णिमेपर्यंत नृसिंह जयंतीचा उत्सव येथे साजरा होतो. या काळात हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात.