संपूर्ण आशिया खंडात पूजला जाणारा गणेश हे महाराष्ट्राचे आराध्यदैवत आहे. त्याची लोकप्रियता इतकी प्रचंड आहे की नवव्या–दहाव्या शतकात हिंदू धर्मात स्वतंत्र गाणपत्य संप्रदायाची स्थापना झाली. या संप्रदायात डाव्या सोंडेचा गणपती हा चंद्रनाडी म्हणजेच शीतल गुणांचा म्हणून अधिक पुजला जातो. काही मंदिरांमध्ये उजव्या सोंडेची गणेशमूर्ती असते. हा गणपती बुध्दी आणि पराक्रमाची देवता मानली जाते. तासगाव येथील प्राचीन गणपती पंचायतन मंदिरात अशीच उजव्या सोंडेची गणपतीमूर्ती प्रतिष्ठापित आहे. हा जागृत गणपती नवसाला पावणारा आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
ऐतिहासिक संदर्भांनुसार, तासगांव पटवर्धन घराण्याचे उपास्य दैवत गणपती होते. पेशव्यांचे सेनापती परशुरामभाऊ हे या संस्थानचे संस्थापक. पुणे येथे इ.स. १७४० मध्ये त्यांचा जन्म झाला. ‘हरिवंशाच्या बखरी’त त्यांच्या जन्माविषयी ‘रामचंद्रपंत आप्पास पुत्र परशुरामभाऊ जाहले ते साक्षात परशुराम अवतार जाहला’, अशी नोंद आहे. श्रीमंत माधवराव पेशवे यांच्या काळात (१७६१ ते १७७२) तासगाव परिसर कोल्हापूरकरांकडून घेऊन तो पटवर्धनांच्या जहागिरीत समाविष्ट करण्यात आला. तेव्हापासून त्यांचे तासगावातच वास्तव्य होते. परशुरामभाऊ यांना घरातूनच गणेशभक्ती आणि युद्धकलेचा वारसा मिळाला होता. वयाच्या चौदाव्या वर्षी १७५४–५५ मध्ये त्यांनी नानासाहेब पेशव्यांसोबत कर्नाटक–सावनूर मोहिमेत भाग घेतला होता. आपल्या ४५ वर्षाच्या कारकिर्दीत शंभरहून अधिक लढायांमध्ये त्यांनी पराक्रम गाजवल्याची इतिहासात नोंद आहे.
इ.स. १७६४, १७७१ व १७७२ मध्ये म्हैसूरचा शासक हैदरअली, इ.स. १७६९ मध्ये नागपूरकर भोसले, इ.स. १७८१ मध्ये इंग्रज, इ.स. १७८६ व १७९० मध्ये टिपू सुलतान यासोबतच कोल्हापूरकर आणि सातारकरांशी झालेल्या लढायांत परशुरामभाऊंनी मोठी मर्दुमकी गाजवली. इ.स. १७९५ मधील मराठे व हैद्राबादचा निजाम यांच्यात झालेल्या खर्डा येथील लढाईत एक लाख मराठा सैन्याचे नेतृत्व परशुरामभाऊंकडे होते. पटट्णकुडी येथे १७९९ मध्ये पटवर्धन आणि कोल्हापूरचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात झालेल्या लढाईत मात्र त्यांच्या फौजेचा पराभव झाला. त्या लढाईत ते मारले गेले. आपल्या कारकिर्दीत परशुरामभाऊंनी तासगावचा मोठा विकास केला. आपल्या वास्तव्यासाठी त्यांनी तासगावमध्ये मोठा वाडा आणि आराध्य दैवत गणपतीचे देवालय उभारले.
या देवालयाबद्दल अशी आख्यायिका सांगण्यात येते की पटवर्धनांचे घराणे मूळचे कोकणातील. परशुरामभाऊ हे अनेकदा गणपतपुळे येथे दर्शनासाठी जात असत. एकदा गणपतीने त्यांना स्वप्नदृष्टान्त देऊन तासगाव येथे आपली प्रतिष्ठापना करण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी इ.स. १७७१ ते १७७९ या काळात येथे गणेशाचे सुंदर मंदिर बांधले. त्यांच्या बहुतांश युद्धमोहिमा कर्नाटक व दक्षिण भारतात झाल्या होत्या. तेथील मंदिरस्थापत्याचा त्यांच्या मनावर प्रभाव होता. त्यामुळे या मंदिराच्या बांधकामासाठी त्यांनी कर्नाटकातून गवंडी, सुतार, शिल्पकार आणले होते. त्यांच्याप्रमाणेच राजस्थानमधील चित्रकार, आंध्रमधील दगड शिल्पी आणून, पटवर्धनांनी सध्याचे गोपूरयुक्त पंचायतन मंदिर साकार केले. परशुरामभाऊ कर्नाटक मोहिमेवरून परत आल्यानंतर गुरुवार, १८ फेब्रुवारी १७७९ या दिवशी या मंदिरात त्यांनी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली. सोबतच येथे रथोत्सवाच्या रूपात गणेशोत्सवही सुरू करण्यात आला. पेशवाईमध्ये शनिवारवाड्यात मोठ्या स्वरूपात गणेशोत्सव साजरा करण्यात येत असे. त्याच प्रकारे येथेही गणेशोत्सव साजरा करण्यात येऊ लागला. याच्या सार्वजनिक स्वरूपामुळे हा महाराष्ट्रातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव मानला जातो. मात्र लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाहून याचे स्वरूप वेगळे असल्याचे मानण्यात येते. भाऊंनी सुरू केलेला श्रीगणपती रथोत्सव आजही त्यांच्या वंशजांकडून येथे मोठ्या प्रमाणावर साजरा होतो.
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या मंदिराला भक्कम आवारभिंत व नगारखाना असलेले दुमजली प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारास प्रवेशमार्गाच्या दोन्ही बाजूस नक्षीदार स्तंभ व त्यावर कमान आहे. आतील दोन्ही बाजूला पहारेकरी कक्ष आहेत. प्रवेशद्वाराच्या वरच्या मजल्यावर नगारखाना व त्यावर कौलारू छप्पर आहे. प्रवेशद्वाराच्या बाजूला रथकक्ष आहे. त्यात रथोत्सवासाठी वापरला जाणारा तीन मजली मोठा रथ आहे. प्रवेशद्वारातून पुढे आल्यावर मंदिराच्या प्रशस्त प्रांगणात प्रवेश होतो. या प्रांगणात विकसित केलेल्या उद्यानामुळे व येथील अनेक वृक्षांमुळे हा परिसर सुंदर भासतो.
पुढे मंदिराचे दुसरे प्रवेशव्दार आहे. त्यात खालील बाजूस मंदिर कार्यालय व वर सात थरांचे, ९६ फूट उंचीचे, नक्षीकामाने सुशोभित असे दाक्षिणात्य पद्धतीचे गोपूर आहे. गोपुरातील पहिल्या थरात चार नक्षीदार स्तंभ व त्यावर तीन महिरपी कमानी आहेत. लाकडी झडपा असलेल्या तीन खिडक्या आहेत. वरील थरात दोन्ही बाजूस प्रत्येकी चार देवकोष्टके, त्यात देवप्रतिमा व मध्यभागी गवाक्ष आहेत. चारही कोनांवर चार मेघडंबऱ्या व त्यावर शिखरे आहेत. वरील तीन थरांत दोन्ही बाजूस प्रत्येकी चार देवकोष्टके, त्यात देवप्रतिमा व मध्यभागी गवाक्ष आहेत. गोपुराच्या शीर्षभागी तीन कळस आहेत.
गोपुरातील प्रवेशद्वार तीन नक्षीदार द्वारशाखांनी सुशोभित आहे. त्याच्या ललाटबिंबावर गणपती व मंडारकावर कीर्तीमुख आहे. प्रवेशद्वाराच्या आतील दोन्ही बाजूला असलेल्या पहारेकरी कक्षांना महिरपी कमानी आहेत. प्रवेशद्वाराच्या छतात नक्षीदार घुमट आहे. गोपुराच्या दोन्ही बाजूस दोन चौथरे व त्यावर सुमारे तीस फूट उंचीच्या चार थरांच्या षटकोनी दीपमाळा आहेत. या दोन्ही दीपमाळांपासून मंदिराच्या सभामंडपापर्यंत भाविकांना बसण्यासाठी आसनांची रचना आहे.
पुढे सभामंडपासमोर दोन्ही बाजूस प्रत्येकी चार स्तंभांवर छत व त्यावर शिखर असलेली दोन लहान मंदिरे आहेत. चौकोनी शिखरात बारा देवकोष्टके व २० उपशिखरांची रचना आहे. शीर्षभागी आमलक व त्यावर कळस आहे. या मंदिरांच्या तिन्ही बाजूंस जाळीदार भिंतींची व महिरपी कमानींची रचना आहे. यातील डाव्या बाजूच्या नंदीकेश्वर मंदिरात नंदीची मूर्ती व उजव्या बाजूच्या गरुडेश्वर मंदिरात गरुडाची मूर्ती आहे.
सभामंडप समोरील बाजूने खुला आहे व त्यात प्रत्येकी पाच नक्षीदार चौकोनी स्तंभांच्या चार रांगा आहेत. स्तंभांचा पाया काहीसा रुंद आहे. स्तंभांच्या चारही बाजू रजतपटल आच्छादित आहेत व त्यावर नक्षीकाम आहे. स्तंभांच्या शीर्षभागी कणी, त्यावरील हस्तांवर तुळई व तुळईवर छत आहे. येथील छतावरही नक्षीकाम आहे. येथील सर्व स्तंभ एकमेकांना नक्षीदार महिरपी कमानीने जोडलेले आहेत. सभामंडपात उजव्या बाजूस भिंतीजवळ उत्सवकाळात वापरली जाणारी पालखी ठेवलेली आहे.
पुढे गर्भगृहाच्या नक्षीदार प्रवेशद्वारावरील द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी व ललाटबिंबावर गणपती विराजमान आहे. ललाटपट्टीच्या वरील बाजूस असलेल्या महिरपात विविध नक्षी कोरलेल्या आहेत. मंडारकावर दोन्ही बाजूंस सिंहशिल्पे व मध्यभागी चंद्रशिला आहे. गर्भगृहात सुवर्ण सिंहासनावर बसलेली, उजव्या सोंडेची चतुर्भुज गणेशमूर्ती आहे. या मूर्तीच्या वरील हातांमध्ये पाश व अंकूश तर खालचे हात वरदहस्त व दानहस्त आहेत. गणेशाच्या दोन्ही बाजूंस वज्रपिठावर मूषक मूर्ती आहेत. मंदिराच्या छतावर चहूबाजूंनी कठडा आहे. गर्भगृहाच्या छतावर तीन शिखरे आहेत. त्यातील मुख्य शिखर तीन थरांचे आहे. पहिल्या दोन थरांत प्रत्येकी बारा देवकोष्टके व त्यांवर शिखरे आहेत. देवकोष्टकांत विविध देवतांच्या मूर्ती आहेत. शिखरात शीर्षभागी घुमट व त्यावर कळस आहे. मुख्य शिखराच्या डाव्या व उजव्या बाजूस घुमटाकार शिखर, त्यावर आमलक व कळस आहेत.
या मंदिरात भाद्रपद गणेश चतुर्थी हा दीड दिवसांचा मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. राजवाड्यात पार्थिव गणेशाची स्थापना करून दुसऱ्या दिवशी ही मूर्तीं व तासगाव संस्थानची १२५ किलो वजनी पंचधातूची गणेश मूर्ती रथातून वाजतगाजत मंदिरात आणली जाते. तेथे आरती करून पुढे ही मिरवणूक काशी विश्वेश्वराच्या मंदिरापर्यंत नेली जाते. तेथे पर्थिव गणेशाचे कापूर ओढ्यात विसर्जन करून रथ पुन्हा मंदिराकडे येतो. अनेक भाविकांचे हा रथ ओढण्याचे नवस असतात. त्यामुळे दोरखंडाच्या साहाय्याने रथ ओढण्यासाठी हजारो भाविक सरसावतात. मिरवणुकीदरम्यान रथापुढे हत्ती नाचवण्याची, तसेच गुलाल व पेढे उधळण्याची परंपरा आहे. या रथोत्सवाला सुमारे २५० वर्षांची परंपरा आहे. मंदिरात गणेश जयंती, संकष्टी चतुर्थी, मंगळवार आदी दिवशी भाविकांची वर्दळ असते.