चिरंजीव हनुमान संन्यासी जनांचे प्रेरणास्थान आहे. संकटमोचक हनुमान सामान्य संसारी माणसांना संकटातून तारून नेणारा तारक वाटतो. शक्तीची देवता म्हणून शक्ती उपासक स्वामी समर्थांनी गावोगावी हनुमानाची मंदिरे स्थापन केली. अनेक गावात स्थापित व स्वयंभू मारूतीची मंदिरे आहेत. असेच एक स्वयंभू मारुतीचे प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिर वाळवा तालुक्यातील डोंगरवाडी गावात आहे. येथील जागृत मारुती नवसाला पावतो व भक्तांना संकटातून तारून नेतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळेच दर शनिवारी हजारो भाविक या मंदिरात दर्शनासाठी येत असतात.
सुमारे ९०० वर्षापूर्वी डोंगरवाडी गावातील एका भाविकाला हनुमानाने स्वप्नदृष्टांत देवून आपण या ठिकाणी असल्याचे सांगितले. दृष्टांतानुसार गावकऱ्यांनी घनदाट झाडीच्या परिसरात शोध घेतला असता ही स्वयंभू पाषाण मूर्ती सापडली. त्याच वेळी मूर्तीचा अभिषेक करून गावकऱ्यांनी लहानसे मंदिर बांधले. या हनुमानाची स्थापना झाल्यापासून गावात मांसाहार बंद झाला. असे सांगितले जाते की या हनुमानाला मांसाहार आणि रॉकेल वर्ज्य आहे. त्यामुळे गावात कोणीही दिवा, स्टोव्ह किंवा चूल पेटवण्यासाठी रॉकेलचा वापर करीत नाही. जेव्हा गावात विजेची सुविधा नव्हती, तेव्हाही येथे कोणत्याही कारणासाठी रॉकेलचा वापर केला जात नव्हता. मृतात्म्याला अग्नी देण्यासाठीही या गावात रॉकेलऐवजी खाद्यतेलाचा वापर केला जातो. मागील अनेक वर्षांपासून या गावात ही प्रथा आहे.
या स्थानाचे एक वैशिष्ट्य म्हणजे, या मंदिराजवळ कोणीही घर बांधत नाही. एवढेच नव्हे, तर तेथे पूर्वी असलेली घरेही दूर नेण्यात आली. याबाबत अशी आख्यायिका सांगण्यात येते की डोंगरवाडी गावात हनुमान प्रकट झाल्यावर येथील एका भक्ताला दृष्टांत झाला की ‘माझ्या आजुबाजुला संसार नको आहेत. ग्रामस्थांनी एक बैलगाडी मंदिरापासून ओढत न्यावी व ती जेथे मोडेल तेथे हे गाव वसवावे.’ त्याप्रमाणे केले असता मंदिरापासून साधारणतः एक किमी अंतरावर ही बैलगाडी मोडली. स्वप्नदृष्टांताप्रमाणे मंदिराजवळ असलेली सर्व कुटुंबे ही त्यानंतर जेथे बैलगाडी मोडली त्या परिसरात स्थलांतरीत झाली. त्यामुळे आजही या मंदिराजवळ कोणी घर बांधत नाही.
या मंदिराच्या पेव्हर ब्लॉक आच्छादित प्रशस्त प्रांगणात चौथरा व त्यावर दीपमाळ आहे. दीपमाळेत दीप प्रज्वलन करण्यासाठी स्वतंत्र हस्त आहेत. प्रांगणातील वटवृक्षाच्या बाजूला चौथरा व त्यावर स्तंभ आहे. बाजूला तुलसी वृंदावन व त्यापुढे एका चौथऱ्यावर विठ्ठल बिरदेवाच्या पादुका आहेत. पुढे उंच जगतीवर मंदिर आहे.
प्रांगणातून पाच पायऱ्या चढून मंदिराच्या मुखमंडपात प्रवेश होतो. मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. मुखमंडपात दर्शनी भागात दोन चौकोनी स्तंभ आहेत. पुढे मुखामंडपापेक्षा काहीसा उंच सभामंडप आहे. खुल्या स्वरूपाच्या या सभामंडपात प्रत्येकी पाच चौकोनी स्तंभांच्या चार रांगा आहेत. स्तंभावर तुळई व तुळईवर छत आहे. सभामंडपाच्या बाह्य बाजुला भाविकांच्या सुविधेसाठी दर्शनरांगेची व्यवस्था आहे. सभामंडपावर चौकोनी छत व त्यावर कळस आहे. येथून पुढे दोन्ही बाजूस बंदिस्त स्वरूपाचे अंतराळ आहे. अंतराळात हवा खेळती राहण्यासाठी गवाक्ष आहेत. अंतराळात एका चौकोनी खोलगट भागात देवाचा पाषाण आहे. येथे भाविकांकडून कौल लावला जातो. याशिवाय येथे शिवपिंडी व गणेशाची पितळी मूर्ती आहे. अंतराळात भिंतीलगत वज्रपिठावर श्रीराम, लक्ष्मण, सीता व हनुमान यांच्या मूर्ती आहेत.
पुढे गर्भगृहाचे प्रवेशव्दार आहे. ललाटबिंबावर गणपती व ललाटपट्टीत पानाफुलांची नक्षी आहे. गर्भगृहात वज्रपिठावर हनुमानाची शेंदूरचर्चित स्वयंभू पाषाण मूर्तीं आहे व मूर्तीशेजारी चांदीची गदा आहे. गर्भगृहाच्या छतावर निमुळते होत गेलेले दोन थरांचे ऊंच शिखर आहे. शिखराच्या पहिल्या थरात बारा देवकोष्टके व त्यावर लघूशिखरे आहेत. शिखरात मध्यभागी कमळदल रिंगण आहे व त्यावरील दुसऱ्या थरावर उभ्या धारेची नक्षी आहे. शिखरात शीर्षभागी एकावर एक असे दोन आमलक, त्यावर कळस व ध्वजपताका आहे.
मंदिराच्या परिसरात येडोबा देवाचे मंदिर आहे. या मंदिराबाहेर चौथऱ्यावर नंदी व पुढे कासव आहे. मंदिरात वज्रपिठावर येडोबा देवाची घोड्यावर स्वार मूर्ती व बाजूला दत्तात्रेयाची मूर्ती आहे. येथून पुढे डोंगराई देवीचे मंदिर आहे. मंदिरात डोंगराई देवीची मूर्ती व पाषाण आहे. या मंदिराच्या बाजूला सप्तमातृका मंदिर आहे. मंदिरात वज्रपिठावर सप्तमातृकापट व इतर देवतांचे पाषाण आहेत. परिसरात अन्नछत्र मंडप आहे. येथे सर्व वार्षिक उत्सवांच्या वेळी तसेच दर शनिवारी महाप्रसादाचे आयोजन केले जाते.
गुढीपाडव्याच्या चौथ्या दिवशी येथे मोठी यात्रा भरते. त्यावेळी परिसरातील गावांतून येथे सासनकाठ्या येतात. याशिवाय हनुमान जयंती, चैत्र पाडवा, राम नवमी व महाशिवरात्री आदी वार्षिक उत्सव साजरे केले जातात. सर्व उत्सवांच्या वेळी हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. दर शनिवारी येथे देवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी उसळते.