रंकाळा हा कोल्हापूरमधील सर्वांत मोठा जलाशय व येथे येणाऱ्या पर्यटकांचे आकर्षणस्थान. महालक्ष्मी मंदिराप्रमाणेच रंकाळा तलाव ही कोल्हापूरची एक ओळख आहे. या तलावास रंकाळा हे नाव लाभले ते या तीर्थक्षेत्राचा क्षेत्रपाल असलेल्या रंकभैरवावरून. रंकभैरव हा महालक्ष्मीचा परमभक्त मानला जातो. तिच्या वरदानामुळे तो येथील तलावात तीर्थरूपाने, तर किनाऱ्यावर लिंगरूपाने विराजमान आहे. याच रंकभैरवाचे मंदिर महालक्ष्मी मंदिरापासून जवळच मंगळवार पेठेत आहे. हेमाडपंती स्थापत्यशैलीतील हे मंदिर सुमारे ९०० वर्षे पुरातन असल्याचे सांगण्यात येते.
कोल्हापूर गॅझेटियरमधील नोंदीनुसार, येथे सातव्या वा आठव्या शतकात महालक्ष्मीच्या मंदिराची स्थापना झाली. त्याच्या आधीपासून या परिसरात एकूण सहा मोठ्या वस्त्या होत्या. ब्रह्मपुरी, उत्तरेश्वर, खोलखंडोबा, पद्माला, रावणेश्वर आणि रंकाळा अशी त्यांची नावे होती. यातील ब्रह्मपुरी ही सर्वांत जुनी वस्ती, तर उत्तरेश्वर व खोलखंडोबा या तिच्या वाड्या होत्या. पद्माला ही वस्ती पद्माला तलावाकाठी होती, तर रावणेश्वर आणि रंकाळा या स्वतंत्र वाड्या होत्या. महालक्ष्मीच्या मंदिराची स्थापन झाल्यानंतर ते कोल्हापूरचे मध्यवर्ती केंद्र बनले. जैन ग्रंथांत या तलावाच्या निर्मितीची कथा सांगितली आहे, ती अशी
की शिलाहार राजा मारसिंह (कार्यकाळ १०५५ ते १०७७) याचा पुत्र गंडरादित्य याने या परिसरात ३६० जैन मंदिरे बांधली. त्याच्या काळातच महालक्ष्मीच्या मंदिरावर कळस चढवण्यात आला. या बांधकामासाठी लागणारा दगड रंकाळा येथे खाण खणून त्यातून काढण्यात आला. पुढे एका भूकंपात ही खाण अधिक मोठी झाली आणि त्यात पाणी साठले. या पाण्याच्या तळाशी रंकभैरवाचे सोन्याचे मंदिर असल्याची वंदता आहे.
येथील रंकभैरवासंदर्भात आख्यायिका अशी की प्राचीन काळी सर्वत्र प्रचंड दुष्काळ पडला होता. कोल्हापूरमध्ये महालक्ष्मीचे वास्तव्य असल्याने येथे दुष्काळाचा मागमूसही नव्हता. येथे पाण्याचा सुकाळ होता. ते पाहून अनेक लोक कोल्हापूरमध्ये स्थलांतरित झाले. येथे पाण्याची पळवापळवी सुरू झाली. तेव्हा या तीर्थाच्या रक्षणासाठी महालक्ष्मी म्हणजेच अंबाबाईने अष्ट दिशांना अष्ट भैरवांची नेमणूक केली. त्यातील रंकभैरवाने उत्तमरीत्या पाणीसाठ्याचे रक्षण केले. तेव्हा देवीने त्याला या क्षेत्राचा क्षेत्रपाल म्हणून नियुक्त केले. करवीरचा कोतवाल असेही त्यास म्हणतात. महालक्ष्मी मंदिराच्या दक्षिण दरवाजातील रस्त्याने सरळ चालत गेले असता काही मिनिटांवर रंकभैरवाचे मंदिर आहे. या प्राचीन मंदिराचे बांधकाम नेमके कधी झाले याची ठोस माहिती उपलब्ध नाही. काही अभ्यासकांच्या मते ११व्या वा १२व्या शतकात या मंदिराची उभारणी झाली असावी. सरदार बाळासाहेब यादव चौकातील मुख्य रस्त्यावरील एका बोळाच्या आरंभी असलेल्या प्रवेशकमानीतून या मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. येथे काही अंतरावर श्री दत्त श्रीधराश्रम हा आश्रम आहे. तेथून नजीकच, काही पायऱ्या चढून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो.
या मंदिराच्या चारही बाजूंनी काहीशी भग्न झालेली तटबंदी आहे. प्रांगणात प्रवेश करताच समोर दिसतात त्या उंच दगडी चौथऱ्यावर बांधलेल्या सुबक दीपमाळा. मंदिराच्या चारही बाजूंना अशा दीपमाळा आहेत. मंदिरासमोर एका चौथऱ्यावर तुळशीवृंदावन आहे. कोल्हापूर संस्थानातील जप्तनमुलुख व सरनौबत हे किताब धारण करणारे सरदार रेखुजी बिन नरसोजीराव जाधव यांच्या अखत्यारित हे मंदिर होते. या प्रांगणातील काही तुळशीवृंदावने ही जाधव घराण्यातील काही स्त्रियांची समाधीस्थाने आहेत. मंदिराच्या मागच्या बाजूस पारावरील देवळीत देवीचे स्थान आहे. येथे देवीची एक प्राचीन दगडी मूर्ती विराजमान आहे.
ओवरी, सभामंडप आणि गर्भगृह अशी या दगडात बांधलेल्या मंदिराची संरचना आहे. मंदिराच्या गर्भगृहावर नव्याने बांधलेले उंच शिखर आहे. मंदिर उंच जगतीवर उभारलेले आहे. समोर संगमरवरी ओटा व येथून चार पायऱ्या चढून मंदिराच्या ओवरीत प्रवेश होतो. या ओवरीस तसेच सभामंडपास कोरीव काम केलेले दगडी स्तंभ आहेत. खालच्या बाजूस चौरसाकार, मधल्या भागात अष्टकोनी व गोलाकार, शीर्षभागात कणी आणि त्यावर तुळई पेलणारे हस्त अशी या स्तंभांची रचना आहे. या स्तंभांच्या मधल्या स्तंभदंड भागात पानाफुलांची नक्षी कोरलेली आहे. मंदिर स्थापत्य अभ्यासकांच्या मते अशा प्रकारची स्तंभरचना ही प्रामुख्याने चालुक्यकालीन मंदिरांत आढळते. या मंदिरावर त्या स्थापत्य शैलीचा प्रभाव यातून स्पष्ट दिसतो.
मंदिराच्या सभामंडपाचे त्रिशाखीय प्रवेशद्वार पितळी पत्र्याने मढवलेले आहे. चौकटीच्या बाजूस मोठा सपाट द्वारस्तंभ आहे. दरवाजाचा उंबरठा दगडी आहे. त्यात अर्धचंद्रशीलेच्या ऐवजी चौकोनी भाग आहे. द्वारचौकटीच्या ललाटबिंबस्थानी पितळी गणेशमूर्ती आहे. आत संगमरवरी फरसबंदी व दगडी स्तंभ आहेत. मध्यभागी पितळी कूर्मशिल्प आहे.
गर्भगृहाचे प्रवेशद्वारही दगडात बांधलेले आहे. त्यास वरील बाजूस महिरपी कमान आहे. द्वारचौकटीवर भौमितिक नक्षीकाम आहे. बाजूच्या कोरीव द्वारस्तंभांच्या स्तंभदंड भागांत मयूरप्रतिमा कोरलेल्या आहेत. येथील गर्भगृह आकाराने मोठे आहे व त्यावर दगडी बांधकामाचे वितान आहे. आत उंच संगमरवरी अधिष्ठानावर रंकभैरवाची उभी, मराठेशाही पगडी घातलेली पाषाणमूर्ती विराजमान आहे. मूर्तीच्या पाठशिळेवर गोलाकार नक्षीकाम आहे व वरच्या टोकावर ‘ळ’ अक्षराच्या आकाराचा विळखा घातलेली आणि फणा उभारलेली पंचमुखी नागमूर्ती आहे. या मूर्तीच्या मागे सोनेरी पत्र्याने मढवलेले सुंदर मखर आहे. मूर्तीशेजारी काळभैरवाची पितळी अश्वारूढ मूर्ती आहे.
मंदिराच्या एका बाजुला विठ्ठल रखुमाईचे मंदिर, तसेच दगडी बांधणीचे नेमीनाथ दिगंबर जैन मंदिर आहे. रंकभैरव मंदिरांच्या पुजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अठरा पगड जाती, अठरा अलुतेदार, बारा बलुतेदार अशा सर्व समुदायांचे रंकभैरव मंदिर हे श्रद्धास्थान मानले जाते. मंदिरामध्ये नियमित अभिषेक, पूजा–अर्चा, नंदादीप व सनई चौघडा विधी पार पडले जातात. दसऱ्याच्या दिवशी अंबाबाईची पालखी व रंकोबा देवाची पालखी या दोन्ही पालख्या बाहेर पडतात. त्यांच्या भेटीचा सोहळा पंचगंगा घाटावर साजरा केला जातो.