निसर्ग सौंदर्याने नटलेल्या राधानगरी तालुक्यातील राधानगरी, काळम्मा, तुलसी या तीन धरणांमुळे येथील परिसर सुजलाम् सुफलाम् बनला आहे. नद्या आणि घनदाट जंगलाने व्यापलेला हा परिसर व येथील गूढ अगम्य वातावरण यामुळेच या भागात गूढ उपासना पद्धती विकसीत झाली असावी. वामाचारी, तांत्रिक, अघोरी, तामसी, गूढ अशा विविध नावाने ओळखली जाणारी आध्यात्मिक साधना केंद्रे देशात सर्वत्र आहेत. दुर्गमानवाड येथील विठलाई देवीचे मंदिर हे तामसी व सात्विक अशा दोन्ही पद्धतीच्या उपसानेचे केंद्र मानले जाते. ही ग्रामदेवता जागृत व नवसाला पावणारी आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
तुलसी नदीच्या उगमस्थानी असलेले देवीचे मूळ स्थान सुमारे आठशे ते हजार वर्षांपूर्वीचे असावे असे मानले जाते. त्या ठिकाणी तंत्र साधकांच्या उपासनेतील विविध मूर्ती आहेत. असे सांगितले जाते की घनदाट जंगलाने वेढलेल्या या देवालयात सामान्य भाविकांना येणे शक्य नाही हे लक्षात घेऊन देवीने खाली येऊन, डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या या गावात आपले दुसरे स्थान निर्माण केले. सोळाव्या शतकातील प्रसिद्ध शक्ती उपासक नारायण स्वामी यांना विठलाई देवीने या ठिकाणी दर्शन दिले होते. यावरून हे मंदिर कमीतकमी पाचशे वर्षांपूर्वीचे आहे हे सिद्ध होते. एका आख्यायिकेनुसार, प्राचीन काळी या परिसरात तारकासुर व व्याघ्रासुर या राक्षसांनी धुमाकूळ घातला होता. विठलाई देवीने त्या राक्षसांचा संहार करून आपल्या भक्तांचा उद्धार केला होता.
मंदिरासमोर घडीव दगडांत बांधलेला दोन थरांचा चौथरा व त्यावर दीपमाळ आहे. चौथऱ्याच्या दुसऱ्या थरात चारी कोनांत गजराजांची अर्धशिल्पे व त्यावर दोन थरांची गोलाकार दीपमाळ आहे. या दीपमाळेत दीप प्रज्वलन करण्यासाठी स्वतंत्र २४ हस्त आहेत. दीपमाळेच्या उजव्या बाजूला दोन चौकोनी स्तंभ असलेल्या मुखमंडपाची रचना आहे. मुखमंडपासमोर जमिनीत रोवलेला चौकोनी दगडी स्तंभ आहे. मंदिराचा दुमजली सभामंडप खुल्या प्रकारचा आहे व त्याच्या दोन्ही बाजुस प्रत्येकी सहा गोलाकार स्तंभ आहेत. बाह्य बाजूच्या स्तंभांत पायाकडे कमळ फुलाची नक्षी आहे. बाह्य बाजुचे सर्व स्तंभ एकमेकांना महिरपी कमानीने जोडलेले आहेत. कमानीच्या वरील बाजूस बाह्य भिंतीत ३२ देवकोष्टके आहेत. सभामंडपात मध्यभागी प्रत्येकी पाच गोलाकार स्तंभांच्या दोन रांगा आहेत. येथे सुमारे १० फूट रुंद व २० फूट लांब चौथरा आहे. उत्सव काळात या चौथऱ्यावर देवीची पालखी ठेवली जाते तसेच विविध धार्मिक विधी पार पाडले जातात. पुढे अंतराळाच्या प्रवेशद्वारावरील पायऱ्यांवर व्याघ्रशिल्पे आहेत. अंतराळाच्या द्वारशाखांवर पानाफुलांच्या नक्षी आहेत व ललाटबिंबावर गणेश विराजमान आहे. बंदिस्त स्वरूपाच्या अंतराळातून बाहेर पडण्यासाठी उजव्या व डाव्या बाजूला द्वार आहेत. अंतराळास प्रवेशद्वाराकडे व बाह्य बाजूस स्तंभ आहेत व ते एकमेकांना अर्धंचंद्र कमानीने जोडलेले आहेत. कमानींच्या वरच्या बाजूस गवाक्षे आहेत.
गर्भगृहातील वज्रपीठावर विठलाई देवीची काळ्या पाषाणातील चतुर्भुज मूर्ती आहे. देवीच्या हातात खड्ग, डमरू, त्रिशूल व अमृत पात्र आहे. मूर्तीच्या मागे असलेल्या रजत प्रभावळीत दोन्ही बाजूस अंगरक्षक व वरच्या बाजूस कीर्तीमुख आहे. प्रभावळीत पानाफुलांची नक्षी कोरलेली आहेत. पाषाण मूर्तीच्या बाजूलाच पितळी उत्सवमूर्ती आहे. वज्रपिठाच्या दोन्ही बाजूस पितळी व्याघ्रमूर्ती व बाजूला इतर देवतांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या छताला विविध रंगातील कपड्यात नारळ व इतर वस्तू बांधून टांगून ठेवलेल्या आहेत. हे गूढ साधनेचे प्रकार असल्याचे सांगितले जाते.
गर्भगृहाच्या छतावर ५१ फूट उंचीचे पाच थरांचे अष्टकोनी शिखर आहे. पहिल्या चार थरात प्रत्येकी आठ देवकोष्टके व त्यांच्या मधील जागेत आठ लघुशिखरे आहेत. देवकोष्टके व लघुशिखरांवर कळस आहेत. शिखराच्या वरच्या थरात छत्र व त्यावर एकावर एक असे दोन आमलक आणि त्यावर कळस आहे. उरूश्रृंग प्रकारच्या या शिखरावर एकूण ६५ कळस आहेत. मंदिराच्या मागील बाह्य बाजूने वरील मजल्यावर जाण्यासाठी जीना आहे. मंदिरात नवरात्र, दसरा, दिवाळी, दर महिन्याची पौर्णिमा व अमावस्या तसेच अष्टमी आदी दिवशी विशेष उत्सव साजरे केले जातात.
पाच दिवस चालणाऱ्या वार्षिक जत्रोत्सवाची सुरवात फाल्गुन कृष्ण त्रयोदशीपासून होते. या पाच दिवसांत मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन, जागरण, गोंधळ आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावेळी देवी पालखीत बसून ग्रामप्रदक्षिणा करते. या यात्रेच्यावेळी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या राज्यातून हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी तसेच नवस फेडण्यासाठी येतात.