
पुणे जिल्ह्यातील प्रतिकेदारेश्वर म्हणून तळेगाव दाभाडे येथील केदारेश्वर मंदिराची ओळख आहे. हे अत्यंत सुंदर आणि शांत असे धार्मिक स्थळ आहे. लहानसे उद्यान, हिरवळीसह अतिशय टापटीप व स्वच्छ असलेला येथील परिसर मन प्रसन्न करतो.
तळेगाव-दाभाडे हे पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील एक ऐतिहासिक ठिकाण. पेशव्यांच्या कारकिर्दीत नावारूपास आलेल्या दाभाडे घराण्यातील खंडेराव दाभाडे हे या गावाचे संस्थापक. अठराव्या शतकातील दाभाडे हे एक प्रसिद्ध मराठा घराणे. मराठा सत्तेच्या काळात या घराण्यातील पुरुषांनी आपल्या कर्तृत्वावर मानाची पदे मिळविली. या घराण्याचा मूळ पुरुष बजाजी पुण्याजवळील तळेगावचे पाटील होते. त्यांचा मुलगा येसाजी शिवाजी महाराजांचा सेवक म्हणून काम करीत असे. शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराजांनी त्यांची नेमणूक रायगडावर केली होती. पुढे संभाजी महाराजांच्या हत्येनंतर बजाजी राजाराम महाराजांसोबत जिंजीला गेले. खंडोजी व शिवाजी ही दोन मुले त्यावेळी त्यांच्यासोबत होती. त्यापैकी खंडोजी यांनी आपल्या पराक्रमाने सेनापती पद मिळवले. त्यांची जिंजी येथील कामगिरी पाहून राजाराम महाराजांनी खंडेरावांना दाभाडे गाव इनाम दिले, असा उल्लेख इतिहासात आहे.
केदारेश्वर मंदिराचा परिसर खासगी मालकीचा आहे. या संपूर्ण परिसराला कुंपण घालण्यात आले आहे. या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविक, पर्यटकांना इंद्रायणी हेरिटेज सोसायटीच्या मुख्य दरवाजातून आत जावे लागते. या ठिकाणी काही प्राचीन अवशेष अजूनही कुंपणाच्या बाहेर दिसतात; परंतु ते खराब अवस्थेत आहेत. मुख्य दरवाजातून प्रवेश केल्यानंतर विस्तीर्ण असा मंदिर परिसर दिसतो. सुंदर अशा बागेतून बांधीव रस्त्याने पुढे गेल्यावर समोरच प्राचीनत्वाच्या खाणाखुणा सांगणारे केदारेश्वराचे मंदिर दिसते
मंदिरात प्रवेश करण्यापूर्वीच सर्वप्रथम जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन होते. तुकोबाराय शिवाजी महाराजांना उपदेश करीत असल्याचे या शिल्पातून दिसून येते. मुख्य मंदिराच्या समोरच चौथऱ्यावर कोरीव नंदीची मूर्ती आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दगडी चौकटीवर रेखीव कलाकुसर केलेली दिसते. याच चौकटीवर वरच्या बाजूला गणपतीची मूर्ती कोरलेली आहे. आत प्रवेश केल्यानंतर सभामंडप, चारही भिंतींमधील देवड्यांमध्ये गणपतीसह विविध देवतांच्या मूर्ती दिसतात. आत गर्भगृहात केदारेश्वराची पिंडी आहे. पिंडीच्या मागील भिंतीतील देवड्यांमध्ये गणपती आणि पार्वतीमातेच्या मूर्ती दिसतात.
केदारेश्वर मंदिराच्या उजव्या बाजूला प्रसिद्ध घुमट विहीर आहे. सुंदर रेखीव काळ्या पाषाणात बांधलेली ही ऐतिहासिक विहीर आहे. खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. या पायऱ्या उतरून अगदी थेट पाण्यापर्यंत जाता येते. या विहिरीमध्येच दोन कमानी आहेत. त्यावरील एका शिलालेखात दाभाडे घराण्याच्या चार पिढ्यांचा उल्लेख आढळतो. विहिरीतील पाणी स्वच्छ, नितळ व थंडगार आहे.
त्यात मासेही दिसतात. मुख्य विहिरीच्या भागामध्ये वरच्या बाजूला रहाट लावण्याची जागा दिसते. आता तिथे रहाट नसला तरी पूर्वीच्या काळी रहाटाने पाणी काढले जात असावे. विशेष म्हणजे या विहिरीच्या भिंतीमध्येही एक लहानसे शंकराचे मंदिर आहे. रहाटाची जागा आहे तिथून पायऱ्या उतरून या मंदिराकडे जाता येते. येथे महाशिवरात्री व श्रावणी सोमवार या दिवसांमध्ये भाविकांची गर्दी असते.
खंडेराव दाभाडे यांच्या कुटुंबाने हे मंदिर बांधल्याचे सांगितले जात असले, तरीही काही इतिहास अभ्यासकांच्या मते हे मंदिर यादव काळातील म्हणजे अगदी ११०० वर्षे प्राचीन आहे. काहींच्या मते या मंदिराचे नाव पूर्वी घुमटेश्वर असे होते.
पुणे शहराजवळील तळेगाव दाभाडे हे पुणे उपनगरी रेल्वेवरील एक महत्त्वाचे स्थानक आहे. डेक्कन एक्स्प्रेस, कोयना एक्स्प्रेस या गाड्यांनाही तळेगाव येथे थांबा आहे. विशेष म्हणजे या रेल्वेमार्गालगतच हे मंदिर आहे. भाविकांना सकाळी ७.३० ते दुपारी १२.३० आणि सायंकाळी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत गाभाऱ्यात जाऊन केदारेश्वराचे दर्शन घेता येते.