भद्रकाली मंदिर

पाटगाव, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर

वैनगंगा नदीच्या खोऱ्यातील भुदरगड तालुका हा घनदाट वने व दऱ्या-खोऱ्यांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील मधाचे गाव म्हणून पाटगावची ओळख निर्माण झाली ती येथील नैसर्गिक साधन संपत्ती अबाधित असल्यामुळे. प्राचीन काळी निबीड अरण्याच्या या प्रदेशात शंकर व भवानी पूजनाची परंपरा आणि त्यामुळेच निर्माण झालेली भव्य देवालये आजही भाविकांच्या आणि स्थापत्य अभ्यासकांच्या मनाला भुरळ घालतात. गावातील हेमाडपंती स्थापत्यशैलीतील भद्रकाली मंदिर व मंदिरातील नंदी हे येथील वैशिष्ट्य आहे. जागृत भद्रकाली देवी नवसाला पावणारी आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

या मंदिराचे दगडी बांधकाम सुमारे तेराव्या शतकातील असावे, असे मत अभ्यासकांकडून व्यक्त केले जाते. मंदिरशास्त्रानुसार त्या-त्या देवालयात गर्भगृहासमोर तेथील मुख्य देवतेच्या वाहनाची मूर्ती बसवली जाते. येथे मात्र हे देवीचे मंदिर आहे व त्यात शंकराचे वाहन असलेल्या नंदीची मूर्ती आहे, हे विशेष. याबाबत आख्यायिका अशी की प्राचीन काळी या घनदाट वनात शंकर व पार्वती द्युत खेळत असताना त्यात शंकरांचा पराजय झाला. शंकर हरले म्हणून पार्वती त्यांच्यावर हसली. पार्वतीने थट्टा केल्याने शंकरांना राग आला व ते येथून काही अंतरावर राईत जाऊन तपाला बसले. महादेव निघून गेले तेव्हा त्यांनी नंदीला पार्वतीच्या रक्षणासाठी सोबत राहण्याची आज्ञा केली. म्हणून या ठिकाणी नंदी पार्वती मातेच्या मंदिरात विराजमान आहे.

पाटगावच्या सीमेवर डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या या मंदिरात जाण्यासाठी सुमारे पन्नास पायऱ्या आहेत. या पायरी मार्गावर भाविकांच्या सोयीसाठी पत्र्याची शेड उभारण्यात आलेली आहे. पायऱ्या संपल्यावर मंदिर परिसराचे, एखाद्या गडाच्या प्रवेशद्वारासारखे असणारे भक्कम दुमजली प्रवेशद्वार दिसते. या दगडी प्रवेशद्वाराच्या वरच्या मजल्यावर नगारखाना आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजुला लहान लहान दीपकोष्ठके आहेत. या प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस दोन्हीकडे देवड्या (पहारेकरी कक्ष) आहेत. येथून पुढे पेव्हर ब्लॉक लावलेल्या मंदिराच्या विस्तीर्ण प्रांगणात प्रवेश होतो. या प्रांगणास दगडी सीमाभिंत आहे. येथून मंदिराकडे जाताना प्रथम मारुतीचे मंदिर दिसते. येथे मारुतीरायाची विश्रांती घेत असलेल्या अवस्थेतील मूर्ती आहे. येथे एका शिळेवर मारूतीराया बसलेले आहेत. त्यांचा एक हात पोटावर तर दुसरा हात आशीर्वाद मुद्रेत आहे. येथून पुढे गेल्यानंतर, मंदिराच्या मागच्या बाजूस दोन प्राचीन उंच दीपमाळा व खुला ‘भद्रकाली रंगमंच’ आहे. या दीपमाळांच्या खालील बाजुस कीर्तिमुख शिल्पे आहेत.

जमिनीपासून उंच जगतीवर असलेल्या भद्रकाली देवीच्या मंदिरातील सभामंडपात येण्यासाठी पाच पायऱ्या आहेत. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. अंतराळ व गर्भगृहाचे दगडी बांधकाम हेमाडपंती स्थापत्य शैलीतील आहे.

सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांवर दोन्ही बाजूस सिंहशिल्पे आहेत. अर्धखुल्या प्रकारच्या सभामंडपात भाविकांना बसण्यासाठी कक्षासनांची रचना आहे. सभामंडपात फरसबंदी केलेली आहे. मध्यभागी कासवमूर्ती आहे. सभामंडपात अंतराळाच्या दर्शनी भिंतीजवळ पाच देवतांच्या तरंगकाठ्या ठेवलेल्या आहेत. अंतराळाचे प्रवेशद्वार दगडी आहे व द्वारचौकटीलगत अर्धस्तंभ आहेत. चौकटीच्या ललाटबिंबस्थानी गणेशमूर्ती आहे. या गणेशाच्या दोन्ही बाजूस व अर्धचंद्राकार मंडारकावर कमळ फुलाची नक्षी कोरलेली आहे. दरवाजाच्या दोन्ही बाजूस खांबांवर स्त्री द्वारपालांच्या प्रतिमा रंगविलेल्या आहेत. बंदिस्त स्वरूपाच्या अंतराळात उत्सवकाळात वापरली जाणारी देवीची पालखी ठेवलेली आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर एका चौथऱ्यावर नंदीची पाषाणातील मूर्ती आहे. रंग दिलेल्या या नंदीच्या पाठीवर झूल आहे. त्या वस्त्रावरील बारकावे, नक्षी, त्यास लावलेले गोंडे हे सारे बारीक तपशीलवार कोरलेले आहे. नंदीच्या गळ्यात चार वेगवेगळ्या प्रकारच्या घुंगुरमाळा आहेत. नंदीच्या मूर्तीसमोर दगडात कोरलेली कूर्मप्रतिमा आहे. अंतराळाच्या छतात दगडांच्या विशिष्ट रचनेतून गोल घुमट साकारला आहे.

गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर गरुड, हनुमंत, द्वारपाल व कमळ फुलांची नक्षी कोरलेली आहेत. ललाटबिंबावर गणेशाची मूर्ती आहे. त्याच प्रमाणे प्रवेशद्वाराच्या उजवीकडे भिंतीलगत छोट्या चौथऱ्यावरही गणेशाची काळ्या पाषाणातील मूर्ती विराजमान आहे. गर्भगृहात भद्रकाली देवीची स्वयंभू पाषाणमूर्ती आहे. या मूर्तीच्या शेजारी देवीची पितळेची उत्सवमूर्ती आहे. भद्रकाली देवीच्या मागील वज्रपिठावर काही स्थानिक देवतांच्या काळ्या पाषाणातील पुरातन मूर्ती आहेत. मंदिराच्या छतावर दोन थरात चौकोनी शिखर आहे. शिखराच्या दोन्ही थरांत देवकोष्ठके आहेत. शिखरावर शीर्षकमळ, त्यावर आमलक, आमलकावर चौक व चौकावर कळस आहे.

मंदिराच्या बाजूला १३ ओवऱ्या असलेली घडीव दगडात व हेमाडपंती स्थापत्य शैलीत बांधलेली धर्मशाळा आहे. देवी भद्रकाली मंदिरापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असलेले शिवमंदिर दाट वनात वसलेले आहे. देवी भद्रकाली मंदिरातील चैत्र नवरात्र, शारदीय नवरात्रौत्सव, दसरा, दिवाळी, शाकंभरी नवरात्र आदी वार्षिक उत्सव जल्लोषात साजरे केले केले जातात. उत्सवकाळात देवीची पालखी महादेवाच्या भेटीस जाते. वार्षिक उत्सवात अभिषेक, भजन, कीर्तन, जागरण-गोंधळ आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच भाविकांसाठी महाप्रसादाचेही आयोजन केले जाते. उत्सवकाळात हजारो भाविक येथे देवीच्या दर्शनासाठी तसेच नवस फेडण्यासाठी येतात.

उपयुक्त माहिती

  • भुदरगडपासून १९ किमी, तर कोल्हापूरपासून ८६ किमी अंतरावर
  • भुदरगड येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या पायरी मार्गापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
  • संपर्क : श्री. केसरकर, सचिव, मो. ९४०५२६५६२५
Back To Home