स्थापत्यशैली व शिल्पसौंदर्यासोबतच महाराष्ट्रातील मंदिरे ही लोकोत्सव व परंपरांसाठी सुध्दा प्रसिद्ध आहेत. मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करणारे दस्तऐवज जितके महत्वाचे तितकेच सामाजिक प्रथा व परंपरांच्या स्मृती जपणाऱ्या आख्यायिकासुध्दा समाज इतिहासाचा महत्त्वाचा भाग मानल्या जातात. असेच एक आगळी वेगळी आख्यायिका असलेले व त्या आख्यायिकेचे नाट्यरूपांतर साजरा करणारे महालक्ष्मीचे प्राचीन मंदिर कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज शहरात आहे. गडहिंग्लज येथील महालक्ष्मी देवी जागृत व नवसाला पावणारी असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.
या मंदिराची आख्यायिका अशी की तारुण्यात पदार्पण केलेल्या सटवाई देवीच्या मुलीला आपल्या भावी पतीविषयी कुतूहल निर्माण झाले होते. तेव्हा ‘तुझा भावी पती चर्मकार असेल’ असे भाकीत सटवाईने आपल्या मुलीस सांगितले. ते न रूचल्याने मुलगी महालक्ष्मी घरातून निघून गेली. वाटेत भेटलेल्या एका सुंदर तरुणाच्या ती प्रेमात पडली व त्यांचा विवाह झाला. काही दिवसांनी त्यांना एक मुलगा झाला. त्याचे नाव इंगळोबा. इंगळोबा खेळत्या वयाचा झाला, तेव्हा वडिलांबरोबर त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाण्याचा त्याने हट्ट केला. आपण काय काम करतो हे आईला न सांगण्याच्या अटीवर वडील त्याला कामाच्या ठिकाणी कार्यशाळेत घेऊन गेले.
तेथून परतताना त्या मुलाने बालसुलभ स्वभावाने त्याला आवडलेले चर्मबंध खिशात घालून आणले. घरी आल्यानंतर महालक्ष्मीला मुलाच्या खिशात ते चर्मबंध सापडले. ते पाहून तिला आपला पती चर्मकार असल्याचे समजले. पतीने ही गोष्ट आपल्यापासून लपवून ठेवली म्हणून ती संतापाने बेभान होऊन हाती तलवार घेऊन पतीला मारण्यासाठी त्याचा पाठलाग करू लागली. जीवाच्या भीतीने तिच्या पतीने रेड्याच्या गुदद्वारातून त्याच्या शरीरात प्रवेश केला. तेव्हा महालक्ष्मीने रेड्याचे शीर कापले आणि रेड्याच्या तुटलेल्या मानेतून बाहेर पडत असलेल्या आपल्या पतीचे शीर उडवले. या धावपळीत दोघांच्या मागे पळत सुटलेला इंगळोबा आपल्या आईला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. अखेर महालक्ष्मी शांत झाली. अशी ही आख्यायिका. महालक्ष्मी देवीच्या यात्रेच्या वेळी हे कथानक नाट्यरूपाने सादर करण्याची परंपरा शेकडो वर्षांपासून आजही येथे कायम आहे.
या आख्यायिकेनुसार, येथील महालक्ष्मी ही लोकदेवता आहे. सटवाई ही धर्मशास्त्रात क्षुद्र लोकदेवता मानलेली आहे. लोक आख्यायिकांनुसार ती मातंग ऋषींची कन्या आहे. तिच्या नावाचे षष्टी असे उन्नयन करण्यात आले आहे. डब्लू. जे. विल्किन्स यांच्या ‘हिंदू मायथॉलॉजी – वेदिक अँड पुराणीक’ या सन १९१३मधील ग्रंथानुसार, षष्टी ही विवाहित महिलांची पुत्रदात्री देवता आहे. ती बाळजन्मप्रसंगी साह्यकर्ती तसेच बालकांची रक्षकदेवता आहे. मांजर हे सटवाईचे वाहन आहे. म्हणूनच कोणतीही हिंदू विवाहित महिला मांजराला त्रास देत नाही. गडहिंग्लजची महालक्ष्मी ही या सटवाईची मुलगी मानलेली आहे. मात्र महालक्ष्मीच्या महिषासुरमर्दिनी रूपाची स्मृती या आख्यायिकेत तिने मारलेल्या रेड्याच्या रूपाने अवशिष्ट आहे.
महालक्ष्मीचे मंदिर हे गडहिंग्लज शहराच्या अगदी मध्यवर्ती भागात आहे. मंदिराभोवती आवारभिंत आहे व त्यातून प्रांगणात जाण्यासाठी दोन प्रवेशद्वारे आहेत. मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. मुखमंडपात चार नक्षीदार षट्कोनी स्तंभ आहेत. स्तंभांच्या गोलाकार पायावर कमळ फुलांची प्रतिकृती व शीर्षभागी कमळ नक्षी आहे. स्तंभांवर कणी व हस्त असून त्यावर छत आहे. छतास सभोवती उतरता सज्जा व वर मंदिरांच्या प्रतिकृती असलेला कठडा आहे. कठड्यात तिन्ही बाजूस देवकोष्टके व त्यात विविध देवतांच्या मूर्ती आहेत.
पुढे दोन पायऱ्या चढून सभामंडप आहे. सभामंडपात प्रत्येकी सात चौकोनी लाकडी स्तंभांच्या चार रांगा आहेत. स्तंभांवर तुळई व तुळईवर असलेल्या लाकडी पट्ट्यांच्या सांगाड्यावर सभामंडपाचे वर व खाली असे दोन भागात विभागलेले कौलारू छत आहे. छताच्या विभाजित रचनेमुळे सभामंडपातील हवा खेळती राहून गारवा निर्माण होतो. सभामंडपातील बाह्य बाजूचे स्तंभ भिंतीत असून कोकणी स्थापत्यशैली प्रमाणे स्तंभांच्या मधली जमीन काही इंच खोलगट आहे. त्यापुढे अंतराळ व गर्भगृह आहे. परंतु भाविकांना मात्र सभामंडपातूनच महालक्ष्मीचे दर्शन घ्यावे लागते. गर्भगृहाच्या रजतपटल आच्छादित द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी व ललाटबिंबावर गणेशमूर्ती आहे. गर्भगृहातील वज्रपिठावर महालक्ष्मी मातेची अष्टभुजा मूर्ती आहे. देवीच्या हातात त्रिशूल, खड्ग, ढाल, भाला आदी शस्त्र व एका हाताने असुर मुंड धरलेले आहे. डोक्यावर मुकुट, अंगावर उंची वस्त्रे व अलंकार परिधान केलेले आहेत. मूर्तीच्या मागील चांदीच्या प्रभावळीत मध्यभागी किर्तीमुख व आजुबाजुला पानाफुलांची नक्षी कोरलेली आहे. गर्भगृहाच्या छतावरही नक्षीदार घुमट आहे.
गर्भगृहाच्या छताला बाह्य बाजूस हस्त व त्यावर उतरता सज्जा आहे. छतावर चहूबाजूंनी कठडा, कठड्यात चारी कोनांवर चौकोनी स्तंभ व त्यावर कळस आहेत. स्तंभाच्या चारही बाजूंना देवशिल्पे कोरलेली आहेत. छतावर पाच थरांचे अष्टकोनी शिखर आहे. त्यातील पहिल्या थरात पानाफुलांच्या नक्षीचे रिंगण, वरील तीन थरात प्रत्येकी आठ देवकोष्ठके व त्यात विविध देवतांच्या मूर्ती आहेत. पाचव्या थरात उभ्या धारेची नक्षी असलेला आमलक व त्यावर कळस आहे.
सुमारे पंधरा वर्षांतून एकदा देवीचा तीन दिवसांचा यात्रा उत्सव साजरा केला जातो. यावेळी आख्यायिकेतील कथानक नाट्यरूपाने सादर केले जाते. यात्रेचा दिवस जाहीर झाल्यानंतर त्या दिवसापासून चार ते पाच महिने आधी पाटलांच्या वाड्यातील महालक्ष्मी देवीची उत्सवमूर्ती सुतार वाड्यात देवीच्या माहेरी जाते. तेथे मूर्तीची डागडुजी व रंगरंगोटी करून देवीचा माहेरवाशिणीप्रमाणे मानपान केला जातो. पतीने आपली फसवणूक केली म्हणून संतापलेली देवी सुतार वाड्यातून धावत सुटते व कुंभार वाड्यात येते. येथे देवी वाड्याच्या बाहेर थांबते. देवीचा मुलगा इंगळोबा यास वाड्यात नेऊन त्यास कुंची व अंगरखा घालून सजवले जाते. दिवट्या घेऊन चर्मकार बांधवांकडून देवीला शांत करण्याचा विधी होतो. रात्रभर देवीची मिरवणूक होते. यावेळी रेड्याचा बळी दिल्यानंतर पहाटे देवी मंदिरात स्थानापन्न होते. १५ वर्षांनी होणाऱ्या या यात्रेच्या वेळी महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, कर्नाटक व गोवा राज्यातूनही लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात.
याशिवाय मंदिरात चैत्र पाडवा, शारदीय नवरात्र, दसरा, दिवाळी व इतर सण उत्सवांचे आयोजन केले जाते. यावेळी देवी पालखी मिरवणुकीने ग्राम प्रदक्षिणा करते. सर्व उत्सवांचे वेळी परीसरात विविध वस्तूंची दुकाने सजून बाजारपेठेचे स्वरूप प्राप्त होते. उत्सवांच्या वेळी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.